13 August 2020

News Flash

नकारात्मक भावनांचं ओझं

लग्न झाल्यानंतर अनेकदा वर्षभरातच नवरा बायकोमध्ये ताणतणाव सुरू होतात. कारण विवाहाच्या इव्हेंटमध्ये जेव्हा आजही देणीघेणी व मानपानावरून शीतयुद्धं पेटतं तेव्हा पुढच्या विध्वंसाची बीजं रोवली जातात.

| August 22, 2015 02:30 am

लग्न झाल्यानंतर अनेकदा वर्षभरातच नवरा बायकोमध्ये ताणतणाव सुरू होतात. कारण विवाहाच्या इव्हेंटमध्ये जेव्हा आजही देणीघेणी व मानपानावरून शीतयुद्धं पेटतं तेव्हा पुढच्या विध्वंसाची बीजं रोवली जातात. चार-पाच तपं एकत्र जगू इच्छिणाऱ्या जोडप्यांना त्यापलीकडचा सहजीवनाचा खरा अर्थ का कुणी समजवून सांगत नाही? कुटुंबीयांचा अहंकार, मानापमान त्या जोडप्याच्या आनंदापेक्षा मोठा कसा काय असू शकतो? नकारात्मक भावनांचं ओझं भिरकावून देणं शक्य नाही का?
‘‘दालू म्हणजे काय रे भाऊ?’’ याच चालीवर ‘‘लग्न म्हणजे काय रे भाऊ?’’ असा प्रश्न लग्न करणाऱ्या अनेक तरुण तरुणींना आणि त्यांच्या पालकांना विचारावा अशी वैवाहिक जीवनाची आजची स्थिती बघताना वाटायला लागलं आहे. पु.लं.चा हा आपल्या मोठय़ा भावाला ‘दारू’बद्दल प्रश्न विचारणारा धाकटा भाऊ वयानं खरंच लहान आणि त्यामुळं असमंजस, अपरिपक्व तरी होता; पण आजकालची लग्न करणारे तरुण तरुणी, त्यांचे बहुतांशी पालक शिकले-सवरलेले आहेत. हा तरुण वर्ग तर उच्चशिक्षित, इंटरनेटवरून माहितीचा खजिना समोर असणारा, देशापरदेशात फिरून आलेला आणि स्वत:ला हुशार समजणारा, ‘आम्हाला सगळं माहीत असतं’ असा भाव मिरवणारा. मग अलीकडच्या लग्नांमध्ये वाढत्या संख्येने ‘गडबडी’ का होत आहेत?
त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं एक बऱ्यापैकी सार्वत्रिक कारण विवाहपूर्व समुपदेशनासाठी माझ्याकडे नुकत्याच आलेल्या एका विवाहोत्सुक तरुणानंच सांगितलं. तो म्हणाला, ‘‘नुकतंच माझ्या एका चुलत बहिणीचं लग्न झालं. आमची वधूची बाजू! शक्य ते सारं काही त्या लग्नासाठी आम्ही केलं आणि इतकं करूनही जे-जे काही घडलेलं मी पाहिलं, त्यानंतर मला नैराश्यच आलं. आपलं आयुष्य एका रात्रीत बदलून टाकणारी एवढी मोठी घटना आपण किती सहजपणे घेतो! महत्त्व कशाला द्यायला हवं नि आपण ते कशाला देतो? आयुष्याला संपूर्ण नवं वळण देणारा निर्णय किती अविचाराने घेतो. प्रत्येक परीक्षेसाठी, नोकऱ्यांमधील बढतीसाठी आवडीने वा नावडीने, पण अभ्यास करणारे आपण, जोडीदार निवड आणि वैवाहिक जीवनाच्या तयारीसाठी मात्र कोणताच अभ्यास करत नाही. अभ्यास करावा म्हणून एरवी सतत मागे लागणारे पालक या अभ्यासाचं कधी सूतोवाचही करत नाहीत. ‘एकदाचं लग्न करा’ हे मात्र सारखं सांगत राहतात. ‘संसार करण्यापलीकडे का करायचं लग्न?’ हे ते धड सांगूही शकत नाहीत ‘सुख-दु:खात साथ देणारं कुणी तरी लागतं अरे/ अगं’ ही घिसीपीटी वाक्यं आणि ‘पाण्यात पडलं की पोहता येतं’ ही गैरसमजूत आम्ही किती दिवस ऐकायची आणि खरी मानायची? कारण आमच्या आजूबाजूला आम्हाला असं काहीच घडताना दिसत नाही! अगदी आमच्या आईबाबांच्या संसारातही फारसं नाही.’
