स्त्रियांनी रात्रपाळीत काम करणं आता काही नवीन राहिलं नाही. रुग्णालय, महानगर दूरध्वनी निगम लिमिटेड, रेल्वे, बीपीओ, मल्टिनॅशनल कंपन्या अनेक ठिकाणी स्त्रिया रात्रपाळीत काम करताना दिसतात. कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरी, नोकरीतही रात्रपाळी अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रियांना वेगवेगळ्याच आव्हानांना सामोरं जावं लागतं. दिवसाच्या आणि रात्रीच्या कामात नक्कीच फरक असतो. त्याचा परिणाम  शरीराप्रमाणे तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि नातेसंबंधावरही होत असतो. तरीही अनेक स्त्रिया आपल्यावरच्या जबाबदाऱ्या तितक्याच जबाबदारीनं पार पाडताना दिसतात. अशाच काही रात्रपाळी करत असलेल्यांचे हे अनुभव –
रेल्वेमध्ये बुकिंग सुपरवायझर म्हणून काम कणाऱ्या मोनिका महाडिक यांना रात्री १० ते सकाळी साडेसहापर्यंत रात्रपाळीत काम करावं लागतं. त्या सांगतात, ‘‘सध्या मी आकुर्डी रेल्वे स्टेशनमध्येच काम करते. तेथून जवळच राहत असल्यानं आता प्रवासाचा ताण येत नाही. मात्र, पूर्वी पुणे स्टेशनला काम करत होते. तेथे रात्री साडेअकरा ते सकाळी आठ दरम्यान काम करावं लागायचं. त्यासाठी मला रात्री दहाची लोकल पकडायला लागायची. पुणे लोकलला एवढय़ा रात्री गर्दी नसल्यानं तो प्रवास म्हणजे कायम मनावर भीतीचा पगडा असायचा. अक्षरश: जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागायचा. कामावर असतानाही येणाऱ्या प्रवाशाला तिकीट द्यायचं, त्यासाठी स्टेशनवर थांबणाऱ्या गाडय़ा, प्रत्येक गाडीचा मार्ग, वेळ यांची माहिती ठेवायला लागते. रात्री बरेचदा मद्यधुंद प्रवासीही येतात. त्यांनाही शांतपणेच उत्तरं द्यावी लागतात. काही काही प्रवासी उगाच उद्धटपणे वागतात, त्यावेळी डोकं शांत ठेवूनच काम करावं लागतं. तिथे कसलीही तडजोड करून चालत नाही आणि अचानक काही झाल्यास काम सोडून जाता येत नाही.’’ अर्थात आपल्या कौटुंबिक समाजरचनेचा आणि मानसिकतेचा फटका मोनिका यांनाही बसला आहेच. संपूर्ण रात्रभर जागं राहिल्यानंतरही सकाळी घरी आल्यावर क्षणाचीही उसंत न घेता, कामाचा सर्व शीण विसरून त्यांना पदर खोचावाच लागतो. अगदी आजही. मुली शाळेत जाणाऱ्या असल्यानं त्यांच्या शाळेची तयारी करायची, त्यांचे डबे, इतर स्वयंपाक आणि घरातली इतर कामं संपली की त्यानंतरच झोप घ्यायला उसंत मिळते. अर्थात तोपर्यंत थेट दुपारच उजाडलेली असते. मात्र त्याची आता त्यांना सवय झाली आहे.
अर्थात अपराधभाव कायम आहेच. त्या म्हणतात, ‘‘रात्रपाळीत काम करताना मुलींच्या शाळा, त्यांचा अभ्यास, त्यांचे बालपण, त्यांचे हट्ट यासाठी इतर स्त्रियांप्रमाणे पुरेसा वेळ देता येत नाही याची कायम खंत वाटत राहते. माझी लहान मुलगी तीन महिन्यांची असल्यापासून तिला पाळणाघरात ठेवावं लागलं. तिला तेथे ठेवून जाताना कायम डोळे भरून जात. परंतु नाइलाज असे. कामावरही कोणत्याही स्थितीत तिकीट खिडकी सोडता येत नसल्यानं मुली अचानक आजारी पडल्या तरी त्यांच्याजवळ कधी थांबता येत नसे. शिफ्ट संपल्यावरच घरी जायला मिळायचं. याची सल कायम आहे.’’  दिवसा काम करत असताना काही अनुचित घटना घडली      तर शेजारी-पाजारी, नातेवाईक तुमच्या मदतीला येऊ शकतात, त्यामुळे थोडं निश्चिंत राहता येतं. पण रात्री काही काही अनुचित घडलं तर काय करायचं याची धाकधूक वाटत राहते, असंही त्यांनी सांगितलं.
‘‘आणखी एक खंतावणारी गोष्ट म्हणजे, वेगवेगळ्या शिफ्टस् आणि त्यात रात्रपाळी असल्यानं अनेकदा एखादा घरगुती कार्यक्रम असल्यास जाता येत नाही. त्यामुळे नातेवाइकांचीही नाराजी पत्करावी लागते. त्याचा परिणाम नात्यांवर  होतो. मुली शाळेतून घरी आल्यावर त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी निवांत गप्पा करत शाळेतील गमतीजमती ऐकायला मला वेळ नसतो. त्या वेळी रात्रीचा स्वयंपाक उरकून मला कामावर जाण्याची घाई असते. त्यामुळे साहजिकच त्यांचाही हिरमोड होतो. रात्री जेवायलाही एकत्र नसतो.
प्रत्येक नात्याला पुरेसा वेळच देता येत नसल्यानं नात्यांमध्ये दुरावा येतोय की काय, अशी भीतीही वाटत राहते. शिवाय तब्येतीच्याही तक्रारी जाणवतातच. रात्रपाळीत सतत संगणकावर बसून काम केल्याने डोळ्यांवर ताण तर येतोच, शिवाय पुरेशी झोप होत नसल्याने मानसिक ताणही जाणवू लागतो.’’ मोनिका सांगतात, कामाचा ताण सहन करता येतो, मात्र बरेचदा घरच्या जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पार पाडता न आल्यानं येणारी निराशा मात्र लपवता येत नाही, तरीही कुटुंबासाठी आणि घरातील कर्ती स्त्री असल्यानं भावनांना आवर हा घालावाच लागतो. आपल्या नोकरीचा फायदा कुटुंबाला नक्कीच होतोय, याचं समाधान वेगळंच’’
रात्रपाळीचा यापेक्षा वेगळा अनुभव एकीनं व्यक्त केला. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये सहनिर्माती म्हणून काम करणारी कल्याणी रात्रपाळीला एक आव्हान समजते. ती सांगते, ‘‘आमच्या क्षेत्रात सर्वात जास्त जर का शिकायला मिळत असेल तर ते रात्रपाळीत. तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. तुमच्याजवळ काम करण्यासाठी जास्त वेळ असल्यानं तुम्ही तुमचं सर्वोत्तम ते देऊ शकता. एकाच प्रकारचं काम न करता विविध जबाबदाऱ्या पार पाडता येतात. वरिष्ठांकडून, सहकाऱ्यांकडून शिकायला मिळतं. आपल्यातल्या उणिवा समजून घेता येतात. एकंदरच रात्रपाळी ही आत्मविश्वास वाढवायला मदत करणारीच ठरते,’’
औरंगाबादला राहणारी कल्याणी मुंबईला नोकरीनिमित्त आल्यानंतर तिला पहिल्या महिन्यातच रात्रपाळीत काम करावं लागलं. ती सांगते, मी रात्रपाळीत काम करते हे माझ्या आईला पचनी पडायला थोडा वेळ गेला. मुंबईचा प्रवास हाही तिचा काळजीचा विषय होता. अर्थात आता तिलाही माझ्या या कामाची सवय झाली आहे. माझे पतीही पत्रकारिता क्षेत्रातील असल्यानं त्यांचा माझ्या कामासाठी कायम पाठिंबाच राहिला. तो केवळ शब्दांनीच असतो असं नाही. तर सकाळी आल्यावर माझ्या कामात ते मदत करून तो कृतीतूनही व्यक्त होतो. माझ्या सासू-सासऱ्यांनीही माझं काम, त्याचं स्वरूप समजून घेत कायम पाठिंबाच दिला. त्यामुळे ते घरी असतानाही मला रात्रपाळीहून आल्यावर निर्धास्त झोपता यायचं.
