डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

माहिती-तंत्रज्ञान यातून जग जितकं जवळ आलं, सोपं झालं, खुलं झालं; तितकंच क्लिष्टही झालंय. एखादे महत्त्वाचे म्हणणे मांडण्यासाठी, बोलण्यापेक्षा या माध्यमांना वापरण्याची सवयही लागते. पण यात बुडून गेलेली मंडळी बऱ्याचदा एकटी पडलेली आढळतात. मुळात ही माध्यमे आहेत. उत्तर मिळण्याच्या, शोधण्याच्या जागा नव्हेत, इतके जरी लक्षात ठेवले तरीही, त्यांना नात्यांच्या मध्ये अडसर न होऊ देता उलटपक्षी नाती वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून नक्कीच वापरता येईल.

‘‘तुझं म्हणणं पटतंय, आज भेटूया.’’ माझ्यासमोर बसलेल्या विशीतल्या एका तरुणाच्या मोबाइलवर आलेला, त्याच्या आवडत्या व्यक्तीचा, त्याला हवा असणारा मेसेज वाचून, त्याचा चेहरा अचानक खुलला. अगदी काही क्षणांपूर्वी, आयुष्यात काहीच अर्थ नाही, कशातही रस वाटत नाही, हे सांगणारा तो; आता मात्र जग जिंकल्याच्या आविर्भावात माझ्याशी बोलत होता. त्याने अर्थातच त्याच्या या बदलाचे कारण मला नुसतेच सांगितले नाही, तर दाखवलेदेखील!

आश्चर्य आहे ना! माहिती-तंत्रज्ञान यातून जग जितकं जवळ आलं, सोपं झालं, खुलं झालं; तितकंच या सहज म्हणवणाऱ्या जगाच्या पाठीवर असणाऱ्या, आधीच अगम्य असणाऱ्या कित्येक समस्या क्लिष्ट झाल्या; त्यात काहींची भरही पडली. इथे या नवीन माध्यमांचे अनेक उपयुक्त कंगोरे, त्यांच्यामुळे आयुष्यात असणारी सुकरता हे निर्विवादपणे मान्यच आहे. पण नाण्याच्या अनेक बाजूंपैकी एक महत्त्वाची बाजू, जी सध्या सगळ्याच नात्यांमध्ये मोठय़ा अडसरासारखी उभी आहे, तिच्यावर प्रकाश टाकायचा हा प्रयत्न. अर्थात सातासमुद्रापार राहणाऱ्या अप्तेष्टांशी संवाद साधण्याचं कामही या माध्यमांमुळेच शक्य आहे, हे ही मान्य करायला हवे.

या माध्यमांचे व्यसन जडणे, किंवा फोमो (FOMO fear of missing out syndrome) सारखा आजार, विद्यार्थीदशेतील होणारे दुष्परिणाम, इत्यादी सर्वज्ञात असणाऱ्या कोणत्याही बाबी, पुन्हा लिहिण्याची गरज नक्कीच नाही, पण हातातून सतत रेतीसारखी निसटत जाणारी नाती, आणि ही माध्यमं यांची न पाहिलेली; किंवा कित्येकदा अनुभवूनदेखील अनुत्तरित राहिलेली काही गणितं; त्यांची उत्तरं मांडण्याचा हा प्रयत्न. एकाच लेखात सगळ्या बाबी लिहिणे अशक्य, म्हणूनच, काही महत्त्वाच्या बाबींचा कसा परिणाम होतोय ते  पाहायला हवं.

या सगळ्याच माध्यमांमुळे म्हणजेच, मोबाइल किंवा इतर साधने यांच्या काही इंचांच्या पडद्यांना, आपल्या भावना, विचार यांना हात घालण्याची थेट संधी मिळू लागली. यातून मूलत: सततच्या संपर्काची साधने उपलब्ध असल्याने, एक गैरसमज, सरसकट सगळ्या स्तरांत, वयोगटांत दिसतो. तो म्हणजे, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळेस, कोणत्याही ठिकाणी, आपण गाठू शकतो. किंवा तसा आपल्याला अधिकारच आहे. वैयक्तिक म्हणून प्रत्येकासाठी असणाऱ्या, सर्वच सीमा, मर्यादा यात पुसल्या जातात. किंवा त्या गरजेच्या आहेत हेच आपण विसरून जातो. त्याही पुढे जाऊन, जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी त्या ठिकाणी, त्या वेळेस नसेल, किंवा काही कारणास्तव अशा तऱ्हेने पोचणाऱ्याकडे तिचे दुर्लक्ष झाले तर तो एक मोठा गुन्हाच ठरावा. उदाहरणार्थ, ‘‘मला भूक लागली आहे, ताबडतोब जेवण तयार ठेव.’’ या किशोरवयीन, किंवा तरुण मुलाचा मेसेज जर आई-बाबांनी वाचलाच नाही तर नंतर एकच गहजब. किंवा ‘‘आज भेटता येणार नाही’’ हे न वाचल्यामुळे अकारण वाट बघत बसणे आलेच. किंवा ‘‘मला तुझी अमुक एक गोष्ट पटली नाही, बोलायचे आहे.’’ याला अपेक्षित प्रतिसाद नाही आला तर माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का, इथपासून ते बोलायचंच नसावं कदाचित, इथपर्यंत ग्रह होऊ शकतात.

अथवा मी सोशल मीडियावर अमुकतमुक लिहिलं होतं, त्यावर प्रतिसाद देण्याऐवजी दुसऱ्या कोणाच्या तरी लिखाणावर टिप्पणी केली, यातून दुखावले जाण्याच्या बाळबोध बाबी. किंवा आपल्याला काय म्हणायचंय हे स्पष्ट न सांगता, त्याविषयी एखादी ओळ लिहून, ते त्या विशिष्ट व्यक्तींना समजावे अशी अपेक्षा, ती न कळल्यास त्यातून येणारी निराशा.

सुपरफास्ट म्हणवणाऱ्या या जगात, या अशा एखाद्या चुकून निसटलेल्या प्रतिसादाची गैरसमजांमुळे मोठ्ठी किंमत मोजावी लागते. परिणामी, स्वत:च्या इच्छेविरुद्ध जाऊनही बऱ्याचदा अक्षरश: जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सतत केवळ गैरसमज टाळण्यासाठी संपर्कात राहणाऱ्यांची, त्यातूनही ताण निर्माण होणाऱ्यांची संख्या कमी नाही.

यातून आपण सगळेच एका भ्रमविलासात जगत राहतो. तो म्हणजे हीच खरी नाती, किंवा हाडा-मांसाच्या माणसांच्या नात्यांपेक्षा बोटांच्या खेळात सामावलेले विश्वच खरे, सच्चे! त्यातून खऱ्या म्हणवणाऱ्या संवादांची गरज ती काय? इकडे प्रवास चालू होतो. किंवा एखादे महत्त्वाचे म्हणणे मांडण्यासाठी, बोलण्यापेक्षा या माध्यमांना वापरण्याची सवयही लागते. पण यात बुडून गेलेली मंडळी बऱ्याचदा एकटी पडलेली आढळतात. या सगळ्या गदारोळात, खरी नाती तयार करणे, त्यासाठी आवश्यक तितका वेळ देणे, हे सगळंच आपण विसरत चाललोय का?

एक आजी नेहमी सांगायच्या, आमच्या वेळेस हे मोबाइल नव्हते त्यामुळे, नवरा-बायकोत सकाळी भांडण झालं, की संध्याकाळी घरी येईपर्यंत दोघांना ओढ लागलेली असायची. ऑफिसात काम करणारा नवरा विचार करायचा, बायको सकाळपासून त्याच विचारात असेल, तर बायको विचार करायची, नवऱ्याला काम कसं सुचलं असेल? संध्याकाळी, आपसूकच, दोघेही विरघळून, काय झालंय हे विसरून जायचे.

या माध्यमांमुळे, अतिशय मारक गोष्ट घडली ती म्हणजे, ‘आत्ताच’.. चा जन्म! म्हणजे ‘आत्ताच’ खायचं, ‘आत्ताच’ विकत घ्यायचं, इथपासून ते ‘आत्ताच’ मत्री, ‘आत्ताच’ प्रेम, आणि महत्त्वाचं ‘आत्ताच’ ताबडतोब बोलणं किंवा भावना व्यक्त करायच्यात असं वाटणं. काही विचार, कल्पना, आयुष्यात येणाऱ्या संधी यांच्यासाठी बऱ्याचदा हा ‘या क्षणाचा’ नियम लागूही पडत असेल, परंतु तो सर्वत्र राबवणे नक्कीच अयोग्य!

जेव्हा आपण भावनांविषयी बोलतो, तेव्हा आपसूकच त्यासोबत येतात ते विचार. काही प्रसंगी, काहीही बोलण्याआधी, व्यक्त होण्याआधी बराच काळ विचार करणं, त्याक्षणी असलेली, वाटणारी भावना सर्व बाजूंनी पडताळून पाहणं आणि महत्त्वाचं धीर धरणं अपेक्षित असतं. धीर धरणं हे तर जणू कालबा झाल्याप्रमाणे, सध्या आपण या माध्यमांमुळे एका काल्पनिक तितक्याच वेगवान आयुष्यात; मनाने, विचाराने आणि भावनांनी पोहोचून, कित्येकदा निष्कर्ष काढूनही मोकळे होतो. नीट विचार केल्यास लक्षात येईल, या ताबडतोब येणाऱ्या प्रतिक्रिया, वाद-प्रतिवाद, किंवा केवळ व्यक्त व्हायचंय म्हणून बोलल्या गेलेल्या कित्येक गोष्टींच्या मुळाशी विचार असतच नाहीत, मात्र त्याचे परिणाम भयंकर असतात. ते रेंगाळत राहतात, तर कधी कायमचे रुजतात. त्यातून नाती निकालात नाही निघाली तरच नवल! आता इथे, हे सगळं गणित केवळ तरुण पिढीशी निगडित आहे असा चुकूनही विचार करू नये. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या माध्यमांच्या मार्फत पोरकटपणाने व्यक्त होणारे कित्येक प्रौढ किंवा ज्येष्ठ व्यक्ती आजूबाजूला सहज दिसतील.

आम्ही डॉक्टर्स बऱ्याचदा हा सल्ला देतो, आपल्या भावनांचा पूर्ण निचरा होऊ द्या, त्या दडवू नका. परंतु यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कशा पद्धतीने व्यक्त होतायत आणि आपल्याइतक्याच इतरांच्या भावनाही महत्त्वाच्याच आहेत हेही. नात्यातील एखाद्या व्यक्तीचा राग आला, वाईट वाटले, मग ते कोणीही असो, आई-वडील, स्नेही, भावंडे, इतर गोतावळा; आपण या माध्यमातून तत्क्षणी व्यक्त होत, एखाद वेळेस काय वाटतंय याचा निबंध लिहून मोकळे होतो. ते खरंच तितकं गरजेचं आहे का? मान्य, एखाद्या व्यक्तीला बोलण्यापेक्षा लिहिण्यातून व्यक्त होता येत असेल, काय म्हणायचं हे सांगता येत असेल, तरीही त्यासाठी या जागा अयोग्यच, हा नियम केला तर जास्त सोपं होईल. व्यक्त होण्याची सगळीच भूक भागली असती, तर काही महत्त्वाच्या प्रसंगी, महत्त्वाचे निर्णय घेताना आजही लोकांना प्रत्यक्ष भेटीची गरज वाटलीच नसती.

