|| अर्चना जगदीश

मारियन नॉर्थ या व्हिक्टोरियन काळातल्या स्त्रीने त्या काळी जगभर फिरून स्वत: काढलेली वनस्पती आणि त्यांच्या अधिवासाची साडेआठशे तैलचित्रं आजही लंडनजवळच्या ‘क्यू’ उद्यानात आहेत. तिच्या स्मरणार्थ एका वनस्पतीचं ‘नेपेंथेस नॉरदीयाना’ असं नामकरण करण्यात आलं. तसेच पाच वनस्पतींना नॉरदीयाना हे प्रजातीनाम देण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे या पाचही वनस्पतींना सर्वप्रथम जगापुढे आणण्याचं कामही मारियननेच केलं होतं. मारियन आपल्याला हवं तसं आयुष्य जगली, वनस्पतींवर प्रेम केलं, त्यांचा मागोवा घेण्यासाठी जगभर फिरली आणि तैलचित्रांचा मोठा वारसा मागे ठेवला. त्या मारियनविषयी..

जगभरातल्या वनस्पतिशास्त्रज्ञांना आणि वनस्पतिप्रेमींना एकदा तरी लंडन जवळच्या ‘क्यू’ इथल्या वनस्पती उद्यानात जायचं असतं. शेकडो एकर पसरलेल्या या उद्यानात जगभरातल्या हजारो वनस्पती प्रत्यक्ष लावून जतन केलेल्या आहेत. इंग्लंडच्या राजघराण्याची खासगी बाग म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या आधीपासून हिची निगा राखली जात असे. पुढच्या दीड-दोनशे वर्षांत ते वनस्पती संशोधनाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. हे क्यू उद्यान त्यातल्या अनेक वैशिष्टय़ांसाठी प्रसिद्ध आहे. इथंच महाकाय व्हिक्टोरियन लिली अनेक तळ्यांमध्ये जपून ठेवली आहे, जगभरातल्या शेकडो वेगवेगळ्या जातींच्या कीटकभक्ष्यी वनस्पती कृत्रिम वातावरणात आनंदाने वाढताना दिसतात. जगातल्या प्रत्येक भागातल्या वनस्पती आणि त्यांचे अधिवास म्हणजे अगदी विषुववृत्तीय सदाहरित जंगल ते सहारा वाळवंट आणि हिमालयीन वनस्पती तसेच अति उंचीवरच्या कुरणासारखी परिस्थिती सगळंच इथं तयार केलं आहे. जगभरात दुर्मीळ-लुप्तप्राय होत चाललेल्या अनेक वनस्पती कायमच्या नष्ट होऊ नयेत यासाठी इथं वाढविल्या जातात.

अर्थात फक्त वनस्पती आणि त्यांचे विविध अधिवासच नाही तर हे सगळं उभं करतानाचा इतिहासही इथं जिवंत आहे. मी पहिल्यांदा ‘क्यू’ उद्यानात गेले तेव्हा काय बघू आणि काय नको असं झालं होतं. फक्त वनस्पतीच नाही तर हा इतिहासही खुणावत असतो. उद्यानाची माहितीपुस्तिका घेऊन फिरत असताना ‘मारियान नॉर्थ कलादालन’ हे नाव वाचून उत्सुकता जागृत झाली. या छोटेखानी कलादालनात गेल्यावर जाणवलं की, संशोधन आणि त्यासाठी फिरणाऱ्या स्त्रियांनी पुढच्या पिढय़ांसाठी केवढं संचित ठेवलं आहे. इथं मारियान नॉर्थ या व्हिक्टोरियन काळातल्या स्त्रीने त्या काळी जगभर फिरून स्वत: काढलेली वनस्पती आणि त्यांच्या अधिवासाची साडेआठशे तैलचित्रं आहेत.

मारियान नॉर्थचा जन्म १८३० मध्ये एका संपन्न ब्रिटिश कुटुंबात झाला आणि तिच्या आईवडिलांची ऊठबस त्या काळच्या सुसंपन्न आणि राजघराण्यातल्या लोकांबरोबर होती. लहानपणी ती आपल्या आईवडिलांबरोबर नॉर्थफोकमधलं घर, हेस्टिंगमधली इस्टेट आणि लंडन इथं सतत प्रवास करत असे. आपल्या घराभोवतालच्या परिसरातून वनस्पतींचे नमुने गोळा करणं ते वाळवून नीट जतन करून ठेवणं, तलचित्र काढणं हे तिचे छंद होते आणि तिच्या वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं. १८४७ मध्ये आईवडील आणि कुटुंबाबरोबर तिने युरोपमध्ये प्रवास केला आणि चित्रं काढणं हे आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं हे तिच्या लक्षात आलं.

या तीन वर्षांच्या प्रवासात तिने झाडां-फुलांचं नीट निरीक्षण करून त्यांची तैलचित्रं काढण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवलं. १८५५ मध्ये तिची आई वारल्यानंतर तिने वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी उचलली आणि पुन्हा दोन-तीन वर्ष बहीण आणि वडिलांबरोबर युरोपमधल्या स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया, ग्रीस, इटली अशा अनेक देशांचा दौरा केला. मारियान आपल्या प्रवासाच्या हकिगती दैनंदिनीमध्ये लिहून ठेवत असे आणि अनेक रेखाचित्रंही काढत असे. पुढच्या जगप्रवासाला ती एक प्रकारे स्वत:ला तयार करत होती. त्याच सुमारास १९७० मध्ये तिचे वडील वारले. बहिणीचं लग्न झालं होतं. त्यानंतर मारियान काही महिने जवळजवळ अज्ञातवासात होती. त्यानंतर मात्र तिने संपूर्ण आयुष्य भटकण्यात आणि वनसंपत्ती-फुलांची चित्रं काढण्यात घालवायचं असं ठरवलं.

त्याच सुमारास ‘क्यू’ उद्यानाचे अधीक्षक सर जोसेफ हूकर यांनी विषुववृत्तीय प्रदेशातून आणलेली आणि उद्यानात वाढलेली आर्महर्सटिया ही वनस्पती आणि तिची सुंदर फुलं मारियानला दाखवली. आपणही प्रत्यक्ष अशा दूरच्या प्रदेशात जाऊन जागेवर हे सगळं सृष्टिवैभव बघून चित्रं काढावीत, असं तिच्या मनात आलं. त्या काळात एकटीनं जगप्रवास आणि तेही बोíनओ- ब्राझीलसारख्या अनवट प्रदेशात, हे मोठंच साहस होतं. कारण तोपर्यंत अशा अनेक दुर्गम ठिकाणांना युरोपियनांचा स्पर्श झाला नव्हता. तिला कंपनी फारशी आवडत नसे आणि सगळं प्रवास तिने एकटीनेच केला. तिच्या कुटुंबाचा राजघराण्याशी असलेला स्नेह उपयोगी आला आणि अनेक देशांमध्ये जाण्यासाठी तिला पत्र आणि ओळखी मिळाल्या. आपल्या प्रवासासाठी तिने हेस्टिंग्ज इथली इस्टेट विकली. १८७१ ते १८७४ या काळात ती अमेरिका, कॅनडा, जमका आणि ब्राझील इथं जाऊन आली. ब्राझीलच्या आठ महिन्यांच्या वास्तव्यात तिने १०० तैलचित्रं काढली. १८७५ ते १८७७ या दोन वर्षांत ती जपान, बोíनओ, जावा आणि श्रीलंका इथं जाऊन आली. प्रत्येक ठिकाणी गेली की ती चित्रं तर काढायचीच पण वनस्पतींचे नमुनेसुद्धा गोळा करून आणायची. तिने बोíनओच्या घनदाट जंगलाच्या आणखी दुर्गम भागातून गोळा केलेले काही नमुने अजूनही क्यूच्या पादपालयात (हर्बेरियम) जतन करून ठेवलेले आहेत. तिने सर्वात प्रथम सगळ्यात मोठं पिचर असलेल्या नेपेंथेस या कीटकभक्ष्यी- घटपर्णी वनस्पतीचं चित्र काढलं, नमुनेही आणले. पुढे मारियानचा सन्मान म्हणून या वनस्पतीचं ‘नेपेंथेस नॉरदीयाना’ असं नामकरण करण्यात आलं.

मारियानला आपलं ध्येय सापडलं होतं आणि ती झपाटल्यासारखा प्रवास करतच राहिली. १८८० मध्ये चार्ल्स डार्वनिच्या सूचनेवरून ती ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पुन्हा बोíनओ असा प्रवास करून आली. या प्रवासात तिने ३०० तैलचित्रं काढली. १८८१ मध्ये तिने ती डार्वनिला दाखवली आणि अर्थातच डार्वनिने तिच्या चित्रांची खूप प्रशंसा केली. डार्वनिचं हे मूळ पत्रही ‘मारियान दालन’मध्ये जपून ठेवलेलं आहे.

