28 February 2021

News Flash

जागर दुर्गेचा..

लोकसत्ताच्या ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नऊ जणींचा सत्कार नुकताच मान्यवरांच्या आणि वाचकांच्या भरगच्च उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाचा हा सचित्र वृत्तान्त

| November 1, 2014 01:55 am

लोकसत्ताच्या ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नऊ जणींचा सत्कार नुकताच मान्यवरांच्या आणि वाचकांच्या भरगच्च उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाचा हा सचित्र वृत्तान्त
शोध नवदुर्गाचा.. तुमच्या आमच्यातल्या दुर्गेचा.. ‘लोकसत्ता’ने यंदापासून हाती घेतलेला हा एक उपक्रम. समाजात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वत:चा मार्ग शोधणारे अनेक जण आपल्याला दिसतात. अपार कष्ट घेत, अनेक अडीअडचणींना तोंड देत ते यशस्वी होतात. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आपण पाहतो, ज्यांनी स्वत:ला अशाच परिस्थितीतून एका उंचीवर नेऊन ठेवलंय. समाजातल्या अशाच काही फारशा परिचित नसलेल्या स्त्रियांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्याचे काम ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून करण्यात आले. या ‘शोध नवदुर्गेचा’ सोहळा १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत रवींद्र नाटय़ सभागृह येथे मोठय़ा उत्साहात साजरा झाला आणि उलगडल्या एकापेक्षा एक अत्युच्च पातळीवरील कामगिरीच्या गौरवगाथा. एक सामान्य स्त्रीही किती ताकदीने परिस्थिती हाताळू शकते याचा परिचय लोकांना झाला आणि तुडुंब भरलेल्या सभागृहातील सगळ्याच प्रेक्षकवर्गाने या नऊ दुर्गाचे भरभरून कौतुक केले.  
   या उपक्रमात निवड झालेल्या नवदुर्गाचं वैशिष्टय़ म्हणजे महाराष्ट्रातल् ch08      या विविध जिल्ह्य़ातून आल्या होत्या. सगळ्याच सामान्य वा मध्यमवर्गातून आलेल्या, पण त्यांचं कार्य मात्र आभाळाच्या उंचीचं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी याच मुद्दय़ावर बोलताना सांगितलं, ‘‘प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक दुर्गा असतेच जी पाठिंबा, ऊर्जा देण्याचे काम करत असते. सामाजिक पातळीवरही असे ऊर्जा देण्याचे काम या स्त्रिया करत असतात आणि त्यातून चांगलं सामाजिक कार्य घडत असतं. या सामाजिक कार्याचा परिचय तितक्याच गंभीरपणे करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.’’ त्यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय यातल्या प्रत्येक नवदुर्गेच्या परिचयातून होत होता. या नवदुर्गा होत्या, स्वत: अपंग असूनही आपल्याला भोगावा लागलेला अन्याय इतर अपंगांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून त्यांना उद्योगाच्या माध्यमातून पायावर उभ्या करणाऱ्या मीनाक्षी निकम, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी म्हणून रडत राहण्यापेक्षा दहा सीटर रिक्षा चालवून कुटुंबाचा आधार होणाऱ्या कुसुम चौहान, रस्त्यावर दिशाहीन भटकणाऱ्या मनोरुग्णांना घरी आणून त्यांना सांभाळणाऱ्या प्रज्ञा राऊत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण सुवर्णपदकासह पूर्ण करून बेरोजगारांना काम मिळवून देणाऱ्या विजयालक्ष्मी सुवर्णा, कर्करोगग्रस्त असतानाही त्याच्याविरोधात जनजागृती करत लढा देणाऱ्या डॉ.(कॅप्टन) रितू बियाणी, अंधांना शिक्षणाची दृष्टी देत त्यांना स्वकष्टाचे मोल शिकवणाऱ्या मंजुश्री कुलकर्णी, गर्भिणीप्राश, सखीप्राश आदी च्यवनप्राशांबाबतचा विश्वविक्रम करणाऱ्या आणि विधवांसाठी हळदीकुंकू उपक्रम राबविणाऱ्या
ch09डॉ. शारदा महांडुळे, पूर्वाचलात जाऊन तेथील रुग्णांची मोफत दंतसेवा करणाऱ्या डॉ. प्रतिभा आठवले आणि धुण्याभांडय़ांची कामं करणाऱ्या मात्र पुढे जाऊन त्यांच्यासाठी लढणाऱ्या मधु बिरमोळे. आणि या दुर्गाचा सत्कार केला तोही आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या नामवंत दुर्गानी. त्या होत्या, नाटय़ संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व अभिनेत्री फैयाज, अर्थतज्ज्ञ डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, उद्योजिका मीनल मोहाडीकर, उद्योजिका वीणा पाटील, पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ नंदिता पालशेतकर, सामाजिक कार्यकर्त्यां अनुराधा गोरे, माजी आयपीएस अधिकारी आभा सिंग आणि या नामवंतांचा सत्कार केला एक्स्प्रेस समूहाच्या प्रकाशक वैदेही ठकार यांनी.
या नवदुर्गाची निवड वाचकांकडून आलेल्या पत्रांमधूनच करण्यात आली होती. ही निवडप्रक्रिया कशी होती हे लोकसत्ताच्या फीचर एडिटर (चतुरंग) आरती कदम यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, ‘‘वाचकांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद आला. त्यातून नऊ जणींची निवड करणे खूपच आव्हानात्मक ठरले. तरीही योग्य दुर्गाच लोकांपर्यंत जावी यासाठी काही निकष वापरले गेले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुढे जाणाऱ्या या दुर्गेने स्वत:च्या पलीकडे समाजासाठीही काही कार्य करणं गरजेचं होतं. तसेच त्यांच्या कार्याची सत्यता तपासण्यासाठी इंटरनेटबरोबरच स्थानिक बातमीदारांचीही मदत घेण्यात आली. पूर्णत: पारखून घेतल्यानंतरच या नऊ जणींची निवड केली गेली आणि त्यातूनच आज स्वत:च्या पलीकडे जाऊन समाजासाठी महत्त्वाचं काम करणाऱ्या नऊ दुर्गा आपल्याला मिळाल्या आहेत.’’ यावेळी प्रत्येक नवदुर्गाच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. आणि त्यानंतर आरती कदम यांनीच घेतलेल्या या नवदुर्गाच्या मुलाखतीत प्रत्येकींनी आपले अनुभव कथन करून वाचकांना आपल्यातल्या दुर्गेची ch03ओळख करून दिली. सुरुवात झाली ती लिबरेशन कोचेस प्रा. लि. या संस्थेच्या संस्थापक-संचालिका विजयालक्ष्मी सुवर्णा यांच्या मुलाखतीने. त्या म्हणाल्या, ‘‘मी आज या स्थानावर पोहोचले आहे त्याचं कारण राग, परिस्थितीवर राग.. दहा बाय दहाचे घर, घरालगतच असणारे सार्वजनिक शौचालय, रोज दाऊ पिऊन येणारे वडील.. इतर समवयस्क मुलांच्या घरी मात्र चांगली परिस्थिती.. याचा मला खूप राग यायचा. आज जी काही मी आहे, जे काही मी घडवले आहे ते या रागातूनच. मी फक्त स्वप्ने पाहिली नाहीत, तर स्वप्नांच्या हात धुवून मागे लागले. ती सत्यात उतरविण्याचा ध्यास घेतला चिडून, त्वेषाने. हे मला हवंच आहे या महत्त्वाकांक्षेतून. कंपनी उभारण्यासाठी बाळंतपणाचा बाऊ केला नाही. मुलगी सात दिवसांची असताना तिला बास्केटमध्ये टाकून ऑफिसमध्ये घेऊन जायची, कारण मला सुट्टी परवडणार नव्हती. शिवाय मी आजूबाजूला कष्टकरी स्त्रियांना पाहत होते. गरज म्हणून गर्भवती असतानाही त्या काम करतच असायच्या आणि बाळंतपणानंतर लगेचही. मला त्यांच्याकडूनच अविरत काम करायची प्रेरणा मिळाली. मी रोज १६ ते १८ तास काम करते. कामाचे आता व्यसनच लागले आहे. स्वत:साठी तुम्ही अविरत काम करता तेव्हा तुम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही.’’
