नीरजा पटवर्धन

‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या निर्मात्या, कला दिग्दर्शक आणि वेशभूषाकार नीरजा पटवर्धन. २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नदीचा प्रश्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दिग्दर्शकासह हा चित्रपट घेऊन जात आहेत. स्थानिकांपर्यंत तो विषय पोहोचवत आहेत, त्यातून काही ठोस घडतही जातं.. नदी वाचली तर आपण, आपली संस्कृती वाचणार, यातलं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवताना आलेले हे अनुभव..

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
How sugar sakhar and chini get its name
Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…

चित्रपटाचा विषय नदीचा. शहरी लोकांना बहुतांशी नळाला येणारे पाणी तेवढे माहिती असते. त्या पाण्याचे मूळ नदीमध्ये. या नद्यांची आजची परिस्थिती हा चिंताजनक मुद्दा. आपल्यातुपल्या जगण्याशी येऊन भिडणारा. आपण जगायचे तर नदी जगायला हवी. नदी जगायची तर काय करायला हवे? या शोधाचा हा चित्रपट, ‘नदी वाहते.’ हा विषय आज महत्त्वाचा, त्यामुळे ठरवलं हा विषय, यावरचा चित्रपट कानाकोपऱ्यात जायलाच हवा.

चित्रपट बनवायचा आणि लोकांना दाखवायचा.. वाक्य एकदम सोपं. पण सगळी प्रक्रिया जटिल, थकवून टाकणारी. लहान निर्मात्याच्या पायाखालची जमीन काढून घेणारी. ठरावीक गणितात न बसणारा चित्रपट असेल तर अधिकच मोठी कोंडी. सगळीकडे चित्रपट पोचावा अशी व्यवस्थाच अस्तित्वात नाही. असलेली व्यवस्था पुरेशी नाही. आम्हाला चित्रपट बघायला मिळाला नाही म्हणणारे प्रेक्षक भरपूर. त्यातले बरेचसे थिएटपर्यंत जात नाहीत किंवा पोचू शकत नाहीत.

मग काय करायचं? आम्ही ठरवलं चित्रपट घेऊन जायचा सगळीकडे. जिथे चित्रपटगृह नाही तिथल्या लोकांनाही चित्रपट बघता आला पाहिजे. याची थोडी उजळणी ‘श्वास’ या चित्रपटाच्या काळात झाली होती. तीच पद्धत ‘नदी वाहते’ चित्रपटासाठी उपयोगात आणायची असे ठरले. पण जिथे चित्रपटगृह नाही तिथे चित्रपट कसा बघणार? तर तात्पुरते चित्रपटगृह तयार करून! एखाद्या शाळा-कॉलेजचा हॉल, देवळाचा सभामंडप, देवळाचे पटांगण जिथे दोन-तीनशे माणसे बसून चित्रपट बघू शकतील अशा ठिकाणी हे तात्पुरते चित्रपटगृह तयार केले जाते. आम्ही तयार करून घेतलेला मोठा पडदा आहे. तो स्थानिक संयोजकांच्या मदतीने उभारला जातो. दिवसा खेळ असेल तर कुठूनही उजेड आत येऊ नये म्हणून जागा बंदिस्त केली जाते. एक ब्लू रे प्लेयर आणि प्रोजेक्टर आमच्याबरोबर असतो. तो चित्रपटाच्या खेळाआधी व्यवस्थित सेट केला जातो. ध्वनिव्यवस्था स्थानिक असते. हल्ली प्रत्येक छोटय़ा गावातही बेसिक दोन स्पीकर्स, एक मिक्सर वगरे व्यवस्था उपलब्ध असते. अर्थात, केवळ छोटय़ा गावांमध्येच नाही तर मुंबईत, ठाण्यातही अशा प्रकारे आम्ही चित्रपट दाखवला आहे. विविध स्थानिक संस्था हे आयोजन करतात आणि प्रत्येक खेळासाठी एक ठरावीक मानधन आणि प्रवासखर्च आकारला जातो.

मोकळ्या आकाशाखाली खेळ करायचा असेल तर अर्थातच सूर्यास्तानंतर पुरेसा अंधार पडल्याशिवाय चित्रपट सुरू होत नाही. प्रेक्षक येऊन बसतात. जाहीर केलेली वेळ टळली तरी अंधार पडलेला नसतो. प्रेक्षक शांतपणे अंधार पडायची वाट बघतात. चित्रपट सुरू होतो. मध्यंतराशिवाय सलग दाखवला जातो. एक तास पंचावन्न मिनिटांचा चित्रपट प्रेक्षक सलग बघतात. कुणालाही मधेच पॉपकॉर्न, वडा, शीतपेयांची वगरेची आठवण येत नाही.

चित्रपट संपल्यावर मात्र कुणी लगेच उठून जात नाही. दिग्दर्शकाबरोबर प्रश्नोत्तरं, चर्चा होते. सर्व खेळांना दिग्दर्शक संदीप सावंत असतात. अनेकदा मीही जाते. या सर्व चर्चा खूप विशेष म्हणाव्या अशा असतात. प्रेक्षक ज्या प्रकारचे त्या दिशेने चर्चा जाते. नाटक-चित्रपटाशी संबंधित प्रेक्षक अर्थातच पटकथा, नटमंडळींची निवड, शूटिंग, साऊंड डिझाइन इत्यादी फिल्म मेकिंगच्या तांत्रिक अंगांची चर्चा करतो. तर काही जण थेट विषयाशी भिडतात. अनेकदा छोटय़ा गावातला प्रेक्षक चित्रपटातल्या अनेक प्रसंगांतून स्वत: गेलेला असतो. त्याची त्याची अशी पाण्याची लढाई चालू असते. कधी त्यानं गावात प्रकल्प येणं आणि त्यासाठी भूसंपादन होणं म्हणजे काय हे अनुभवलेलं असतं. कधी त्याला त्याच्या बालपणी बघितलेली, पण आता कोरडीठाक झालेली गावची नदी आठवत असते.

सावंतवाडीच्या महाविद्यालयामधला शिरिशगे गावातून आलेला मुलगा ‘आजोबाच्या काळी जमीन गेली, धरण अजूनही झालंच नाही’ हे सांगताना आतून हललेला असतो. शेती-जमीन-पाणी याकडे लक्ष द्यायला हवं हे त्याला मनातून पटलेलं असतं. चित्रपटामध्ये जसा नदीसाठी, काठ जिवंत करण्यासाठी, झटणारा एक गट आहे तशी काम करणारी, प्रयोग करणारी माणसं वेगवेगळ्या गावात विखुरलेली आहेत. त्यांना आपलीच कहाणी चित्रपटात दिसत असते. ते लोक स्वत:चे अनुभव सांगतात. यशापयशाच्या कहाण्या सांगतात. आपल्याच गावात असे काही घडतेय हे अनेकांच्या गावीही नसते. त्यांच्यापर्यंत विषय पोचतो. विचारांचे आदानप्रदान होते. नदीच्या माणसांची ताकद, ऊर्जा वाढते. त्यांना अजून हात मिळतात.

‘आमच्या गावात नदीची अशी अशी अवस्था आहे. काय करता येईल? नदीत घाण टाकू नका, अशी सतत विनंती करत असतो आम्ही, पण लोक ऐकतच नाहीत. काय करावे? आमच्या नदीवरही बंधारे बांधायचेत. कसे करायचे?’ असे अनेक प्रश्न येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच आम्ही देऊ शकत नाही. पण प्रत्येक खेळाला वेगवेगळ्या विषयात काम करणारी स्थानिक मंडळी आलेली असतात. कृषी अधिकारी असतात. आपल्या गावात, आपल्या नदीचे काय होऊ शकते, आपण काय करायला हवंय याबद्दलच्या चच्रेला तोंड फुटते. त्या त्या स्थानिक नद्यांच्या दृष्टीने उपयोगी अशा सूचना, मुद्दे पुढे येतात. काहीतरी ठोस पावले उचलायच्या दृष्टीने आखणी करायला सुरुवात होते.

‘नदीचा प्रश्न समजला, पण याला नक्की उपाय काय? ठोस उत्तर काय? ते चित्रपटाने दिलंच नाही.’ अशी एक प्रतिक्रिया बरेचदा येते. चित्रपटाने ‘अक्सीर इलाज’ प्रकारातली ठोस उत्तरे द्यायला हवीत ही अपेक्षा बऱ्याचदा दिसते. काम करत राहणे, प्रयोग करत राहणे, शोध घेत राहणे हाच ‘अक्सीर इलाज’ आहे हेच चित्रपटाचे म्हणणे आहे. हे आम्ही सांगतोच पण कधी कधी प्रेक्षकांत असलेले महत्त्वाचे लोकच अजून चांगल्या प्रकारे उत्तर देतात.

‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’चे डॉ. प्रसाद देवधर सांगतात की ‘लॅबमध्ये चेकिंग करून घेतल्यावर पॅथॉलॉजी रिपोर्ट येतो. अमुक असे आहे. तमुक तसे आहे वगरे. रिपोर्ट सांगत नाही काय करा. हा चित्रपट कोकणासाठी, नद्यांसाठी तसा रिपोर्ट आहे. परिस्थिती गंभीर आहे. समजून, उमजून, विचार करून कामाला लागायची वेळ आलेली आहे.’

शहरातली कुणी एक आपल्या गावाकडच्या जमिनीवर कृषी पर्यटनाचा प्रयोग सुरू करतो. आपल्या गावात अशा प्रकारचा चित्रपट बघायला मिळाला याचे कुणाला समाधान असते. बांबोळीच्या (गोवा) शाळेतल्या इयत्ता आठवीतल्या मुलाला ‘तिचं पुढं काय झालं?’ हे शोधायचं असतं. तो दिग्दर्शकाला ‘‘नदी वाहते,चा पुढचा भाग मी करणार मोठा झालो की.’’ असं वचन देतो. काही तरी सकारात्मक घडत जातं..

या सगळ्यातून ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या ठिकाणी चित्रपटचा खेळ करायला निघतो..

needhapa@gmail.com

chaturang@expressindia.com