दिवाळीचं शूटिंग संपलं. श्रावण, नवरात्र, दसरा, दिवाळी हे दिवस दूरचित्रवाणी मालिकेच्या पथ्यावर पडले होते. दिवाळीनं पुरता आठवडा घालवला होता. ‘सण इथले संपत नाही’ असं प्रेक्षकाला वाटावं इथपर्यंत एकेक सण तासणं सुरूच. पण आता पुढचा सण कोणता असणं अपेक्षित आहे हे कळेनासं झालं तेव्हा निर्माता गडबडला. आणि सण नाहीत म्हटल्यावर तर तो सणकळलाच.
दि वाळीचं शूटिंग संपलं तशी ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ या मालिकेचा मालक चिंताक्रांत झाला. याच्या पुढचे एपिसोड भरवायचे कशानं? श्रावण, नवरात्र, दसरा, दिवाळी हे दिवस मालिकेच्या पथ्यावर पडले होते. दसरा तीन एपिसोड पुरला होता, दिवाळीनं पुरता आठवडा घालवला होता. असे सगळे महत्त्वाचे सण पुरवून पुरवून खाऊन झाले होते. तेही जिवाला फार त्रास न करता!
सण कोणताही असो, ‘फॉरमॅट’ एकच! तो तो सण येण्यापूर्वी सुमारे महिनाभर मालिकेतल्या पात्रांनी त्याच्याविषयी चर्चा करायची, नवनव्या कल्पना काढायच्या, मग घराची सजावट, मग पात्रांची उत्सवी सजावट, मग गावाकडच्या एखाद्या उपटसुंभ म्हाताऱ्या पात्राचं आगमन, त्याच्या तोंडून त्या सणाचं सांस्कृतिक माहात्म्यकथन, तो ते रंगवून रंगवून सांगत असताना मागे त्या त्या कथाभागाचं नाटय़ीकरण (गोकुळाष्टमीला नायकाने कृष्ण होऊन पुठ्ठय़ाचा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे, नवरात्रीत नायिकेने माँ दुर्गा होऊन थर्माकोलच्या परशूने दुष्ट खलनायकाला भोसकणे वगैरे वगैरे) मग कट टू डायरेक्ट सण! सनई चौघडा, मेंदी, बांगडय़ा, नऊवारी पातळं, नथी बुगडय़ा, सडा रांगोळय़ा, फुलं-तोरणं, सुटे दिवे, दिव्यांच्या माळा, आकाशकंदील, मिठाया, जिलब्यांची ताटं, लाडवांची शिप्तरं, कल्पकतेची लक्तरं! ‘सण इथले संपत नाही’ असं प्रेक्षकाला वाटावं इथपर्यंत एकेक सण तासणं सुरूच. पण आता पुढचा सण कोणता असणं अपेक्षित आहे हे कळेनासं झालं तेव्हा निर्माता गडबडला. त्यानं सरळ आपल्या स्टोरी डिपार्टमेंटला बोलवून घेतलं. लांब चेहऱ्यानं त्रासून विचारलं,
‘‘वेल फ्रेण्ड्स, दिवाळीनंतर काय येतं?’’
‘‘दिवाळं.’’
‘‘देतोय मी. लगेच गेल्या तीन महिन्यांचं पेमेंट एकदम काढतोय. पुन:पुन्हा आठवण करून देऊ नका. दिवाळीनंतर कुठले सण येतात असं विचारत होतो मी.’’
‘‘विशेष कुठलेच सण येत नाहीत.’’
सण नाहीत म्हटल्यावर निर्माता सणकळलाच. त्रासून खेकसला, ‘‘येत नसतील तर काढा. र्अजट. माणसांचे, प्राण्यांचे, निसर्गाचे, घरांचे, कसलेतरी काढा. यंदा आपण बैलपोळा कसला गाजवला होता आपल्या सीरियलमध्ये? विसरलात?’’
‘‘कसा विसरणार? एका पॉश सोसायटीत चौदाव्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या कॉर्पोरेट बॉस हीरोनं लिफ्टमधून बैल वर मागवून त्याची पूजा केलेली दाखवली होती आपण. चार लोकात मान काढायलाही जागा राहिली नाही आम्हाला. साधं बुग्गुबुग्गु करायलासुद्धा!’’
‘‘ते स्वप्नदृश्य होतं. सत्य नव्हतं. राईट? स्वप्नात काहीपण येऊ शकतं. ते आमच्यावर सोडा हो. तुम्ही लोकांनी सण काढा.’’
‘‘ते ठीक आहे सर. पण साधारणपणे दिवाळी झाली की हिंदू वर्षांतले महत्त्वाचे सण संपतात.’’
‘‘सीरियल संपत नाही ना पण.. १०० भागांचं एक्स्टेन्शन मिळालंय. हे आणखी टेन्शनच. तुम्ही लोक स्टोरीपण वाढवत नाही हवी तेवढी.’’
‘‘आताशी कुठे आपली हिरॉईन नव्वदी गाठत्येय. एवढय़ात दोनदा मारलीपण तिला. एकदा पुनर्जन्म दाखवला. एकदा प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदलून आणून दाखवली. आणखी कितीदा तिला मारून स्टोरी वाढवायची सर?’’
‘‘नाही ना जमत? म्हणून तर म्हणतोय. सण वाढवा. अरे बारक्या, तिकडे पंचांग, कॅलेंडर काय असेल ते आण रे.’’ लगेच दोन्ही आलं. पण पंचांग बघतात कसं हे कोणत्याच अंगानं तिथल्या कोणाला माहीत नव्हतं म्हणून सगळय़ांनी कॅलेंडरवर आक्रमण केलं. एकाला साक्षात्कार झाला,
‘‘दिवाळीनंतर लगेच पांडवपंचमी येते सर.’’
‘‘पांडवपंचमी. साऊंड्स गुड. लेस एक्स्प्लोअर्ड टू.’’
‘‘त्या दिवशी पाच पांडवांचं काहीतरी झालेलं असणार सर. पण आपल्या स्टोरीत चारच भाऊ आहेत.’’
‘‘जत्रेत हरवलेला पाचवा भाऊ आणूया का त्या दिवशी?’’ ऑल ऑफ ए सडन? लोकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पुढे त्याच्यात रहस्यही घालता येईल. की बुवा हा खराच भाऊ आहे का तोतया आहे? कशी वाटते आयडिया?

‘‘फारच ओरिजिनल आहे सर’’ पुढेमागे कधीतरी खायच्या मिठाला आजच जागत एकजण म्हणाला. पण पुढे पुटपुटला,
‘‘पण तो सगळा पुरुषापुरुषांचा फेस्टिव्हल होईल ना सर.. सणाला लेडीजशिवाय ग्लॅमर नाही.’’
‘‘ते पण बरोबर आहे. राखीपौर्णिमेला राखी रंगाचे दुपट्टे, नागपंचमीला नागाच्या वेटोळय़ासारख्या टिकल्या ही ‘हे सुरांनो.. ची कॉन्ट्रिब्युशन आहे. टिकल्या टिकल्या म्हणून सीरियल टिकली. एवढी मोठी पॉवर आपली. ती काय नुसते सण नाहीत म्हणून घालवायची? नो वे. अजून थोडं कॅलेंडरस्टॉर्मिग करा. सण पाहिजे म्हणजे पाहिजे.’’
कॅलेंडर उलटसुलट फडफडवताना एकजण चीत्कारला,
‘‘हाऊ अबाऊट तुळशीचं लग्न, सर?’’
‘‘झालंय.’’
‘‘ते दरवर्षीच होतं सर.’’
‘‘तसं नाही. यापूर्वी बऱ्याच डेली सोप्सनी ते वापरलंय. लग्नाचा चान्स कोणी सीरियलवाले सोडत नसतात रे. हांऽ आता आपण त्याला हवा तर री-मॅरेजचा अँगल देऊन मेसेजपण देऊ शकतो. वटपौर्णिमेला ‘‘झाडं लावा.’’ कोजागरीला ‘‘वीज वाचवा’’ असे मेसेज आपण दिलेले आहेत हय़ापूर्वी.’’
‘‘बघा. नाहीतर तुळशीला सध्या मागे ठेवू.’’
‘‘मागे ठेवण्याचं मागे ठेवा हो. एक कचकचीत, सणसणीत सण पुढे आणा. शेवटी आपली संस्कृती इतकी ‘रिच’ आहे. तिला दोन-चार जादा सण काय कठीण? फोरसाईट बघा आपल्या फोरफादर्सची. पुढेमागे २१व्या शतकात दैनंदिन धारावाही मालिका असतील, त्यांना सारखा भरणा लागेल, तेव्हा कच्चा माल कमी पडू नये म्हणून अगोदरच प्रत्येक महिन्याला दोनचार सणांची तरतूद करून ठेवलीये जुन्या लोकांनी. शिवाय छोटीमोठी हळदीकुंकवं, पूजा, मंगळागौरी, डोहाळजेवणं हे तर ठेवलंच आहे करून.’’
‘‘डोहाळजेवण फोरफादर्समुळे नसतं सर. प्रत्येक भावी फादर त्याला कारण होतो.’’
‘‘मला कारणं नकोयत. रिझल्ट हव्येत. दिवाळीच्या मोठय़ा सुट्टीवर जाण्यापूर्वी मला पुढल्या वर्षांसाठी मोठ्ठा सण हवा. इज दॅट क्लिअर?’’ निर्मात्याचा आवाज चढला तेव्हा सगळय़ांनी गुपचूप कॅलेंडरमध्ये डोकी खुपसली. ते मराठी भाषेतच होतं. तरी हिब्रू भाषेत असल्यासारखे अडखळत, चाचपडत वाचणाऱ्यांचे एकेक शब्द पडायला लागले?
‘‘कुष्मांडनवमी कशी वाटते सर?’’
‘‘आहाहाऽ वैकुंठचतुर्दशी.. केवढा मोठा महान सण सर..’’
‘‘कालभैरव जयंती.. सॉलिड आहे ना नाव..’’
‘‘भौमप्रदोष.. ऐकलाय कोणी?’’
‘‘मला वाटतं, आपण देवदिवाळीवर जावं. दिवाळी तर देव!’’
अर्थाचा थांगपत्ता न लागणारी चित्तचक्षू चमत्कारिक नावं पडत गेली. त्यातल्या त्यात, ‘कुष्मांडनवमी’ ही अंडेनवमी असून ती कांदेनवमीसारखी साजरी होत असेल या अंदाजावर एकमत झालं. एवढं होईपर्यंत कॅलेंडरची पानं संपली आणि सरांची चिकाटीही. ते एकदम भडकून अपशब्दच बोलायला लागले. ‘सण काढा नाहीतर पळ काढा’. एवढा छोटासा ‘मेसेज’ द्यायला एवढे अपशब्द कशाला काढा हे लोकांना समजेना. मध्येच भान सुटून ते आईमाईवर उतरले तेव्हा एकजण दुसऱ्या बारक्याच्या कानी लागत म्हणाला,
‘‘हे तर अगदी गटारी अमोश्येची भाषाच बोलायला लागले की रे..’’
‘‘कशाची भाषा म्हणालास?’’
‘‘गटारी अमोश्या नसते का? वशट खायची? लागट बोलायची?’’
‘‘हां हां.. गटारी? आपण २-२ किलो कोंबडय़ा उडवतो ती? अचकट विचकट बोलतो ती? मित्रा.. मित्रा.. तोडलंस.. फोडलंस.. क्रॅक केलंस.. रे.. सरऽ सापडला! सीरियलमध्ये एक अद्याप न केलेला सण सापडला. हाऊ अबाऊट गटारी अमावास्या सर?’’
‘‘गटारी.. ऐकली नाही फार..’’
‘‘म्हणून तर करायची ना सर..’’
‘‘पोटेन्शियल आहे का त्याच्यात?’’
‘‘खूप आहे सर. दारू पिऊन दंगा.. पाटर्य़ा.. बाचाबाची.. एखाददा मारपीटसुद्धा..’’
‘‘तीन भाग तरी जातील ना मालिकेचे?’’
‘‘शुअर सर, शिवाय तुम्हाला कंपल्सरी  लागतो तसा मेसेजपण देता येईल.’’
‘‘मेसेज? वंडरफुल. कसा पण?’’
‘‘सोपंय सर. १४व्या मजल्याच्या फ्लॅटच्या खिडकीतून आपला नायक रस्त्यावरचं गटार बघतो. तेव्हाच ठरवतो. आता यापुढे आपल्या समोर अशी गटारं नाही राहिली पाहिजेत. ‘स्वच्छ गटार, सुंदर गटार, हाच आपला यापुढचा निर्धार!’’ फिनेल, डेटॉल, डी.डी.टी. वगैरे बनवणाऱ्या  कंपन्यांची स्पॉन्सरशिपपण मिळवता येईल सर.. शिवाय गावागावांत स्वच्छ गटारांची स्पर्धापण अनाऊन्स करता येईल. की लगेच बक्षिसांसाठी प्रायोजक मिळवायचे. सगळं एकापुढे एक सुरूच होईल सर..’’
‘‘ऐकता ऐकता सरांचं भान हरपलं. गटारी अमावास्या या महान सांस्कृतिक सणाचं ‘पोटेन्शियल’ पाहून ते हरखले. इकडे ते काही भाग कमीत कमी डायलॉग लिहून काम भागेल या आनंदाने लेखकांच्या कल्पनेलाही पंख फुटले.’’
ठरलं! आगामी वर्षांत ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ मालिकेत जंगी गटारी अमावास्या करायचीच! एक मोठ्ठं सांस्कृतिक कार्य पार पाडण्याच्या आनंदात मंडळी पांगली.’’
‘सण आला भाग्याचा..’ असं गुणगुणत मालिकेचे मालक घरी परतले तर त्यांची बायको सामान आवरत बसलेली. हौसेने ते म्हणाले, ‘‘दिवाळीची तयारी वाटतं? काय करायचंय मला सांग. मीपण आता चांगला आठवडाभर सुट्टीवर आहे. आता सणाची कामं करू.’’ यावर त्यांच्या बायकोने त्यांच्याकडे एक तुच्छ कटाक्षटाकला आणि थंडपणे म्हटलं,
‘‘धिव्याळय़ीच्यी? त्ययारी? तीपण घ्यरी? बरे आहात ना तुम्ही? आता या काळात आपल्यात कोणी चकल्या तळत आणि रांगोळय़ा काढत घरी बसतं का? कुठे प्रवासाला निघायचं तेवढं ठरवा. सण आणि संस्कृती ठेवा तुमच्या सीरियलसाठी. कसं?’’