31 May 2020

News Flash

वेध भवतालाचा : कविमनाची निसर्गरक्षक

आयुष्यातल्या या निसर्गरम्य अनुभवांवर अ‍ॅनने ‘वूड्सवुमन’ सह १६ पुस्तके लिहिली.

(संग्रहित छायाचित्र)

अर्चना जगदीश

अमेरिकेतील पर्यावरण संरक्षक आणि संवेदनशील लेखिका अ‍ॅन लबास्टील १९८० पासूनच वातावरण बदलाकडे जगाचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती. ट्विचेल सरोवराच्या काठावरच्या झोपडीत ती तब्बल ४० वर्षे एकटीच राहिली. तर अ‍ॅडरोंडॉक उद्यानाची अधीक्षक म्हणून तिने १९७५ ते १९९३ पर्यंत काम केलं. पानगळीचे रंग बघायला येणारे निसर्गप्रेमी पर्यटक, पर्वतराजीत भटकायला येणारे गिर्यारोहक आणि सरोवरात कनू घेऊन येणाऱ्या हौशी लोकांना मार्गदर्शक म्हणूनही ती काम करत असे. आयुष्यातल्या या निसर्गरम्य अनुभवांवर अ‍ॅनने ‘वूड्सवुमन’ सह १६ पुस्तके लिहिली. ‘नॅशनल जिओग्राफिक’सह अनेक मासिकं आणि नियतकालिकांमधून दीडशे लेख लिहिले आणि २०-२५ शोधनिबंधही.

निसर्गाच्या सान्निध्यात एकटंच कुठेतरी लांब, जंगलाच्या कडेला नाहीतर एखाद्या तलावाकाठी जाऊन राहावं आणि शहराच्या, माणसांच्या गोंगाटापासून दूर स्वत:बरोबर वेळ घालवावा असं आपल्यापैकी बऱ्याच निसर्गप्रेमींना अनेकदा वाटत असतं. अर्थात, आपण स्वीकारलेल्या जगण्यात हे असं जमतंच असं नाही, पण निसर्ग समजून घेण्यासाठी, माणसांच्या जगापासून आणि कोलाहलापासून दूर एकटीनं राहणं आणि तरीही निसर्ग संरक्षणासाठी, बदल घडवण्यासाठी काम करणं शक्य आहे का?

असं एकटय़ानेच निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं उदाहरण म्हटलं तर हेन्री वाईल्ड थोरो आणि त्याचं वॉल्डन तळ्याकाठचं चिंतन, माणसांबद्दलचा विचार आठवतो. नाहीतर योसेमिटीच्या परिसरात एकटय़ानेच दिवसचे दिवस राहून तिथला निसर्ग अगदी आत, मनात साठवून घेण्याचा आत्मानंद मिळवत असतानाच लागलेल्या विनाशाच्या चाहुलीने खिन्न न होता योसेमिटीच्या परिसरातील धरण थांबवण्यासाठी काम करणारा जॉन म्यूर आठवतो. मात्र स्त्रियांनी असं काही केल्याची उदाहरणं विरळाच. आफ्रिकेत जाऊन काम करणाऱ्या अनेक संशोधक या स्त्रिया असल्या तरी त्यांच्या निसर्गासोबत राहण्यामागे प्रजातीचा अभ्यास किंवा त्या प्रजातीचे संरक्षण करण्याची धडपड होती. शिवाय एखाद्या संशोधन किंवा संरक्षण प्रकल्पाचा भाग म्हणून जेन गुडाल, डायन फॉसी अशा धाडसी संशोधक आफ्रिकेत बराच काळ राहिल्या होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:चा शोध घेणं आणि लिहिणं, त्याचबरोबर निसर्गसंवर्धन आणि रक्षणासाठी काम करणं अशा आयुष्याची स्वत: निवड केलेल्या स्त्रियांची उदाहरणं जवळजवळ नाहीतच.

