वर्ष संपत आलं आहे, असं म्हणावं की नवीन वर्ष सुरू होत आहे म्हणावं! अखंड काळाचा एक असा बिंदू ज्याला दोन्हीपकी कोणतंही नाव देता येतं- वर्षअखेर किंवा वर्षांरंभ! वाटून गेलं की ही दोन नावं आहेत आणि दोन दृष्टिकोनही..
नव्या वर्षांचं – २०१४ चं कॅलेंडर विकत घ्या म्हणून एक मुलगा सकाळी सकाळी घरी आला. कॅलेंडर तर हवंच होतं. घेतलं आणि कॅलेंडरची ती सुरनळी कपाटात ठेवून दिली. मनात वर्षांखेरीच्या कामांची गर्दी होती. आवरून लवकर बाहेर पडायचं होतं. पण त्या व्यग्रतेत नव्या वर्षांच्या चाहुलीनं अलगद प्रवेश केला.. वर्षांखेरीच्या संधीकालात वर्षांरंभाची पहाट डोकावली. तो मुलगा कॅलेंडर घेऊन येईपर्यंत मनात वर्षांखेरीच्या विचारांची गजबज होती. आता त्यात वर्षांरंभाच्या विचारांची धून ऐकू येऊ लागली..
अखंड काळाचा एक असा बिंदू ज्याला दोन्हीपकी कोणतंही नाव देता येतं- वर्षांखेर किंवा वर्षांरंभ! वाटून गेलं की ही दोन नावं आहेत आणि दोन दृष्टिकोनही.. याच विचारांच्या नादात घाईघाईत बाहेर पडले..
रस्त्याच्या बाजूला साचलेल्या गढूळ पाण्यात एक कावळा आपली चोच साफ करून घेत पाणी पीत होता. डास, माश्या, आणखी काही कृमी-कीटकही असतील त्याच्या भोवती.. हे तसं अगदी सामान्य दृश्य.. कुणालाही, कुठेही, केव्हाही दिसू शकेल असं. मलाही दिसलं असेल बऱ्याचदा. पण कसं कोण जाणे आज त्या दृश्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. डोळ्यांसमोर तरळत राहिलं बराच वेळ. एरवी कपाळावर आठय़ा पाडणारं हे दृश्य. पण आज त्यानं मला वेगळंच काही जाणवून दिलं. मनात आलं कोणतीही जागा ‘रिकामी’ असत नाही. त्यातलं काही वाया जात नाही. उलट कुणाची तरी अगदी तातडीची गरज भागवू शकतं. कुणाचं तरी ‘जीवन’ असू शकतं. अशी कोणतीही क्षुल्लक वाटणारी ‘घटना’ ही विनाकारण असत नाही.. विचार करता करता त्या दृश्याचं बोट सोडून जाणीव अंतर्मुख झाली. तिला स्फुरलं-
‘कोईभी जगह खाली नहीं होती
 कोई भी चीज बेवजह नहीं होती
 हर चीज का कुछ न कुछ मकसद होता है
 जीने का अपना अपना अंदाज होता है.!’
रस्त्याच्या कडेला साचलेल्या घाणेरडय़ा पाण्याकडे असंही पाहता येतं.! सौंदर्य केवळ वस्तूच्या बाह्य़ दिसण्यात असतं की त्याच्या असण्याच्या अनुच्चारित हेतूत, उपयोगितेत असतं? की याची दखल घेणाऱ्या नजरेत असतं? एखाद्या गोष्टीकडे अशा वेगळ्या नजरेनं पाहिलं तर ती किती अर्थपूर्ण आणि मग सुंदरही वाटू शकते ना?
काही वर्षांपूर्वी अगदी वेगळ्या जाणिवेतून एक कविता लिहिली होती. आजच्या विशेष मूडमध्ये ती मला त्या वेळेपेक्षा आणखी काहीतरी सांगू लागली..
जमिनीखालच्या अंधारात
असतात असंख्य रंगच्छटा
असंख्य आकार
किती तरी स्वाद.. गंध
आणि वेगवेगळे स्पर्शही.!
खणून पाहिलं
तर आपल्याला दिसते
फक्त माती.. दगड.. पाणी..
पण मुळांना कळतं
कुठं काय आहे
आणि आपल्या झाडाला
काय हवं आहे..
ती निमूट अंधारात
पसरत राहतात
आईच्या उत्कटतेसारखी
आणि पुरवत राहतात झाडाला
रंग, गंध, आकार.. हवं ते ते.!’
मानवी नजरेला जिथं फक्त दगड, माती, पाणी दिसतं तिथंच, माणसासारखी कोणतीही ज्ञानेंद्रियं नसलेल्या मुळांना दिसतात रंग, आकार, उमगतो स्वाद, गंध आणि मुख्य म्हणजे कळतं की यातलं आपल्या झाडाला नेमकं काय हवं आहे..! बहरलेलं झाड पाहून आपण केवळ असा तर्क करू शकतो किंवा सूक्ष्म शास्त्रीय प्रयोगांनी हे जाणून घेऊ शकतो की जमिनीखालच्या अंधारात असतात रंग.. आकार.. स्वाद.. गंध.. स्पर्श.. असे सर्व गुणधर्म.! पण सामान्य नजरेला नाही दिसत यातलं काही. तिला दगड-मातीच दिसते. इतकंच नाही तर जे दिसतं त्याच्यापलीकडे इतकं अमर्याद, वैविध्यपूर्ण काही असू शकेल असा विचारही डोकावत नाही मनात!
इथंही दोन पूर्ण वेगळे दृष्टिकोन. पण दर्शनिबदू वेगळे, पाहण्याची क्षमता वेगळी, दिशा वेगळी. आपापल्या जागी आपापल्या क्षमतेत होणारं एखाद्या ‘घटने’ विषयीचं आकलन किती कमालीचं भिन्न असतं ना? अशी एखादी घटना, एखादी वस्तू प्रत्येकाला जर वेगळी दिसत असेल तर मग ती स्वत: असते तरी कशी? पाहणाऱ्याला, जाणणाऱ्याच्या प्रत्येक नजरेला दिसेल तशी? बहुरूपिणी? पण ही रूपं तर पाहणाऱ्याच्या नजरेत असतात. ‘घटना’, ‘वस्तू’ स्वत:हून काहीच असत नाही का? म्हणजे दृष्टिकोनावरच सर्व अवलंबून असतं की काय? .! कुठे तरी वाचलेलं आठवलं.. अंतर्मुख मनानं मग याच दिशेनं भरारी घ्यायला सुरुवात केली. नेहमीच्या असंख्य गोष्टी नव्या दृष्टीला वेगळ्या दिसायला लागल्या. भोवतीचं भयंकर म्हणवलं जाणारं ‘वास्तव’ मनाआड होऊ शकत नव्हतं. तरी त्याच्याकडे पूर्ण वेगळ्या नजरेनं पाहता येईल असा भरोसा आतून उगवत होता.
पण कसं? लगेच दुसरं मन ओरडलं. रोजचे काना-मनावर आदळणारे, घाबरवून सोडणारे प्रसंग चलचित्रासारखे डोळ्यांसमोर सरकू लागले. असंख्य उणिवा आणि दुर्घटनांच्या नोंदी अधोरेखित करणारे वृत्तपत्रांचे टाहो फोडणारे मथळे आणि समस्यांचे ऊग्र रूप नजरेत खुपसणाऱ्या वाहिन्यांवरच्या घसाफोड चर्चा आठवल्या. त्या त्या वेळची कमालीची हताशता आठवली. सगळीकडून सतत अंगावर कोसळणाऱ्या असंख्य विपरितांचं ओझं एखादे दिवशी पृथ्वीचा तोल ढळवेल असं कुणी तरी कुठे तरी म्हटलेलं आठवलं. कसं पाहणार याकडे वेगळ्या नजरेनं? कसं काय दिसणार त्यात काही भलं?.
आजचा चंगळवाद, त्याचं हरप्रकारे सतत होत राहणारं समर्थन, त्यासाठी होत असलेली निसर्गाची लयलूट.. हे सर्व पाहून दूरदृष्टी असलेले विचारवंत भयंकर भविष्याचं चित्र रेखाटून समाजाला वेळीच सावध होण्याचा इशारा देत असतात.. असंच चालू राहिलं तर भावी पिढय़ांसाठी आपण काय ठेवणार रखरखीत माळरानाखेरीज? ना कुठे हिरवळ ना पाण्याचे झरे.. निसर्गाची सर्व संपत्ती आपणच ओरबाडून घेणार आहोत का? निसर्ग श्रीमंत आहे. सर्वाच्या सर्व गरजा सहज भागवण्याइतका. पण तो माणसाची अमर्याद हाव नाही पुरवू शकणार..