‘‘रात्रपाळीच्या दरम्यान शारीरिक तक्रारी बरेचदा वाढतात. झोपेच्या, जेवणाच्या वेळा बिघडल्यामुळे उष्णता वाढते. झोप पुरेशी झाली नाही की बरेचदा जेवणही नीट जात नाही. अर्थातच मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळेच असेल कदाचित सलग रात्रपाळी करताना अनेकदा उदास वाटतं. अर्थात या माझ्या वैयक्तिक तक्रारी असल्याचं कल्याणी म्हणते. या गोष्टी टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं, जेवणाच्या वेळा पाळणं असा सल्लाही कल्याणी देते.
प्रसारमाध्यमांमधील वार्ताकन करणारी आणखी एक मैत्रीण नंदिता तिचा अनुभव सांगते, ‘‘तुम्हाला रात्रपाळीत रात्रीची मुंबई पाहता येते. रात्री घडणाऱ्या घटना, त्याचे वार्ताकन करताना माणसांचे त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू तुमच्या समोर येतात. तुम्ही अधिक अनुभव समृद्ध होता. म्हणूनच माझ्यासाठी तरी रात्रपाळी ही अधिक आव्हानात्मक ठरतेय.’’
स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या           स्वाती नायकोडीचंही कल्याणीसारखंच मत आहे. तिच्या मतेही रात्रपाळीचं काम अधिक जबाबदारीचं असतं. ‘‘रात्री रुग्णाकडे लक्ष देण्याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनाही सांभाळावं लागतं. कधी कधी त्यांना धीर देण्याबरोबरच त्यांच्या रागाचा, उद्धटपणाचा सामना करावा लागतो. अशा वेळी तुम्हाला तुमचा तोल सांभाळावा लागतो,’’ स्वाती सांगते, ‘‘जसा तुमचा अनुभव वाढतो, तशा कार्यालयीन जबाबदाऱ्या वाढतात आणि हीच बाब घरातही लागू होते. लग्न झाल्यावर घरातील जबाबदाऱ्यांमध्येही वाढ होते.’’ स्वातीचं एकत्र कुटुंब आहे. रात्रपाळीहून आल्यावर घरातील सर्व जण विश्रांती घेण्याचाच सल्ला देतात. मात्र घरात सर्वाचीच सकाळची गडबड सुरू असताना आपण झोपणं तिच्या मनाला पटत नाही. मग अशा वेळी घरात मदत करून दुपारीच झोप घेणं ती पसंत करते. स्वाती सांगते, ‘‘रात्रपाळीत सगळं रुटिन बदललेलं असतं. झोपेचं गणित बिघडल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटी, डोकं जड होणं अशा परिणामांना सामोरं जावंच लागतं. त्यामुळे या काळात आजारी पडल्यासारखं वाटतं. अर्थात रात्रपाळी आठवडय़ाभराचीच असल्यानं तेवढय़ापुरताच हा त्रास होतो.’’
सिस्टर इन-चार्ज असणाऱ्या जयश्री फडणीस २०१२ पासून सलग रात्रपाळी करतात. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या वयस्कर सासूबाईंच्या देखभालीसाठी त्यांनी सलग रात्रपाळी स्वीकारली आहे. मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेते, तर पतीही नोकरी करत असल्यानं घरातील सगळेच कामानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे मग दिवसभर वृद्ध सासूबाईंकडे लक्ष देण्यासाठी म्हणून ही तडजोड त्यांनी स्वीकारलीय. ‘‘लग्न झाल्यानंतर अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत सासूबाईंच्या आधारामुळेच मी नोकरी करू शकले. अगदी डबल डय़ुटीही केली. आता त्यांच्यासाठी एवढं करणं काहीच नाही.’’ त्या सांगतात.
रात्रपाळीचा त्यांना मिळणारा फायदा म्हणजे रात्रपाळीत काम करत असल्यानं बँक, इतर काही सरकारी कामं, कार्यालयीन कामं करण्यासाठी खास सुट्टी घ्यावी लागत नाही. ती दुपारच्या वेळेत पूर्ण करता येतात. त्या रात्री ९ ते ४ किंवा रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत काम करतात. अर्थात ते तितकंच जबाबदारीचं काम आहे. त्या सांगतात, ‘‘सिस्टर इन-चार्ज असल्यानं प्रत्येक वार्डमध्ये राऊंड मारून पाहणी करणं, इमर्जन्सी ऑपरेशनची तयारी, त्याचा अहवाल अशी कामं असतात. त्यामुळे तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं,’’ जयश्रीताई कल्याणला राहत असल्यानं मुंबईत कामावर जाण्यासाठी साधारणत: दीड ते दोन तास आधी निघावं लागतं. रात्री १२ ची डय़ुटी असेल तर कोणतीही रिस्क नको म्हणून सरळ १० वाजताची लोकल पकडून जायचं, म्हणजे निर्धोक प्रवास करता येतो. त्याचप्रमाणे पहाटे ४ वाजता काम संपल्यावरही  सकाळी वर्दळ सुरू झाली की मगच त्या घरी जायला निघतात. प्रवास लांबचा असल्यानं लोकलमध्ये थोडी झोपही होते, हा फायदाच असल्याचं ताई गमतीनं सांगतात. सकाळी घरी आल्यावर मात्र लगेच घरातील कामांसाठी उभं राहावं लागतच. सलग रात्रपाळी असल्यावर झोपेचं काय? यावर त्या सांगतात, ‘‘हे खरं आहे की रात्रीची झोप हीच  शरीरासाठी योग्य आणि गरजेची असते. मात्र आता शरीराला सवय झाली आहे. त्यामुळे दुपारची चार-पाच तासांची झोप पुरेशी ठरते. लोकलमधली झोपही उपयोगी पडतेच. सुट्टीच्या दिवशी मिळणारी रात्रीची झोप मग आठवडय़ाभरासाठी एनर्जी देऊन जाते.’’
एका आयटी कंपनीत काम करणारी        शुभम कुलकर्णी रात्रपाळीबद्दल वेगळाच मुद्दा मांडते. ती सांगते, मला सलग किंवा रात्रपाळी म्हणून काम नसतं. मात्र प्रोजेक्टची गरज म्हणून किंवा आम्ही जर परदेशी कंपन्यांसाठी काम करत असू तर बरेचदा रात्री काम करावं लागतं. महानगरामध्ये राहणारी तरुणाई ही जवळपास रात्री १२ वाजेपर्यंत तशीही जागीच असते. त्यांची दिनचर्या तशीही रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं अशाच प्रकारची असल्यानं त्यानंतर तीन-चार तासांचं जागरण त्रासदायक ठरत नाही.
शुभमच्या मते, रात्रपाळीत काम करणं तसं फायदेशीर ठरतं. घरी नातेवाईक आल्यास त्यांना पुरेसा वेळ देता येतो. घरातील कामं निवांतपणे करता येतात. अर्थात ती हेही मान्य करते की सध्या तिचा कुटुंब विस्तार नसल्यामुळे तिला रात्रपाळी सोयीची वाटत असली तरी मुलं असणाऱ्यांसाठी रात्रपाळीचं काम थोडं आव्हानात्मकच आहे.
रात्रपाळीत आज असंख्य जणी काम करतात. त्यांना आरोग्यविषयक, मानसिक प्रश्नही सतावतात तर काहींमध्ये कौटुंबिक अपराधगंड निर्माण करतात. मात्र सध्या तरी त्यांनी निवडलेल्या किंवा करत असलेल्या नोकरीची ती गरज आहे, अपरिहार्यता आहे. अर्थात काहींसाठी ती सतत नवं काही शिकायला मिळणारी आणि अनपेक्षित घटनांच्या शक्यतांमुळे व्यक्ती म्हणून कस लावणारी असते आणि म्हणूनच ती आव्हानात्मकही ठरते आहे.
रेश्मा भुजबळ -reshmavt@gmail.com