डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

कोणत्याही समूहात जगताना किंवा अगदी दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, काम करत असतील तर मतभेद हे आलेच. त्यातून भांडण होणं हेही साहजिकच. मात्र त्याचं स्वरूप काय, आणि नंतर त्याचे दूरगामी परिणाम काय, हे फार महत्त्वाचं. साध्या भांडणातून कायमची दुरावलेली नाती तर किती तरी. एकमेकांचं तोंड बघण्याचीसुद्धा इच्छा नसणारे तर पावलागणिक भेटतील. म्हणून अपरिहार्य भांडण कराच, पण..

विमलताई आणि त्यांचे यजमान यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि विमलताईंची पंचाहत्तरी, अशा खास कौटुंबिक सोहळ्यातला एक प्रसंग. मुलं, मुली, सुना, जावई, नातवंडं यांच्यासह आप्तेष्ट, स्नेही यांची गजबज, गप्पा-गोष्टी या साऱ्यांनी तो सोहळा अक्षरश: रंगलेला. उभयतांना वेगवेगळ्या भेटी देण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी. यात एक सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे, दोघेही अत्यंत उत्साही, हसरे आणि एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले. सगळ्यांचं स्वागत करत समारंभाचा आनंद घेत होते. दोघांनाही त्यांचे अनुभव सांगण्याचा आग्रह झाला आणि दोघांनीही आपसूक एकमेकांकडे पाहून, छानसं हसून हलकीशी मंजुरी घेतली. काकांनी सरळ प्रश्न केला, ‘‘तुमच्यापैकी किती नवरा-बायको कचाकचा भांडतात?’’ हे ऐकून अर्थातच हशा पिकला.

काका पुन्हा म्हणाले, ‘‘अहो, खरं विचारतोय, नवरा-बायकोच कशाला? भावंडं, मित्र-मत्रिणी, मुलं आणि तुम्ही अशी तुमची जोरदार जुंपते की नाही?’’ हे ऐकल्यावर आजूबाजूचा जमाव काका काय म्हणतायत हे गांभीर्यानं ऐकायला लागला. ‘‘मस्त भांडायचं, अगदी भरपूर, सगळ्यांशी. आम्ही तर भांडायचो बुवा. म्हणून तर इथवर आलो. नाही तर जरा मिळमिळीत संसार झाला असता. काय हो!’’ असं म्हणून त्यांनी विमलताईंकडे पाहिलं. ताईंनी काकांच्या हातावर टाळी देऊन आपलं अनुमोदन दर्शविलं.

किती खरं आहे हे. जसं कोणत्याही नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, ममता, काळजी हे अविभाज्य घटक; अगदी तसंच भांडण, मतभेद हेही असायलाच हवेत नाही का?

‘भांडण’ हा शब्द जरी उच्चारला तरीही अंगावरून पाल झटकून टाकावी तशी कित्येकांची प्रतिक्रिया असते. ‘‘भांडण? छे छे, आम्ही नाही भांडत. ते सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही.’’ वगैरे सहज ऐकायला मिळतं. एकमेकांची अनुरूपता तपासण्यासाठी किंवा त्याच्यामुळे सहजीवनात सातत्याने काही तरी समस्या येतात म्हणून काही जोडपी मार्गदर्शनासाठी, उपचारांसाठी येतात. त्या वेळेस आपण व्यक्ती म्हणून कसे आदर्श आणि दोषविरहित वगैरे आहोत हे दाखवण्याकडे सर्वसाधारण अनेकांचा कल असतो. तिथं अर्थातच आपण भांडतो म्हणजे या आदर्श असण्याच्या मूळ संकल्पनेला छेद देणारी काही तरी वर्तणूक आपल्याकडून होतेय, त्यामुळे हे होत असलं तरीही मला अमान्य आहे, अशा कुठल्या तरी, भ्रामक स्वत:च्याच वागणुकीला पर्यायाने स्वत:ला नाकारणाऱ्या जगात ही मंडळी जगतात. यातून समस्या सुटण्यापेक्षा बऱ्याचदा अजून गुंतागुंतीची होते. पेक्षा जे घडतंय ते आणि आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारायला शिकलो तर आता यात बदल करावे लागतील का? करायचे असतील तर कसे? असे साधे प्रश्न समोर उरतात. तिथं माझ्या वागण्यात बदल केल्याने केवळ मीच नाही, तर माझ्या आजूबाजूचं वातावरण बदलेल, इतरांना कमी मनस्ताप होईल हे अध्याहृत असतंच.