 नंतरच्या दुर्गा होत्या, नागपूरच्या प्रज्ञा राऊत. त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही मनोरुग्णांचा सांभाळ अगदी स्वेच्छेने आणि आनंदाने करतो. नवऱ्याचे वेतन, शेतीतून मिळणारे उत्पन्न केवळ याच मिळकतीतून आम्ही मनोरुग्णांचा सांभाळ करतो, कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय. आम्ही त्यांना स्वत:च्या पायावर उभं करू शकलो याचं समाधान आहे. यासाठी त्यांच्याशी थोडे प्रेमाने बोलावे लागते. त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी नकार न देता. त्यामुळे ‘नाही’पण त्यांच्यात येत नाही. शिवाय आम्ही सतत डॉक्टरांची मदत घेतो. त्यांच्या उपचाराने मनोरुग्ण बऱ्याच प्रमाणात बरे होतात. त्यांना फक्त आपलेपणा हवा असतो. त्यांच्यावर कुणी तरी विश्वास दाखविणे गरजेचे असते. तेच आम्ही करतो.
ch04त्यानंतरच्या दुर्गा होत्या मंजुश्री कुलकर्णी. त्यांना त्यांच्या प्रेरणेबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, माझे वडील दिवंगत मधुकर सोनटक्के कारंज्यासारख्या छोटय़ा गावात सामाजिक स्वरूपाचे कामे करायचे. त्यांच्या कार्याचा प्रभाव माझ्यावर होता. विवाहानंतर सुरुवातीला पती कामानिमित्त वरोऱ्याला असल्याने वरचेवर बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाणे व्हायचे. या दोन ‘बाबां’नी मला समाजकार्याची प्रेरणा दिली. सर्वानीच आनंदवनामध्ये येऊन काम करण्यापेक्षा प्रत्येकाने आनंदवनाचा एकेक कोपरा घेऊन विविध ठिकाणी काम केले तर संपूर्ण भारत आनंदवन बनेल, हे साधनाताई आमटय़ांचे विचार पटले. मग अकोल्यात परतल्यावर ‘आनंदवन’च्या धर्तीेचे काही काम करावे म्हणून मी अंध व्यक्तींना मदत करायचे ठरविले. नियतीचे काही संकेत असतात त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि ब्रेल लिपी शिकवणाऱ्या क्लासेसची माहितीही मिळाली. ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. ‘नॅब’ संस्थेकडून जिल्ह्य़ातील अंध व्यक्तींची माहिती मिळवली आणि मग ‘क्षितिज अंध-अपंग’ पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. आता अनेक र्वष या क्षेत्रात काम केल्यानंतर अंधत्वाचे कारण हे दारिद्रय़ आणि कुपोषण असल्याचे लक्षात येऊ लागले आहे. कारण, संपर्कात असलेली सर्व ३० ते ४० मुले ही गरीब आहेत. गरिबाच्या घरी अपंगत्व म्हणजे दुष्काळात तेराव्या महिन्यासारखे असते. त्यातही ग्रामीण भागात अंध मुलींचे प्रश्न अधिकच बिकट आहेत. अंध मुलगी कुठे बाहेर एकटी फिरणार? या विचाराने पालक सातवीनंतर तिची शाळा बंद करून तिला घरी बसवितात. एखाद्या अंध मुलाशी किंवा त्या मुलीपेक्षा जास्त अपंग असलेल्या मुलाशी तिचे लग्न लावून देतात. आई-वडील दोघेही अपंग त्यामुळे मूलही अपंग जन्मण्याचे प्रमाण वाढते आणि ते कुटुंब दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकत जाते. म्हणूनच यासंदर्भात आम्ही जनजागृती करतोय. एक अंध आणि एक डोळस अपंग असे विवाह व्हावेत यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि २५ डोळस महिला आमच्या या उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन काम करत आहेत.
ch07चाळीसगावच्या मीनाक्षी निकम हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. अपंग असूनही इतरांना उपजीविकेसाठी प्रवृत्त करणाऱ्या मीनाक्षी याचं आयुष्य हे सुई दोऱ्यामुळे सांधलं गेलं. त्या म्हणाल्या, ‘‘अगदी नकळत्या वयात दोन वर्षांची असतानाच पोलिओमुळे आलेले अपंगत्व. त्यात बाराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. आमच्या कुटुंबाची घडीच विस्कटली. अपंगत्व आणि वैधव्य एकत्र आले तर कुटुंबाची काय वाताहत होते हे मी माझ्याच घरात अनुभवले आहे. पाच भावंडे, विधवा आई आणि माझी ही पंगू अवस्था. त्या वेळी सुई-दोऱ्याने आधार दिला. सुई-दोरा हे जोडण्याचे काम करतात. या सुई-दोऱ्याने कपडेच काय माझे अवघे आयुष्य जोडले. आता मी दरमहा ५० हजार रुपये कमवीत असले तरी पहिल्या शिलाई कामातून मिळालेले ५० पैसे हे माझ्यासाठी अजूनही अनमोल आहेत. ‘प्रहार क्रांति’ आंदोलनाद्वारे मी विधवांना सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करते. मी कधीही माझ्या आयुष्यात रडलेले नाही. मला सगळ्या स्त्रियांना हेच सांगायचे आहे की पती-निधनाचे दु:ख मोठे आहे. पण, स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळाची माता असते, हे विसरू नका. तुमच्या मुलांकडे बघा, त्यांच्यासाठी जगा. जो क्षण गेला त्यासाठी रडत बसू नका. आणि हेच मी अपंग महिलांनाही सांगते. अपंग आहात म्हणून लोकांसमोर हात पसरू नका. भीक मागू नका. तुमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण बंद क रू नका. माझ्याकडे येणाऱ्या अपंग मुलींना मी कामाने आणि शिक्षणाने आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी प्रेरित करते आहे.’’
त्यानंतरची डॅशिंग दुर्गा होती, डॉ. (कॅप्टन) रितू बियाणी. त्यांच्या म्हणण्यानुसार मी आज जे काही आहे त्यासाठी मी कर्करोगाचे आभार मानते जर तो झाला नसता तर मी इथे नसते. आपला प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय सेना दलात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर मला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यातल्या त्यात सुदैव असे की खूप लवकर लक्षात आल्याने व वेळीच उपचाराने रोग आटोक्यात आला. मात्र, उपचारादरम्यान या रोगाविषयी जनसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे ch05लक्षात आले. मग देशभर या रोगाविषयी माहिती देण्याचा निश्चय केला. देशभरात ७३७ प्रबोधन कार्यशाळा घेऊन दोन लाख नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचविला. कर्करोग हा माझ्यासाठी शाप नाही तर वरदान ठरले आहे. कर्करोगाचा प्रसार करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. अगदी प्रत्यक्षात कर्करोग नसतानाही चुकीच्या निदानामुळे उपचारांच्या दिव्यातून जाणाऱ्यांना वाचवता आले. मी अशा नऊ जणांना वाचवले आहे. आपल्याकडे तब्बल ७० टक्के रुग्ण केवळ उशिरा कर्करोगाचे निदान झाल्याने दगावतात. त्यामुळे ही माहिती लोकांना देण्याची जबाबदारी नियतीनं माझ्यावर सोपवली आहे, असे मानून मी काम करते आहे. कर्करोगाला कोणतीही सीमा नाही. तो कुठेही कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे माझ्या जनजागृतीच्या कामाला सीमेची मर्यादा कशी असेल? म्हणून आजही मी माझ्या ‘हायवे इनफेनाईट’ या उपक्रमाच्या माध्यमातून माझी गाडी घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्याचे काम करते आहे.
वाशीम, करंजा येथून आलेल्या बंजारा समाजातल्या कुसुम चौहान म्हणजे सामान्यातील असमान्यत्वाचं चपखल उदाहरण. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षाचालक क्षेत्रात त्या रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं पोट भरत आहेत. त्या म्हणाल्या, विदर्भातला दुष्काळ. या दुष्काळापुढे नवऱ्याने हात टेकले आणि आत्महत्या केली. माझ्या वडिलांची रिक्षा होती. मात्र, रिक्षाचा चालक आठ-आठ दिवस पैसे देत नव्हता. त्यामुळे घरात मुले उपाशी राहायची. त्यांची भूक पाहवत नव्हती. मग स्वत:च रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. कारंज्यासारख्या छोटय़ा गावात एका महिलेनं रिक्षा चालविणं सोपं नव्हतं. सुरुवातीचा एक-दीड महिना मी एकटीच फिरत होते. कुणीही रिक्षात बसत नव्हतं. हिनं नवऱ्याला मारलं आणि आता आपल्यालाही कुठेतरी जाऊन ठोकेल, अशी त्यांना भीती वाटायची. पण, काहीही झाले तरी रिक्षा चालवायचीच हा माझा निर्धार होता. मग हळूहळू लोक रिक्षात बसू लागले. इतक्या वर्षांत माझ्या गाडीखाली लहानसा बेडुकही कधी आलेला नाही. बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज चार वर्षांत फेडले. आता मी आणि माझे कुटुंब आनंदात आहोत..’’
ch06विधवांसाठी हळदीकुंकू उपक्रम चालू करणाऱ्या आणि वंध्यत्वामुळे अपमान भोगाव्या लागणाऱ्या स्त्रियांना त्या दु:खातून बाहेर काढणाऱ्या डॉ. शारदा महांडुळे हे आणखी एक करारी व्यक्तिमत्त्व. त्या म्हणाल्या, ‘‘आमचा अहमदनगर जिल्हा मुंबईपासून फारच लांब आहे. लहानपणापासून आमच्याकडे स्त्री-पुरुष दुजाभाव, स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान हेच अनुभवलं आहे. स्त्रियांना होणारे बरेचसे आजार हे शारीरिक नाही तर त्यांच्या मानसिक खच्चीकरणातून जन्माला येतात, हे मी ठामपणे सांगते. माझ्याकडे येणारी रुग्ण महिला, ती सात महिन्यांची गर्भवती असताना तिचा पती अपघातात मरण पावला. त्यानंतर तिची प्रसूती झाली आणि माहेरी गेलेली असताना केवळ हातावर मेंदी काढली म्हणून तिच्या सासूने उकळत्या तेलात तिचा हात बुडवला. ही घटना माझ्या जिव्हारी लागली. स्त्री विधवा झाली की तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं जातं. तिला मंगळसूत्र निषिद्ध. तिच्यावर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. ‘जिथे नारीची पूजा केली जाते, तिथे देव वसतो’, असे मानणारी भारतीय संस्कृती आहे. मग केवळ वैधव्य आल्याने महिलांना शुभकार्यापासून वंचित का ठेवले जाते? या  अपप्रवृत्तीविरुद्ध जाणीवपूर्वक कृती करावी म्हणून विधवांसाठी ‘हळदी कुंकू’ समारंभ आयोजित करण्यात सुरुवात केली. वटपौर्णिमेला याच स्त्रियांकडून वडाच्या रोपांची लागवड करण्याचा उपक्रम आम्ही राबवतो. या कामात कुटुंबाची खूप मदत मिळते. लोक टीका करतात, नावे ठेवतात. दवाखाना चालत नसल्याने यांना हे नसते उद्योग सुचतात, अशी शेरेबाजीही करतात. मात्र, मी त्याची पर्वा करीत नाही. मी काही गुन्हा करीत नाही. सावित्रीबाई फुल्यांनी अंगावर चिखलाचे गोळे झेलले, आपण दगड सोसण्याची तयारी ठेवली पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये मूल होत नाही म्हणून रडणाऱ्या स्त्रिया असतात. मूल झाले नाही तर नवरा दुसरा विवाह करेल, या भीतीने त्या रडत असतात. अशा वेळी कमीतकमी पैशात यावर काय उपाय करता येईल, या विचाराने आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून स्त्रियांसाठी ‘गर्भिणी प्राश’ आणि पुरुषांसाठी ‘पॉवरप्राश’ नावाचे च्यवनप्राश बनवले. या च्यवनप्राशचा अनेक जोडप्यांना फायदा झाला आहे.’’
स्वत: घरकामगार असणाऱ्या आणि पुढे त्यांच्या अधिकारांसाठी लढणारी दुर्गा म्हणजे मधु बिरमोळे.
ch02त्या म्हणाल्या, ‘‘आमचा संघर्ष आत्मसन्मानासाठी. लहानपणी शाळेत जात असतानाच मी लोकांकडे धुणीभांडीही करायचे. त्याचे लोकांना कौतुक वाटायचे. पण, तरीही घरमालकीण आपल्याला वेगळी वागणूक देते, हे तेव्हाच लक्षात आले होते. घरकाम करणाऱ्या मुलीसाठी चहाचा कप वेगळा ठेवला जातो. रात्रीचे उरलेले, शिळे खायला दिले जाते, हे लक्षात आले. मात्र, असे का? आपण काही जगावेगळे काम करत नाही, घरकामच करतो आहोत? या प्रश्नाचे उत्तर त्या वेळी मिळाले नव्हते. त्यामुळे नंतर जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅडव्होकेट वर्षां काळेंच्या घरी काम करण्याची संधी आली तेव्हा त्यांना आधीच ‘उष्टी-खरकटी भांडी माझ्यासाठी ठेवू नका,’ असे बजावले. त्यांनी माझी सखोल चौकशी केली आणि माझ्यातली हुशारी त्यांना जाणवली. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या वडिलांनीच करून दिले. पुढे ‘एकलव्य कष्टकरी संघटने’च्या माध्यमातून प्रौढ शिक्षण पूर्ण केले. या संघटनेमुळे मी घडले. घरेलू काम करणाऱ्यांना ‘कामगार’ म्हणून दर्जा दिला जावा. इतर कामगारांना मिळणाऱ्या किमान वेतन, साप्ताहिक रजा यासारख्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आमची लढाई कुणा व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध नाही. आत्मसन्मान मिळविण्यासाठी हा संघर्ष आम्ही करीत आहोत. आता सरकारने घरकाम करणाऱ्यांनाही ‘कामगार’ म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यासाठी कायदाही करण्यात आला आहे.’’
दिवाळीच्या दरम्यान पूर्वाचलात जाण्याचा शिरस्ता या वेळी न मोडल्यामुळे या सत्काराला उपस्थित न राहिलेल्या डॉ. प्रतिभा आठवले या एक दुर्गा. सहज पर्यटक म्हणून पूर्वाचलात गेलेल्या अहमदाबादच्या डॉ. प्रतिभा आठवलेंनी तेथील आरोग्य सुविधेचा अभाव पाहून दर वर्षी काही दिवस दंतचिकित्सा शिबिरं सुरू केले. गेली १३ वर्षे त्या ऑक्टोबर महिन्यात पूर्वाचलमधील राज्यात २१ दिवस जातात. त्यांच्या प्रयत्नांनी त्या भागात आता पाच दंत चिकित्सा केंद्र कार्यरत झाली आहेत. त्यांच्या भगिनी स्नेहल जोशी यांनी हा नवदुर्गा पुरस्कार स्वीकारला.   
या दुर्गाच्या प्रत्येक मुलाखतीदरम्यान त्या त्या दुर्गेच्या कार्याशी साधम्र्य साधणाऱ्या गाण्याची जोड देण्यात आली होती. तनुजा जोग, अद्वैता लोणकर, श्रीरंग भावे म्हटलेल्या आणि त्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या उत्तरा मोने यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. उत्तरा मोने यांच्याच ‘मिती क्रिएशन’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते, अभ्युदय बँक आणि पृथ्वी एडीफस.        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 1:55 am

Web Title: nine brave lady honor under the initiative of shodh nav durge%e2%80%8e cha by loksatta
Next Stories
1 मदतीचा हात : रिव्हर्स मॉर्गेज
2 प्राणायामाचे तंत्र डॉ.
3 दम्यावर संजीवनी
Just Now!
X