मानसी होळेहोन्नूर

आपले मूल १०-१५ मिनिटे उशिरा घरी आले तर आपण बचन होतो, काही क्षणांसाठी त्याचा संपर्क झाला नाही तर नको नको ते विचार डोक्यात येतात. मग एप्रिल २०१४ पासून ज्यांचा काहीच पत्ता नाही अशा ११२ मुलींच्या आई-वडिलांनी काय करावे? ईशान्य नायजेरियातल्या चिबॉक प्रांतातल्या शाळेतून २७६ मुलींचे अपहरण झाले होते. ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने या मुलींना डांबून ठेवले होते. यातल्या ५७ मुली पळून परत आल्या होत्या. परंतु २१९ मुली मात्र अडकलेल्याच होत्या. सरकारने केलेल्या वाटाघाटीनंतर त्यातल्या १०७ जणींची सुटका झाली. मात्र ११२ मुलींचा आजतागायत काहीच पत्ता नाही. याच घटनेवर जोएल काची बेन्सन या नायजेरियाच्या दिग्दर्शकाने ‘चिबॉकच्या मुली’ (डॉटर्स ऑफ चिबॉक) हा माहितीपट बनवला, ज्याला यावर्षीच्या व्हेनिस महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, या माहितीपटामध्ये ‘व्ही आर’ म्हणजे व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा प्रयोग केलेला आहे.

१४ एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या या घटनेनंतर जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नायजेरिया सरकारवर ‘बोको हराम’शी वाटाघाटी करण्याबद्दल खूप दबाव टाकला गेला होता, त्यामुळेच १०७ मुली परत त्यांच्या घरी येऊ शकल्या. पण त्यानंतर मात्र जगाचे लक्ष या गोष्टीवरून दुसरीकडे वळले. त्यामुळे ११२ मुलींच्या सुटकेचा प्रश्न काहीसा दुय्यम ठरला. आज पाच वर्षांनंतरही त्यांचे पालक मुलींच्या प्रतीक्षेतच आहेत. यातल्या अनेक पालकांनी त्यांचे अनुभव ‘चिबॉकच्या मुली’ या माहितीपटात सांगितले आहेत. चिबॉक प्रांतात आजही पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते. त्यामुळे तिथे गरिबीचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यात अनेक घरांमध्ये पाच वर्षांपासून मुलीचा ठावठिकाणा नसल्याचे दु:ख वेगळे. या पालकांना कोणीही भावनिक मदत किंवा समुपदेशनाची मदतसुद्धा केली नाही हे भीषण वास्तव जेव्हा दिग्दर्शक बेन्सन यांना जाणवले तेव्हा तेसुद्धा हादरले. या पालकांमधली एकजणच पुढाकार घेऊन स्त्रियांना एकत्र जमवून बोलते करते, मग त्या सगळ्या मिळून त्यांच्या मुलींसाठी प्रार्थना करतात, हे केल्यामुळे त्यांचे दु:ख हलके होते.

या माहितीपटात व्हर्चुअल रिअ‍ॅलिटीचा प्रयोग केला आहे. म्हणजे तुम्ही तो व्हिडीओ बघताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव घेता. जगात इतक्या काही गोष्टी घडत असतात, की मिनिटापूर्वीची बातमी शिळी होते, त्यामुळे पाच वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या ११९ जणींचा जगाला विसर पडणे यात काही विशेष नाही, मात्र यांचे कुटुंबीय आजही हे दु:ख घेऊन वावरत आहेत. या बेपत्ता झालेल्या ११९ मुली जिवंत आहेत की नाहीत, असल्या तर कोणत्या स्थितीत आहेत याची काहीच कल्पना नाही. दर महिन्याला लेकीची वाट बघत तिचे कपडे धुऊन ठेवणाऱ्या आईला काय दु:ख होत असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. पण या माहितीपटातून त्यांच्या दु:खाची जाणीव जगापुढे नव्याने मांडली गेल्यामुळेच या पालकांबद्दल सहानुभूती नक्कीच वाढीला लागेल. कदाचित यानंतर तरी या पालकांच्या दु:खावर फुंकर घालायला संस्था पुढे येतील, त्यांचे समुपदेशन करतील. एवढे झाले तरी या माहितीपटाचा हेतू सफल झाला असे म्हणावे लागेल.

शांततेसाठीची रोशनी

अफगाणिस्तान हा आपला धुमसता शेजारी. पहिल्यांदा शीतयुद्धाचा बळी ठरला आणि नंतर तालिबानच्या हालचालींचा. कोणत्याही युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्त्रिया आणि लहान मुले सगळ्यात जास्त भरडली जातात. अफगाणिस्तानातल्या उत्तरेकडच्या कुंडूज प्रांतात गेल्या दोन दशकांपासून तणावाची परिस्थिती कायम आहे. कधी तालिबानचा जोर असतो तर कधी शांती सेनेचा. ३१ ऑगस्टला परत एकदा तालिबानने या कुंडूज प्रांतातले सगळ्यात मोठे आणि अफगाणिस्तानातले सहावे मोठे शहर असलेल्या कुंडूजवर हल्ला करून आपले बस्तान बसवले. या गोष्टीचा अर्थातच तिथल्या थोडय़ाफार होऊ घातलेल्या सुधारणांवर लगेचच फरक पडतो. त्यामुळेच ‘रेडिओ रोशनी’ चालवणाऱ्या सेदिक सेरझाई यांची काळजी वाढली आहे.

२००८ मध्ये सेदिक यांनी खास स्त्रियांसाठी म्हणून ‘रेडिओ रोशनी’ या नावाने स्थानिक रेडिओ स्टेशन सुरू केले. २००९ मध्ये त्यांच्या स्टेशनवर क्षेपणास्त्रे डागली होती. त्यावेळी त्यांनी सरकारकडे मदत मागितली पण सरकारचा एकूण नूर पाहता त्यांची लढाई त्यांनीच लढायची ठरवली. जेव्हा केव्हा धमक्या मिळत, शहरात अस्थिरता असे, त्या काळात तेवढय़ापुरते रेडिओचे प्रक्षेपण बंद करायचे. शांतता प्रस्थापित झाली, की आपले काम परत सुरू करायचे याची जणू सेदिकसारखीच अनेकांना सवय झाली आहे. त्यामुळेच आज दहा वर्षांनंतरही त्या जिद्दीने टिकून आहेत. २०१५ मध्ये त्यांना पहिल्यांदा फोनवर धमकी मिळाली. तेव्हा त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रेडिओ स्टेशन तसेच टाकून पळ काढला. जीव वाचला पण तालिबान्यांनी जुने रेकॉर्डिंग नष्ट केले, सामानाची नासधूस केली आणि सुरुंगसुद्धा पेरून ठेवले. दोन महिन्यांनंतर त्यांनी सुरुंग निकामी करून घेतली, सामानाची नव्याने जुळवाजुळव केली आणि परत प्रक्षेपण सुरू केले.

सेदिक यांचे कार्यक्रम फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषदेखील ऐकतात. त्यांचे काही कार्यक्रम हे ‘फोन इन’ असतात. त्यामुळे त्यांच्या परिसरातल्या अनेक स्त्रिया त्यांच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलतात. बहुतांश प्रश्न हे बहुविवाहाच्या चालीतूनच आलेले असतात. एक पत्नी, तिच्याकडून झालेली मुले असतानाही दुसरी, तिसरी पत्नी करून आणली जाते. मग स्त्रियाच स्त्रियांचे कसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषण करतात याची अनेक उदाहरणे सेदिक यांना ऐकायला मिळतात. शिक्षण, आरोग्य असे प्राथमिक हक्कसुद्धा अनेकदा स्त्रियांच्या, मुलींच्या वाटय़ाला सहज येत नाहीत. त्यात सेदिक यांना वेगळीच भीती वाटते. ती म्हणजे, अमेरिकी सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये चाललेल्या वाटाघाटींमध्ये इथल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा बळी दिला जाऊ नये. अमेरिकी सरकारला लवकरात लवकर तिथून काढता पाय घ्यायचा आहे. त्यामुळे तालिबानला शरिया कायदा लागू करू दिला जाईल अशी त्यांना शंका वाटते. होरपळलेल्या मनांवर सहानुभूतीची फुंकर घालण्याचे काम सेदिक करत आहेत. त्या खरोखरीच अनेकींना त्यांच्या ‘रेडिओ रोशनी’वरून जगण्याची नवी रोशनी दाखवत आहेत. अफगाणिस्तानात, कुंडूज प्रांतात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी तिथल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, नव्याने त्यांच्यात रुजत असलेल्या आत्मभानाचा मात्र बळी दिला जाता कामा नये.

अनंत ‘तिची’ ध्येयासक्ती

सत्त्याहत्तराव्या वर्षी अनेक जण ‘खूप जगून झाले, सगळे पाहून झाले.’ अशा मानसिकतेत असतात. पण जेन सॉक्रेटिस या मात्र त्याला अपवाद ठरल्या आहेत. ३ ऑक्टोबर २०१८ ला त्यांनी कॅनडामधून एकटीने शिडाच्या बोटीतून जगभ्रमणाला सुरुवात केली आणि ३२० दिवसांनंतर कुठेही न थांबता, कोणाच्याही मदतीशिवाय, एकटीने हा प्रवास पूर्ण केला. हे साहस करणाऱ्या सर्वाधिक वयाच्या व्यक्ती म्हणून त्यांची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

मूळच्या ब्रिटनच्या नागरिक असलेल्या जेन यांनी यापूर्वी देखील शिडाच्या नौकेतून जगभ्रमण केलेले आहे. १९९७ नंतर नवऱ्याच्या जोडीने त्यांनी नौकानयनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. २००३ मध्ये नवऱ्याचे निधन झाल्यानंतरही त्यांनी एकटीनेच प्रवास करायला सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी एकटीनेच नौकेतून जगभ्रमण करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. २०१२ मध्येसुद्धा त्यांना यश मिळाले नाही, पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी २०१३ मध्ये परत एकदा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांच्या विक्रमाची नोंद ‘एकटीने शिडाच्या नौकेतून प्रवास करणारी सर्वाधिक वयाची स्त्री’ म्हणून झाली. विक्रम नोंदवला असला तरीही जेन यांना नौकानयनाची हौस काही घरात बसू देत नव्हती. २०१७ मध्ये होडीतून पडल्यामुळे त्यांना मानेला, बरगडय़ांना दुखापत झाली होती. त्यातूनही सावरत त्यांनी मागील वर्षी सुरू केलेली त्यांची प्रदक्षिणा यावर्षी पूर्ण केली.

सत्त्याहत्तराव्या वर्षी एकटीने समुद्रात शिडाच्या बोटीतून प्रवास करताना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलेच असावे लागते. जेन सॉक्रेटिस यांनी हा विक्रम करताना त्यांचे उद्दिष्ट काय होते माहीत नाही. मात्र त्यांनी यामुळे जगासमोर कोणत्याही गोष्टीसाठी वयाचे बंधन नसते याचे उदाहरण ठेवले आहे. आता सगळे झाले म्हणून थांबण्यापेक्षा ‘अरे, अजून बरेच काही आहे, ते करून बघू या.’ या उमेदीने जेव्हा अनेकजण विचार करायला सुरू करतील तेव्हा जेन सॉक्रेटिस यांचा विक्रम फक्त पुस्तकात न राहता समाजात बघायला मिळेल. हेच त्याचे खरे यश असेल.

न्यायाचा परीघ वाढवताना

युनायटेड किंग्डममध्ये ‘वुमेन इक्व्ॉलिटी पार्टी’ (डब्ल्यूईपी) हा नव्याने लोकप्रियता मिळवणारा पक्ष आहे. अर्थातच नावाप्रमाणेच या पक्षाची धोरणे स्त्रीकेंद्रित आहेत. त्यामुळेच त्यांनी पुढच्या सर्वसाधारण निवडणुकांसाठी त्यांच्या ५ सदस्यांची ५ विद्यमान खासदारांविरुद्ध उमेदवारी जाहीर केली आहे. या पाचही जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप होते वा आहेत आणि त्यांच्याविरुद्ध उभ्या राहणाऱ्या पाचही जणी या बलात्कार, लैंगिक शोषणाच्या बळी आहेत. तसे बघायला गेले तर युकेच्या पुढच्या निवडणुका २०२२ मध्ये आहेत, पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुदतपूर्व निवडणुका पुढील वर्षी घेतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच ‘डब्ल्यूईपी’ने इतक्या लवकर त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.

लैंगिक शोषण, बलात्कार या गोष्टींबद्दल आपल्या समाजात मोठय़ाने बोलायचे धाडसदेखील खूप कमी जण करतात. बहुतांश वेळा अशा शोषितांना समाजात अवहेलनेचा सामना करावा लागतो. त्यांनी त्याच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडली यासाठी आधी त्यांनाच दोषी समजले जाते. पाच उमेदवारांमधील सेरेना लेडली, जेन सेल्बी यांची लढत ही राजकारणात मुरलेल्या केल्विन हॉपकिन्स आणि मार्क फिल्ड यांच्याविरुद्ध आहे. इतर तिघींची नावे ‘डब्ल्यूईपी’ने जाहीर केलेली नाहीत.

सेरेना लेडली यांच्यावर सोळाव्या वर्षी बलात्कार झाला. त्यातून त्या सावरतात न सावरतात तोच कॉलेजात, त्या ज्या माणसाच्या प्रेमात पडल्या, त्यानेही त्यांना शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्याकडून त्यांना एक मूलसुद्धा झाले. तरीही जोडीदारात काहीच फरक पडला नाही. उलट त्याने तिचे आर्थिक शोषणसुद्धा करायला सुरुवात केली. नंतर कशाबशा त्या त्याच्या तावडीतून सुटल्या. तरीही त्याने पुढची काही वर्षे तिचा पिच्छा सोडला नाहीच. आत्महत्येच्या विचारापर्यंत जाऊन आता देशातील एका मातब्बर राजकारण्याविरुद्ध लढण्यासाठी उभे राहणे हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण लेडली यांनी ते करून दाखवले. त्या म्हणतात, ‘‘मी का? याऐवजी मी का नाही? असा विचार मी करते.’’ तर सेल्बी यांच्यावरदेखील दोन वर्ष बलात्कार होत होता. त्यांनी त्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला होता. पण पुराव्याअभावी ते सगळेच मोडीत निघाले. या पूर्ण प्रक्रियेत सेल्बी यांना जो अनुभव आला तो मात्र अजूनच उद्विग्न करणारा होता. त्यानंतर त्यांनी मग अनेक सेवाभावी संस्थांबरोबर काम करायला सुरुवात केली. त्या म्हणतात, ‘‘आमच्यातल्या प्रत्येकीकडे स्वत:चे असे एक ठोस कारण आहे लढण्यासाठी. आम्हाला अन्यायग्रस्त स्त्रियांना न्याय मिळवून द्यायचा आहे. ज्या पुरुषांना वाटते, की ते गुन्हा करून, सहज सुटून जाऊ शकतात, त्यांच्याविरुद्ध आम्हाला लढायचे आहे. यूकेमधल्या निवडणुका कधी होतील माहीत नाही. या पाच जणी ज्यांच्याविरुद्ध लढण्यास उत्सुक आहेत ते निवडणूक लढवतील की नाही, तेसुद्धा माहीत नाही. त्या पाच जणींना किती मते मिळतील, किती जणी जिंकतील हेसुद्धा माहीत नाही. मात्र या पाच जणींची हिंमत वाखाणण्यायोग्यच आहे. स्वत:वरच्या अन्यायाच्या निमित्ताने त्या एका मोठय़ा मुद्दय़ाला हात घालत आहेत. त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

(माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com