सत्य परिस्थिती अशी की, आपण सगळेच भांडतो. परिस्थिती, जागा, पद्धत, भाषा, कारण, विषय, इत्यादी हेच काय ते व्यक्तीपरत्वे बदलते. कोणत्याही समूहात जगताना, किंवा अगदी दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, काम करत असतील तर मतभेद हे आलेच. त्यातून भांडण होणं हेही साहजिकच. मात्र त्याचं स्वरूप काय, आणि नंतर त्याचे दूरगामी परिणाम काय, हे फार महत्त्वाचं. साध्या भांडणातून कायमची दुरावलेली नाती तर किती तरी. एकमेकांचं तोंड बघण्याचीसुद्धा इच्छा नसणारे तर पावलागणिक भेटतील. पण मग या ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशा ‘भांडण’ या एकंदरीत विषयाचं करायचं तरी काय? नेहमीप्रमाणे यालाही एक सोपा आराखडा देऊन त्यामानाने हे सोपं करता येईल का ते पाहायला हवं.

भांडणांना, मतभेदांना जास्त महत्त्व न देता, तो सगळ्या नात्यांमध्ये सहज येणारा भाग आहे असंच त्याच्याकडे बघायचं. याचं साधं कारण, कटाक्षाने भांडणं टाळायची असं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा नकळत, आपलं सगळं लक्ष त्यातल्या ‘टाळणे’ या विषयापेक्षा ‘भांडण’ या विषयाकडे लागून राहतं. ही एक आपल्या अंतर्मनाची किंवा मेंदूची खासीयतच. त्यामुळे कित्येकदा आपल्याही नकळत आपलं अंतर्मन, मेंदू केवळ अशा घटना, कृती, प्रसंग डोक्यात ठेवू लागतो, किंवा त्यांचीच नोंद घेतली जाते की ज्यातून भांडणाला तोंड फुटेल. साहजिकच आहे, सतत ही एक विशिष्ट बाब मला नको आहे हे आपण स्वत:ला सांगताना, नकळत, ती बाब, तिची सर्व वैशिष्टय़ं मनात इतकी कोरतो, की त्याच बाबीला नाकारताना सतत तिचाच अपरिहार्यपणे विचार चालू राहतो. याचं साधं उदाहरण आपल्या पुराणात, कंसाला कृष्णाचा मृत्यू हवा होता, तेव्हा त्याला जसा सतत कृष्णाचा ध्यास लागला, अगदी तसंच काहीसं! थोडक्यात, ‘नकोशा’ गोष्टीची सतत उजळणी करत आपणच तिला जिवंत ठेवत राहतो. त्यामुळे नाती आहेत म्हणजे भांडणं होणार हे गृहीत धरून, त्यांच्यासाठी कोणताही खास कप्पा राखून ठेवायला नको.

* ती आहेत म्हणताना पुढे येणारा दुसरा अपरिहार्य विचार म्हणजे सतत भांडणंच होतील का? ही विशिष्ट भीती. इथंही वरचेच मुद्दे लागू. ही भीती बऱ्याचदा लग्नाच्या बेडीत अडकू पाहणाऱ्या नवीन जोडगोळ्यांना असते, किंवा लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, किंवा कामासाठी, शिक्षणासाठी एकत्र राहणारी माणसं, यांच्यातही. या भयाकडे ‘साहजिक वाटणारे भय’ असं बघितलं, तरीही कित्येकदा याची पाळंमुळं बालपणातसुद्धा दिसतात. अतिशय भांडकुदळ आई-वडील, भावंडं, त्यातही काही विशिष्ट पद्धतीची हिंसा हे अनुभवलं असेल, तर मोठी माणसं केवळ भांडतात किंवा आपणसुद्धा असेच वागू का? आपलं आयुष्यही असंच असेल का? असे कित्येक प्रश्न सातत्याने मनात येऊन तसेच वाटायला सुरुवात होते. कधी कधी हे केवळ प्रश्न न राहता, त्याचं रूपांतर खऱ्या वर्तणुकीत नकळत होऊन जातं. उदा. समिना अतिशय शांत मुलगी. तिला कोणी मोठय़ा आवाजात बोललेलंही आवडायचं नाही, भांडण तर फारच दूरची बाब! प्रथमदर्शनी हे चित्र असलं, तरीही समिनाच्या सोबत राहणाऱ्या मत्रिणींचं म्हणणं असं होतं, की ती स्वत:च सतत कुरकुर करते. काहीबाही, छोटय़ा गोष्टीतून भांडण होईल अशी कारणं शोधते. आणि आता तिच्या अशा दुटप्पी स्वभावाचा सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. समिनाच्या नकळत, ती तिने लहानपणी पाहिलेली परिस्थिती तिच्या आजूबाजूला तयार करत होती, तेही सातत्याने.

भांडणं ठरवून कधीही करू नयेत. म्हणजे काही व्यक्तींमध्ये असा एक समज दिसतो, की बऱ्याच दिवसात काहीच बिनसलं नाही, तर ठरवून एकमेकांची उणीदुणी काढून ठरवून भांडावं. छे, याची काहीच गरज नाही. एकदा हा सहज येणारा भाग आहे हे ठरवलं की मग ते घडलं तर ठीक, नाही घडलं तरी ठीक, असं त्याच्याकडे पाहिलेलं उत्तम.

भांडणाविषयी, काही उगाचच उदात्त वगैरे कल्पना, किंवा भ्रामक समज बऱ्याच मंडळींमध्ये आढळतात. उदा.-

ज्या वेळेस ज्या व्यक्तीशी भांडावंसं वाटतं, त्या वेळेस ते टाळून, एखादा विशिष्ट दिवस ठरवून त्याला वाट मोकळी करून द्यावी.

आता यातला एकच भाग तसा काही अंशी योग्य. तो म्हणजे ज्या क्षणी भांडावंसं वाटतं त्या क्षणी ते टाळावं. पण याला नक्कीच मर्यादा आहे. त्या क्षणी टाळण्याचं कारण असं की, नकोशा भावनांचा निचरा होऊन एखाद्याला खूप दुखावणं आपल्याकडून टाळलं जातं. पण म्हणून ठरलेला दिवस, वार, वेळ, असं काहीही असू नये. कारण तोपर्यंत हाच एक विचार डोक्यामध्ये घर करून राहतो किंवा काय आणि कसा मुद्दा मांडायचाय यावर खूप जास्त मानसिक ऊर्जा खर्च होते.

उदा. आपल्याला कंपनीत एखादा नवीन प्रस्ताव मांडायचा आहे, त्यावर प्रतिवाद होणार आहे, हेही माहीत आहे. त्यासाठी काय उत्तरं असावीत याचा आपण तो प्रस्ताव मांडेपर्यंत सतत विचार करतो. आणि ते होऊन गेलं की त्यानंतरच जरा हायसं वाटतं.

लहान मुलांसमोर भांडण टाळावं – आता एकदा ही सहज क्रिया आहे हे ठरल्यावर लहान मुलांना यातून वगळण्यात काय अर्थ? मात्र इथं एक महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. सतत मतभेद, भांडणं होत असतील तर मात्र ते लहान मुलांसमोर नक्कीच टाळावं. त्याचं कारण त्यांना ‘नातं म्हणजे मतभेद’ हेच वाटण्याची शक्यता असते. शिवाय मुलांसमोर भांडताना आपले शब्द, आपले आविर्भाव, याकडे विशेष लक्ष असणं अत्यावश्यक. त्यामुळे त्यांनाही आपले मतभेद कोणत्या शब्दात पोहोचवावेत हे लक्षात येतं. ज्या कुटुंबात सतत भांडणं होतात, त्यांना मी मुद्दाम ‘लहान मुलांसमोर खुशाल भांडा’ असं सांगते. यातून एक तर भांडण्याची प्रक्रियाच बदलते. घाणेरडय़ा, नकोशा, टोचणाऱ्या शब्दांचा वापर सपशेल बंद होतो आणि मुलं समोर आहेत म्हणताना केवळ मूळ मुद्दा काय त्यानुसार अतिशय तार्किक भांडणं होतात. शारीरिक, मानसिक, हिंसेचा प्रश्नच नाही. अर्थात हे त्यांच्यासाठी ज्यांना आपण भांडत असतानाही आजूबाजूच्या जगाचं भान असतं. असं भान नसणारे आणि आडवा वाद घालणारे कित्येक जण केवळ भांडायचं म्हणून भांडतात, अशांसाठी काहीच लागू नाही.

लहान मुलांसमोर भांडताना एक महत्त्वाचं तत्त्व, म्हणजे समजा, भांडण त्यांच्या एखाद्या मुद्दय़ावरून असेल तर मात्र ते तात्काळ थांबवलेलं उत्तम किंवा ते विनोदी अंगाने घेऊन त्यातून मार्ग काढणं हितावह. अन्यथा, ‘या परिस्थितीसाठी मीच जबाबदार’ असे विचार त्यांच्या मनात घर करून राहू शकतात. उदा. मुलाला शाळेत जाण्यासाठी झालेला उशीर. मुलाचा एखादा प्रोजेक्ट, शाळेतला उपक्रम अपुरा असणं, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, इत्यादी.

भांडणाने राग वाढतो. – हे आता; काय आणि कोणत्या प्रकारचं भांडण आहे त्यावर सर्वस्वी अवलंबून. पण भांडणाने एकंदरीतच राग, चिडचिड, इत्यादी भावनांचा हवा तसा निचरा होतो. या भावना दाबून ठेवणं अर्थातच योग्य नसतं. याच्यापुढे जाऊन आपण भांडणं करताना काही काळजी घेऊ शकतो का? वाचताना हास्यास्पद वाटेल, परंतु याच्याकडे डोळसपणे पाहिलं तर लक्षात येईल, की भांडणं होणं यापेक्षा ती कशी होतायत यामुळेच जास्त समस्या असतात.

भांडणात महत्त्वाची आणि तितकीच खटकणारी बाब म्हणजे आवाज. शक्य तितक्या लहान आवाजात आपण आपला मुद्दा मांडू शकलो तर बऱ्याचदा नकोसे हल्ले टाळले जातात. आता इथं काही अतिहुशार व्यक्ती, स्वत:चा मुद्दा अतिशय मोठय़ा आवाजात मांडून, पुढे समोरच्या व्यक्तीला ‘हळू आवाजात बोल’ हे सुचवतात. इथं त्या स्वार्थीपणाने केलेल्या टिप्पणीमुळे राग वाढणं साहजिक आहेच. त्यामुळे आपल्याला भांडणापलीकडेही, व्यक्तीची काळजी असेल तर असं स्वार्थी वागणं नक्कीच टाळू या.

भांडण जर तार्किक मुद्दय़ांना धरून असेल, तर समोरच्या व्यक्तीला संपूर्ण मुद्दा मांडण्याची मुभा द्यावी. अर्थात भांडणात मध्ये मध्ये घुसखोरी होतेच. तरीही आपले तार्किक मुद्दे व्यवस्थित मांडावेत. समोरच्याचेही ऐकून घ्यावेत. यातून कित्येकदा ‘भांडण नेमकं का चालू झालं होतं’ असे विनोदी प्रसंग तयार होतात, आणि त्याने जास्त मजा येते.

