‘‘योगेशजींच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेत माझी त्यांना पूर्ण साथ आहे. त्यांच्या बदलीच्या विरुद्धची केस चालू असताना वकिलाची फी परवडत नसल्याने योगेशजींनी स्वत:च ती केस लढवली. त्यावेळेस मीही त्यांच्याबरोबर न्यायालयात कायद्याच्या पुस्तकांचा भारा घेऊन जात असे. अखेर योगेशजी ती केस जिंकले. आमच्या ‘नेव्हर से डाय’ या तत्त्वानेच आम्हाला जिंकवले होते. आता आम्ही दोघांनीही मिळून आमची स्वत:ची कायद्याची फर्म काढली आहे. आपली न्याय व्यवस्थाच देशाला तारेल, असा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही एकत्रितपणे त्यासाठी उभे राहिलो आहोत..’’ सांगताहेत माजी आयएएस अधिकारी आभा सिंग आपले पती वाय. पी. अर्थात योगेश प्रताप सिंग यांच्याबरोबरच्या २७ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
माझी आणि योगेश प्रताप सिंग म्हणजेच वाय.पी. यांची पहिली भेट आमच्या साखरपुडय़ाच्याच दिवशी म्हणजे १४ जानेवारी १९८७ या दिवशी झाली. त्याआधी आम्ही एकमेकांना भेटणे तर दूरच, पण पाहिलेही नव्हते. त्यावेळेस ते आय.पी.एस.करत होते आणि मी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम. फिल. २३ फेब्रुवारी १९८७ ला आमचा विवाह झाला आणि आज २७ वर्षांनंतर लक्षात येतंय आम्ही एकमेकांना दिलेली साथच आम्हाला इथपर्यंत घेऊन आलीय.
 उत्तर प्रदेशातल्या कुठल्याही ठाकूर – राजपूत कुटुंबातल्या मुलांप्रमाणे आमच्या आई-वडिलांनीच आधी एकमेकांना भेटून आमचा विवाह ठरवला होता. माझे वडील आर. बी. सिंग हे उत्तर प्रदेशात वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. मी कुणाशी विवाह करावा याचा निर्णय तेच घेतील आणि तो माझ्यासाठी योग्य आणि अखेरचा निर्णय असेल, असे त्यांचे मत होते.  वाय.पीं.चे वडील डॉ. एस. बी. सिंग हे आकाशवाणी उपसंचालक होते, तेही या मताशी सहमत होते.  
लग्नाच्या आधी माझ्या आईने योगेशजींना विचारले, ‘तुम्हाला कुठली गाडी देऊ?’ त्यावर योगेशजींनी तडफदारपणे उत्तर दिले, ‘‘म ससुराल कि गाडी में नही बठुंगा.’’ योगेशजी हुंडा घेण्याच्या पूर्ण विरुद्ध होते. वाय.पी.ंचा साधेपणा, हुशारी आणि विचारांवर माझी आई बेहद्द खूश होती. माझ्यासाठी तिने पाहिलेला हा पहिलाच मुलगा होता. योगेशजींचा तिच्यावर खूप प्रभाव पडला, त्यामुळे हे लग्न जुळवण्यात आणि योग्य रीतीने पार पाडण्यात तिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली.
 विवाहानंतर कुठल्याही नव्या नवरीप्रमाणे एका आय.पी.एस. अधिकाऱ्याची बायको म्हणून आरामाचे आणि ग्लॅमरचे आयुष्य जगता येईल असे वाटत होते. पण कुठलेही चुकीचे काम करायचे नाही आणि प्रामाणिकपणे काम करायचे या माझ्या ठाम तत्त्वामुळे आयुष्य खडतर झाले. एका सरकारी आदेशानुसार वाय.पीं.चे अधिकृत वाहन काढून घेण्यात आले, कर्मचारी वर्गही काढून घेण्यात आला. खरे तर सगळ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाही ही सेवा शेवटपर्यंत मिळते. पण आमच्याबाबतीत सगळं वेगळं झालं.