अमेरिकेतील पर्यावरण संरक्षक आणि संवेदनशील लेखिका अ‍ॅन लबास्टील म्हणजे; एखादी स्त्री स्वत:च्या जगण्याच्या तत्त्वांशी अजिबात तडजोड न करता जगापासून दूर रानात एकटं, आनंदी आयुष्य कसं जगू शकते याचं उत्तम उदाहरण होती. १९५५ मध्ये कॉन्रेल विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर लगेचच तिने आक्रमण करणाऱ्या प्रजाती (इनवॅसिव), त्यांचा वेगवेगळ्या अधिवासांवर होणारा परिणाम, आम्ल पाऊस या विषयांवर विचार मांडायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९६९ मध्ये तिने कॉन्रेलमधूनच वन्यप्राणीशास्त्रात पीएच.डी. मिळवली. त्याच सुमारास रॅचेल कार्सनच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ने बुद्धिवाद्यांना आणि संशोधकांना जाग यायला लागली होती. पर्यावरण या विषयाकडे जगाचं लक्ष वेधून घेणारी स्टॉकहोम परिषदही सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीलाच भरली होती. लबास्टीलसारख्या संवेदशील मनाच्या तरुणीवर या सगळ्याचा परिणाम न होता तरच नवल.

१९६० च्या सुमारास पदव्युत्तर अभ्यासाच्या निमित्ताने अ‍ॅन आणि तिचा नवरा मध्य अमेरिकेत मुख्यत: मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथे गेले होते. तिथे त्यांनी दुर्मीळ जायंट पाईड बिल्ड ग्रेब या पक्ष्यांचा अभ्यास केला. ग्वाटेमालामध्ये स्थायिक लोक त्याला आपल्या भाषेत ‘पॉक’ म्हणत. या पक्ष्यांचं एकमेव वसतिस्थान होतं ग्वाटेमालामधलं अतीतलान सरोवर. अ‍ॅनने या पक्ष्यांचा अभ्यास केलाच, पण पुढे एकटीने अनेकदा जाऊन स्थानिक लोकांबरोबर त्यांच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न केले, पण विकासकामे, वाढतं पर्यटन आणि मासेमारीच्या खेळासाठी तळ्यात आणून सोडलेले बाहेरचे मासे यामुळे पॉक पक्ष्यांचं वसतिस्थान आक्रसत गेलं. त्यांची पाण्यातल्या खाद्यासाठी स्पर्धा तयार झाली आणि शेवटी १९८० च्या सुमारास हे देखणे पक्षी पृथ्वीतलावरून कायमचे नाहीसे झाले. तिच्या धडपडीबद्दल आणि झोकून देऊन या पक्ष्यांची काळजी घेत असल्यामुळे स्थानिक लोक तिला ‘ममा पॉक’ वा या ‘ग्रेब बदकांची आई’म्हणत.

आपला ग्वाटेमालाचा अनुभव आणि ग्रेब्सना वाचवता आलं नाही याचं आंतरिक दु:ख, तसंच विकासाच्या नादात आपण सगळ्या पृथ्वीलाच विनाशाच्या खाईत लोटतो आहोत हे तिने तिच्या ‘ममा पॉक’ या १९९० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात पुन्हा पुन्हा सांगितलंय. पुढे ‘वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड’ आणि स्थानिक संस्था यांच्या मदतीने तिने ग्वाटेमाला आणि पनामामध्ये अभयारण्ये आणि संरक्षित प्रदेश तयार करण्यात आणि त्यांना सरकारी मान्यता मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अ‍ॅन आणि तिच्या नवऱ्याचं पटलं नाही कारण न्यूयॉर्कजवळच्या अ‍ॅडरोंडॉक पार्कमधल्या त्यांच्या मालमत्तेवर पर्यटन व्यवस्थापक म्हणून तिने काम करावं असा तिच्यावर दबाव होता. निसर्गाचा नाश करून पैसे मिळवणं, संपत्ती तयार करणं हे अर्थातच तिला मान्य नव्हतं. न चालणाऱ्या नात्यातून दूर व्हायचं होतं पण पार्कच्या वेड लावणाऱ्या निसर्गापासून दूर जायचं नव्हतं. मग विभक्त होऊन तिने अ‍ॅडरोंडॉक उद्यानाच्या पश्चिम परिसरात २० एकर जागा घेतली आणि तिथेच ओंडक्यांची एक केबिन बांधून ती एकटी राहायला लागली. ती स्वत: परिसंस्था अभ्यासक होती. आपल्या कारकीर्दीची पंधराहून जास्त वर्षे ती या उद्यानाची अधीक्षक म्हणून काम करत होती. चोवीस हजार चौरस मल पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात समशीतोष्ण कटिबंधातील जंगलं आणि डोंगररांगा आहेत. जागोजागी असलेली छोटी-मोठी सरोवरं आणि छोटय़ा दऱ्यांच्या या उद्यानात जगभरातून हजारो पर्यटक येतात, कारण हिवाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पानगळीआधी हा सगळा परिसर केशरी-किरमिजी-जांभळ्या-पिवळ्या-नारिंगी रंगाने भरून जातो. पानगळ सुरू होण्याआधी पानाचे रंग प्रत्यही बदलत असतात. हे सृष्टीवैभव दरवर्षी नवीन भासतं आणि म्हणूनच अ‍ॅन लबास्टीलने हाच परिसर निवडला.

