News Flash

निर्गुणी संत

करुणा हा मलूकदासांच्या सगळ्या चिंतनाचा, उपदेशाचा आणि कार्याचाही गाभा राहिला आहे.

| August 29, 2015 01:27 am

करुणा हा मलूकदासांच्या सगळ्या चिंतनाचा, उपदेशाचा आणि कार्याचाही गाभा राहिला आहे. ‘भूखहिं टूक, प्यासेहिं पानी। ऐहि भगति हरिके मन माही।’ हीच तर भक्ती आहे. ईश्वराला तीच फार आवडते, असा त्यांचा विश्वास होता.

जाति हमारी आतमा, नाम हमारा राम

पाँच तत्त्व का पूतरा, आइ किया विश्राम
आत्मा हीच आमची जात. राम हेच आमचं नाव. पंचतत्त्वांनी बनलेल्या या देहरूपी पुतळ्यात आम्ही विश्रांतीसाठी आलो आहोत, अशा भावनेनं जीवनाकडे आणि आपल्या अस्तित्वाकडे पाहणारे संत मलूकदास हे सूरदासांचे, दादू दयालांचे किंवा मीरेचे समकालीन संत आहेत.
निर्गुणी संतांची सारी लक्षणं अत्यंत उत्कटपणे प्रकट करणारे ते संत आहेत. जाती-पातींचे, धर्माचे किंवा चर-अचराचे कसलेच भेद मनात नाहीत. नाना रूपांनी पूजला जात असला तरी परमात्मा एकच आहे. याची निश्चित खूणगाठ हृदयाशी बांधलेली आहे. ईश्वर भक्तीवर सर्व मनुष्यमात्रांचा अधिकार समान असल्याची जाणीव अगदी स्पष्ट आहे आणि अंतर्यामीच्या गहनात उतरण्याचा एक अतितरल, अतिनिर्मल आणि अतिसंवेदनशील असा पण तरीही साधासा मार्ग माहीत झाला आहे- निर्गुणी संत स्वत:त बुडालेले आणि तरीही जगाविषयीच्या आस्थेनं अपार ओलावलेले संत आहेत.
मलूकदास याला अपवाद नाहीत. एकशेआठ वर्षांचं दीर्घ आयुष्य त्यांना मिळालं आणि त्या आयुष्याचा बहुतेक काळ त्यांनी ईश्वर चिंतनात घालवला. त्यांनी त्यांच्या ईश्वराला राम हे नाव दिलं होतं, पण त्यांचा राम शेकडो नावं आणि शेकडो रूपं धारण करणारा होता. एकच होता तो पण त्याची ओळख वेगवेगळी सांगितली जात होती. स्वत:मध्ये खोलवर उतरल्यावरच त्याचं एकमेव मूल स्वरूप दिसू शकत होतं. तोच एक परमात्मा प्रत्येक प्राणिमात्रात त्यांनी पाहिला आणि साऱ्या दुनियेविषयीचं ममत्व त्यांच्या मनात भरून राहिलं.मलूकदासांची संवेदनशील वृत्ती त्यांच्या बालपणापासूनच दिसत आली. गंगा नदीच्या काठावरचं त्यांचं कडा हे गाव अलाहाबादपासून फारसं दूर नव्हतं. तिथे त्यांचे पूर्वज बहुधा पंजाबातून येऊन स्थिरावले असावेत. मलूकदासांच्या वाणीवर अस्सल पंजाबीचा प्रभाव दिसून येतो, तोही बहुतेक त्याचमुळे. सुंदरदास खत्री कक्कड आणि शांतीदेवी यांच्या पोटी जन्माला आलेला मलूक अगदी लहान असल्यापासूनच अतिभावनाशील होता. त्याच्या भावुकतेच्या पुष्कळ कथा चरित्रकारांनी आणि शिष्यमंडळींनी पुढे जपून ठेवल्या आणि लिहूनही ठेवल्या आहेत. त्यांचं सार एवढंच आहे, की या संतांचं हृदय प्रथमपासूनच प्रेमानं आणि करुणेनं भरलेलं होतं.करुणा हा तर पुढे मलूकदासांच्या सगळ्या चिंतनाचा, उपदेशाचा आणि कार्याचाही गाभा राहिला आहे. आपल्या गावात आलेल्या भयंकर प्लेगच्या साथीत आपल्या घरच्या वडीलधाऱ्यांचं मन त्यांनी गाव न सोडण्याविषयी वळवलं आणि आजारी माणसांची रात्रंदिवस सेवा केली. त्या प्रत्यक्ष कार्यामागेही होती ती त्यांच्या मनातली माणसांविषयीची- नव्हे, सर्वच जीवमात्रांविषयीची अथांग करुणा. ‘भुकेल्याला घासभर अन्न आणि तान्हेल्याला घोटभर पाणी हीच तर भक्ती आहे. ईश्वराला तीच फार आवडते,’ असा त्यांचा विश्वास होता.

भूखहिं टूक, प्यासेहिं पानी। ऐहि भगति हरिके मन माही।। जगातल्या दु:खितांचं दु:ख हरण करावं, त्यांचं दरिद्रय़ मलूकनं स्वीकारावं आणि त्यानं लोकांना सुख वाटावं, अशी इच्छा मलूकदासांनी वारंवार व्यक्त केली आहे. दुसऱ्याचं दु:ख जो जाणतो तोच खरा पीर आहे, असं म्हणताना पीर म्हणजे पीडा या अर्थाला काव्यात्म रीतीनं खेळवत त्यांनी उपदेश केला आहे.

मलूका, सोई पीर है, जो जाने पर पीर
जो पर पीर न जानई, सो काफिर बे पीर

मलूकदासांच्या करुणेची पाखर अशी प्रत्येक दु:खितावर आहे एवढंच नव्हे तर ती साऱ्या चराचरावर आहे. झाडाची हिरवी- जिवंत फांदी तोडली, तरी त्यांच्या हृदयात सुरा घुसल्यासारखी किंवा बाण घुसल्यासारखी वेदना होते.
हिरवी फांदी तोडु नका हो शर घुसतो हृदयात
जीव आपुल्यासमान तोही, म्हणतो दास मलूक

मलूकदासांच्या सद्य भक्तीची कीर्ती फार झपाटय़ानं पसरली; ती जशी जनसामान्यांमध्ये तशी राज्यकर्त्यांमध्येही. पार औरंगजेबापर्यंत त्यांची थोरवी जाऊन पोचली आणि त्यानं मलूकदासांच्या आश्रमाला दोन गावं इनाम दिली. असं म्हणतात, की त्यांच्यामुळेच औरंगजेबानं (हिंदूंवर लादलेला) जिझिया कर रद्द केला.औरंगजेबानं ज्या दोन सैनिकांना मलूकदासांकडे पाठवलं होतं, त्यातला एक फतेह खाँ हा मलूकदासांचा निस्सीम भक्त बनला. मलूकदासांनी त्याचं नाव ठेवलं मीर माधव. आयुष्यभर त्यांची सोबत करणाऱ्या मीर माधवाची समाधी आजही मलूकदासांच्या समाधीशेजारीच आहे. मलूकदास अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जगले. त्यांच्या शिष्यांनी काबूल- कंदाहार- मुलतानपासून तामिळनाडूपर्यंत अनेक ठिकाणी त्यांच्या गाद्या निर्माण केल्या. त्यांनी या जगाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांचं शरीर गंगेच्या प्रवाहात सोडलं गेलं. अशी कथा सांगितली जाते, की प्रयागला, काशीला आणि जगन्नाथपुरीला ते सशरीर जिवंतपणे गेले आणि पुरीला तर त्यांनी जगन्नाथाकडून विशिष्ट प्रसादाचा वरही मिळवला. म्हणून आजही पुरीला जगन्नाथाच्या प्रसादात मलूकदासांच्या नावाचा रोट वाटला जातो. तिथे समुद्रतटावर आजही मलूकदासांचं पवित्र स्थान दाखवलं जातं.तशी मलूकदासांची आठवण जागवणारे आश्रम आज दिल्लीत, कडा गावात आणि अगदी कॅलिफोर्नियातही आहेत. पण त्यांची आठवण खरी जागती ठेवली आहे ती त्यांच्या दोह्य़ांनी आणि साख्यांनी. फार सरळ, हृदयस्पर्शी आणि काव्यात्म अशी त्यांची वाणी आहे आणि त्यांच्या रचनांमधून तीच सहजपणे प्रवाहित होते आहे. सामान्य माणसाला फार मोठा दिलासा देणारे त्यांचे शब्द तीनशे वर्षांनंतरही अद्याप तसेच प्रभावी आहेत. सर्वाचं दु:ख आपलंच आहे, असं समजलं की त्या अविनाशी परमेश्वराच्या अगदी जवळ जातो आपण, असं मानलं त्यांनी आणि तो परमेश्वर कुणा मूर्तीत नाही, असंही मानलं.

सारी दुनिया वेडी साधो,
करते पूजा पाषाणाची
मलूक जीवात्म्याचा पूजक
ईश्वर चिंता वाही त्याची

त्यांनी कधी दुनियेला निर्जीवांची वस्ती म्हटलं. ज्यांना खरं जगणं- स्वत:चं मूळ स्वरूप ओळखून जगणं माहीतच नाही. ते जिवंत कसे म्हणणार? म्हणून ही दुनिया म्हणजे ‘मुर्दोकी बस्ती’ आहे. मूर्खपणा, मूपणा, अहंता, अज्ञान यांच्या वेढय़ात उदास होतात मलूकदास, पण त्या तशा माणसांविषयीच्या कळवळ्यानं भरूनही येतात. सत्ता आणि संपत्ती यांच्यासाठी चाललेली लोकांची धडपड त्यांना केविलवाणी वाटते. ते म्हणतात,

प्रभुतेसाठी सारी धडपड
कोण प्रभूला स्मरते?
स्मरे प्रभूला, त्याच्या पुढती
प्रभुता दासी होते

मलूकदासांनी ढोंगी साधूंवर शब्दांचे चाबूक चमकावले, मायामोहात गुरफटलेल्या माणसांना खडसावत जागं केले आणि भूतदया, करुणा, सहानुभूती यांच्या व्यापक विस्तारात हृदय फैलावणाऱ्या प्रत्येकाला रामनामाचा आश्वासक आशीर्वाद दिला.
डॉ. अरूणा ढेरे – aruna.dhere@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 1:27 am

Web Title: nirgun saint
Next Stories
1 ना हार ना जीत
2 कर्मयोगाचा सदरा!
3  अदृष्टाच्या वाटेवर..
Just Now!
X