‘माझ्या त्या चुलतबहिणीच्या लग्नात तिच्या नवऱ्यानं आणि त्यांच्याकडच्या अनेक मंडळींनी ज्या काही अवाजवी अपेक्षा केल्या, मानापमानावरून जे काही रुसवे-फुगवे केले, त्यामुळे त्या घरात नव्यानं जाणाऱ्या माझ्या बहिणीला काय वाटलं असेल, असे विचार सारखे माझ्या मनात येत होते. ‘नंतरही ही माणसं आपल्याला असंच वागवतील का? मोकळ्या मनानं माझं स्वागत करतील का?..’ अशा किती तरी असुरक्षित भावनांचं काहूर तिच्या मनात उठलं असेल. ‘या सगळ्या गैरप्रकारांत एक शब्दही न बोलणारा माझा नवरा, नंतर तरी आपल्याला समजून घेईल का? साथ देईल का? या विचारांनं ती किती अस्वस्थ झाली असेल? लाखो रुपये उधळूनही, आमच्या कुटुंबाची किती तरी उर्जा, वेळ खर्च होऊन, कुणालाच त्या समारंभाचा मनापासून आनंद झालेला मला दिसला नाही. उलट बहिणीच्या काळजीनं माझं मन काळवंडूनच गेलं. त्याच रात्री मी माझ्या आईबाबांना सांगितलं, ‘‘एक तर लग्न म्हणजे काय, सहजीवन म्हणजे काय, हे नीट समजून घेतल्याशिवाय आणि सुयोग्य सहजीवन उभं करण्यासाठी लायक जोडीदार बनल्याशिवाय मी लग्न करणारच नाही. आणि जेव्हा लग्न करीन तेव्हा ‘कोर्ट मॅरेज’च करीन.’’
समोर घडणाऱ्या घटनांकडे इतक्या संवेदनशीलतेनं आणि तरीही इतक्या विवेकानं बघणाऱ्या परिपक्व मुलाचं मला खूप कौतुक वाटलं, कारण वीस-एक वर्षांच्या माझ्या समुपदेशनाच्या अनुभवात, मला स्वत:चा असा स्वतंत्र, वेगळा विचार करणारी, स्वत:च्या लग्नापूर्वी दुसऱ्याच्या अनुभवानं शहाणी झालेली आणि स्वत:ची वैवाहिक सिद्धता करून मगच लग्नाचा विचार करणारी तरुण-तरुणी तुलनेनं फार कमी वेळा भेटली; किंबहुना याच्या चुलतबहिणीच्या लग्नात जे काही घडलं, तसंच काहीसं ज्या अनेक लग्नांत घडतं, त्याचे पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाले आणि उभयतांवर, तसंच त्यांच्या कुटुंबांमध्ये जे ताण निर्माण झाले, ते घेऊन मात्र अनेक जोडपी आली. ऋतुजा आणि निनाद हे असंच एक जोडपं!
त्या दिवशी ते दोघं, ऋतुजा आणि निनाद माझ्यासमोर येऊन बसले होते. चिडलेले दिसतच होते. त्यांची एकंदरीत देहबोली व चेहऱ्यावरील भाव बघून, इकडे यायला निघता-निघता किंवा रात्री झोपण्यापूर्वी बहुधा भांडण झालं असावं असंही वाटत होतं. नमनाला घडाभर तेल न घालवता, ‘‘एकएकटं बोलायला आवडेल की एकमेकांसमोरही बोलू शकता?’’ मी विचारलं.
‘‘एकमेकांसमोरच बोलतो.’’ दोघंही एकमेकांकडे पाहात म्हणाले. पहिल्याच भेटीतील बोलणं म्हणजे तक्रारींचा न संपणारा पाढा, हे अनुभवी समुपदेशकाला माहीतच असतं आणि तरीही तो तितक्याच शांतपणे ऐकत असतो! लग्न ठरलं तिथपासूनच्या तक्रारी होत्या. सुरुवात तिनं केली. ‘‘पहिल्याच बैठकीपासून याच्या आईवडिलांचा कसा वरचष्मा होता (‘वर’ पक्ष ना!) आणि आजही (म्हणजे लग्नाला अजून वर्षही व्हायचं होतं.) सासूबाई आमच्या प्रत्येक गोष्टीत कशा हस्तक्षेप (खरं तर दादागिरी!) करतात; सारख्या चुका काढतात; कशाचंही कौतुक नाही..’’ करता-करता गाडी मानपान, देणं-घेणं यावर घसरली.
‘‘माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती विशेष चांगली नसतानाही त्यांनी देण्याघेण्याच्या खूप अटी घातल्या. याच्याकडे बघून त्यांनी त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन सर्व केलं; पण यांचं समाधान नाही. सासूबाई तर लग्नातच रुसून बसल्या. यांच्याकडच्यांची मानापमानाची, अवास्तव अपेक्षांची नाटकं सांभाळताना आमच्याकडच्यांचा जीव मेटाकुटीला आला. तरी समाधान नाहीच. आजही त्या माझ्याकडे आल्या की, तेच-तेच सर्व ऐकवून दाखवतात. घरातल्या वस्तू दाखवून, ‘ही आम्हाला कशी मिळणं अपेक्षित होती आणि कशी हलक्या दर्जाची दिली आहे.माझा एकुलता एक मुलगा. तुझ्या आईवडिलांनी विहीण म्हणून माझी किती हौस पुरवायला हवी होती. ते तर राहिलं बाजूलाच. आम्ही मागितलेलंही धड दिलं नाही..’’
‘‘यांची सारखी नाराजी, धुसफूस, माझ्या आईवडिलांना टाकून बोलणं, सारखं तेच-तेच जुनं काढणं, माझी सहनशक्ती केव्हा तरी संपणारच ना हो? आणि हा काहीच बोलत नाही. गप्प बसून राहतो. मी का ऐकून घ्यायचं मग त्यांचं?’’
‘‘हे थोडं म्हणून की काय, याला, माझ्या नवऱ्याला दिवसभर सारखे फोन करत बसायचे. तासन् तास बोलत बसायचं. माझ्याबद्दल सतत त्याचे कान भरायचे. सगळा दिवस आम्ही दोघे कामावरच असतो. रात्री जेमतेम कुठे २-४ तास एकत्र भेटतो, त्यातही यांचे फोन. आपल्या मुलाचं नवीन लग्न झालंय, त्या दोघांना वेळ मिळू द्यावा, हेही समजत नाही यांना? समजत कसं नाही? सगळं समजतं. पण मुद्दामच करायचं! इतका पझेसिव्हनेस. मुलाला सारखं आपल्या मुठीत ठेवायला बघायचं..’’
एकापाठोपाठ एक प्रेशर कुकरच्या शिट्टय़ा वाजतच होत्या. आता त्याला बोलण्याची संधी मिळाली. ‘‘अहो मॅडम, माझी आई आहे थोडी पझेसिव्ह माझ्या बाबतीत. मी कबूल करतो, पण मीही एकटाच आहे. तिच्या एकुलत्या एक मुलाचं एकदाच (?) लग्न होणार, तर आपली हौसमौज व्यवस्थित (?) पुरवली जावी, असं तिला वाटणारच ना? लग्नाआधी मी एकटाच राहात होतो नोकरीच्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही रोजच फोनवर बोलायचो. आईला त्याची सवय झाली आहे, ती एकदम कशी बदलेल? पण तिचा फोन वाजला रे वाजला की इकडे पारा चढलाच! आईला समजवायला गेलं तर तीही ऐकत नाही आणि ही तर काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते. मधल्यामध्ये सगळा ताण माझ्यावर येतो. लग्नानंतर माझं वजन केवढं कमी झालं आहे, मॅडम! कामावरही मन एकाग्र होत नाही. नोकरी सुरू केल्यापासून प्रथमच माझा परफॉर्मन्सही घसरलाय. बॉसकडून नुकत्याच कानपिचक्याही मिळाल्या आहेत. मला कळतच नाही काय करावं ते? कुणीच समजुतीने घ्यायला तयार नाही.’’ तो हताशपणे आपली बाजू मांडत होता.
तक्रारींची यादी हनुमानाच्या शेपटीसारखी लांबत चालली होती. जवळजवळ तास-दीड तास होऊन गेला होता. या सगळ्या बोलण्यात मला त्या दोघांचं लग्न, सहजीवन कुठेच सापडेना. काय बघून, काय विचार करून त्यांनी एकमेकांना निवडलं असावं? दीर्घकालीन वैवाहिक जीवनाची पायाभरणी करणारं त्यांचं पहिलं वर्ष कसं जातंय? एकमेकांसोबतचे कोणते आनंदाचे क्षण त्यांना गवसले? एकमेकांशी कुठे-कुठे जुळवून घ्यावं लागतं? ते कितपत जमतंय? या कशातला एक शब्दही नाही.
ऋतुजा आणि निनाद समुपदेशकाकडे येणाऱ्या एका मोठय़ा वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. माणसं बदलतात पण तक्रारी, प्रश्न, ताण आणि शेवटी नैराश्य अगदी सारखंच. ‘विवाह सोहळा’ या आजकाल एक ते चार दिवसांचा ‘इव्हेंट’ झालेला आहेच. त्यालाच केंद्रस्थानी करून, माणसं त्यांची सारी ताकद, पैसा, भावभावना आणि केवढा तरी वेळ त्या ‘शो’मध्ये घालत असतात. ज्या वधू-वरांना आणि त्यांच्या कुटुंबांना पुढे कैक र्वष एकमेकांशी जुळवून घेत, किमान समान कार्यक्रमांखाली किमान समाधानी राहायचं आहे, याचा विचार ना वधू-वर करताना दिसतात, ना त्यांचे कुटुंबीय ना नातलग. कुणाकडूनच विवेक, तारतम्य दाखवल्याचं दिसत नाही. खरेदी ऊर्फ लग्नाचा बस्ता बांधणं (रोजच्या जाहिरातींचा मारा ऐका, वाचा, बघा), देण्याघेण्याच्या याद्या बनवणं (बैठक बसवून), एकमेकांचे मानपान व मर्जी राखणं, रुसवेफुगवे सांभाळणं या सगळ्यात, नवविवाहितांचे मनोमीलन, दोन कुटुंबांमधील सौहार्द पूर्ण हरवून जातं. वाळूसारखं बघता-बघता निसटून जातं. ज्या समारंभावर एवढा पैसा उधळला (अगदी कर्ज काढून, उधारउसनवारी करूनही) त्याचं समाधान कुणालाच मिळताना दिसत नाही. याला शहराकडचे-गावाकडचे, देशात वा परदेशात राहणारे, जास्त वा कमी शिकलेले, विविध पदांवर कामं करणारे, असा कोणताही भेदभाव राहिलेला नाही.
लग्न ही खरं तर किती आनंददायक घटना! सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा मनोभावे आणि समंजसपणे आनंद घ्यायचा, बदलत्या काळाची दखल घेत वधू-वरांनी एकमेकांची विचारपूर्वक निवड करायची, समतेच्या पायावर आजच्या आधुनिक काळातलं वैवाहिक जीवन उभं करायचं, फुलवायचं.. या अशा साऱ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून लग्न साध्या, परंतु सर्वाना आनंद, समाधान देणाऱ्या पद्धतींनी साजरं होताना क्वचितच दिसतं. स्वत:च्या लग्नाचा, आयुष्यावर दीर्घकालीन आणि महत्त्वाचे परिणाम करणाऱ्या जोडीदार निवडीचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवून समारंभाचे आयोजन करण्याचा स्वत:चा काही वेगळा, स्वतंत्र विचार गांभीर्याने करायचा सोडून, अंधानुकरण, स्पर्धा, वैभव दाखवण्याची हौस, जाहिरातींना भुलून अमर्याद खरेदी, रोज चढत्या कमानीने वाढत चाललेले सजावटींचे प्रकार, वधू-वरांना घेऊन येणाऱ्या साध्या एका मोटारीचेच उदाहरण घ्या. सगळी कल्पनाशक्ती (की कल्पनाविलास!) ‘मी कसं इतरांपेक्षा काही तरी वेगळं, नवीन केलं’ यातच खर्ची पडलेली दिसते. आमचा थाटमाट पाहून साऱ्यांचे डोळे कसे दिपले, सगळ्यांनी कसं तोंडभरून कौतुक केलं आमच्या कार्याचं.. याची वर्णनं करण्यातच कोण अभिमान! वधू-वरही या पाण्यासारख्या वाहणाऱ्या पैशांत आपली सर्व हौसमौज भागवून घेत असतात.. भले ते कपडे, दागिने, चपलांचे जोड वगैरे वगैरे पुढे एकदासुद्धा वापरतील वा न वापरतील! कुणालाच कशाचंच काही वाटेनासंच झालं आहे.
माझ्या एका परिचितांच्या मुलाचा नुकताच घटस्फोट झाला. त्या शहरातील कुटुंब न्यायालयात, २०१५ च्या जानेवारीपासून मार्चअखेरच्या तारखेला नोंदवली गेलेली त्यांची केस आठशेच्या आसपासची होती. म्हणजे येणाऱ्या काही महिन्यांत केवळ एका तिमाहीत, एका शहरात, आपण एक हजार घटस्फोटांचा आकडा गाठणार आहोत! यातले बरेचसे घटस्फोट लग्न झाल्यापासून १ ते ५ वर्षांतच होताना दिसतात. म्हणजे एक-दोन दिवसांच्या भव्यदिव्य समारंभावर उधळलेला पैसा वायाच गेला की! मोडलेल्या त्या लग्नातील मानपानांना तरी काय स्थान उरतं नि त्या देण्याघेण्यांना तरी! सगळी वरवरची झकपक, सजावट, साजशृंगार.. सारं काही गळून पडतं आणि उरतो ते नैराश्य, ताण आणि एकमेकांविषयीची कटूता.
म्हणूनच लग्न या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. त्यासाठी ‘शो बिझनेस’मध्ये हरवलेल्या त्या दोघांच्या सहजीवनाला शोधावं लागेल. नवदाम्पत्याला त्याची जाणीव करून द्यावी लागेल. विवाह समारंभाच्या लखलखाटाच्या धामधुमीत जे ‘आऊट ऑफ फोकस’ गेलेलं असतं, ते दोघांचं ‘सहजीवन’ केंद्रस्थानी आणावं लागेल. कारण ‘विवाह म्हणजे नेमकं काय? विवाह का आणि केव्हा करायचा? विवाहातील ‘शेअरिंग्ज’ म्हणजे काय नि ती कोणती? (मुळात ती असतात इथपासून सुरुवात!) एक वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक घटना यापलीकडे शरीर, मन, मेंदू यांच्या पातळीवर विवाहामुळे नेमकं काय-काय घडतं..’ यातली एकही गोष्ट भावी वधू-वरांना सांगण्याचं कुणालाही सुचलेलं नसतं. इतका सुंदर, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि निसर्ग लाभलेला भारत देश सोडून परदेशातले हनीमून करताना (हनीमून म्हणजे नेमकं काय? ते तर जाऊच द्या हो.. तो परदेशात केला हे महत्त्वाचं!) कितीही पैसे गेले तरी चालतात.
एकूणच आजचे विवाह म्हणजे ‘पोरखेळ’ होत चालला आहे जणू. आपण लग्न नेमकं का करतो आहोत आणि पुढील पन्नास-एक वर्षांसाठी कुणाचा तरी जोडीदार बनायला आपण सक्षम झालो आहोत का? पैसे मिळवण्याव्यतिरिक्त गृहस्थाश्रमाच्या अनेक जबाबदाऱ्या उचलायला आणि कर्तव्य निभावायला आपण मनानं तयार झालो आहोत का? नातेसंबंध म्हटले की, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुसार जुळवून घेणं हे आलंच. विवाहाच्या जवळपास चार-पाच तपांच्या नात्यासाठी एकीकडे तडजोडीची, तर दुसरीकडे स्वबदलाची, त्यातून स्वविकास साधण्याची आपली तयारी झाली आहे का? हे इतके महत्त्वाचे प्रश्न आपण स्वत:ला साधे विचारूनसुद्धा बघत नाही. लग्नमंडपात नटूनथटून उभं असताना, डोळ्यांना सुखावणारा ‘मेकअप’, विवाहातील वास्तव समोर आल्यावर काहीच दिवसांत उतरतो. माणसाचं ‘खरं रूप’ समोर येतं. त्याला सामोरे जाण्याची आपली मानसिक तयारी झाली आहे का? हा प्रश्न विवाहेच्छुंनी स्वत:ला आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांना एकदा तरी विचारायला हवा असं आपल्याला वाटतं का?
ऋतुजा आणि निनादसारखे असंख्य तरुण-तरुणी तो स्वत:ला विचारत नाहीत, ना त्यांचे पालक! म्हणूनच तर ते सारे जण फक्त लग्नातील मानापमान, अपेक्षाभंगाचा राग, नाराजी, नैराश्य, त्यातून परस्परांचा दुस्वास..अशा साऱ्या नकारात्मक भावनांचं ओझं घेऊन वावरत होते. ते ओझं त्या साऱ्यांनाच आता पेलवेनासं झालं होतं, पण कुणालाही ते आपापल्या पाठीवरून उतरवून टाकूनही द्यायचं नव्हतं! तसंच सांभाळत राहायचं होतं, ज्याचं रुपांतर एकमेकांची उणीदुणी काढण्यात, भांडण्यात, परस्परांवर दोषारोप करण्यात होत होतं. विवाहातला आनंद त्या सगळ्यात पार कोमेजून गेला होता. सहजीवनावर गडद सावली पडली होती या सगळ्याची!
..आणि वर म्हटल्याप्रमाणे, ऋतुजा-निनाद आणि त्यांचे पालक हे आपल्या समाजातील सध्याच्या या चित्राचं केवळ प्रतिनिधित्व करतात!
(लग्नाचा आनंद आयुष्यभर अनुभवायचा असेल, समाधानी सहजीवन व्यतीत करायचं असेल तर लग्नापूर्वीच एकमेकांविषयीची अनुरुपता आणि परस्परपूरकता जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तशी ती जाणून घेता येते. कशी ते पाहूया पुढील, २९ ऑगस्टच्या अंकात.)
vankulk57@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2015 2:30 am

Web Title: negative burden
Next Stories
1 संदर्भ जगण्याचे
2 ‘सा’ ची आराधना..
3 शक्यता दुर्बीण वापराच्या
Just Now!
X