ती एकटीच माणसांच्या कोलाहलापासून दूर एका छोटय़ाशा झोपडीत राहत होती आणि माणसांचं तिला वावडंच असलं तरी फक्त तिच्या अशा राहण्यामुळे विकासाच्या नादात वाहत चाललेल्या माणसांच्या जगाला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व कळणार नाही याची तिला जाणीव होती. म्हणूनच ती या विजनवासातून बाहेर पडायची, प्रवास करायची, व्याख्यानं द्यायची मात्र तिच्या पावलांना ओढ असायची ती तिची स्प्रूसची झाडं, माळरानं आणि तिला साद घालणाऱ्या रानव्याकडे परतायची. दुरून येणारे फिंच पक्ष्यांचे आवाज, ट्विचेल सरोवरावर उठणारे तरंग आणि सतत रंग बदलणाऱ्या आकाशचं त्यात पहुडलेल्या प्रतिबिंबाने ती हरखून जायची. ट्विचेल सरोवराच्या काठावरच्या झोपडीत ती तब्बल ४० वर्षे एकटी राहिली. अ‍ॅडरोंडॉक उद्यानाची अधीक्षक म्हणून तिने १९७५ ते १९९३ पर्यंत काम केलं. पानगळीचे रंग बघायला येणारे खरे निसर्गप्रेमी पर्यटक, पर्वतराजीत भटकायला येणारे गिर्यारोहक आणि सरोवरात कनू म्हणजे छोटी बोट घेऊन येणाऱ्या हौशींना मार्गदर्शक म्हणूनही ती काम करत असे.

पार्कमध्ये काम करत असताना क्षमतेचा विचार न करता सुरू असलेल्या आणि सतत विस्तारत जाणाऱ्या व्यावसायिक पर्यटनाला तिने नेहमीच विरोध केला. माणसांचा पायरव निसर्गाच्या संगीतात सहज मिसळून जाणारा असावा यासाठी ती आग्रही होती. पर्यटकांमुळे निसर्गावर अतिक्रमण होते आहे आणि हवे तेवढे पैसे घेऊन निसर्गाचं अद्भुत रूप फक्त बघायला येणाऱ्या लोकांवर तिचा थोडासा रागही होता. अनेकदा इतक्या प्रचंड उद्यानातले खासगी जमीनमालक आणि अ‍ॅनमध्ये खडाजंगी व्हायची. यावरूनच पार्कच्या व्यवस्थापनाबरोबरदेखील तिचा संघर्ष व्हायचा. पण ती नेहमी निसर्गाच्याच बाजूने उभी राहिली. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिचे पार्क व्यवस्थापनाबरोबर छोटय़ा छोटय़ा निर्णयावरून खटके उडत, पण तिचं प्रतिपादन निसर्गाबद्दलच्या आंतरिक ओढीतून आणि निसर्ग संरक्षणाच्या काळजीतून आलेलं होतं याची व्यवस्थापनाला जाणीव होती. म्हणूनच अधीक्षक म्हणून निवृत्त झाल्यावरदेखील व्यवस्थापक मंडळाची सदस्य म्हणून तिची सन्मानाने नियुक्ती झाली होती.

आपल्या ओंडक्यांच्या केबिनमध्ये बसून लिहिलेलं अ‍ॅनचं पाहिलं पुस्तक म्हणजे ‘वूड्सवुमन’. या पुस्तकाच्या लाखभर प्रती विकल्या गेल्या. याच नावाचे तिने पुढे आणखी तीन खंड लिहिले. मात्र पहिला खंड म्हणजे काहीशी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. कारण एखाद्या एकटय़ा राहणाऱ्या बाईचे असे थेट अनुभव लोकांना पचनी पडणार नाहीत, असं तिला वाटलं. ऐंशीच्या दशकातदेखील स्वत:बद्दल सांगणं तिला प्रशस्त वाटलं नाही. म्हणूनच तिच्या पुस्तकात तिने ट्विचेल सरोवराचं नाव ‘ब्लॅक बेयर लेक’ असं ठेवलं आणि पुढेही तेच कायम ठेवलं. एकटीने निसर्गाच्या सान्निध्यात प्रदीर्घ काळ राहण्याचे भावनिक अनुभव आणि जंगलातल्या पर्वतराजीतल्या भटकंतीतून मिळालेले अनुभव तिने या चार खंडांत दिले आहेत. अ‍ॅनने एकूण १६ पुस्तके लिहिली. ‘नॅशनल जिओग्राफिक’सकट अनेक दर्जेदार मासिकं आणि नियतकालिकांमधून दीडशेहून अधिक लेख लिहिले आणि २०-२५ शोधनिबंध. तिला १९८० पासून म्हणजे पॉक लुप्त झाल्यावरच जाणवलं होतं, की अभ्यास, संशोधन होत राहील पण जंगलं, पर्वत आणि माळरानं, त्यावर राहणारे पशू-पक्षी, कीटक आणि त्यांचे अधिवास  प्रत्यक्ष वाचवणं अधिक महत्त्वाचं, तातडीचं आहे.

पृथ्वीची आपण काळजी घ्यायला हवी हेच तिच्या सगळ्या पुस्तकांचं मूळ सूत्र आहे. शिवाय सर्व प्रजाती एकमेकांशी जोडलेल्या आहेत, आपणही त्या गोफाचा एक धागा आहोत. बुद्धी मिळाली असली तरी आपली जबाबदारी आपण विसरता कामा नये हेच ती आपल्या हळुवार निसर्गसंवादातून सांगत राहिली. त्या काळात म्हणजे १९८० पासूनच ती वातावरण बदलाकडे जगाचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती. सरोवराच्या काठी मोसमानुसार बदलणारा निसर्ग आणि त्याची रूपं यावर ती कविमनाने लिहीत राहिली. हिवाळ्यातल्या पानगळीनंतर गोठणाऱ्या दिवसांमध्ये सरोवरही हळूहळू पांढरंशुभ्र व्हायचं. वातावरण बदलाची चाहूल लागल्यानंतर तिने लिहिलं, ‘‘हिवाळ्याच्या सुरुवातीला सरोवराचं पाणी हळूहळू अभ्रकासारखं चमकायला लागायचं, बर्फाच्या पातळ थरातून खालचं पाणी दिसायचं. वाढत्या हिवाळ्याबरोबर तापमान खाली जायचं आणि संपूर्ण सरोवर गोठून जायचं. बर्फातले बूट घालून त्यावरून लांबवर फिरायला जाता यायचं अगदी क्षितिजाजवळ भासणाऱ्या पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत.. मात्र आता १९९५ नंतर मात्र तो भूतकाळ झाला आहे.’’

पुस्तकं आणि लिहिण्याच्या टेबलाबरोबरच तिच्या केबिनमध्ये भिंतीवर ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांनी दिलेल्या शाली, शिंगं हौसेनं लावून ठेवल्या होत्या. तिचा जीव शेवटपर्यंत रमला पार्कच्या निसर्गात, पानगळीत आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांची निसर्गाबद्दलची समज आणि अनुबंध यात. एकटीनं, जगाला आणि प्रगत जगातल्या माणसांना झुगारून जगायचं हा निर्णय तिने शेवटपर्यंत असोशीने पाळला. ती खूप पत्रं लिहायची, यापलीकडे आणखी सामाजिक वर्तुळ नव्हतंच तिला. कारण तिच्या ब्लॅक बेयर सरोवराच्या आसपासचं सगळं काही म्हणजे तिचं जग होतं. ती २०११ मध्ये न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयामध्ये  शहात्तराव्या वर्षी गेली. तेव्हाही ती एकटीच होती.

‘वूड्सवुमन’ या तिच्या पहिल्या पुस्तकात तिनं लिहिलं आहे, ‘‘मी माझ्या केबिनमध्ये जंगलं आणि पर्वतांमध्ये कुठेतरी एकटी, अणुमात्र आहे आणि इथे जीवनाला आदि-अंत नाही. पण अचानक सरोवरावर कुठूनतरी उडत आलेल्या पाकोळ्यांच्या पंख फडफडवण्यामुळे पाण्यावर तरंग उठतात, त्या वेळी त्या पाकोळ्यांच्या घिरटय़ा आणि तरंग बघताना मला वाटायचं, की हे उडणं, गिरक्या घेणं आणि तरंग म्हणजे नवी सुरवातच तर आहे!’’

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 1:36 am

Web Title: nature protector poet anne labastille abn 97
Next Stories
1 नात्यांची उकल : शारीर नात्याचा सहवास
2 पळा पळा दिवाळी आली..
3 अवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये
Just Now!
X