ल्युसी अ‍ॅन होल्म्स. ब्रिटनमधली एक स्वच्छंदी तरुणी. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत, नाटकाच्या विश्वात यथेच्छ डुंबणारी. आपल्याच कल्पनेच्या जगात रमत कादंबऱ्या लिहिणारी.. पण एके दिवशी तिच्या या मनोराज्याला तडा गेला.. बाईची खरी ओळख काय या प्रश्नाने तिला एका व्यवस्थेविरुद्ध उभं राहायला प्रवृत्त केलं. आज ती उभी आहे इंग्लडमधल्या एका प्रस्थापित, बलाढय़ ‘जगा’समोर. आता फक्त जिंकायचंच आहे.. कारण हा लढा आहे, बाईसाठीचा, तिच्या आत्मसन्मानासाठीचा, तिच्या अनावृत देहाचे- टॉपलेस फोटो छापले जाऊ  नयेत यासाठीचा!
ch08याची सुरुवात झाली तेव्हा ल्युसी ११ वर्षांची होती, शरीरभान नुकतंच कुठं येऊ लागलेलं. उमलू लागलेलं शरीर, उभार जाणवताहेत न जाणवताहेत अशा स्थितीतले. त्याच वेळी घरी वर्षांनुवर्षे येणाऱ्या ‘द सन’चं नेमकं ते पान तिच्या नजरेसं पडलं- ‘पेज ३.’ त्यातली अनावृत स्त्री. बांधेसूद देहाची.. तिचं मन तुलना करू लागलं नि मग ती सवयच झाली.  अंक आला की त्यातली ‘टॉपलेस मॉडेल’ बघायची आणि स्वत:चं शरीर तपासायचं. तिला वाटू लागलं, कुणी तरी आपल्याला नापास करतंय, तिला शरीराचीच लाज वाटू लागली, आरशात बघायची भीती वाटू लागली. पण काहीतरी चुकीचं घडतंय.. हेही तिला जाणवत होतं.
 ‘द सन’ घरी रोज येतच होता. तीही मोठी होत होती..अभ्यास, नाटकं करत असतानाच तिला लिहायची आवड निर्माण झाली. त्यातूनच  ब्लॉग सुरु झाला, ‘बींग वुमन’ आणि जन्माला आल्या चार कादंबऱ्या. कल्पनेच्या या राज्यात ती छान रमून गेली होती, पण बाहेर, वास्तवात मात्र काही तरी वेगळच सुरू होतं.. स्त्रीविरुद्ध..
 क्रीडा विश्वातल्या बातम्यांसाठी खास प्रसिद्ध असलेलं आणि १९७० पासून ‘टॉपलेस मॉडेल’साठी प्रसिद्ध झालेलं ब्रिटनमधलं जुनंजाणतं ‘द सन’ त्या दिवशीही तिच्या हाती पडलं. साल होतं, २०१२. ऑलिम्पिक्सचे दिवस. तिने पान ३ उघडलं. ‘तो’ फोटो तिथे नव्हता. ती खूश झाली. तिला अपेक्षित होतं खेळातल्या यशस्वी मुलींचे फोटो. पदकं घेऊन उत्साहाने रसरसलेले.. पण.. पानं उलटता उलटता १३ वर होतीच ती, एक हॉट टॉपलेस ‘मॉडेल.’ कुणी तरी जोरात थोबाडात मारल्यासारखं झालं तिला आणि जाणवलं.. हे पुरुषांचंच जग आहे.  जिथे बाईच्या आत्मसन्मानाला स्थानच नाहीए. तिचं कर्तृत्व, तिची गेल्या काही वर्षांतली भरारी याला किंमतच नाहीए. आहे ते फक्त तिच्या सुडौल देहाचं प्रदर्शन!
त्या ‘हॉट’ फोटोंनी ठिणगी पेटली. हे थांबवायलाच हवं, तिला पक्क पटलं. तिने मैत्रिणींशी बोलायला सुरुवात केली. कुणालाच हे देहाचं प्रदर्शन आवडत नव्हतं. प्रवासात तर ते पान उघडणं अनेकींसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. काही लहान मुलींसाठी ‘उघडं’ राहणं ‘सो व्हॉट’ होऊ  लागलं तर काहींसाठी ते न्यूनगंडाचं कारण  ठरत होतं. तिला यापेक्षाही भयानक अनुभव समजू लागले. तीसुद्धा लैंगिक अत्याचाराची बळी होतीच. अत्याचाराच्या, अगदी बलात्काराच्या गोष्टी कळू लागल्या. इतक्या की लैगिंक अत्याचार साथीसारखा पसरलाय की काय असं वाटावं. अर्थात दैनिकातले फोटो लगेच बलात्काराला उत्तेजन देत नाही, एवढं तिलाही कळत होतं, पण या पाश्र्वभूमीवर असे फोटो छापणं योग्य होतं?  तिने त्यावेळचे ‘द सन’चे संपादक डॉमनिक मोहन यांना ३ पानी पत्रच पाठवलं. या फोटोचे दुष्परिणाम सांगणारं. आणि ‘द सन’विरोधात ऑनलाइन पिटिशन दाखल केलं.  ‘द सन’ त्यावेळी सर्वाधिक खपलं जाणारं वृत्तपत्र होतं आणि म्हणूनच मीडिया मोगल रुपर्ट मडरेक यांच्या मालकीच्या अवाढव्य जगाशी ती टक्कर होती. एका प्रस्तापिताविरुद्धचा लढा होता. पण चांगलं काम     केलं की लोकं जोडली जातातच.    तिने हाक दिली ..और कारवा बनता गया. ६० हजार लोकं  सक्रिय जोडले गेले. ऑनलाइन सह्य़ा अडीच लाखांवर पोहोचल्या..‘नो मोर पेज थ्री’ मोहीम सुरू झाली अन् संपादक डॉमनिक मोहन यांना तोंड उघडावंच लागलं. ‘लोकांना जे हवं तेच आम्ही देतोय.’ त्यांनी पोपटपंची केली, ‘हे आहे, तरुण, ताजंतवानं आणि नैसर्गिक सौंदर्याचं सेलिब्रेशन.’ त्यानंतर साहजिकच ‘फ्रीडम ऑफ प्रेस’चे वाद घातले गेले. वातावरण तापायला लागलं.. ऑगस्ट २०१३ ला मडरेक ट्विटले.. ‘कन्सिडरिंग..’
आणि ‘द सन’च्या आयरिश आवृत्तीतून टॉपलेस मॉडेल्सची उचलबांगडी झाली, अर्थात त्यांची जागा स्विमिंग कॉस्च्युममधल्या मॉडेल्सनी घेतली, पण हेही नसे थोडके! पण खरी लढाई ब्रिटनमधली होती. २०१२ ते २०१४ वैचारिक घुसळण सुरू होती. राजकारणी लोकही सामील झाले. १५२ एमपींनी आपल्या सह्य़ांचं पत्र ‘द सन’ला पाठवलं, निषेध म्हणून ग्रीनपार्टीच्या कॅरोलीन तर ‘नो मोर पेज थ्री’चा टी शर्ट घालूनच पार्लमेंटमध्ये पोहोचल्या. २०१५ च्या जानेवारीत ही मोहीम अधिक तीव्र केली गेली. ३० विद्यापीठातल्या मुलांनाच हाताशी धरलं गेलं. सगळ्यांनी
‘द सन’वरच बहिष्कार टाकायचं ठरवलं..
 ‘द सन’ने १९७० पासून या टॉपलेस मॉडेल्स प्रसिद्ध करायला सुरुवात केली तो काळच, ‘सेक्सिझम’चा होता आणि बाईचं अस्तित्वच बेदखल होतं. ती उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहिली जात होती. पण त्याला आता ४४ वर्षे लोटली आहेत. दरम्यानच्या काळात बाई कुठल्या कुठे पोहोचली आहे. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने- पुढे चालते आहे. एक बाई म्हणून तिला तिला आत्मभान, आत्मप्रतिष्ठा, स्वत्वाची ओळख पटलीय.. तरी आजही प्लस्टिक सर्जरी केलेली खोटय़ा सौंदर्याच्या देहाचं साजरं होणं ल्युसीला पटतच नव्हतं. तिचं म्हणणं एकच, ‘काळ बदला आहे, तुम्ही बदलायला हवंच’.. आणि ते घडलं, १६ जानेवारी २०१५च्या ब्रिटनच्या आवृत्तीत पान ३ वर तिची छबी छापून आली.. पण जरा लाज ‘झाकून’- पुढेही तेच. दुसरा, तिसरा चौथा, पाचवा दिवस गेला.. आंदोलनकर्ते खूश झाले. जिंकली लढाई असं वाटत असतानाच पुन्हा ते घडलं..      २२ जानेवारीच्या अंकात. पुन्हा एकदा टॉपलेस हॉट बेब.. आणि आता रोजच!
पुढे काय? सुरू केलेली लढाई मध्येच थांबवता येणार नाहीच आता ..किंबहुना ती थांबवू नयेच. 

उंच भरारी
ch07मी पायलट झालेय, असं स्वप्नच आपल्याला पडत नाही की काय, की हे स्वप्न मिटल्या पापण्यांआडच बंदिस्त करून ठेवलंय आम्ही, की पुरुषच तेवढे ‘हवेत’ काम करू शकतात आणि बायका तेवढय़ा जमिनीवरच, अशी आमची खात्री पटलीय.कारण जगभरात १०० मधल्या फक्त तीनच स्त्रिया कमर्शिअल पायलट आहेत. (१ लाख ३० हजार पायलटांपैकी स्त्री पायलट फक्त ४ हजार. पण चांगली बाब ही की आपल्या देशात मात्र हे प्रमाण ११ टक्क्य़ांवर गेलंय पण गर्वाची बाब म्हणजे त्यातली एक, ब्रिटिश एअरवेजमधली हेलेन नुकतीच बोइंग ७६७ ची पहिली फ्लाइंग ऑफिसर झाली आहे, १४ वर्षांनंतरच्या कामगिरीनंतर! आतापर्यंत पायलट असणारी एक स्त्री त्याचाही पुढचा टप्पा गाठत स्त्री अधिकारी झाली आहे. तीही बोइंग विमानाची
खरं तर इवोन पोल सेन्स ही ब्रिटनची पहिली कमर्शिअल पायलट (नोकरी या अर्थाने)बनली त्याला पाच दशकं (१९६०) ओलांडून गेलीत. तेव्हा तिच्या एका सहकाऱ्याने म्हणे सांगितलं होतं की जर एक स्त्री पायलट होत असेल तर मी राजीनामा देईन. सुदैवाने की दुर्दैवाने पण ती त्याने ‘हवे’तच मारलेली बात ठरली. नंतर सगळ्याच पुरुषांनी तिला मदतच केली. पण एक नक्की, तिला मी विमान उडवते आहे,  हे स्वप्न पडलं तेव्हा ती आठ वर्षांची होती. ती म्हणते, हे खूपच वेगळं क्षेत्र असल्याने जेवढय़ा लवकर तुम्ही याचा ध्यास घ्याल तेवढं तुम्ही या स्वप्नाच्या जवळ जाल. तर हेलन म्हणते, आपण बाया हे क्षेत्र आमचं नाही हे ऐकतच मोठं होतो. टीव्ही घ्या नाही तर चित्रपट पायलट असतो तो पुरुषच. त्यामुळे प्रत्यक्षातही नाही आणि खोटय़ा जगातही कुणी स्त्री आदर्श नाहीतच.
पण काळ बदलतो आहे..
तेव्हा बाया, महिला, स्त्रियांनो, आपण ‘हवेत’न जाता ‘हवे’त काम करू शकतो हे दाखवण्यासाठी, स्काय हॅज नो लिमिट    
आरती कदम – arati.kadam@expressindia.com