ch22ज्याला शाळेत जाणंही पैशांअभावी शक्य नव्हतं, तो दादामुळे शिकला आणि अविरत कष्ट करत प्लास्टिक सर्जरीमध्ये उत्तम पदवी घेऊन डॉक्टर झाला. पण पैशाच्या मोहापेक्षा आपल्या गावातल्या, लातूरमधल्या लोकांना आपली सेवा मिळावी म्हणून त्याने उभं केलं, लहाने हॉस्पिटल. गेल्या १४  वर्षांत इथे अनेकांची आयुष्ये उभी राहिली. वैद्यकीय सेवेतून रुग्णांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच आशीर्वाद मानणाऱ्या डॉक्टरांची ही प्रेरक कथा.
मी साधारणपणे सहा वर्षांचा असेन तेव्हा मला शाळेत घातले गेले, पण नेमका त्या वर्षी पाऊस व्यवस्थित झाला नव्हता म्हणून आमच्या अण्णांनी (माझे वडील) सांगितलं, या वर्षी शाळेत जाऊ नको, शेतात जनावरे सांभाळण्यासाठी माणूस नाही आणि माझी रवानगी  शेतात झाली. माझे दादा अर्थात माझे वडील बंधू पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने त्यावेळी औरंगाबादला एम.बी.बी.एस. करत होते. येण्या-जाण्याच्या तिकिटासाठी पसे मिळत नसल्यामुळे ते वर्षभर गावाकडे येऊ शकले नव्हते. त्यामुळे मी वर्षभर शाळेशिवायच. उन्हाळ्याच्या सुट्टीत दादा गावाकडे आले तेव्हा मी घरीच असल्याचे त्यांना कळले. त्यांनी त्या सुट्टीत मला बाराखडी, शंभपर्यंत उजळणी, बे एके बेचा पाढा, माझे संपूर्ण नाव काढण्यास शिकविले.
जून महिन्यात शाळा सुरू होताच दादा मला शाळेत घेऊन गेले. गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा होती. शिक्षकांना भेटले व म्हणाले, ‘हा विठ्ठल, माझा छोटा भाऊ. याला गेल्या वर्षी काही अडचणीमुळे अण्णांनी शाळेत पाठविले नाही. पण, गुरुजी, विठ्ठलला पहिलीच्या मुलाला येते एवढे सर्व काही येते. तुम्ही त्याला दुसरीला प्रवेश द्या म्हणजे त्याचे एक वर्ष वाया जाणार नाही.’ दादांचे म्हणणे गुरुजींनी ऐकून घेतले आणि मला समोर बसविले, मला पाटी-पेन्सिल हातात दिली आणि बाराखडी, शंभपर्यंतची उजळणी, माझे संपूर्ण नाव पाटीवर लिहिण्यास सांगितले. मला ते सारे येत होतेच. साहजिकच गुरुजींच्या या परीक्षेत मी पास झालो आणि मला दुसरीत प्रवेश मिळाला, पहिली न शिकताच. तरी मी दुसरीच्या वर्गात पहिला आलो, चौथीच्या बोर्ड परीक्षेतही मी पहिला आलो. आठवी, नववी, दहावीला असताना आमची शाळा सकाळी दहा ते साडेचार वाजेपर्यंत असायची. सकाळी ९ वाजेपर्यंत व शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी अंधार पडेपर्यंत शेतात जाऊन काम करावे लागायचे, यामुळे अभ्यासाला वेळच मिळायचा नाही.
दररोज सकाळी शेताकडे जाताना व परत येताना एक धडा पूर्ण वाचून व्हायचा. गृहपाठ करण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी मात्र वेळच मिळायचा नाही. तेव्हा आमच्या गावी वीजही नव्हती आणि चिमणी किंवा कंदील लावून आपण अभ्यास करावा तर आमच्या घरी महिनाभरासाठी रॉकेल घेण्याएवढेही पसे नसायचे. मला वाटायचे अभ्यास नाही केला तर आपले काही खरे नाही. त्यावेळी माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. मी त्याच्याकडे गेलो व त्याला म्हणालो, ‘भारत, आपण दोघे एकत्र अभ्यास करत जाऊ.’ तो हो म्हणाला आणि मी ताबडतोब पळत पळत त्याच्या वडिलांकडे गेलो. गावात त्यांचे रेशनचे दुकान होते, त्याच्या वडिलांना म्हणालो, ‘नागाअण्णा, मी आणि भारत आजपासून एकत्र अभ्यास करणार. आम्हाला दररोज एक कंदीलभर रॉकेल देत जा.’ माझे हे शब्द ऐकून नागाअण्णाचे डोळे पाणावले. त्यांनी मला जवळ घेऊन कुरवाळले,‘अरे पोरहो, एक नाही दोन कंदील देतो अभ्यास करा’ आणि आमचा अभ्यास सुरू झाला.
दररोज कंदिलाचा फुगा चुलीतल्या राखेने उजळून पेपरने स्वच्छ करणे आणि दिवस मावळायला दुकानात जाऊन कंदिलात रॉकेल भरून घेऊन येणे आणि अभ्यासाला बसणे हा माझा नित्यक्रम झाला. आमची माय खूप खूप कष्ट करायची, दिवसभर शेतात राब राब राबायची. शेतातून गोवऱ्या-जळणफाटा घेऊन संध्याकाळी यायची, सगळ्यांसाठी स्वयंपाक तयार करून शेतातील माणसांना पाठवून द्यायची, आम्हा लेकरांना खाऊ घालायची. आम्ही जेवून उरेल ते ती खायची,  रात्री केव्हा तरी तिला जाग यायची, माझ्या कंदिलाचा उजेड दिसायचा. म्हणायची, ‘अरे विठ्ठल, आता झोपावं माय, खूप उशीर झालाय.’ तिला मी ‘हो – हो माय’ म्हणायचो आणि ठरलेला अभ्यास संपेपर्यंत करतच राहायचो. दहावीला आम्ही सर्वजण मिळून ११८ विद्यार्थी होतो. त्यात आमच्या गावातील (माकेगावचे) दहाजण होतो. आमच्या गावात परीक्षेचे सेंटर नव्हते. परीक्षा झाली ती लातूर जिल्ह्य़ातील चापोली येथे. दहावीचा निकाल लागला आणि आमच्या गावातील दहापकी नऊजण नापास झाले. एकचजण पास झाला तो म्हणजे मी. केवळ पासच नव्हे, तर आमच्या सेंटरमधून मी पहिला आलो होतो.
पुढे अकरावी-बारावीसाठी राजर्षी शाहू कॉलेज, लातूर येथे दादांनी मला प्रवेश घेऊन दिला. तेथेही मी मेरिटमध्ये आलो व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मेडिकलला नंबर लागला. अभ्यास करायचा, कष्ट करायचे ठरवलेच होते. वैद्यकीय उच्च शिक्षणाच्या साडेचार वर्षांमध्ये मी चौदा गोल्ड मेडल घेतले. खूप अभ्यास केला. पाठांतर वाढवलं. मेडिकलची सगळी पुस्तके माझी अगदी पाठ असायची. कुठलाही रुग्ण समोर आला तर मला लवकर निदान समजायचे. त्यावरचा उपचार तोंडपाठ असायचा. पुढे औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.एस. (जनरल सर्जरी) झालो.  मी एम.सीएच. ही सर्जरीमधली सर्वोच्च पदवी घ्यावी असे दादांना मनापासून वाटत होते; त्यांना ही पदवी कौटुंबिक अडचणीमुळे घेणे शक्य झाले नव्हते. मी ती परीक्षा दिली आणि माझी प्लास्टिक सर्जरीसाठी निवड झाली. प्लास्टिक सर्जरी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे. रुग्णालयातून करावी अशी दादांचीच इच्छा होती. मी प्रवेश घेतला आणि ती सर्वोच्च पदवी संपादन केली.