हे सगळं तर बरोबरच आहे.. खूप महत्त्वाचं आहे. आज, आत्ता, इथे याचा विचार व्हायलाच हवा. सर्वानी सतत सावध राहायला हवं. निसर्गाकडून भरभरून घेताना त्याला काही देत राहणंही गरजेचं आहे. ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ असं म्हणत प्राचीन काळापासून परोपरीनं सांगितलं गेलेलं ज्ञान प्रत्येक काळातले आचार्य नव्या काळाच्या भाषेत पुन्हा पुन्हा सांगत राहतात.. पण समाज ढिम्म बदलत नाहीए. सगळीकडे निराशाजनक चित्र आहे. माणसाची सर्व प्रकारची भूक पाशवी या विशेषणाला लाजवेल इतकी वाढत चालली आहे.. अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या संवेदनशील मनाला सगळीकडून अंधारून आल्यासारखं वाटतं आहे. भोवतीच्या असंख्य घटितांमध्ये त्याला सकारात्मक, आशादायी काही दिसेनासंच झालं आहे..
हे सगळं आठवून क्षणभर मनात उगवू लागलेला भरोसा डळमळीत व्हायला लागला. सकाळपासूनचा प्रसन्न मूड झाकोळून जायला लागला. पण माझीच एक कविता धीर द्यायला धाऊन आली. दोन-तीन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूच्या साथीचं थमान सुरू होतं. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन फिरत होता.. त्या वेळी हिंदीत लिहिलेली ही अनुवादित कविता-
रोगजंतूंचा प्रसार मथळ्यांमधें झळकतोय हल्ली
जगाच्या त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत
सहा महिन्यात पोचलाय रोगजंतूचा प्रभाव
रोज मृत्यु होतायत एक-दोन
हृदय धडधडतं असं काही वाचून.. ऐकून..
पण ऋतू असे की
आपल्या परीनं निभावतायत आपलं काम
वृक्ष बहरतायत. बघता बघता
फुलांचा सडा पडू लागलाय
हवा दरवळू लागलीय
असे कितीतरी वृक्ष असतील
कितीतरी ठिकाणी वसंत फ़ुलला असेल
कितीतरी जीव जन्माला येत असतील
दर क्षणी एक-दोन
सृजनाच्या या प्रसाराची
कोणतीच दखल घेतली नाहीए मथळ्यांनी
आणि मनही प्रफुल्लीत होत नाहीए
असं काही पाहून.. ऐकून..
खरंच.. एका बाजूला ‘विनाश’ आपलं काम चोख निभावत असताना सृजनाची ऊर्जा त्याच्या दुप्पट वेगानं कार्यरत झालेली असते. मात्र पायाखालच्या जमिनीच्या आधारासारखी ती गृहीत धरली जाते. त्याची ‘बातमी’ होत नाही. जे वेगळं आहे, क्वचित घडणारं आहे त्याची बातमी होते. पण त्याचमुळं चांगल्या, सकारात्मक गोष्टी नेहमी दुर्लक्षित राहतात. आपणही ‘विनाशकारी’ बातम्या वाचून अस्वस्थ होतो. पण एखाद्या गृहीतासारखा सूर्य रोजच उगवतो म्हणून त्या सूर्योदयाच्या असीम सौंदर्याचा आनंद आपण घेत नाही. निसर्गाची ओसंडून वाहणारी अमर्याद संपत्ती आणि निरामय आनंद देणारं सौंदर्य आपण खुशाल दुर्लक्षित ठेवतो. फार काय घरगुती प्रश्नानं खचून जाताना आपली प्रकृती ठणठणीत आहे याचा आनंद आपल्याला होत नाही.  जे हातात नाही, जे आता वेदना देतंय त्याचं दु:ख जे आहे त्याचा आनंद झाकोळून टाकतं नेहमी. ‘सगळा दृष्टिकोन’ अशा असंख्य दुर्लक्षितांकडे आपलं लक्ष वेधून घेऊ शकतो.!
आज वर्षांरंभाच्या चाहुलीची धून मनात वाजत असताना उत्स्फूर्तपणे वाटत राहिलं की सगळ्याचा पूर्ण वेगळ्या तऱ्हेनं विचार करता येणं शक्य आहे.. विनाशाच्या असंख्य रूपांना पराभूत करणारा सृजनाचा खेळ उघडय़ा डोळ्यांनी पाहता येईल. दुर्लक्षित राहणाऱ्या अनेक सकारात्मक गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घेता येतील- उदा. प्रत्येक पानगळीनंतर बहर येतो. रात्रीनंतर दिवस उगवतो. मृत्यूचा पराभव करत रोज, दरक्षणी नवे जीव जन्माला येतात जीवन अनंत आहे. काही थांबत नाही. काही संपत नाही..
सामान्य मानवी मनाला जमिनीखालच्या अंधारात फक्त दगड.. माती.. पाणी दिसतं तसंच त्याला फक्त आज आत्ता इथे आहे तेवढंच, त्याच्या दृष्टीसमोर येईल तसंच दिसतं. त्याच्या सकारात्मक, प्रगल्भ नजरेला जास्तीत जास्त एवढंच उमगतं की ‘जीवन अनंत आहे. काही थांबत नाही. काही संपत नाही..’ मात्र काही महामानव द्रष्टे असतात. ते जाणू शकतात वर्तमान भूगोलाच्या पल्याडचं ‘सत्य’. त्या प्रज्ञावंत ऋषींना आतून उमगलेलं ‘तत्त्वज्ञान’ त्यांनी नोंदवून ठेवलंय मंत्ररूपात-
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते?
आपण राहतो त्या विश्वाचं स्वरूप आहे तरी कसं? या मूलभूत प्रश्नाचं उपनिषद्कारांनी दिलेलं उत्तर म्हणजे हा शांतिमंत्र. ‘तेही पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे’ म्हणजे दृश्य विश्वाची निर्मिती ज्यातून होते तेही पूर्ण आहे आणि निर्माण झालेलं विश्वही पूर्ण आहे. या पूर्णाचं वैशिष्टय़ असं की जे पूर्णातून निर्माण होतं ते तर पूर्ण असतंच पण त्या पूर्णातून हे पूर्ण काढून घेतलं तरी जे उरतं तेही पूर्ण असतं.! खरं तर पूर्ण या संज्ञेच्या संदर्भात ते, हे असा भेद करता येत नाही. पण ही संकल्पना समजून घेताना अशी भाषा वापरावी लागते..
वर्षांखेरीची कामं उरकायला घाईघाईनं बाहेर पडलेल्या मला सकाळी सकाळी आलेल्या त्या मुलानं कॅलेंडरसोबत वर्षांरंभाची आठवण दिली. तिचा हात धरून वाटभर झालेल विचारांचा प्रवास, ईशावास्य उपनिषदाच्या सुरुवातीला आणि शेवटी म्हटल्या जाणाऱ्या या महान शांतिमंत्रापर्यंत पोचला.. या मंत्राचा आशय अत्यंत मननीय आहे. यात एक दिलासा आहे की जे आहे ते अनंत आहे. न संपणारं आहे. पूर्ण आहे. नव्या वर्षांत पदार्पण करताना त्याचा खोलार्थ समजून घेऊन त्याची व्याप्ती जाणून घेण्याची प्रेरणासर्वाना मिळावी अशा शुभेच्छांसह या मंत्राचं मराठी पद्यरूप स्पष्टीकरण खाली देत आहे-
तेही पूर्ण आहे। हेही पूर्ण आहे।
पूर्णात उगवे। तेही पूर्ण ।।
पूर्णाचे संपूर्ण। काढून घेतले।
तरी उरतसे। पूर्णच ते.! ।।
 पूर्ण इथे नाही। फक्त विशेषण।
भाषेतली वीण। साधणारे।।
पूर्ण ते आहे की। असते जे नित्य।
आणि जे सर्वत्र। असतेच।।
काल-अवकाश। व्यापून असते।
उणे काय व्हावे। कशातून।।
त्यातूनच जन्मे। विलीन त्यामध्ये।
नाम-रूपामध्ये। प्रकटे जे।।
पूर्णाहून काही। नाहीच वेगळे।
जरी प्रकटते। भिन्नपणे।।
पूर्णाच्या क्षितिजी। उगवे ते पूर्ण।
मावळते पूर्णपूर्णामध्ये।।
बीजातून एक। वृक्ष उगवतो।
वृक्षांवर लक्ष। बीजे पुन्हा।।
एक पूर्ण पेशी। निर्माण करून।
मूळ पेशी। पूर्ण उरतसे ।।
तसे ते जगाला। जन्माला घालून।
राहतसे पूर्ण। आहे तसे।।
येणारे जाणारे। जगही ते पूर्ण।
जन्मे ज्याच्यातून।  त्याच्यासम।।
तेच प्रकटते। अनेक होऊन।
कुठे उणेपणा काही नाही।।

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Guru Gochar 2024
Guru Gochar 2024 : २० दिवसानंतर ‘या’ राशींचे नशीब पालटणार, वर्षभर मिळेल यांना बक्कळ धनलाभ
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा