News Flash

शांततेचं गढूळ सावट

नात्यांची उकल

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या म्हणाव्या तर विचित्र आणि म्हणाव्या तर वयानुरूप, त्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्य-अस्वास्थ्यानुसार असलेल्या सवयी आणि त्यातून रोजच निर्माण होणाऱ्या प्रसंगातून वादाला, भांडणाला सुरुवात होते. कित्येकदा हे सगळंच अगदी ‘घर कोणाचं’, ‘कोणी कोणाला काय सांगायचं’ इथपर्यंत येऊन पोहचतं. सगळी शांतता गढूळ होते आणि त्याचं सावट अर्थातच घरात, माणसांच्या मनात, आजूबाजूला रेंगाळत राहतं. अशा वेळी कोणी कुणाला समजून घ्यायचं?

‘‘डॉक्टर, हे आमचे बाबा, ऐकायला कमी येतं. आम्ही आत्ता जिथे राहतोय, तिथे राहणं यांच्यामुळे अगदी कठीण झालंय. रोज खिडकीतून खाली हात धुतात. कितीदा सांगितलं तरीही ऐकत नाहीत.’’ पन्नाशी उलटलेली एक सून नव्वदी ओलांडलेल्या सासऱ्यांविषयी त्राग्याने बोलत होती. सुनेला असं वाटत होतं, की आजोबांशी मी डॉक्टर म्हणून बोलले तर ते कदाचित माझं ऐकतील. प्रतिष्ठित परिसरात राहणाऱ्या सुनेचा त्रागाही योग्य होता आणि आयुष्यभर कोकणातल्या मोकळ्या आवारात, निसर्गाच्या सान्निध्यात राहिलेल्या आजोबांची अशी हात धुण्याची सवय देखील!

‘‘माझ्या आईला काही कळतंच नाही. कितीदा सांगितलं, की ब्लाऊज नसेल घालायचा तर ठीकच, पण अंगावरून नीट पदर घेत जा. घरात वयात आलेली मुलं आहेत माझी.. मलाच अवघडल्यासारखं होतं.’’ या आजींचे वय ८५. त्यांना झालेल्या एक प्रकारच्या त्वचाविकारामुळे त्यांना अंगावर कपडे नकोसे वाटायचे. घरात बसल्या बसल्या त्या कायम उघडय़ा अंगावर वारं घेत राहायच्या.. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या म्हणाव्या तर विचित्र आणि म्हणाव्या तर वयानुरूप, त्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्य-अस्वास्थ्यानुसार असलेल्या सवयी आणि त्यातून रोजच निर्माण होणारे काही प्रसंग! हे नुसतं इथेच थांबत नाही, तर त्यातून वादाला, भांडणाला सुरुवात होते. कित्येकदा हे सगळंच अगदी ‘घर कोणाचं’, ‘कोणी कोणाला काय सांगायचं’ इथपर्यंत येऊन पोहचतं. सगळी शांतता गढूळ होते आणि त्याचं सावट अर्थातच घरात, माणसांच्या मनात, आजूबाजूला रेंगाळत राहतं. यात महत्त्वाचा भाग, तक्रार करणारी मंडळीच बऱ्याचदा या वयोवृद्ध पालकांना सांभाळत असतात, देखभाल करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांनाही ही सततची भांडणं नकोशी झालेली असतात. परंतु तरीही ती काही अंशी अटळ होऊन बसतात. असं का?

याचं महत्त्वाचं कारण, म्हणजे मुलं, मुली, सुना, जावई सगळेच वयाने ५५ किंवा ६० दरम्यानचे आणि वडीलधारी मंडळी ८५-९०च्या  घरातली. नातवंडे ३०-३५ ची आणि त्यात, पतवंडेही वय वर्षे ३ ते ५ मधली. यातून एक  प्रश्नचिन्ह उभं राहतं, काय आणि कसं करायचं? यावर दुसऱ्यात टोकाला बसून आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा दोन शब्दांत हा विषय संपवतो, ‘समजून घ्या!’ तिथे ही वयस्क मंडळी आणि घरातील चिमुकले मंडळ सोडले तर बाकी सगळ्यांचेच चेहेरे एका क्षणात खाडकन उतरतात. त्या चेहऱ्यांवर ‘शक्यच नाही’ इथपासून, ते ‘तुम्हाला काय जातंय सांगायला’, ‘रोज असं तुमच्याकडे कोणी असेल तर कळेल’, किंवा ‘जाऊ दे बोलण्यात काहीच अर्थ नाही!’, इथपर्यंत कित्येक प्रतिक्रिया येतात.

आता आपण वर सांगितलेले वयोमान काळजीपूर्वक बघितले तर घरातल्या मधल्या फळीची अवस्था खरोखर अवघड म्हणावी अशीच! पन्नाशीनंतर, स्वत:च्या कमी होत चाललेल्या शारीरिक क्षमता, त्यातून सध्याच्या जीवनशैलीमुळे किंवा त्याशिवायही मागे लागलेल्या अनेक व्याधी, जीवनशैली टिकवण्याचा वाढता ताण, नवीन-जुनी नाती टिकवत पुढे चालत राहणे; या सगळ्यांचाच एकत्रित परिणाम म्हणून यांचा विचार होणे आवश्यक. ही मधली फळीच पुढच्या आणि मागच्या पिढीतला दुवा! त्यामुळे नुसते ‘समजून घ्या.’ इतकं सांगून नक्कीच भागणार नाही. विस्ताराने हा विषय समजावून घेतला तर मात्र कदाचित थोडासा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत होईल.

वृद्धापकाळ आणि बालपण यांची सांगड आपण वर्षांनुवर्षे घालत आलो आहोत. त्याचं इष्ट कारण म्हणजे बऱ्याच अंशी या दोन्ही अवस्थांमध्ये असणारे साधम्र्य! शारीरिक दुर्बलता, मानसिक असमानता, विचारात, भावनांमध्ये उडणारा गोंधळ, कमी झालेले तारतम्य. परंतु यातील काहीही स्वीकारण्याची अजिबातच तयारी नसण्याची अवस्था म्हणजे वृद्धापकाळ. शिवाय इतकं सगळं असूनही घरातील कत्रेपणाचे पद न सोडण्याची विचित्र मानसिकता! यामागे संपूर्ण घरावर, कुटुंबावर असलेला आपला दरारा, वचक कुठेही कमी होऊ नये हे अध्याहृत. सर्व मंडळींच्या लेखी आपल्याला असणारा आदर, त्याला कुठेही धक्का लागू नये, म्हणून हट्टीपणाने आपण आजही कसे सक्षम आहोत हे दाखवत राहण्याची धडपड! यातूनच असे कितीतरी ‘मजेशीर’ प्रसंग रोज घडायला सुरुवात होते. यातला ‘मजेशीर’ हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरण्याचं कारण, म्हणजे बालपणातल्या सगळ्याच कृती याच एका शब्दाखाली आपणच छानपैकी झाकून टाकतो, नव्हे तर त्यातून आनंद घेतो. इथे बालपण म्हणजे साधारण ३ वर्षांपर्यंतची मुले आणि त्यांचा एकंदरीत खोडकरपणा, बाललीला हे सगळं डोळ्यासमोर आणल्यास समजणे सोपे होईल.

परंतु वयस्क, वृद्ध मंडळींबाबत मात्र आपले नियम वेगळेच असतात. लहान मुलाने अनावधानाने किंवा अजून समजत नाही म्हणून कोणत्याही ठिकाणी काही नैसर्गिक क्रिया, जसे मल-मूत्र विसर्जन केले, तर आपण ते गृहीत धरतो. तसेच मुलांचे इतरही कितीतरी उपद्रव, केवळ आपल्या मानसिकतेने गृहीत धरलेले असतात, म्हणून ते मान्य करणे सोपे जाते. तीच आणि तशीच बाब, अत्यंत वृद्ध मंडळींच्या बाबतही लागू करता येईलच.

आजोबा संडासात जाताना कडी लावतच नाहीत, हे लक्षात आल्यानंतर, त्यांना रोज त्यावरून चिडचिड करत बोलण्यापेक्षा, घरातील इतर सर्वानीच दार हळूच ढकलून बघण्याची सवय लावून घेतली, तर उत्तम! हीच गोष्ट, त्यांच्या इतर काही सवयींच्या बाबत. आपल्या दृष्टीने त्या फुटकळ, निष्कारण असू शकतील. परंतु त्यांच्या दृष्टीने त्या त्यांच्या फार काही न घडणाऱ्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असू शकतील. जसे की, घरातील दरवाजाची कडी सतत उघडणे – लावणे, घरात उगाच येरझाऱ्या घालणे, कोणाच्याही खोलीत कधीही बिनदिक्कत शिरणे किंवा उगाच चौकशा करणे, यातले काहीही!

बऱ्याचदा यामागे काही मासिकता असते. वर सांगितलेल्या उदाहरणात कडी न लावण्यामागे आपल्या वयामुळे, कधीही काहीही होऊ शकेल ही सततची भीती, तसे झाल्यास आपण आतच अडकून राहिलो तर काय घडेल? मदत मिळेल का? इतरांना समजेल का? ही असुरक्षितता! घरात माणसं आहेत का हे बघण्यासाठी उगाच खोलीत डोकावण्याची मानसिकता. यातील काही सवयी या चीड आणणाऱ्या नक्कीच असतात. म्हणजे एखाद्या घरात, आजोबांचा फोन आल्यानंतर नातवंडं बाहेर असतील तर, बोलण्याचे विषय बाजूला राहून, ‘नव्या पिढीला कशी शिस्त नाही’, किंवा ‘मोठय़ा माणसांचे कसे लक्ष नाही’, वगरे बौद्धिकं घडतात. अशा वेळेस, खरे तर, नातवंडांशी बोलण्याची आस आणि ते न झाल्यामुळे वेगळ्याच पद्धतीने व्यक्त होणारी हतबलता असते.

हा सगळाच विचार करताना, आपण इथे काही कारणांमुळे दूर असणाऱ्या, राहणाऱ्या वृद्ध मंडळींचाही विचार करू या. जसे की, घरात पटत नाही, वाद होतात, म्हणून गावी राहणारे किंवा वेगळे घर घेऊन राहणारे, स्वखुशीने वृद्धाश्रमात राहणारे किंवा हट्टाला पेटून, आपल्या वडिलोपार्जित जमिनीची राखण करत तिथेच राहणारी मंडळी! तिथे तर अजून काही समस्या असतात. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना अचानक काही झाल्यास पटकन उपचार मिळावेत ही घरातल्या इतर माणसांची कितीही इच्छा असली तरीही या वयस्क मंडळींच्या दुराग्रहापुढे हात टेकावेच लागतात. तिथे बऱ्याचदा सतत आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडे हवे तसे लक्ष देऊ शकत नाही हे शल्य बोचत राहण्याची किंवा कुठेतरी कमी पडतोय असे वाटण्याची, त्यातून मानसिक ताण येण्याचीही शक्यता असते. परंतु अशा वेळेस, त्यांना जसे हवे आहे तसे ते आपल्या उर्वरित आयुष्यात आनंदाने राहात आहेत हे स्वत:ला समजावणे उत्तम! कारण कदाचित त्यांचा सर्वतोपरी विचार करून आपण त्यांना आपल्याजवळ ठेवण्याचा अट्टहास केलाच तर त्यांना कैदेत टाकल्याप्रमाणे वाटू शकते.

आता या सगळ्याच बाबीत ताण न येऊ देता मजा कशी घेता येईल? किंवा सोडवण्यासाठी अगदीच अशक्य वाटणाऱ्या या कोडय़ातून बऱ्यापैकी कसा मार्ग काढता येईल? बऱ्यापैकी म्हणण्याचे कारण असे, की कोणतेही नाते हे शंभर टक्के आदर्श, किंवा ‘हवे तसे’ या सदरात येऊच शकत नाही किंवा या किंवा अशा काही समस्यांवर त्यातल्या त्यात सोपे, अमलात आणता येण्यासारखे उत्तर शोधावे लागते. याबाबत या वयोवृद्ध मंडळीच्या सवयी, त्यांचं विचित्र वागणं, सगळंच अत्यंत सहजतेने घेऊन, आपण याचं उत्तर शोधू शकतो.

लहान मुलांसाठी काही काळापर्यंत, वागण्या – बोलण्याचे कोणतेही नियम, बंधने आपण गृहीत धरत नाही. अगदी तसेच या वयोवृद्ध मंडळींच्या आसपासचे वातावरण ठेवले, तर हे शक्य होते. त्याविषयी कोणत्याही प्रकारची लाज वाटणे किंवा आपल्या सामाजिक, आर्थिक, एकंदरीत व्यावहारिक परिस्थितीशी त्यांच्या वागण्याचा आपल्या मनात असलेला संबंधच आपण पुसून टाकला, तर हेच आपल्याला वेगळ्या पद्धतीने अर्थात ‘मजेशीर’रीत्या दिसेल. कदाचित म्हणूनच नातवंडे आणि आजी-आजोबा यांचे वेगळे नाते असते. कारण बहुतांश वेळा नातवंडे, त्यांच्याकडे आपसूकच केवळ प्रेमभावनेने पाहतात. आजी-आजोबांनाही नातवंडांसोबत जास्त मोकळीक, जवळीक वाटते. तिथे त्यांना अमुक एका परिघात, तमुक एका पद्धतीने आणि वयाच्या दडपणाखाली वागण्याची गरजच नसते.

वयस्कांच्या एककल्ली वागण्यामध्ये, किंवा न ऐकण्यामध्ये, रुसून बसण्यामध्ये, बऱ्याचदा आपले नकळत होत असलेले दुर्लक्षही कारणीभूत असते. महिन्यातून तीनदा फोन करणाऱ्या मुलाने, मुलीने एकदाच फोन केला तर त्यावर नाराजीचेच सूर दिसतात. अशा वेळेस ‘हे असलं ऐकण्यासाठी कशाला फोन करा?’ असा विचार केला जातो, पण त्यापेक्षा सतत फोन करून जर आपण बोललो, त्यांचा लहान मुलांसारखा रुसवा काढला, तर त्यांचा राग निवळतो. त्यांच्या दृष्टीने तो एक फोन हेच त्यांच्या पुढच्या कमीत कमी दोन महिन्यांच्या करमणुकीचे साधन असेल तर?

एक साधा विचार केला आणि कृतीतून अमलात आणला, तर आपल्यासाठी अजून सोपे होईल, तो म्हणजे, जसे लहान मुलांसमोर आपण सपशेल माघार घेतो, तशीच इथेही घ्यावीच लागते- तीही आपल्याच मन:स्वास्थ्यासाठी! ज्यावेळेस त्यांच्या काही कृती, सवयी आपल्या दृष्टीने लाजिरवाण्या, आक्षेपार्ह असतील, त्यावर तिथेच मनापासून हसून, ‘अहो होतंच, असू द्या.’ किंवा ‘असं झालं का? बरं- बरं.’ या प्रकारचं बोलणं आपल्याकडून वारंवार यायला लागलं तर तेही त्यांना जमेल तितका प्रामाणिक प्रयत्न करून त्यांच्यामुळे आपल्याला होणारा त्रास कसा कमी करता येईल हे पाहतात. या प्रक्रियेत आजूबाजूच्या लोकांना, शेजाऱ्यांनाही सहभागी करून घेतलेले उत्तम. म्हणजे एकंदरीत सगळीकडेच त्यांच्यासाठी शंभर टक्के नसले तरीही, काही अंशी स्वागतार्ह वातावरण तयार होते. त्यातून त्यांना हवा असणारा आदर जपला जातो.

अगदी सुरुवातीला दिलेल्या उदाहरणात, मी त्या सूनबाईंना खिडकीत एक कुंडी ठेवायला सांगितली. शिवाय खालच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांना त्यांची परिस्थिती समजावून सांगितली, तसे रोज शेजारीच विचारायचे, ‘‘काय आजोबा, आज आमच्या गुलाबाला पाणी नाही घातलंत तुम्ही?’’

सगळ्यात महत्त्वाची बाब, या वयस्क स्थितीत त्यांनाच ‘समजून घ्या’, किंवा ‘असे वागू नका’, ‘त्रास देऊ नका’ हे सांगून काय उपयोग? त्यातून रोजच होणारी भांडणे तशीच चालू राहतील. त्यापेक्षा आपणच त्यांना समजून घेतलेले बरे. ते करताना ते सहजतेने केले तर त्याचाही ताण राहणार नाही. करून तर पाहू या!

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:05 am

Web Title: natyanchi ukal article by dr urjita kulkarni 5
Next Stories
1 आत्मभान येणे गरजेचे
2 रंगभूमीवरील अमीट छाप
3 ती ‘राज’कर्ती व्हावी.!
Just Now!
X