आता प्रॅक्टिस कुठे करायची हा प्रश्न होता. मला माझी वैद्यकीय कारकीर्द लातूरमध्येच घडवायची होती. दादांनीही होकार दिला, पण माझे गुरू       डॉ. बमन डावर व माझे सर्व मित्र याच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं, मी एवढी मोठी पदवी मिळवलीस. माझ्या कामाला खरा वाव मुंबईत मिळेल. लातूरसारख्या छोटय़ा शहरात त्याचा कितपत उपयोग होईल? पण मी लातूरलाच जायचं नक्की केलं. एक हजार स्क्वेअर फुटाची भाडय़ाची जागा घेतली व तेथे हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरविले. त्यामागे दोन कारणं होती. मला माय-अण्णासोबत राहायचे होते आणि दुसरे म्हणजे प्लास्टिक सर्जरी म्हणजे आतापर्यंत श्रीमंतांचीच मक्तेदारी होती. मला ती आपल्या परिसरातील गोरगरिबांपर्यंत न्यायची होती. ते माझं स्वप्न होते. पण स्वप्न वास्तवात येण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीची गरज होती ती  पैशांची. लातूरमध्ये हॉस्पिटल सुरू करायचे ठरवले खरे, पण त्यासाठी पैसे कुठून आणणार? मी लातूरमधील जवळजवळ सर्वच बँकांकडे कर्ज मागणी केली. पण त्यांनी माझ्यासमोर प्रश्नांचा डोंगर उभा केला. तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे? तुम्ही आम्हाला सिक्युरिटी म्हणून काय देऊ शकता? मी बँकेच्या मॅनेजरना सांगायचो, सर माझ्याकडे मी एम.सीएच. सर्वोच्च पदवीधारक आहे. त्यावेळी बँक मॅनेजर म्हणायचे, ‘साहेब, आम्ही आपल्या डिग्रीचा आदर करतो. पण आम्ही सिक्युरिटीशिवाय कर्ज देणं शक्य नाही.’ शेवटी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेत आलो. तिथे दादांचे एक मित्र सदस्य होते, त्या मित्राच्या भावाने त्यांची १६ एकर जमीन सिक्युरिटी म्हणून लिहून दिली आणि मला वैद्यनाथ बँकेकडून तीन लाख रुपये कर्ज मिळाले. या कर्जाच्या पशातून मी हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या अत्यंत गरजेच्या यंत्रसामग्रीची खरेदी केली. रुग्णांसाठी तीन खोल्या, माझ्यासाठी एक कन्सल्टिंग रूम, माझी पत्नी       डॉ. कल्पना लहानेसाठी एक कन्सल्टिंग रूम व एक ऑपरेशन थिएटर असे हॉस्पिटल २१ मे २००० या दिवशी लातूरमध्ये सुरू केले. दुसऱ्याच दिवशी,   २२ मे २००० रोजी तीन सर्जरी केल्या. कामाची सुरुवात जोरात झाली. आज हा आकडा दररोज दहावर येऊन पोहोचला आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत दररोज तीनपेक्षा कमी सर्जरी मी कधीच केल्या नाहीत.
हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगाच्या रुग्णांवर सर्जरी करून साजरा करण्याचे आम्ही ठरविले आणि त्या दिवशी अशा ११ रुग्णांवर सर्जरी करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हॉस्पिटलचा तिसरा, चौथा वर्धापन दिनही अशाच रुग्णांवर सर्जरी करून साजरा करण्यात आला. तेव्हा असे लक्षात आले की, अशा व्यंगाचे अनेक गरीब आणि गरजू रुग्ण या भागात आहेत आणि ते हे व्यंग घेऊनच जगत आहेत, फक्त वर्षांतून एकदा सर्जरी करून पुरेसं होणार नाही. आमच्याकडे पसे नसल्यामुळे अशा व्यंगाच्या सर्वच रुग्णांवर मोफत सर्जरी करणे आम्हालाही शक्य नव्हते. कसेबसे कर्ज काढून आम्ही