उमा बापट

umaajitbapat@gmail.com

Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

निरागसता फक्त बालवयापुरती मर्यादित नाही. वय वाढले तरी वागण्यातली निरागसता ही माणसाची सहज अभिव्यक्ती असू शकते. जर निष्पाप वयापासून घराघरांत चिंतेचे दुखणे विकत घ्यायचे नसेल तर वातावरणातच निरागसता सामावलेली हवी. ‘मूलपण’ जपले की मुलांचे स्वास्थ्य टिकेल. पालकांच्या, शिक्षकांच्याही वागण्यात निरागसता सहजतेने रुजलेली असेल तर पालकत्वात पदोपदी येणारे अडसर चिंतेचा विषय बनणार नाहीत.. आपल्या निरामय घरटय़ातली एक काडी निरागसतेची..

‘‘बाप्पा रागावला का?’’ चार वर्षांच्या मिताने देवघराजवळ बसलेल्या आजीला विचारले. अनपेक्षितपणे विचारलेल्या या प्रश्नाने आजी कोडय़ात पडली. घरातल्यांशी बोलल्यावर, मिताच्या मनात असे का आले, याचा अंदाज तिला बांधता आला. काही वेळापूर्वी तिचे आजोबा म्हणाले होते, ‘‘सांगितलं ना, आता उडय़ा मारणं पुरे. सांगितलेले ऐकले नाही तर देवबाप्पा रागावतो आपल्यावर.’’ आजोबांचे न ऐकता तिने उडय़ा मारणे चालूच ठेवले होते. मात्र आजोबांचं ऐकलं नाही म्हणून खरंच देवबाप्पा रागावला आहे का? हे पाहायला मात्र ती विसरली नाही.

परीराणी, राक्षस, सांताक्लॉज यावर विश्वास बसणे यापलीकडे निरागसता सकस, सुंदर, निर्मळ असते. इंग्रजीत ज्याला ‘इनोसन्स’ म्हटले जाते, विदाऊट हार्म वा मराठीत आपण म्हणतो, निष्पाप! हेतुपूर्वक त्रास न देणारे, कोणाचे वाईट न चिंतणारे निष्पाप मन व निरागस वागणे. लहान मुलांमध्ये स्वाभाविकपणे दिसणारी ही गुणवैशिष्टय़े! प्रौढत्व म्हणजे निरागसतेचा अभाव असे समीकरण झाले असेल तर ते चुकीचेच आहे.

जन्मापासून मनावर माहितीचे लोट आदळणाऱ्या पिढीला निरागस राहाता येईल का, हा खरा प्रश्न आहे. औपचारिक शिक्षणाचे वय अलीकडे येत गेले तसे मुलांचे भावविश्व निर्मळ ठेवणारे वातावरण बदलत गेले. ज्या वयात मुलांना मानसिकदृष्टय़ा स्पर्धा मानवणाऱ्या नाहीत त्या वयातदेखील स्पर्धाना अग्रक्रम मिळाला. बालवयोगटातील उत्स्फूर्त, सहज-खेळाचा मानसशास्त्रीय अभ्यास झालेला आहे. तीन-चार वर्षांखालील मुलांना नेमून दिलेल्या निर्मितीपेक्षा त्याच्या प्रक्रियेत जास्त रस असतो. जसे कागदाची एखादी वस्तू बनवण्याआधी मुले कागद हाताळून, चुरगळून, फाडूनही पाहू शकतात. त्याचे तुकडे होतात का? ही निरागस उत्सुकता असते. यातून त्यांना ना काही बनवायचे असते ना काही मिळवायचे. स्पर्धेतील काटेकोर नियम पाळण्यासाठी जी मानसिक पूर्वतयारी हवी ती या वयात तयार व्हायची असते. स्पर्धा म्हणजे काय, याचा गंधही नसताना त्याआधी त्यांना स्पर्धेत उतरवले जाते!

एक प्रातिनिधिक उदाहरण विस्ताराने बघू या. निरागसतेला न मानवणारे वातावरण मिळाले तर काय होऊ शकते हे या उदाहरणातून समजून घेता येईल. एखादा उपक्रम चिंतेची मालिका कशी तयार होऊ शकतो हेही त्यातून पाहता येईल. शहरात अनेक बालवाडय़ांमध्ये फॅन्सी ड्रेस किंवा त्यासारख्या सर्वमान्य स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. पाच-सहा वर्षांच्या पुढील मुलांसाठी या उपक्रमातून शिकण्यासारखे, मजा घेण्यासारखे बरेच काही असते. सभाधीटपणा यावा, नक्कलेतली गंमत यावी, वेगवेगळ्या भूमिका कळाव्यात यासाठी ही चांगली सुरुवात आहे. पण तीन-चार वर्षे आणि त्याच्या खालच्या मुलांसाठीही अशाच स्पर्धा घेतल्या जातात तेव्हा मात्र मुलांवर वेगळा परिणाम करणारे होऊ शकते. या स्पर्धाचे स्वरूप ‘बक्षीस सगळ्यांना’ इतपत बदलले जाते फार तर.. पण शिशुवयातल्या खेळातून व्यक्त होण्याच्या गरजा आणि मानसिक वाढीची स्थिती याला अनुसरून हे उपक्रम आहेत का, याचा पुरेसा विचार, शास्त्रीय आधार याकडे दुर्लक्ष होते. याचे गांभीर्य आयोजकांना असणे महत्त्वाचे असते. आजकाल तीन वर्षांच्या मुलाने स्पर्धेत बक्षीस मिळवले तर तो पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय बनतो. २०२० च्या जमान्यात तर तो ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स’ही होऊ शकतो. पण जर तीन वर्षांचे मूल स्टेजवर जाऊन ठरवून दिलेले हावभाव करत काही बोललेच नाही तर? खरे तर इतकी साधी घटना.. पण एखाद्या आईसाठी अपराधीपणाच्या भावनेला निमित्त होऊन बसते. ‘‘तिची-त्याची तयारी नीट करून घेतली होती, घरी नीट करत होती-होता. रात्री जागून टोपी बनवली होती मी. इतर मुले कशी स्टेजवर जाऊन बोलू शकतात? माझ्याच मुलाला-मुलीला हे का नाही जमले?’’ अशा अनेक चिंतांचे उगमस्थान मुलांनी न केलेल्या काही सेकंदांच्या सादरीकरणात आहे.

वयाला न साजेशा स्पर्धा- काही पालकांच्या अवास्तव अपेक्षा- काही मुलांवर सरावाचा ताण- जर अनपेक्षित यश मिळाले नाही तर काही पालकांना येणारी अपराधीपणाची भावना- काही पालकांची मुलांवर नाराजी- आनंदावर बाधा आणणाऱ्या आठवणींचे पडसाद- पुढच्या स्पर्धाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर होणारे परिणाम, अशी ही हनुमानाच्या शेपटीसारखी चिंतेची साखळी वाढत जाते. एका साध्या प्रसंगातून पालक-मूल नात्याचे पोत बदलले जाऊ शकते. मुलाच्या स्व-प्रतिमेवर आणि पालकांनी मुलांची जी प्रतिमा त्यांच्या मनात तयार केली आहे त्याच्याशी अशा अनुभवांचा थेट संबंध असतो हे ओघाने आलेच.

आमच्या बालपणात डोकावून पाहिले तर घरातल्या ओढण्या घेऊन परीराणी बनण्याच्या सहज-खेळापासून ते आजोबांची वाकून चालण्याची नक्कल करण्यातही बागडणारी बालसुलभता आमच्यात होती, पण आताच्या मुलांकडे पाहिले तर वाटते त्या निरागसतेपासून किती लांब आलो आहोत आपण. भरपूर माळा, मोठी टिकली लावून स्वत:त रमणाऱ्या सानुल्यांची निरागस ऊर्मी, घटकेत काठीचा घोडा, तीच काठी तलवार तर कधी लाटणंही व्हायची.. ‘लकडी की काठी’चं हे मासूम वय! त्यात कोणत्या घाईने घुसली स्पर्धा? कोणाचा जय? कसली हार? नेमके कशाला बक्षीस? उत्तेजन? आणि कोणाला सांत्वन? (‘कनसोलेशन प्राइज’ हा शब्द कोणत्या वयाला साजेसा?) जिथे फक्त त्या क्षणात मुलांचे असणे असते, कोणासमोर काही सादर करण्याचा आविर्भाव नसतो. अशा निष्पाप मानसिकतेला अलगद अनुभवता येत नसेल तर मुले ते अनुभवणार तरी कधी?

पालक कार्यशाळांमधील चच्रेतून अशा प्रकारच्या उपक्रमातील मुलांच्या निरागसतेची मार्मिक उदाहरणे आठवतात. एक आई तिची अडचण सांगत होती. माझ्या मुलाची पूर्ण तयारी झाली होती, पण स्पर्धेच्या वेळी तो अजिबात बोललाच नाही. त्याच्या मते, ‘आदल्या दिवशी घरी सगळ्यांसमोर त्याने ते बोलून दाखवले होते, मग दुसऱ्या दिवशी शाळेत पुन्हा तेच का म्हणायचे? त्याला आपल्या ओळखीच्या माणसांपुढे बोलायचे होते. अनोळखी लोकांसमोर कशाला बोलायचे?’ असा त्याचा रास्त प्रश्न होता. बालवाडीतील वयात नुसता सराव, रंगीत तालीम, अंतिम कार्यक्रम यातली प्रौढ-फारकत का समजावी? गरजेपेक्षा जास्त सरावाची या वयातील मुलांकडून अपेक्षा का केली जावी? मुले- पालक- शिक्षक यांच्या ताणाचा हा विषय का बनावा? ज्या वयात मुलांचे विश्व सहज-खेळाभोवती गुंफलेले असते, त्या वयात सादरीकरणांची आवश्यकता आहे का? स्पर्धा हे ‘साधन’ आणि त्यातले मुलांचे सादरीकरण हे ‘साध्य’ होईल का? साध्य आणि साधन एकच असलेली ही शुद्ध अवस्था! कामावर निष्ठा असलेले थोर लोकही फक्त काही मिळवण्यासाठी काम करत नाहीत तर कामातला प्रत्येक कण नि क्षण ते एका अर्थाने निरागस शुद्धतेने जगतात.

‘सहज-खेळणं’ हा मुलांचा विरंगुळा! मुलांना आनंद झाला किंवा ती रागावली तरीही सोबतीला खेळ, काम केले तरी तो खेळच. म्हणून तर लहान मुले हौसेने केर काढतात आणि काही मोठी माणसे नाइलाजाने! मुलांना कंटाळा आला तर ते खिडकीच्या बाहेर बघून मन रमवू शकतात. कंटाळा घालवण्यासाठी स्वत:च्या आत डोकावण्याची उपजत योजना निरागस अवस्थेत आहे. पण निरागसतेने साधे क्षण कसे टिपायचे हे आजची मंडळी विसरत चालली आहेत. खिडकीची दारे उघडी असतानाही, बंदिस्त चौकटींचा आधार घेण्याची अपरिहार्य हतबलता बाजारीकरणातून बेमालूमपणे निर्माण केली गेली. मनोरंजनासाठी पैसे, विजेवरची उपकरणे लागतात ही आधुनिक शहरी जीवनातली प्राथमिक गृहीतके कशी, कधी बनली?

निरागसता फक्त बालवयात मर्यादित नाही. वय वाढले तरी वागण्यातली निरागसता ही माणसाची सहज अभिव्यक्ती असू शकते. मुलांबरोबरच सर्व वयोगटातील निरागसता जपणे कठीण व्हावे असे समाजमान्य संकेत बदलत चालले आहेत. शहरीकरण, प्रौढ औपचारिकतेच्या भ्रामक कल्पनांमध्ये बघता-बघता समाज फसत गेला. निरागस कुतूहलाने एखादा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे हसे व्हायला आजकाल प्राथमिक शाळेपासूनच सुरुवात होते. सहज कोणाला दाद दिली तर विनाकारण दाद देणाऱ्या व्यक्तीचे त्यामागे छुपे डाव आहेत, अशी शंका घेण्याकडे काही लोकांचा कल दिसतो. इंग्रजीत ज्याला ‘नाईव्ह’ म्हणतात तसा नवखेपणा ही निरागसतेतील सुंदर छटा न मानता बावळटपणा मानला जातो. एखादी प्रौढ व्यक्ती जी निष्पापपणे वागत असली तरी त्या व्यक्तीला मराठी भाषेत ‘गरीब बिचारी’ म्हणून संबोधले जाते. काहीसा विरोधाभास आहे ना हा? निष्पापपणा हा एका अर्थाने सकस भाव आहे, शुद्धतेकडे जाणारे हे वागणे आहे. ही श्रीमंती मानावी की गरिबी?