बऱ्याचदा, या अशा वेळेस मला काय म्हणायचंय यामध्ये, समोरचा ऐकतोय का, आणि ते पोचतंय का हेच आपण विसरतो. ज्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांच्याही, त्या वेळेस असणाऱ्या परिस्थितींचा विचार करणे आणि सर्वच अतिशय जवळच्या नात्यातसुद्धा एक मर्यादा पाळणे गरजेचे असते. वैयक्तिक बोलताना, होणारी देवाणघेवाण यातून खरेतर प्रश्न सुटतात. ती या माध्यमातून कशी साधता येईल? इथे बोलताना विचार एकांगी असू शकतात, शिवाय यातून सारे काही सुस्पष्ट होईल असेही नसते. सहज उपलब्ध आहे म्हणून, भावनांचा निचरा करण्यासाठी, किंवा महत्त्वाचे विषय बोलण्यासाठी या माध्यमांना न वापरलेलेच बरे. त्यातून होणाऱ्या गैरसमजांचा प्रश्न कायमचा सुटेल.

‘आत्ताच’चा अट्टहास सोडला, तर अजून एका गोष्टीचा फायदा होतो. आपला मेंदू, भावना, विचार सारे काही, त्या एका क्षणात ज्या टिपेला पोचलंय तिथून त्याला शांत होण्यासाठी, सारासार विचार करण्यासाठी, निवण्यासाठी जरासा वेळ मिळतो. मग कदाचित काही बाबी कमी महत्त्वाच्या वाटतात, किंवा त्या बोलण्यापेक्षा, व्यक्ती महत्त्वाची वाटते. त्यामुळे चुकून झालेले मतभेद भांडणापर्यंत पोहोचत नाहीत.

‘आत्ताच’चे उत्तम उदाहरण, म्हणजे, रस्त्यात होणारी रहदारी किंवा इतर कारणांवरची भांडणे. इथे एक लक्षात येईल, केवळ माझा मुद्दा बरोबर आहे, हेच पटवण्याचा प्रयत्न असतो, निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा नाही. सततचा अस्थिरपणा, न्यूनगंड, अति रागाच्या समस्या, एकंदर नात्यांविषयी, स्वत:विषयी भ्रामक समजुती, त्यातून पटापट तुटणारी नाती या साऱ्यांचा जन्म नाही म्हणायला या ‘आत्ताच’ संस्कृतीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

आता या माध्यमातून अजून एक भयंकर प्रकार समोर येतो, तो म्हणजे, जाती, धर्म, राजकारण यावर नको इतके कडवे विचार, त्यातून दुभंगणारा समाज, त्यावरील तीव्र मतांचा पाऊस, आणि कशाचीही तमा न बाळगता केलेले हल्ले. यातून कित्येक मनं दुखावली जातात. कित्येकदा, लिहिलेला लेख, किंवा एखाद्याचे व्यक्त होणे, वैयक्तिक टिप्पणीसारखेही घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातून मत्रीत, नात्यात वितुष्ट येऊन तीही तुटलेली आढळतात.

इथेही दोन्ही बाजूंनी सारासार विचाराचाच अभाव!

पण या माध्यमांना इतक्या खलनायकी भूमिकेत टाकताना एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. खरेतर त्यांच्यामुळे समोर येते ती प्रत्येक व्यक्तीत दडून राहिलेली मूळ वृत्ती, क्वचित प्रसंगी कधीही न दिसलेला कंगोरा. इतरांच्या लेखी आपले महत्त्व किती, हे सतत जोखून पाहण्याची वाढीस लागलेली मानसिकता, त्यातही स्पर्धा. थोडक्यात स्वत:पेक्षा इतरांच्या मतांना आपल्यालेखी असलेली किंमत. आपली एकंदरीत जडणघडण, दृष्टिकोन, सारेच! कित्येकांचे खरे, तर कित्येक बेगडी चेहरे!

मुळात ही माध्यमे आहेत. उत्तर मिळण्याच्या, शोधण्याच्या जागा नव्हेत, इतके जरी लक्षात ठेवले तरीही, त्यांना नात्यांच्या मध्ये अडसर न होऊ देता उलटपक्षी नाती वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून नक्कीच वापरता येईल.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com