हॉस्पिटल सुरू केलेले होते. तेव्हा आम्हाला अशी माहिती मिळाली की, अमेरिकेची ‘स्माईल ट्रेन’ नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेतर्फे या व्यंगावर उपचार करण्यासाठी मदत दिली जाते. त्यांना संपर्क करण्यास मी सुरुवात केली. त्यांना तसे पत्रही पाठविले आणि भारतासाठी कार्य करणाऱ्या     सतीश कालरा यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यांचे अनेक प्रश्न होते. २४ ऑक्टोबर २००४ या दिवशी आमच्या स्वतंत्र हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यासाठी माझे गुरूडॉ. डावर आले होते आणि ते ‘स्माईल ट्रेन’ या संस्थेच्या सल्लागार समितीवर काम करत होते. त्यांनी माझे हॉस्पिटल पाहिले, काम पाहिले आणि भारावून गेले. एवढय़ा छोटय़ा शहरात एवढे मोठे प्लास्टिक सर्जरीचे काम होऊ शकते हे माझ्या विचारापलीकडचे आहे, असं त्यांनी बोलून दाखविलं. डॉ. डावरसरांनी सतीश कालरा यांच्याशी चर्चा केली. २८ ऑक्टोबर २००४ या दिवशी सतीश कालरा आमच्या लहाने हॉस्पिटलला भेट द्यायला आले. आमचे काम पाहून प्रचंड खूश झालेल्या कालरा यांनी ‘स्माईल ट्रेन’ची पार्टनरशिप दिली. आणि एका दिवसापुरत्या राहिलेल्या दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावर आता वर्षभर प्लास्टिक सर्जरी सुरू झाली. ४ डिसेंबर २००४ या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमाला गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०१४ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आणि ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली ते रुग्ण होते, ५७९६. महाराष्ट्रातील हा  विक्रम आहे. आम्ही दररोज अशा प्रकारच्या दोन ते तीन सर्जरी करत असतो आणि वर्षभरात ६०० ते ६५० सर्जरी पूर्ण होतात. संपूर्ण महाराष्ट्रात १८१ प्लास्टिक सर्जन आहेत व सर्व मिळून वर्षभरात अशा व्यंगावर १४०० ते १६०० सर्जरी होतात. त्यातील ६०० ते ६५० सर्जरी आमच्या एकटय़ा लहाने हॉस्पिटलमध्ये होतात. आता लहाने हॉस्पिटल हे देशातील व परदेशातील प्लास्टिक सर्जन मंडळीसाठी या विषयावरील ट्रेिनगचे केंद्र झाले आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आणखी एका शस्त्रक्रियेसाठी आमचं रुग्णालय ओळखलं जातं ते म्हणजे जळीत रुग्ण उपचार केंद्र. हा प्रश्न अत्यंत कठीण आणि जिकिरीचा. २६ मार्च २००१ रोजी सुरू झालेल्या या केंद्राला १४ वष्रे पूर्ण होत आहेत. एवढेच नव्हे तर एक उत्कृष्ट जळीत रुग्ण केंद्र म्हणून देशभरात व जगभरात मान्यता प्राप्त आहे. याशिवाय हात पाय तुटला, बोटे तुटली, शरीराचा इतर कोणता भाग कापला गेला तर अशांना सहा तासांच्या आत उपचार होणे गरजेचे असते. त्यावर शस्त्रक्रिया होणे जरुरी असते. या भागातील रुग्णांना असे उपचार मिळण्यासाठी पुणे, मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. कितीही लवकरात लवकर रुग्ण निघाला तरीही सहा तासाच्या आत योग्य ठिकाणी पोहोचू शकत नसायचा. त्यामुळे त्याला तो अवयव कायमचा गमवावा लागत होता. पण आमच्या रुग्णालयामुळे अनेकांची सोय झाली. त्यांना योग्य वेळी उपचार मिळू लागले. अगदी माफक खर्चात.
या सर्वामध्ये ज्या कामाने मला वेगळं समाधान दिलं ते म्हणजे सौंदर्य शस्त्रक्रिया. आज आपलं वैद्यकीय ज्ञान खूपच आधुनिक झालं आहे. शरीराचा कोणताही अवयव नीटनेटका करता येतो. मी आतापर्यंत म्हणजे गेल्या १४ वर्षांत किमान १००० मुलांच्या नाकावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. नाक चांगले नाही म्हणून किंवा एखादी मुलगी दिसायला सुंदर नाही म्हणून तिचे लग्न जुळत नाही, असा अनेक पालकांचा अनुभव. शिवाय त्या मुलामुलींमध्येही न्यूनगंड निर्माण होतो तो वेगळाच. नाकाची प्लास्टिक सर्जरी किंवा सुंदर दिसण्यासाठी केली जाणारी सर्जरी अत्यंत महागडी समजली जाणारी सर्जरी आहे. पण जेव्हा असे रुग्ण, पालक माझ्या ओपीडीमध्ये येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते सांगतात, ‘लहानेसाहेब, ही आमची मुलगी, लग्नाचं वय  झालंय. स्थळं येतात, पण कोणी पसंत करत नाही. काय करावं सुचत नाही.’ त्यांच्या अशा असाहाय्य व्यथा ऐकल्यानंतर मी कमीत कमी खर्चामध्ये नाकाची प्लास्टिक सर्जरी करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेकांची लगे्न जुळली. न्यूनगंड निघून जाण्यासाठी मदत झाली.
आज मागे वळून बघताना जाणवतं, काम करत राहणं एवढंच माझं ध्येय होतं. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण मी जिद्द सोडली नाही. अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणी कधी वाटल्याच नाहीत. उलट त्या बळच देत गेल्या. आई-वडिलांच्या कष्टाने प्रेरणा मिळायची, त्यांच्या प्रेमाने शक्ती मिळायची. मोठे बंधू पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंचा-दीपस्तंभासारखा आदर्श डोळ्यासमोर होता. त्यांनी आखून दिलेल्या पथावरच चालायचे होते. वाट अवघड होती, पण रस्ता माहिती होता आणि अविरत चालत गेलो. पुढील शिक्षणासाठी दादांकडेच राहिलो. दादा-वहिनींनी मला मुलासारखे प्रेम दिले. दादांच्या लेकरांमध्ये मी खूप गुंतलेलो होतो. तेही माझ्यावर प्रचंड प्रेम करत. चार बहिणींचेही प्रेम मिळायचे. या सर्व प्रेमामुळे अभ्यास करण्यासाठी ऊर्जा मिळायची. सहजीवनात मनासारखा जोडीदार मिळाला. तिने घरातील, आई-वडिलांची व कौटुंबिक इतर सर्व गोष्टींची जबाबदारी उचलल्यामुळे मला तिकडे फारसे लक्ष घालावे लागत नाही. हॉस्पिटलच्या कामातही ती मला मदत करते. त्यामुळे मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करूशकतो. सर्व सुखदुखात आम्ही एकत्र हातात-हात घालून वाटचाल करत आल्यामुळे मार्ग सुकर झाला. भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शाह भेटले. ते एक निष्णात भूलतज्ज्ञ तर आहेतच, पण ते माझे मित्र, मार्गदर्शक व पालक झाले. वेळोवेळी आíथक व मानसिक पाठबळ देत ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिले.
शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण व वैद्यकीय शिक्षणात प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले आदर्श गुरुजन मिळत गेले. त्यांनी दिलेल्या ज्ञानावरच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी ज्ञानाबरोबरच खूप माया, प्रेमही दिले. या सर्व गुरुजनांचा मी जन्मभर ऋणी राहीन. आमचे काम म्हणजे टीमवर्क असते, त्यामुळे मी एकटाच काही करू शकत नाही. माझे सर्व सहकारी आणि कर्मचारीवृंद सर्वच खूप उत्साहाने मला कामात साथ देतात. ते सर्वच माझ्यावर प्रचंड प्रेमही करतात.
माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे माझे रुग्ण. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकलो. तीन खोल्यांच्या लहाने हॉस्पिटलपासून आज स्वतंत्र १०० खाटांचे लहाने हॉस्पिटल उभे करू शकलो. मी जेव्हा माझ्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहतो, त्याने मला काम करण्याची खरी ऊर्जा मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच्या हास्याने माझा सर्व थकवा निघून जातो. यापुढेही आमच्याकडून अशीच कामे करून घ्यावीत ही ईश्वरचरणी प्रार्थना.   
डॉ. विठ्ठल लहाने -vlahane@gmail.com

a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच