योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

तंत्रज्ञानाशिवाय आजचं जग चालणार नाही, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि पुन्हा गजर वाजून जाग येईपर्यंत मोबाइल आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. पण तरीही त्याला बाजूला ठेवून जगण्याच्या पारंपरिक पद्धतीच अधिक योग्य होत्या, असं म्हणता येईल का?  तंत्रज्ञानाबद्दल, त्याच्या आपल्या जगण्याला व्यापून टाकण्याविषयी तटस्थपणे विचार करता येईल का?

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
what is google wallet app
गूगलचे ‘Google wallet’ नेमके आहे तरी काय? कोणते अँड्रॉइड वापरकर्ते घेऊ शकतात याचा लाभ?
Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
It was seen in paris how a public toilet is being cleaned automatically
VIDEO: पॅरिसमध्ये अशाप्रकारे होते सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता; ‘हे’ खास तंत्रज्ञान आपल्याकडे कधी येणार?

सकाळी पावणेआठच्या आसपास ठरवलेली सगळी कामं संपल्यामुळे तो निवांत होता. घरगुती खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्याचा दिवस भल्या पहाटेच सुरू व्हायचा. व्यवसायाशी निगडित काही लोकांना ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्यानं आपला लॅपटॉप सुरू केला.

पण बरेच प्रयत्न करूनही जेव्हा पैसे ट्रान्सफरच झाले नाहीत तेव्हा तो वैतागला. तेवढय़ात बेल वाजली. त्यानं दार उघडलं, तर त्याच्याकडून नेहमी खाद्यपदार्थ घेणारे काका उभे होते. काल त्यांच्या घरी तो  पदार्थाची डिलिव्हरी द्यायला गेला होता. पण तेव्हा घरी कु णीही नसल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शेजारी ठेवून तो परत आला होता. त्यामुळेच काका न चुकता त्याला पैसे द्यायला आले होते.

खरं तर त्या पन्नाशीतल्या काकांना त्यानं ऑनलाइन पैसे पाठवायला सुचवलं होतं. पण काकांनी ‘भेटूनच पैसे देतो,’ असं सांगितल्यामुळे कदाचित काकांना ऑनलाइन व्यवहाराची जास्त माहिती नसावी, असा निष्कर्ष त्यानं काढला होता. काका घरात आले, तसं तो म्हणाला, ‘‘पैसे देण्याची इतकी घाई करण्याचं काही कारण नव्हतं. मी दोन-तीन दिवसांनी तुमच्या भागात येणार होतो तेव्हा पैसे घेतले असते.’’ त्यावर हसून काका म्हणाले, ‘‘रोज सकाळी चालायला बाहेर पडतोच. आज तुझ्या भागात आलो. आता थोडा वेळ त्या समोरच्या बागेत फेऱ्या मारेन आणि मग घरी जाईन. तेवढंच नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं.’’

हे बोलणं सुरू असतानाच काकांचं लक्ष त्याच्या लॅपटॉपकडे गेलं. तो ऑनलाइन पैसे पाठवत होता हे लक्षात आल्यावर काका म्हणाले, ‘‘आज नऊनंतर पैसे पाठव. मुख्य सव्‍‌र्हरच्या मेंटेनन्सचं काम सुरू आहे.’’ त्यावर तो आश्चर्यानं म्हणाला, ‘‘हे तुम्हाला कसं माहिती?’’

त्यावर काका शांतपणे म्हणाले, ‘‘अरे माझ्या कंपनीचं जे सॉफ्टवेअर आहे. त्यातला एक भाग ऑनलाइन पैसे पाठवण्याशी संबंधित आहे. तेव्हा त्याच्याशी निगडित सगळी माहिती आम्हाला मिळत असते. आज सकाळच्या वेळात कदाचित तासाभरासाठी सव्‍‌र्हर बंद असेल हे काल दुपारीच मला समजलं होतं.’’

त्यावर तो गोंधळून म्हणाला, ‘‘काका तुम्हाला हे सगळं इतकं माहिती आहे, तर मग तुम्ही काल मला फोनवर ‘ ‘ऑनलाइन ट्रान्सफर’ फार वापरत नाही,’ असं का म्हणालात?’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘मला माहिती सगळं असतं. पण मी त्याचा वापर खूप कमी करतो.’’

‘‘म्हणजे?’’ त्याचा गोंधळ आणखी वाढला.

‘‘तुला खरोखर ऐकायचं असेल तर चल.. बागेत चालता चालता बोलू.’’ असं म्हणून काका त्याला घेऊन घराबाहेर पडले.

बागेत पोहोचल्यावर काका म्हणाले, ‘‘सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मोबाइल फोन आला, तेव्हा मलाही त्याबद्दल कमालीचं अप्रूप वाटलं होतं. पण मग काही महिन्यांतच मला पहिला झटका बसला. मोबाइल येण्यापूर्वी माझे जे नंबर तोंडपाठ होते ते मी विसरायला लागलो. त्याचं मला आश्चर्यही वाटलं आणि थोडं वाईटही. म्हणजे तंत्रज्ञानानं नंबर साठवून ठेवण्याची सोय केलेली आहे. पण त्यावर पूर्णपणे विसंबून राहाणं हे खरोखर योग्य आहे का?, असा प्रश्न मला पडला. मग पुढे जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसं नवनवीन अविश्वसनीय गोष्टी प्रत्यक्षात आल्या आणि सोयीच्या पुढे जाऊन सोयीस्कर वागणं जास्त वाढायला लागलं. नेमकी हीच गोष्ट मला खटकायला लागली.’’

‘‘पण सोयीस्कर म्हणजे नेमकं कसं?’’ अजूनही त्याला काकांच्या बोलण्याचा अंदाज येत नव्हता.

‘‘व्यवसायाची किंवा स्वत:ची गरज आहे म्हणून मोबाइल घेणं ही निश्चितच एक उत्तम सोय आहे. पण फोनची क्षमता आहे म्हणून त्यावर अनेक तास गेम खेळत बसणं, रोजचा ठरावीक ‘डेटा पॅक’ संपवण्याचं कारण देत अनेक तास ‘सोशल नेट व ग साईटस्’वर घालवणं, मेसेजेस पाठवत राहाणं, हे माझ्या मते तरी सोयीस्कर वागणं आहे.’’ काकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

‘‘पण काका, मोबाइल हा फक्त फोन करण्यापुरता उरलेला नाही. शिवाय ‘एंटरटेनमेंट’ ही आजची गरज आहे. कु णाची ती गेम्स खेळून भागते, कु णाची मेसेजेस पाठवून, कु णाची ‘सोशल नेटवर्किंग साईट’वर  जाऊन, तर          कु णाची ‘वेब प्लॅटफॉर्म’वरचे कार्यक्रम बघून.’’ त्यानंही आपलं रोखठोक मत सांगितलं.

‘‘बरोबर. ‘एंटरटेनमेंट’ हा मूळ विषयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण एंटरटेनमेंट ही काही फक्त आजचीच गरज नाही. कालही ती गरज होतीच. त्याबद्दल दुमत नाही. पण ती भागवण्यासाठी तंत्रज्ञान हे एकमेव माध्यम आहे का? हा मी इतर कु णाला नाही, तर स्वत:लाच विचारलेला प्रश्न आहे. असे मी अनेक प्रश्न स्वत:ला विचारत असतो. हे असं होण्याचं कारण हेच, की मोबाइल, इंटरनेट, लॅपटॉप नसलेलं आणि तरीही व्यवस्थित चालणारं जग मी पाहिलं आहे. अगदी खरं सांगायचं, तर आज त्या जगातल्या बऱ्याच गोष्टी नाहीत, याची हुरहुर मला वाटत राहाते. त्यावर नेमका उपाय काय करावा, याचा मी खूप विचार केला आणि शेवटी ‘तटस्थ’ राहायचं ठरवलं.’’

‘‘तटस्थ म्हणजे?’’ काकांची उत्तरं त्याचा गोंधळ वाढवत होती.

‘‘तंत्रज्ञान हे चांगलं किंवा वाईट नसतं. आपण त्याचा वापर कसा करतो त्यावर ते अवलंबून असतं. तेव्हा मी नवीन येणाऱ्या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती घेतो. पण माझ्यासाठी त्या खरोखर आवश्यक आहेत का?, त्यांच्यावाचून माझं काही अडतं आहे का?, याची तटस्थपणे पडताळणी करतो. कारण बाजारात एखादी नवीन गोष्ट आली म्हणून त्याआधी आपण जे काही वापरत होतो,त्याला ‘कालबाह्य़’ ठरवणं, हे आपलं पहिलं अपयश असतं. त्याचबरोबर नवीन येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला गरज असतेच असं नाही. पण हे न समजणं म्हणजे दुसरं अपयश.’’ काकांनी आपली बाजू स्पष्ट केली.

‘‘पण काका, हे असं मत असूनही तुम्ही स्वत: त्या क्षेत्रात काम करता. हा विरोधाभास आहे, असं तुम्हाला नाही का वाटत?’’ त्यानं स्पष्टपणे विचारलं. ‘‘निश्चितच विरोधाभास आहे. केवळ संसारातल्या अर्थकारणाचं गणित जमवण्यासाठी तो मला मान्य करावा लागला आहे. पण निदान, तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही, हे लक्षात ठेवून माझ्या तंत्रज्ञानाच्या वापरात आणि विचारात कमीत कमी विरोधाभास असेल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो.’’ काकांनी त्यांची भूमिका मांडली. त्यावर तो थोडा विचार करत म्हणाला, ‘‘पण असं केल्यामुळे तुम्ही एकटे पडत नाही? म्हणजे अगदी घरातल्या मंडळींनादेखील हे फार टोकाचं वागणं आहे, असं वाटू शकतं.’’

त्यावर काका मंदपणे हसत म्हणाले, ‘‘सुदैवानं नाही. कारण मी आधी सांगितलं तसं,  ही फक्त माझी भूमिका आहे, जी मी कु णावरही लादत नाही. मात्र घरातल्या मंडळींबरोबर मोकळेपणानं याविषयी भरपूर बोलतो. तंत्रज्ञानाचा वापर किती, कसा, कुठे, केव्हा करायचा, ही माझ्या मते वैयक्तिक बाब आहे. शिवाय ‘एकटं पडणं’ हे पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. तसंही हल्ली माणसं घोळक्यात असूनही कुठे सगळ्यांबरोबर असतात? बहुतेक लोक भेटल्यानंतर पाचव्या मिनिटाला मोबाइलमध्ये डोकं घालतात. जेवण एकत्र बसून करावं म्हटलं, तर त्याही पंगतीला टीव्ही आणि मोबाइल असतातच. नशिबानं माझ्या घरी अजून तसं होत नाही. पण अनेक ठिकाणी हे मी बघितलेलं आहे. एखादा क्षण हा संवादामुळे संस्मरणीय होण्यापेक्षा कोणत्या ‘फिल्टर’च्या ‘सेल्फी’नं जास्त चकचकीत होऊ शकतो, याकडे बहुतेकांचं लक्ष असतं. हे असं जेव्हा होतं, तेव्हा तुमचं एकटेपण वाढत जातं. त्यात कु णाला कोणतीही गोष्ट सांगण्याची, सुचवण्याची सध्या सोय नसते. बरं, अशा गोष्टी सांगून समजतही नाहीत. त्याची जाणीवच व्हावी लागते.’’

‘‘काका, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात येतो आहे. पण याची एक दुसरी बाजूही आहे. आज तंत्रज्ञान वापरून माझ्या पिढीतल्या प्रत्येकानं त्याच्या आवडीचं असं एक जग तयार केलं आहे. आधी नसलेल्या कित्येक गोष्टी करण्याची मुभा त्याला यामुळे मिळालेली आहे. त्याचं काय?’’ तो म्हणाला.

‘‘बरोबर. पण त्याचबरोबर कित्येक नवीन आणि उत्तर नसणारे प्रश्नही उभे राहिले आहेत त्याचं काय? आवडीचं जग तयार करणारे वेगळ्या अर्थानं एकटे पडत आहेत. इंटरनेट आणि वीज हा त्यांच्या जगाचा प्राणवायू आहे. काही वेळा जेव्हा तो बंद होतो, तेव्हा त्यांची तगमग, तडफड बघवत नाही. एकटेपणाची तुलनाच करायची असेल, तर मग मला माझं एकटेपण सुसह्य़ वाटतं. कारण त्यात मी पूर्णपणे कधीही एकटा पडत नाही. तो मागे राहिलेला काळ, त्यातल्या असंख्य आठवणी माझ्या सोबतीला असतात. त्यासाठी वीज किंवा इंटरनेटची गरज नाही.’’

काकांच्या त्या बोलण्यातलं गांभीर्य जाणवून तो म्हणाला, ‘‘तुमच्या मते हे सगळं कुठपर्यंत जाईल?’’ त्यावर विचार करून काका म्हणाले, ‘‘प्रत्येक गोष्टीचं एक वर्तुळ असतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, जिथे खूप मोठा प्रवास करूनही माणूस पुन्हा पहिल्या ठिकाणीच पोहोचला आहे. काळानुसार त्या पहिल्या ठिकाणाचं स्वरूप बदललेलं होतं, पण गाभा तोच होता. मला वाटतं, तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचंही असंच होईल. तशी सुरुवातही फार थोडय़ा प्रमाणात, पण होते आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे गेल्याच आठवडय़ात तुझ्याच वयाच्या असलेल्या माझ्या पुतण्याचं पत्र आलं. त्यानं स्पष्टपणे लिहिलं होतं, की ‘ई-मेल’मध्ये आता लिहिण्याची ती मजा येत नाही, म्हणून मुद्दाम असं पत्र पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा माझं म्हणणं हेच आहे, की दरवेळी स्वत: अपयशी होऊनच शिकायला पाहिजे असा काही नियम नाही. दुसऱ्याचं अपयश संदर्भ म्हणून वापरलं तरी बरंच काही साध्य होईल.’’

ते ऐकून तो समाधानानं म्हणाला, ‘‘आज आपल्या या गप्पा झाल्या हे खूप चांगलं झालं.’’

त्यावर हसून काका म्हणाले, ‘‘आणि त्याही सव्‍‌र्हर बंद असण्याच्या मुहूर्तावर!’’