केवळ ‘माझं म्हणणं खरं करण्यासाठी भांडण’ असा खाका असणाऱ्या लोकांशी किंवा वितंडवाद घालणाऱ्याशी अजिबातच भांडू नये. यात नवरा-बायको, स्नेही, मुलं अशी सगळी नाती आली. याचं महत्त्वाचं कारण, अशा व्यक्तींना काहीही करून समोरच्या व्यक्तीला हाणून पाडणं, आणि समोरची व्यक्ती कशी हरतऱ्हेने चुकीची आहे हे ठामपणे मांडण्यात रस असतो. त्यामुळे यातून हाती काहीच लागत नाही.

भांडताना काही व्यक्ती, समोरच्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक परिस्थिती लक्षात न घेता भांडण सुरूच ठेवतात. अशा व्यक्तींच्या नावावरही काट मारावी. उदा. आजारी असताना होणारी चिडचिड समजून न घेता भांडणारे जोडीदार, स्नेही.

काही जोडप्यांमध्ये ‘संवादाला काहीच शिल्लक नाही, म्हणून वितंडवाद’ असं समीकरण असतं. यातील किमान एका व्यक्तीने हे गरजेचं नाही, हे लक्षात घेऊन, या खेळातून स्वत: काढता पाय घ्यावा.

आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तींविषयी आपल्याला, त्यांच्या सर्व सीमा, मर्यादा साधारण माहीत असतात. कितीही छोटं अथवा मोठं भांडण असेल तरीही शक्यतो त्या ओलांडू नयेत किंवा त्यांना स्पर्शही करू नये, त्यातून बऱ्याचदा केवळ वेदनांखेरीज हाती काहीच उरत नाही!

सुरू असलेल्या भांडणात पूर्वीच्या भांडणांचे संदर्भ कशासाठी? त्याने केवळ गुंता वाढतो.

भांडण चालू झालं की घडय़ाळ बघावं. जास्तीत जास्त दहा मिनिटं, मनभरून भांडावं आणि दहाव्या मिनिटाला, एखादा खेळ बंद व्हावा तसं ते थांबवून पुन्हा पूर्वपदाला यावं.

भांडणात काही व्यक्ती अगदी टोकाच्या शरणागतीला जातात; परंतु वास्तविक ती शरणागती नसून केवळ आपला मुद्दा सिद्ध करण्याचा किंवा आता स्वत:कडे काही तार्किक मुद्दे नाहीत म्हणून टाकलेला एक डाव असतो. उदा. ‘माझंच चुकतं नेहमी!’ ‘ठीकंय किती वेळा माफी मागू?’ इत्यादी! यातून, समोरच्या व्यक्तीची चांगलीच गळचेपी होते. असं वागून त्या क्षणापुरता भांडणात विजय मिळवता येईल, पण समोरच्या व्यक्तीच्या मनातून तुम्ही कायमचे उतराल.

भांडण कोणी पुढाकार घेऊन सोडवायचं? सतत मीच का पुढाकार घ्यायचा? या पातळीवर भांडण जाऊच देऊ नये. तरीही अशा वेळेस एखाद्याने पुढाकार घेतलाच, तर समोरच्यानेही योग्य प्रतिसाद देणं अर्थातच अपेक्षित.

सर्वात महत्त्वाची गोष्ट, कितीही भांडण झालं तरीही, काही क्षणात आपल्याला ते विसरता आलं पाहिजे. याचाच दुसरा अर्थ त्यात अर्थातच बोचऱ्या बाबी नकोत. किंवा कायम लक्षात राहतील असे वार-परतवारही नकोत. भांडताना आपला ‘अहं’ पोत्यात गुंडाळून ठेवला तर हे जमतं. कारण भांडण हे घटनेचं, त्या-त्या प्रसंगाचं ठेवलं तर त्याच्या छान खुमासदार आठवणी राहतात. त्यातून नाती तुटत नाहीत, तर अधिक समजत जातात. मग अगदी रोज भांडण झालं तरीही चालेल. कदाचित हेच त्या काकांना म्हणायचं असावं.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com