आमच्या लग्नाला आता २७ वष्रे झाली. ६ ऑक्टोबर १९८९ ला  माझ्या मुलाचा आदित्यचा जन्म झाला आणि २८ ऑगस्ट १९९५ ला माझ्या मुलीचा ईशाचा जन्म झाला. सुरुवातीला माझ्या सासू-सासऱ्यांचा माझ्या आय.ए.एस. परीक्षेला बसण्यास विरोध होता. अतिमहत्त्वाकांक्षी स्त्रिया घराकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे माझे कौटुंबिक आयुष्य अस्ताव्यस्त होईल, असे त्यांना वाटायचे. पण योगेशजींनी मला ठाम पाठिंबा दिला. त्यांच्या मते, जर मी आनंदात नसेल तर आमचे कौटुंबिक आयुष्यही आनंदाचे नसेल. म्हणूनच त्यांनी करिअरचा माझा निर्णय माझ्यावरच सोपविला. आज मी जे काही मिळवले आहे किंवा  करिअरच्या या टप्प्यरयत पोहोचले ते केवळ योगेशजींच्या पूर्ण पाठिंब्यामुळे. मी १९८८ मध्ये आय.ए.एस.च्या परीक्षेला बसले खरे, पण जेव्हा मी आय. ए. एस.च्या मुलाखतीसाठी गेले तेव्हा मी पाच महिन्यांची गरोदर होते. मला १९९१ ला  ‘मुंबई कस्टम्स’मध्ये नोकरी लागली. आणि योगेशजींनी मुंबईत माझ्यासोबत राहण्यासाठी वर्धा इथले एस.पी.चे पद सोडले. ते आधी ‘अन्न आणि औषध’ प्रशासनात आले आणि नंतर त्यांनी ‘सीबीआय’मध्ये प्रवेश केला.
कस्टम्समधल्या भ्रष्टाचारामुळे मला तिथे राहणे अशक्य झाले होते. म्हणून मी पुन्हा परीक्षा दिली आणि १९९४ मध्ये भारतीय टपाल सेवेत रुजू झाले. मी कस्टम्स खात्यात रुजू झाल्यावर आमच्या कुटुंबात माझ्या करिअरवरून निर्माण झालेला वाद योगेशजींनीच मिटवला आणि अखेर मी सरकारी अधिकारी झाले. नंतर योगेशजीनी जेव्हा आय.पी.एस. चा राजीनामा दिला तेव्हा आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. माझे आई-वडील त्यावेळी खूपच अस्वस्थ होते आणि त्यांना माझी काळजी वाटत होती. कारण त्यांनी माझे लग्न एका आय.पी.एस. अधिकाऱ्याशी लावून दिले होते ना. पण योगेशजींचे आई-वडील मात्र शांत होते आणि त्यांना आपल्या मुलावर, त्याच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता. यातूनही तो मार्ग काढेल अशी त्यांना खात्री  होती. योगेशजी भ्रष्टाचाराला कधी शरण जाणाऱ्यातले नव्हते.
जेव्हा योगेशजींनी धीरुभाई अंबानी आणि ‘रिलायन्स’च्या विरोधात चौकशी सुरू केली तेव्हापासून आमच्या आयुष्यातला तणाव वाढू लागला. त्याआधी ते ‘यूटीआय ६४’  घोटाळ्याची चौकशी करत होते. अखेर सगळ्याची परिणती ज्यात व्हायची तीच झाली. योगेशजींची सीबीआयमधून बदली झाली. त्यांच्या कुलाबा कार्यालयाला टाळे ठोकले गेले, त्यांनी मीडियाशी संपर्क ठेवू नये म्हणून फोनच्या लाइन्स तोडल्या गेल्या. त्यावेळेस मोबाइल फोन्स नव्हते. त्यांचा पगार थकविण्यात आला. त्यामुळे मला माझ्या एकटीच्या पगारावर घर चालवावे लागत होते. कधी कधी मलाही या सगळ्या परिस्थितीमुळे त्रास व्हायचा, वैफल्य यायचे. कारण इतर आय.पी.एस, आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या बायका मस्त मजेत जगत होत्या, पाटर्य़ा, परदेशी प्रवास एन्जॉय करत होत्या, त्यावेळेस मी मात्र रोज लोकल गाडीने प्रवास करून ऑफिसला जात होते. दोन्ही मुलांना बसने पाळणाघरात नेऊन सोडत होते. घरचा स्वयंपाक, बाजारहाट करत होते. हा विरोधाभास सहन करणे कधी कधी खूप कठीण जायचे. पण आम्ही आमच्या योग्य मार्गाने जात होतो आणि या सगळ्यामुळे आमची इच्छाशक्तीही वाढली.
