गरज संपली तेव्हा माणसाची शेपटी गळून पडली, तशीच ‘जात’ गळून पडायची वेळ केव्हाच आलेली आहे. ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. पण ती हळूहळू व्हायला हवी आहे. अनेक जातींनी बनलेलं माझं कुटुंब मला पुढे पुढे जाणारं वाटतं. काळानुसार बदलणारं. अजूनही जात उराशी धरणारी कट्टर कुटुंबं मला थिजलेली वाटतात. कालबाह्य़. वर्षांनुर्वष एकाच जागी गोठलेली, थांबलेली.
माझं पूर्ण नाव अमृता सुभाषचंद्र ढेंबरे! माझं ‘ढेंबरे’ आडनाव कुणालाही नीट उच्चारता यायचं  नाही.  शाळेतही नाही,  कॉलेजातही नाही. त्याचा इतका राग यायचा! ‘‘पूर्ण नाव काय तुमचं?’’
‘‘अमृता सुभाषचंद्र ढेंबरे.’’
 ‘‘काय? ठोंबरे?’’
 ‘‘नाही हो ढेंबरे.’’
 ‘‘काय, ढमढेरे?’’
 ‘‘अहो, ढेंबरे!’’
‘‘अच्छा अच्छा, ढोबरे.’’  ‘‘नाही नाही, ढेंबरे!’’
अशा संवादांना सतत सामोरं जावं लागायचं. मला इंटरकॉलेज स्पर्धेमध्ये कसलंसं बक्षीस मिळालं तेव्हा रंगमंचावरून माझं नाव ‘ढगे अमृता’ असं उच्चारलं गेलं. कुणीच रंगमंचावर गेलं नाही. पुन्हा एकदा ‘ढगे अमृता, स. प. महाविद्यालय’, असा नारा झाल्यावर माझ्या आसपासच्या  मित्रमैत्रिणींनी मला रंगमंचाकडे ढकललं. आपसात सगळे हसत होते. आता मलाही खूप हसू येतंय, पण तेव्हा मात्र प्रचंड अपमान वाटला होता. या आणि अशा कर्णकटू अनुभवांमुळे मी माझं नाव आई, ज्योती सुभाषसारखं अमृता सुभाष लावायला सुरुवात केली.
पण मला कॉलेजात असताना हेसुद्धा नाव बदलावं असं वाटायला लागलं. त्याचं असं झालं, पुरुषोत्तम करंडक नावाच्या एकांकिका स्पर्धेत मी भाग घेतला होता. पहिल्याच वर्षी मला ‘यशवंत स्वराभिनय’ हे वाचिक अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मला आनंद  झाला. पण असंही कानावर आलं की माझ्या ओळखीतलं कुणीसं कुणाला तरी म्हणालं, ‘‘ज्योती सुभाषांची मुलगी ना, त्यामुळे दिलं असेल पदार्पणातच ‘यशवंत स्वराभिनय’!’’ वाईट वाटलं. त्या वर्षी पुरुषोत्तम करंडकला अभिनेते मोहन गोखले परीक्षकांपैकी एक होते. बक्षीस समारंभाच्या भाषणात ते बक्षीस मिळालेल्या सर्वाविषयी बोलत असताना माझ्याविषयी म्हणाले, ‘‘ती खऱ्या अर्थानं ‘अमृता’ आणि ‘सुभाष’ असल्यामुळे तिला आम्ही वाचिक अभिनयाचं पारितोषिक दिलं. या वाक्यानं माझं आधीच फिरलेलं डोकं अजूनच फिरलं. आधीच्या प्रतिक्रियांमुळे मी दुखावलेली होते, त्यामुळे मी ज्योती सुभाषांची मुलगी म्हणून मला बक्षीस दिलं असंच त्यांना म्हणायचं आहे, असं मला वाटलं. ते वयच तसं होतं. माझी आई ज्योती सुभाष हिचं अभिनेत्री म्हणून खूप नाव होतं. त्यामुळे तिची मुलगी म्हणूनच ओळखलं जायचं मला. आता ते  साहजिक वाटतं, पण ते वय ज्यानं त्यानं दुखावणारं, स्वत:च्या स्वतंत्र ओळखीसाठी धडपडणारं. मी समारंभ संपताच ताडताड मोहन गोखल्यांपाशी गेले. त्यांच्या पुढय़ात जाऊन भरल्या डोळ्यांनी त्यांना म्हणाले, ‘‘मला नको हे बक्षीस! तुम्ही असं का म्हणालात मी ‘अमृता सुभाष’ आहे म्हणून मला बक्षीस दिलं. आईची  मुलगी  म्हणून दिलेलं हे बक्षीस मला नको. सगळे मला असंच म्हणतात. तुम्हीही असंच म्हणता.’’ ते शांतपणे त्यांच्या भेदक घाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहिले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. शांतपणे म्हणाले, ‘‘बाळा, काय  बोलते आहेस तू? माझ्या  बोलण्याचा अर्थ तुला समजलेला दिसत नाही. तो समजून घ्यायला तुला संस्कृतची मदत घ्यावी लागेल. ‘सु’भाष म्हणजे चांगली भाषा. त्या अर्थानं अमृता सुभाष. म्हणजे अमृताप्रमाणे गोड भाषा, गोड वाणी असलेली मुलगी. ‘यशवंत स्वराभिनय’ हे पारितोषिक चांगला वाचिक अभिनय म्हणजे चांगली वाणी असलेल्या कलाकाराला देतात ना, त्या अर्थानं तू आम्हाला खरोखर ‘अमृता’ ‘सुभाष’ वाटतेस म्हणून तुला हे बक्षीस दिलं, असं मला भाषणात म्हणायचं होतं.’’ मी माझ्या नावाच्या अर्थाचा कधी विचारच केला नव्हता. त्या दिवसापासून मला अमृता सुभाष हे नाव खूप आवडायला लागलं आणि मी तेच कायम ठेवलं.
 या नावामुळे मला एका वेगळ्याच खेळाला सामोरं जावं लागणार आहे हे मी अभिनयक्षेत्रात नवीन आले तेव्हा जाणवलं नव्हतं मला. पण जसजसं या क्षेत्रात माझ्या नावाला ‘नाव’ यायला लागलं तसतसं मला त्या खेळाला सामोरं जावं लागलं. अजूनही लागतं. म्हणजे होतं कसं की, ‘अमृता सुभाष’ या नावामुळे काहीच कळत नाही. त्यामुळे कधीकधी कुणाकुणाची गोची होते. असं थेट कसं विचारणार ना. मग आडवळणाने सुरुवात होते. सुभाष हेच आडनाव का? त्यांना नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं ते  मला कळलेलं असतं. तो प्रश्न असतो, ‘तुम्ही कुठल्या जातीच्या?’ पण हा प्रश्न मला आवडत नाही. म्हणून मी तो कळलाच नाही असं दाखवते. म्हणते, ‘‘नाही, आडनाव नाही, सुभाष बाबांचं नाव.’’ काही जण या उत्तरावरच थांबतात. पण काहींसाठी या प्रश्नाचं उत्तर फार म्हणजे फार महत्त्वाचं असतं. माझ्या कामामधून, गाण्यामधून, लिखाणातून, मुलाखतींमधून मी जी काही त्यांना दिसत असते ती त्यांच्यालेखी अपूर्ण असते. या सगळ्या ओळखींना पूर्णत्व देणार असते माझी जात. मग ते धीटपणे पुढचा प्रश्न विचारतात, ‘‘सुभाष वडिलांचं नाव, मग आडनाव?’’ मीही त्यांना हवं ते उत्तर देतच नाही. मी विचारते, ‘‘माहेरचं की सासरचं?’’ समोरचे अचानक चकीत. ‘‘लग्नं झालं आहे तुमचं?’’ मी, ‘‘हो’’.  समोरचे धीटच होत जातात. ‘‘वाटत नाही हो!’’ मी (गोड हसून) ‘‘हो, पण झालं आहे.’’ ‘‘मिस्टरांचं नाव काय?’’ मी (आडनाव न सांगता) ‘‘संदेश.’’ समोरचे विजिगीषूपणे, ‘‘त्यांचं आडनाव काय?’’ इथे मला हरायला आणि दमायला होतं. मी माझं आडनाव सांगून टाकते. माझ्या आडनावावर समोरच्यांचं आडनाव काय आहे त्याप्रमाणे प्रतिक्रिया येते. एकदा एक आजी माझं आडनाव ऐकून त्यांच्या सुनेला म्हणाल्या, ‘‘वाटलंच मला. आपल्यातलीच आहे गं, तरीच इतकं चांगलं काम करते!’’ यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे माझं मलाच कळेना. कारण मी खरंच कुणाच्यातली आहे? माझी आई माहेरची देशपांडे, म्हणजे देशस्थ ब्राह्मण. तिनं लग्न केले ‘ढेंबऱ्यां’च्या, म्हणजे मराठय़ाच्या मुलाशी. तिला मी झाले, मग मी लग्न केलं कुलकण्र्याच्या घरात. म्हणजे पुन्हा ब्राह्मण. आपल्याकडे वडिलांनंतर नवऱ्याची जात लावतात. माझे वडील मराठा आणि नवरा ब्राह्मण म्हणजे मी दोन्ही का? यांच्यातली का त्यांच्यातली? आम्ही कुणाच्यातले, हा प्रश्न आमच्या कुटुंबातल्या बऱ्याच जणांना पडेल. आमच्या घरात नुसतं ब्राह्मण मराठाच. पण माझ्या कुटुंबात आसपास बघते तेव्हा दिसतं की आईची काकू पारशी होती. माझी एक मामी केरळी, एका मावशीचा नवरा उत्तर प्रदेशी, एकीचा पंजाबी, एका बहिणीचा नवरा बंगाली, एका भावाची बायको अर्धी ख्रिश्चन, एकाची तर ऑस्ट्रेलियन आहे. आम्ही राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय होऊन बसलो आहोत. योगायोगानं माझ्या सख्ख्या भावानं माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा एकदा देशपांडय़ांच्याच मुलीशी लग्न केलं आहे. आम्हा सगळ्यांची ही सरमिसळ पाहिली की जाणवतं आमची जात कधीच मागे गळून पडली आहे.
गरज संपली तेव्हा माणसाची शेपटी गळून पडली, तशीच ‘जात’ही गळून पडायची वेळ  केव्हाच आलेली आहे. ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. पण ती हळूहळू व्हायला हवी आहे. इतक्या जातींनी बनलेलं माझं कुटुंबं मला पुढे पुढे जाणारं वाटतं. काळानुसार बदलणारं. अजूनही जात उराशी धरणारी कट्टर कुटुंबं मला थिजलेली वाटतात. कालबाह्य़. वर्षांनुर्वष एकाच जागी गोठलेली, थांबलेली.
माझं कुटुंबं बदलण्याची सुरुवात कुठून कुठून झाली असेल? परवाच माझ्या मावशीकडून मी माझ्या कुटुंबाच्या काही गोष्टी ऐकत होते. माझ्या आईची एक चुलत आजी होती. तिला घरात सगळे ‘बाई’ म्हणायचे. ती कर्मठ ब्राह्मण. सोवळी. तिला दुसऱ्या जातीतल्या कुणाचा स्पर्शसुद्धा चालायचा नाही. माझ्या आई-बाबांचं लग्न ठरलं तेव्हा बाबा मराठा आहेत ही गोष्ट बाईआजीपासून लपवली गेली. बाबांची ओळख सुभाष ढेंबरेऐवजी माझ्या आईची मैत्रीण सुनीती लिमये हिचा भाऊ सुभाष लिमये अशी करून देण्यात आली. बाबांचा स्वभाव बाईआजीला खूप आवडला. नंतर तर ते तिचे खूप लाडके झाले. ती जाईपर्यंत तिला ते मराठा आहेत हे माहितीच नव्हतं. पण मावशीनं बाईआजीची अजून एक गोष्ट सांगितली. त्यावरून वाटतं बाईआजीला जरी खरं काय ते कळलं असतं तरी तिनं कदाचित बाबांवर प्रेम केलं असतं. ती गोष्ट म्हणजे आईच्या काकांनी ‘आवा’ नावाच्या एका पारशी मुलीशी लग्न करायचं ठरवलं. ज्या दिवशी आवा लग्न होऊन घरी येणार होती त्या दिवशी बाईआजी संतापून शेजारच्यांच्या घरी राहायला गेली होती. पण नंतर मात्र आवा तिची लाडकी होत गेली. इतकी की बाईआजीनं तिचं नाव आवाचं अवंतिका करून तिला आपलं म्हणून टाकलं. आवामध्ये असं काय असेल ज्यानं कर्मठ ब्राह्मण असलेली बाईआजी आवाचं पारशी असणं विसरली. आवानं कुठल्या हलक्या हातांनी तिच्यातल्या आणि बाईआजीतल्या वर्षांनुर्वष घट्ट बांधलेल्या जातीच्या गाठी उकलल्या असतील.  बाईआजीविषयी मावशीनं असंही सांगितलं की, ती गावातल्या बायकांची बाळंतपणं करायला जायची, पण तेव्हा मात्र ती जातपात बघायची नाही. इतक्या वर्षांपूर्वी बाईआजीत मला दोन्ही दिसतं. मनातले कट्टर सोवळे, जातीचे बांध आणि त्याचबरोबर ते बांध ओलांडून जातीपलीकडे जाऊन पाहाणं. त्या काळात ते बांध मोडण्यासाठी तिच्यासारख्या बाईला खूप ताकद लागली असेल. पण तिनं ती दाखवली. कुठल्याशा खालच्या जातीच्या बाईचं बाळंतपण करताना. बाईआजीच नव्हे आईची सख्खी आजी, मामीआजीसुद्धा गावातल्या गरीब, उपाशी, कुठल्याही जातीच्या लोकांना जेवणाची भरलेली ताटं नेऊन देत असे. माझ्या आईचे वडील, अण्णा गावातले डॉक्टर. त्यांनी पेशंट तपासताना कधीही त्यांची जात विचारली नाही. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर गावातली सगळी ब्राह्मण लोकांची घरं इतर जातीचे लोक जाळत असताना संपूर्ण गावात फक्त आमचं घर वाचलं, हा योगायोग खचितच नव्हे. ती माझ्या कुटुंबाची पुण्याई आहे. इतक्या वर्षांपूर्वीची बाईआजी, मामीआजी, अण्णा नाव, जातीपलीकडे जाऊ शकले. आपण अजूनही नाही जाऊ शकत, खेद वाटतो. काहीच महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राचं लग्न मोडलं. ते दोघं अनेक र्वष एकमेकांवर प्रेम करत होते. पण तो महार, ती ब्राह्मण. तिच्या घरच्यांनी नाही घडू दिलं. त्यांच्या शेवटच्या भेटीत ती धाय मोकलून रडत होती, असं तो म्हणाला. तिनं नंतर कोरडय़ा दगडी डोळ्यांनी कुणा ब्राह्मण मुलाशी लग्नं केलं. त्या दिवशी माझ्या मित्राची झालेली तगमग विसरता येत नाही.  मागच्या महिन्यात एक शूटिंग करत होते. काम संपवून निघायच्या वेळी मी ड्रायव्हरला हाक मारली तर तिथले कॅमेरामन ताडकन म्हणाले, ‘‘काय अमृता, मुस्लीम ड्रायव्हर काय ठेवते?’’ मला एकदम आत दुखलंच. माझ्या आजोळची शरिफा आठवली. घरी पडेल ते काम करायची. सुट्टीत आजोळी गेल्यावर आम्हा भावंडांचंही करायची. तिचं नाव मुसलमान आहे हे कुणीच नाही लक्षात आणून दिलं. मी सामान गाडीत ठेवणाऱ्या माझ्या ड्रायव्हरकडे पाहिलं. दोनच दिवसांपूर्वी माझ्या वाढदिवसासाठी त्यानं मला आवडतो तसा केक त्याच्या खिशाला जड असून आणला होता. तो केक बघून माझ्या चेहऱ्यावर आलेला आनंद बघून त्याच्या चेहऱ्यावर आलेलं निर्मळ हसू आठवलं. मी शांतपणे त्या कॅमेरामनला सांगितलं, ‘‘हा माणूस माझ्याकडे आयुष्यभर काम करेल. कारण तो एक अप्रतिम ड्रायव्हर तर आहेच, पण एक फार फार चांगला इमानी माणूस आहे.’’ आणि हो, माझं आडनाव विचारणाऱ्या प्रत्येकासाठी  हे उत्तर- माझं नाव फक्त ‘अमृता’ ‘सुभाष!’

Maharashtrian Style Gavachi Kheer or Wheat Kheer Note The Recipe And Try Ones At Home
Wheat Kheer Recipe: पौष्टिक अन् खमंग गव्हाची खीर बनवा; ‘ही’ सोपी पद्धत लगेच नोट करा
How To Make Juice Premix Recipes To Save Money
१ वर्ष टिकणारी फळांच्या सरबताची पावडर बनवून संत्री, कलिंगडाचा आस्वाद हवा तेव्हा घ्या; वेळ, पैसे वाचवणारा Video पाहा
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
chaturang article, ganesh matkari, my female friend, common thoughts, subjects, two way communication, sharing,
माझी मैत्रीण : टूवे स्ट्रीट