जर निष्पाप वयापासून घराघरांत चिंतेचे दुखणे विकत घ्यायचे नसेल तर वातावरणातच निरागसता सामावलेली हवी. अशी कल्पना करू.. बालवाडय़ा, पाळणाघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, टोप्या, मोजडय़ा, पिसं, जुन्या काळातील वस्तू आणि असे बरेच काही नुसते ठेवलेले आहे. मुले मोकळेपणे वावरत आहेत, वस्तू हाताळून, कपडे घालून पाहात आहेत, स्वत:चे स्वत: पोशाख तयार करत आहेत. आरशात स्वत:कडे बघून हसत आहेत. पालक, शिक्षक ही निरागसता फक्त अनुभवत आहेत, त्यांना या चिमुकल्यांकडून काहीही पाठ करून घ्यायचे नाही. राक्षसाची शिंगे लावलेला मुलगा आणि फुलपाखरांचे पंख लावून भिरभिरणारा मुलगा एकमेकांचे स्पर्धक नाहीत तर सोबत खेळत आहेत. हे किती निरागस दृश्य. वर्षांतून एकदाच नाही तर बालवाडय़ांमध्ये हा नित्य खेळाचा भाग असू शकतो. अमेरिकेत काही बालवाडय़ांमध्ये, मुलांसाठीच्या केंद्रांमध्ये यासाठी खुली रचना असते आणि मुलांना यातून सहज-खेळाची मुभाही असते.

पालक म्हणून आपणही काही गोष्टी आठवून पाहू –

* मी गेल्या आठवडय़ात कोणता सहज निरागस अनुभव घेतला?

* कोणाचे निष्पाप वागणे मला भावून गेले?

* माझ्या घरचे वातावरण निरागसतेला धक्का देणारे आहे का? यावर मी विचार केला आहे का?

‘मूलपण’ जपले की मुलांचे स्वास्थ्य टिकेल. पालकांच्या, शिक्षकांच्याही वागण्यात निरागसता सहजतेने रुजलेली असेल तर पालकत्वात पदोपदी येणारे अडसर चिंतेचा विषय होणार नाहीत. समाजमान्यच पण काही पद्धतींचा (जसे की स्पर्धा) तणावपूर्व वातावरण तयार करण्यात थेट संबंध असतो याचे भान ठेवायला हवे. तसेच एखादी मुलांच्या वयाला साजेशी सहज-खेळाची खुली रचना वातावरणातला ताण हलकेच घालवण्यात सोबत करू शकते यावर विश्वास ठेवू या.

नवनवीन तंत्रज्ञानाच्या काळात मानवी मनाचे स्थायी असे निरागसतेचे मंत्रज्ञानही स्मरू या. निरागसतेचा आपल्या आतला झरा नित्य जिवंत ठेवू. जपू या आपल्या निरामय घरटय़ातली एक काडी निरागसतेची..

आजच्या जगण्याच्या धबडग्यातून लहान मुलंही सुटलेली नाहीत, हे समाज म्हणून निश्चितच चिंताजनक आहे. वाढती स्पर्धा म्हणा, मग ती गुण मिळवण्याची असो, आर्थिक सुबत्तेची तुलना करणारी असो मुलांमुलांमधला मैत्र भाव संपवतो आहे. आई- वडिलांच्या जगण्यातले, नात्यामधले ताण मुलांमध्ये झिरपायला लागले आहेत. त्यातून मुलांचं जगणंही तणावाचं होत चाललेलं आहे. आपल्याला हा प्रश्न फक्त स्वत:चा वाटला तरी साकल्याने तो समाजाचा होत चालला आहे, म्हणूनच मुलांच्या मानसिकतेकडे जाणीवपूर्वक पाहणे पालक म्हणून अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पाखरांना निश्चिंत निरामय घरटं देणं आपलं कर्तव्य आहे, कसं ते जाणून घेऊ  ‘निरामय घरटं’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.