दरम्यान, योगेशजींची पुन्हा नागपूरला बदली करण्यात आली. योगेशजींनी त्या बदलीला न्यायालयात आव्हान दिले. महाराष्ट्र सरकारविरुद्धचा हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. तिथे योगेशजींच्या बाजूने निकाल लागला. त्यावेळी सरकारने त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलसारखा निष्णात वकील दिला होता. तरीही योगेशजी तो खटला जिंकले. विशेष म्हणजे योगेशजींनी तो खटला स्वत:च लढला. या दरम्यान आम्ही एकमेकांबरोबर ठामपणे उभे होतो. सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत असे नाही. पण सचोटीने आणि नियमाप्रमाणे वागणाऱ्या अधिकाऱ्याला काम करणे कठीण जाते एव्हढे खरे. योगेशजींचे कायद्याचे ज्ञान वाढावे म्हणून मीच त्यांच्यासाठी मुंबई लॉ कॉलेजचा, एलएल.बी. चा फॉर्म आणला. तेव्हा योगेशजीनी नुसता कायद्याचा अभ्यास केला नाही तर एलएल. एम.च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवून ते पहिले आले. त्याच सुमारास २००४ मध्ये मीही एलएल. बी. पूर्ण केले होते. आम्हा दोघांचे एकच ध्येय होते, अन्यायाविरुद्ध झगडणे आणि भ्रष्टचारी व्यवस्थेला बळी पडणाऱ्या प्रामाणिक लोकांना मदत करणे.
आम्ही दोघेही प्रशासकीय सेवेत होतो. आमचे आई-वडीलही सरकारी सेवेत होते, त्यामुळे आम्हा दोघांची पाश्र्वभूमी सारखीच होती. बौद्धिकदृष्टय़ाही आम्ही एकाच पातळीवर होतो. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे सोपे झाले. योगेशजींचा अर्थशास्त्र हा विषय होता तर माझा राज्यशास्त्र. त्यामुळे आम्हा दोघांची करिअर एकमेकांना पूरक ठरली. योगेशजींच्या भ्रष्टाचार विरुद्धच्या मोहिमेत माझी त्यांना पूर्ण साथ आहे. त्यांच्या बदलीच्या विरुद्धची केस चालू असताना वकिलाची फी परवडत नसल्याने योगेशजींनी स्वत:च ती  केस लढवली. त्यावेळेस मीही त्यांच्याबरोबर न्यायालयात कायद्याच्या पुस्तकांचा भारा घेऊन जात असे. आम्हा दोघांसाठी ही एक लढाई होती. अखेर योगेशजी ती  केस जिंकले. तेव्हा केलेल्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे चीज झाल्याने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सत्याचा नेहमी विजय होतो या माझ्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले. वाटले, आमच्या ‘नेव्हर से डाय’ या तत्त्वानेच आम्हाला अन्यायाच्या अंधारातून बाहेर काढले होते. आता आम्ही दोघांनीही मिळून आमची स्वत:ची कायद्याची फर्म काढली आहे. आपली न्याय व्यवस्थाच देशाला तारेल, असा आम्हाला विश्वास आहे. आणि आम्ही एकत्रितपणे त्यासाठी उभे राहिलो आहोत.
योगेशजी तसे लवकर चिडतात आणि जे त्यांनी ठरवलेले असते तेच करतात. याबाबतीत ते कुणाचेही, अगदी माझेही ऐकत नाहीत. आमची भांडणे, वादही होतात. जेव्हा त्यांनी आय.पी.एस.चा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमचे मोठे भांडण झाले. मला तर या निर्णयाचा धक्काच बसला होता.  पण त्यांची होणारी कुचंबणाही मला बघवत नव्हती. मला समजून सांगताना ते म्हणाले, ‘‘असे समजू नकोस की मी तुझ्या एकटीच्या पगारावर जगेन आणि आपले घर चालेल. मी काहीतरी नक्कीच करेन आणि अगदी मला दुसरी काही नोकरी नाही मिळाली तर मी डोसाची गाडी टाकेन. कारण मला डोसे चांगले जमतात. ते ऐकल्यावर मात्र माझ्या डोळ्यांत पाणी आले.’’ त्यांच्या या राजीनाम्याला माझा मुलगा आदित्य, जो तेव्हा दहावीत होता, त्यानेही पािठबा दिला. वडिलांना तो माझ्यापेक्षा जास्त ओळखत असावा, पण एक पिता म्हणून ते खूप प्रेमळ आहेत. माझ्या मुलीचा ईशाचा वाढदिवस २८ ऑगस्टला असतो. ती अजमेरच्या मेयो स्कूलमध्ये शिकत होती. पण तिच्या वाढदिवसाला खास आम्ही तिला भेटायला न चुकता अजमेरला जायचो. मुलांच्या शिक्षणात, इतर प्रगतीमध्ये ते खूप रस घेतात. अगदी माझ्या मुलीचा टीव्ही बघण्याचा वेळही ते तपासून बघत असत. कारण तिला बंगलोरच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, अशी त्यांची खूप इच्छा होती. आदित्य आता २४ वर्षांचा झालाय. त्याने हैद्राबादच्या लॉ कॉलेजमधून पदवी घेतलीय आणि तो कायद्याच्या क्षेत्रातच करिअर करू इच्छितो. त्याच्या दृष्टीने योगेशजी म्हणजे आदर्श आहे. योगेशजी खूप छान स्वयंपाक करतात. मुलांसाठी ते डोसे, पावभाजी, छोले काय काय बनवतात. मी तर त्यांना घरातली ‘आई’च म्हणते.
 खरे तर आमचे स्वभाव वेगळे आहेत, पण त्यांना माझ्या करिअरमध्ये, माझ्या यशामध्ये आनंद मिळतो. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये मला त्यांचा नेहमीच पािठबा असतो. अन्यायाविरुद्ध लढण्यात योगेशजींना साथ देण्यासाठी, तसेच   माझ्या सामाजिक कामासाठी मला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची होती.  मला महिलांविषयक काम करायचे होते, पण सरकारी नोकरी सोडवतही नव्हती. तेव्हा योगेशजींनी मला हा निर्णय घ्यायला भाग पाडले. तुझी सामाजिक कार्य करायची इच्छा आहे ना, मग तू ते कर. नोकरी सोड, घर कसे चालवायचे ते मी बघेन. त्यांचा हा विश्वासच मला माझ्या आवडीचे काम करू देतो आहे. आणि म्हणूनच आज मीही न्यायालयात लढते आहे. सलमान खान विरुद्धची हिट अ‍ॅण्ड रन केस, पोलीस इन्स्पेक्टरला विधानसभेत मारल्याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्धची केस, एका महिलेच्या आईचा मृत्यू इस्पितळात दुर्लक्ष केल्यामुळे झाला ती केस आणि इस्थर अनुया प्रकरणी कुर्ला पोलिसांनी मिसिंगची केस नोंदवण्यास नकार दिल्याची केस. या केसची मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू आहे.