ही सगळी चित्रं सांभाळण्याचं काम जिकिरीचं आहे आणि आपला वारसा, आपली समज पुढच्या पिढय़ांसाठी ठेवायची असेल तर या संग्रहासाठी योग्य जागा शोधली पाहिजे असं तिच्या मनाने घेतलं आणि अर्थातच ‘क्यू’शिवाय आणखी योग्य जागा नव्हती. तिने १८७९ मध्येच त्या वेळचे ‘क्यू’चे संचालक सर जोसेफ हूकर यांना आपला संग्रह देणगी म्हणून देण्यासाठी पत्र लिहिलं. शिवाय यासाठी लागणारं दालन- संग्रहालयही आपणच स्वखर्चाने बांधून देऊ याची ग्वाही दिली. मग पुढची दीड-दोन वर्ष तिने या दालनाच्या आराखडय़ापासून ते प्रत्यक्ष चित्रांची मांडणी करण्यापर्यंत सगळं काम मनापासून केलं. तिने एक अट घातली होती, ती अशी की, तिने केलेली चित्रांची मांडणी आणि क्रम पुढे कधीही बदलता काम नये. या संग्रहालयात तिने यासाठी केलेले कच्चे-पक्के आराखडेही जपून ठेवले आहेत. तिच्या चित्रांमध्ये फक्त फळं-फुलंच नाहीत तर त्यांचा अधिवास, आजूबाजूचे त्या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी, कीटक यांचाही समावेश आहे. वनस्पतींची चित्रं काढणं सोपं नाही, कारण त्यांच्या सर्व वैशिष्टय़ांसह पानं-फुलं चितारणं यासाठी वेगळी प्रतिभा असावी लागते आणि अधिक कष्टही घ्यावे लागतात. मारियानचा ध्यास तर यासाठीच होता. १८८२ मध्ये या दालनाचं औपचारिक उद्घाटन झालं आणि ‘क्यू’मध्ये येणाऱ्या दर्शकांच्या मनात मारियानने मानाचं स्थान मिळवलं.

पण हा मानमरातब बघायला ती तिथं थांबली नाही. कारण आणखी अनवट प्रदेश आणि तिथली वनसंपदा तिला साद घालत होती. ती चिले आणि सेशल्सला प्रवासाला गेली, भारतातही काही काळ येऊन गेली. यानंतर मात्र तिचा प्रवास थांबला. तिने ‘रिकलेक्शन ऑफ हॅपी लाइफ’ या नावाने आपल्या सगळ्या प्रवासावर आधारित चरित्रात्मक ग्रंथ लिहिला. मारियानने चाळिसाव्या वर्षी खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयासाठी प्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी असा प्रवास एकटीच्या जिवावर करायला सहसा पुरुषदेखील तयार नसत. पण मारियानने ते आव्हान पेलले. विषुववृत्तीय प्रदेशातील रोगराई, हवामान, प्राणी आणि कीटक, आदिवासी जमाती या सगळ्याला तोंड देत तिने सातत्याने आपली फिरस्ती चालूच ठेवली. ती स्वत: वनस्पतिशास्त्रज्ञ नव्हती  किंवा तिने त्यातलं काही शिक्षण घेतलं नव्हतं. पण आपल्याला दिसणारं सौंदर्य आणि निसर्गाबद्दलची खोलवर जाणीव सर्वाना समजावी म्हणून ती तिच्या कुंचल्याच्या माध्यमातून धडपडत राहिली. कलेच्या माध्यमातून वनस्पतिशास्त्राकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं फार मोठं काम या व्हिक्टोरियन काळातल्या या स्त्रीने केलं होतं. आपल्याला आज कल्पना येणार नाही, पण व्हिक्टोरियन झगे घालून बोटीतून-डोंग्यांमधून प्रवास करायचा, डोंगर आणि दलदली पार करायच्या हे येरागबाळ्याचं काम नाही. आपलं काम आपल्यानंतरही मागे उरावं म्हणून तिने आपलं सगळं काही देऊन या चित्रांसाठी दालन उभारलं हेही त्या काळाच्या दृष्टीनेदेखील वेगळंच होतं.

तिच्या कामाचा सन्मान करायला ब्रिटिश विज्ञानजगत विसरलं नाही. तिच्या नावाने नॉरदीयाना म्हणून एका वनस्पती गटाचं नामकरण करण्यात आलं, तर पाच वनस्पतींना नॉरदीयाना हे प्रजातीनाम देण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे या पाचही वनस्पतींना सर्वप्रथम जगापुढे आणण्याचं कामही तिनेच केलं होतं.

मारियान आपल्याला हवं तसं आयुष्य जगली, वनस्पतींवर प्रेम केलं, त्यांचा मागोवा घेण्यासाठी जगभर फिरली आणि आपल्या सगळ्यांसाठी तिच्या हजारभर तलचित्रांचा मोठा वारसा मागे ठेवून ३० ऑगस्ट १८९० मध्ये मारियानने जगाचा निरोप घेतला म्हणूनच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तिचं हे कृतज्ञ स्मरण.

  • ब्रिटिश लोकांना आपला वारसा आणि तो जतन करण्याचं महत्त्व समजतं. अनेकदा असं जतन करण्याचा महोत्सवही ते करतात. आपल्याकडे वारसा तर लांबच, पण निसर्गदेखील ओरबाडून घेण्याकडेच कल दिसतो. आता तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासाच्या काळात अशा प्रवासाची, प्रत्यक्ष अनुभवाची गरजही कदाचित पुढच्या पिढय़ांना राहणार नाही. पण तरीही संवेदनशील मनांना मारियनचा प्रवास आणि तिने करून ठेवलेलं पुढच्या पिढय़ांसाठी कला आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचं प्रचंड काम नेहमीच प्रेरणा देत राहील.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com