डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

गाळलेल्या जागा भरण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे, कोणी तरी सोबत असतानाही, आपापल्या मोबाइलमध्ये डोकं आणि मन घालून बसलेल्या व्यक्ती, अर्थात आपण सगळेच. इथे आपल्याला वाटेल तसे सोयीनुसार आपण चच्रेत भाग घेतो किंवा प्रतिसाद देतो, नाही का? पण आपल्याला समोरची व्यक्ती, केवळ आपल्या एकटेपणाची जाणीव कमी करणारी रिकामी जागा म्हणूनच लागते. तसंच कोणाशीही भेटताना किंवा महत्त्वाच्या चर्चा चालू असताना, समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा किंवा ती व्यक्ती जे मांडत आहे त्याच्या गांभीर्याचा विचार न करता, आलेल्या फोनवर निवांत बोलत राहणारी मंडळीही याच सदरातली.. आपण तसे आहोत का?

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

शाळेत असताना प्रश्नपत्रिकेत एक अतिशय आवडीचा प्रकार असायचा तो म्हणजे ‘गाळलेल्या जागा भरा.’ त्या ‘टिंब-टिंब’च्या जागी, नेमकं उत्तर मांडणं सोपं असायचं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्या रिकाम्या जागेच्या अलीकडे आणि पलीकडे असणारं वाक्य. त्यातून संदर्भ लागायचा. ते विशिष्ट वाक्य वाचलेलं असेल, पाठ असेल, तर हे अजून सोपं व्हायचं आणि एकंदरीत किती गुण हाती लागतील यामध्ये याचे गुण मात्र नक्की होऊन जायचे.

इथे अपेक्षित उत्तराऐवजी दुसरं साधारण साधम्र्य असलेलं काहीही लिहिलं तरीही ते उत्तर मात्र चुकायचं. उत्तरासाठी असणारी जागा, रिकामी न सोडता भरली गेलीये हेच एक केवळ तसं म्हटलं तर एक खोटं समाधान किंवा छोटीशी फसवणूक स्वत:शीच असायची. तो फुगा निकालाच्या दिवशी फुटणार हे माहीत असलं तरीही. एका उत्तराऐवजी दुसऱ्या उत्तराची शब्दाला शब्द म्हणून अदलाबदल इथपर्यंत ठीकच, पण हेच सूत्र जेव्हा आपण जगताना वापरायला सुरू करतो, शब्दांच्या जागी माणसांची काढ-घाल करायला सुरुवात करतो, तेव्हा मात्र नुसताच गोंधळ न उडता, त्याच्या दूरगामी परिणामांना आपल्याला सामोरं जावंच लागतं. ‘‘मला काय वाटतं ना डॉक्टर, की सगळेच माझा वापर करतात. त्यांना हवं तेव्हा, हवं तसं आणि नंतर मात्र बेमालूम काढून फेकून देतात. त्यात माझी मुलं, माझा मित्रपरिवार, माझे सहकारी सगळेच आले.’’ एक चाळिशीचे गृहस्थ सांगत होते. त्यांचं हे वाक्य तसं बघायला गेलं तर प्रातिनिधिक स्वरूपाचं. कारण या वाक्यात व्यक्त झालेली ही भावना आजकाल सर्रास आबालवृद्धातल्या कोणाकडूनही ऐकायला मिळते.

म्हणजे पाहा, ७-८ वर्षांच्या खट्ट होऊन बसलेल्या मुलाला विचारलं, ‘‘काय रे, तू का त्या बाकीच्यांसोबत खेळायला जात नाहीस? तुझा अमुक अमुक मित्र खेळतोय की.’’ तर तो म्हणेल, ‘‘नाही, आज त्याचे ‘दुसरे’ मित्र आलेत. तो म्हणाला, ‘आज मी यांच्यासोबत खेळेन.’ मग मीच गेलो नाही खेळायला.’’

तरुणांमध्ये तर हे अनेकदा दिसतं. एकाच वेळेस बऱ्याच लोकांसोबत काही न काही ठरवून ठेवणे. आणि त्यानुसार मग स्वत:चा दिनक्रम, कामं सगळं उलटसुलट फिरवत राहणं. पण यात त्यांना काहीच वावगं वाटत नाही. हे अगदी सहजतेने घेत, असच कधी या तर कधी त्या गोतावळ्यात गुंतत ते मजेत जगत राहतात. फरक पडतो, तो त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येक वडीलधाऱ्या मंडळींना, मग त्या कुटुंबातील असोत, किंवा इतर कोणी. आपण भेटायला येणार म्हणून खास काही तरी बेत करून आपली वाट पाहत बसलेली, एखादी आजी, किंवा मोठे काका, किंवा शाळेतले शिक्षक, किंवा कोणीही, यांना मात्र फरक नक्की पडतो. अशा वेळेस ‘त्यांना काय ते घरीच असतात, नाही जमलं तर त्यात एवढा काय विचार करायचाय,’ असं म्हणणारी हीच मंडळी मात्र, त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोण्या एका व्यक्तीने असं केल्यास ‘आपल्याला का टाळलं जातंय?’ या विचाराने, सरभर होतात.

थोडक्यात, या भावनेपासून कोणाचीही सुटका नाही. पण असं का होतंय? आपल्या सगळ्यांनाच असं सातत्याने किंवा कधी तरी असं वाटत असेल तर ते नेमकं का? याचं कारण, आपण सगळेच आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, नात्यांचा वापर आयुष्यातील केवळ गाळलेल्या, रिकाम्या जागा भरण्यासाठी करत आहोत, आणि त्यात आपण पूर्ण निर्ढावल्यासारखे सरावून गेलोय. हे वाक्य थोडंसं खटकेल किंवा खूप जास्त टोचेल पण सत्य परिस्थिती तर तीच आहे. यापुढे खेदाने असं म्हणावं लागेल, की याची सुरुवात आपण आपल्या खूप जवळच्या नात्यांपासून करतो. आपले कुटुंबीय, जवळचे स्नेही, आप्तेष्ट, आणि बऱ्याचदा आपला जोडीदार यांना आपण केवळ या जागा भरण्यासाठी वापरतो. म्हणजे पाहा, मित्रमंडळींसोबत क्रिकेटची मॅच पाहायला जाणं काही कारणाने रद्द झालं आणि त्यामुळे मोकळा राहिलेला वेळ कसा घालवायचा म्हणून जोडीदारासोबत फिरायला जाणं, किंवा मुलांसोबत वेळ घालवणं. आता पुढे हा प्रश्न येईल, की मग यात काय झालं? अगदी योग्य. कारण वेळ सत्कारणीच लागला, किंवा इतरांनाही तुमचा हवासा सहवास मिळालाच. यात मूळ मुद्दा असा, की तो तुम्हाला हवा म्हणून, केवळ वेळ जात नाही म्हणून, की ज्या व्यक्तींसोबत तुम्ही हे करताय त्यांना छान वाटावं म्हणून? शिवाय अशा केवळ ‘वेळ-घालवणं’ या प्रकारात सतत आपल्याला जाता आलं नाही किंवा रद्द झालेल्या कार्यक्रमाविषयी हळहळ मनात ठेवून वावरणं किंवा बाकीच्या व्यक्तींना आपण त्यांना देत असलेल्या बहुमूल्य वेळेची सतत जाणीव करून देणं, यात केवळ आपला आप्पलपोटेपणा, आपला वेळ घावण्याचा मार्ग शोधणं हेच आहे.

आता रिकाम्या जागा भरण्याचं अजून एक उत्तम उदाहरण पाहू. कोण तरी सोबत असतानाही, आपापल्या मोबाइलमध्ये डोकं आणि मन घालून बसलेल्या व्यक्ती, अर्थात आपण सगळेच. इथे आपल्याला वाटेल तसं आपल्या सोयीनुसार आपण चच्रेत भाग घेतो किंवा प्रतिसाद देतो, नाही का? पण आपल्याला समोरची व्यक्ती, केवळ आपल्या एकटेपणाची जाणीव कमी करणारी रिकामी जागा म्हणूनच लागते. तसंच कोणाशीही भेटताना, किंवा महत्त्वाच्या चर्चा चालू असताना, समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा किंवा ती व्यक्ती जे मांडत आहे त्याचा गांभीर्याचा विचार न करता, आलेल्या फोनवर निवांत बोलत राहणारी मंडळीही याच सदरातली.

यात एका मुलीने मांडलेली कैफियत फारच बोलकी आहे. तिचे आणि तिच्या जोडीदाराचे सतत खटके उडतात म्हणून सगळं काही समोर मांडताना ती म्हणाली, ‘‘मला त्याचं वागणंच कळत नाही. मी त्याच्या समोर नसताना, किंवा आम्ही भेटलो नाही तर तो ‘आत्ता तू असतीस तर आपण हे केलं असतं, इथे गेलो असतो.’ वगैरे म्हणत राहतो, आणि आम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटतो, तेव्हा मात्र बऱ्याचदा तो त्याच्या विश्वात हरवलेला असतो किंवा काहीही करण्यासाठी, कुठे जाण्यासाठी फारसा उत्सुक नसतो. मलाच पुढाकार घ्यावा लागतो. बऱ्याचदा मला असं वाटतं की, आमचं नातं हे त्याच्या दृष्टीने तितकं महत्त्वाचं आहे का? की तो केवळ वेळ जात नाही म्हणून माझ्यासोबत असतो?’’

यातच सध्या आपलं काम कमी आहे, म्हणून मिळालेला मोकळा वेळ घालवण्यासाठी तयार केली जाणारी क्षणिक नाती, किंवा आपण कुटुंबापासून, जोडीदारापासून लांब आहोत म्हणताना तोपर्यंतचा काळ सुखाचा व्हावा या उद्देशाने केली जाणारी मत्री, जपलेली नाती हीदेखील आपण ‘टाइम-किलर्स’ म्हणूनच वापरतो. यात सोशल मीडियावर तयार होणारे नातेसंबंध अग्रक्रमावर येतील. त्याशिवाय खूप जुने स्नेही, आप्तेष्ट यांच्यामध्येही हे नक्कीच दिसून येतं. त्यातही आपलं आयुष्य, नोकरी, व्ययसाय, मुलं सांपत्तिक, सामाजिक स्थिती या सर्वच दृष्टीने मार्गी लागेपर्यंत ठेवलेले संबंध आणि त्यानंतर केवळ जुजबी बोलण्यासाठी जपलेली नाती, हे दृश्य तर सहज दिसते. यातही ‘दुसऱ्याला माझ्या आयुष्यात हव्या त्या जागी मी ‘भरू’ शकतो; पाहिजे तसं वगळू शकतो आणि हा माझा हक्कच आहे,’ असं समजणारी या वरच्या यादीतील काही मंडळी तर, हे सतत करताना दिसतात. त्या विषयी त्यांच्याशी कोणी बोलायचा त्यांना सांगायचा प्रयत्न केल्यास ही जगरहाटी आहे, असं भासवून त्यात आपण काही बदल करणं गरजेचं आहे हेच त्यांना पटत नाही. म्हणूनच कित्येकदा खूप जुने स्नेही भेटले, की आता काय बोलायचं असा एक यक्षप्रश्न उभा राहतो. जगत असताना आपल्या अवतीभवतीच्या लोकांना मी रिकाम्या जागा भरण्यासाठी तर वापरत नाहीये ना हे ओळखता येतं का? नक्कीच. त्यासाठी खालचे निकष स्वत:ला लावून बघायचे.

* मी ठरवलेल्या लोकांसाठी, योग्य तो वेळ ठरवून काढतो / काढते. त्यात काही अपरिहार्य कारणाशिवाय बदल होत नाही किंवा ते मी रद्दही करत नाही.

* आधी ठरलेली एखादी भेट / कार्यक्रम इथे मी जाण्याचं टाळत असेन, किंवा त्यात मला काही स्वारस्य नसेल, तर केवळ इतर कोणी मला वेळ देण्याचं टाळत आहे म्हणून मी तिथे जाणं पसंत करतो / करते, किंवा स्वत: ते घडवूनही आणतो / आणते.

* ज्या क्षणी मी ज्या व्यक्तींसोबत आहे तिथे त्यांच्या वेळेचा, त्यांच्या उपस्थितीचा माझ्याकडून संपूर्ण आदर केला जातो. मी अशा वेळेस, केवळ इतरांचे दाखले देत बसत नाही. किंवा इतरांचं वाजवीपेक्षा, किंवा त्या-त्या विषयानुसार अपेक्षित असेल त्यापेक्षा जास्त गुणगान करून, समोरच्या व्यक्तीला कानकोंडं करत नाही.

* ज्या व्यक्तींचा मला मनापासून आदर आहे, त्यांच्यासाठी मला माझ्या व्यग्र दिनक्रमातून वारंवार वेळ काढणं आवडतं. त्यांच्यासह घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी बहुमूल्य असतो.

* एखाद्या व्यक्तीसोबत ठरलेला कार्यक्रम इतर कोणासाठी तरी रद्द करणं मला आवडत नाही. तसं मी कधीच करत नाही.

* माझ्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्तीसाठी अडीअडचणीत मदत करणं, पाठीशी उभं राहणं मला आवडतं. हे फक्त बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणं यावर माझा भर असतो.

* मला एकटं राहायला आवडत नाही म्हणून इतरांना फोन करणं, भेटायला बोलावणं, त्यासाठी आग्रही असणं हे कटाक्षाने टाळण्याकडे माझं लक्ष असतं. अशा वेळेस कदाचित समोरची व्यक्ती इतर व्यवधानात असू शकेल हे मला समजतं.

आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघू या. आपल्याला कोणाकडूनही अशी ‘गाळलेल्या जागेची’ वागणूक मिळते आहे हे लक्षात आलं, की कोणतेही ग्रह करण्याआधी त्या व्यक्तीशी बोलून बघायला काहीच हरकत नाही. अनावधानाने असं घडू शकतं, हेही डोक्यात ठेवलेलं उत्तम.

त्याही पुढे जाऊन, ‘असं वागवण्याचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही. तेव्हा माझं माझ्याशी काय नातं आहे, हे फार महत्त्वाचं’ हा विचार ही सगळीच कोंडी फोडू शकेल. या विचाराने इतरांच्या आपल्याला मिळालेल्या वागणुकीमुळे आपण दु:खी होणं, त्याचाच सतत विचार करणं आणि त्यामुळे आपल्या एकंदरीत आयुष्यावर परिणाम होणं हे ताबडतोब टाळता येईल. आपण पर्याय म्हणूनच जर उपलब्ध नसू, तर आपल्याला कोणी गाळलेल्या जागी ठेवण्याचा प्रश्नच उद्भावणार नाही.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com