आणि त्यांचेही अनेक ‘लढे’ सुरू आहेत. मला योगेशजींचा सार्थ अभिमान आहे.  आय.पी.एस.मधून राजीनामा देऊन स्वत:ला भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा म्हणून प्रस्थापित करणे ही सोपी गोष्ट नाही. आदर्श घोटाळा, लवासा घोटाळा अशासारख्या अनेक केसेस ते आजही लढत आहेत. सरकारी नोकरीत असताना मला खूप टेन्शन यायचे. कारण आम्हाला कुणाचा पाठिंबा नव्हता. जेव्हा त्यांचा पगार थांबवण्यात आला तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांपकी कुणीही मदत तर राहोच, पण साधी सहानुभूतीही दाखवली नाही. त्यांनी त्यांच्या कार्याला किंवा पाटर्य़ानाही आम्हाला बोलावणे थांबविले. कारण आम्ही आल्यास त्यांच्या बढतीवर परिणाम होईल, असे त्यांना वाटायचे. ज्या राजकीय नेत्यांविरुद्ध आणि अधिकाऱ्यांविरुद्ध, त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून योगेशजीनी केसेस फाईल केल्या. त्यांनी सरकारी गृहनिर्माण सोसायटीतला आमचा फ्लॅटही काढून घेतला. महाराष्ट्रातले आम्ही एकमेव आय.पी. एस. आणि आय. ए. एस. अधिकारी असू की ज्याचा सरकारी गृहनिर्माण सोसायटीत फ्लॅट नाही. पण हेही मान्य करावे लागेल की कधी कधी योगेशजींच्या सततच्या सरकारविरुद्धच्या संघार्षांमुळे मला आणि माझ्या मुलांना खूप कठीण काळाला सामोरे जावे लागले. माझ्या मुलांचे बालपण काही अंशी हरवले. पण आज दोन्ही मुले याच क्षेत्रात करिअर करण्याच्या प्रयत्नांत आहेत. माझ्या मुलीला आय. पी. एस. होण्याची इच्छा आहे.
आमच्या २७ वर्षांच्या संसारात आम्हा दोघांनाही इगोची बाधा झाली नाही. ते कधीही टिपिकल नवऱ्यासारखे वागले नाहीत. जेव्हा मी १९९५ मध्ये आय.पी.एस.च्या प्रशिक्षणासाठी एक वर्ष गाझियाबादला गेले होते तेव्हा ते मुंबईत ‘सीबीआय’ मध्ये होते. पण माझा मोठा मुलगा तेव्हा ५ वर्षांचा होता. योगेशजी त्याला सांभाळायचे. त्याची शाळेची तयारी, अभ्यास, जेवण, टिफिन, त्याची सगळी काळजी ते घ्यायचे. आदित्यला त्यांनी आईची उणीव भासू दिली नाही. वयाच्या २१ व्या वर्षी माझा योगेशजींशी विवाह झाला. तेव्हापासून आजतागायत त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले.  मला वाटते कुठल्याही दागदागिन्यांच्या भेटीपेक्षा, कुठल्याही परदेशी प्रवासापेक्षा किंवा कुठल्याही स्थावर जंगम मालमत्तेपेक्षा योगेशजींनी मला सतत जो पािठबा दिला, सतत माझ्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि मला माझ्या आयुष्यात पूर्ण स्वातंत्र्य दिले, हीच माझ्या टृष्टीने मोठी भेट आहे.
 आज लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर आमच्या नात्याकडे मागे वळून पहाते तेव्हा वाटते की योगेशजी आणि मी एकमेकांत इतके गुंतलो आहोत की एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांच्याशिवाय आयुष्य ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते माझे पती आहेत, मित्र आहेत आणि माझे गुरूही. आम्ही भांडतो, वाद घालतो, पण दिवसाची अखेर आम्ही एखाद्या रेस्टॉरेंटमध्ये जाऊन एकत्र जेवत असतो किंवा त्यांनी घरी बनवलेल्या एखाद्या पाककृतीचा आस्वाद घेत असतो. कारण आम्हा दोघांनाही बाहेर खाण्याची खूप आवड आहे. दिवसातून किमान १० वेळा तरी आम्ही फोनवरून एकमेकांशी बोलत असतो. यापेक्षा जास्त आपल्याला आयुष्यात काय हवे असते.  
खरे तर योगेशजींनी आय.पी.एस.मधून राजीनामा दिल्यानंतर आयुष्य शांत आणि नीट चालले आहे. राज्य सरकारने अजूनही योगेशजींचे निवृत्तिवेतन आणि भविष्य निर्वाह निधी दिला नाही. पण आता आयुष्य एका वेगळ्या निश्चित दिशेने मार्गक्रमण करतंय. एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांसह..