आपली घट्ट समजूत असते की मी जसं इतरांसाठी करतो, त्यांनीही आपल्यासाठी करावं. इतकंच नव्हे तर आपण हेही म्हणतो, ‘मी जर त्यांच्यासाठी एवढं केलं, तर त्यांचीही काही जबाबदारी नाही का?’ या आणि अशा अनेक प्रसंगातील वागण्याला, अशा अपेक्षांना योग्यच म्हटलं गेलं. पण यातूनच अनेकदा अपेक्षाभंगाचं दु:ख पदरी येतं.
विचारांची निर्मिती ही प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित असते. गतकाळातील अनुभव, मिळालेली माहिती आणि सूचना. याबद्दल आपण गेल्या भागात (१९ एप्रिल) सविस्तरपणे चर्चा केली. आणि आता पाहणार आहोत आपल्या मनातील काही समजुती वा विचार धारणा (Belife system) यांच्याबद्दल.
आपल्या काही समजुती योग्य असतात तर काही अयोग्य. माणूस असा प्राणी आहे ज्याने ज्या गोष्टीत अर्थ आहे, अर्थात ‘स्वार्थ’ आहे त्याच समजुती जवळ-जवळ स्वीकारल्या. पण ज्या गोष्टींतून परमार्थ साधता येईल अशा समजुती बऱ्याच अंशी नाकारल्या. या जगात धर्माविषयी, जन्म-मृत्यूविषयी, पाप-पुण्याविषयी, प्रथा-परंपरांविषयी किंवा रोजच्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळय़ा परिस्थितींविषयी, प्रसंगांविषयी आपल्या काही ठरावीक समजुती असतात. आणि आपणही या सर्व समजुती योग्य मानून त्याचबरहुकूम मार्गक्रमणा करतो.
आता थोडंसं मागे वळून पाहू या. आपलं बालपण आठवू या. कारण तेथूनच वैचारिक जडण-घडणीला सुरुवात होते. आलं ना डोळय़ासमोर आपलंच बालपण. आठवा त्या काळातील एक-एक प्रसंग. घरातील वडिलधारी मंडळी आई-बाबांना बोलायची, मुलांचे फाजील लाड करू नका. त्यांना धाकाचा बडगा जरूर दाखवा. नाही तर ती जास्त शेफारतील. एकदा कधी तरी आपल्याकडून फार मोठी चूक झाली होती. त्या चुकीबद्दल आई-बाबा खूप-खूप रागावले होते. धपाटे पण घातले होते पाठीत. पुन्हा तशीच चूक केली तर याहीपेक्षा भयानक शिक्षा होईल असा दमही भरला होता. छोटे होतो आपण सगळे. खेळण्यात मग्न असायचो. अभ्यासाची आठवणच नसायची, मग पुन्हा बाबा खूप ओरडायचे. मग अभ्यासाला बसणं व्हायचं. आई-बाबांकडून बऱ्याचदा ही वाक्यं म्हटली जायची, प्रेमाने सर्व काही बिघडते. रागावलं तर मुलं बरोबर वठणीवर येतात. सुतासारखी सरळ होतात. आपल्याला जसं पाहिजे तसं वागतात. प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगात आपण हे अनुभवत गेलो की रागावूनच काम होतं. अगदी घट्ट रुतून बसलं ते आपल्या मनात. तीच आपली विचार धारणा झाली आणि हीच भावना घेऊन आपण लहानाचे मोठे झालो. मोठे झाल्यावर देखील आपली ही समजूत तसूभरही कमी झाली नाही, का बदलली नाही. मग आपण आपल्या ऑफिसात अधिकारी म्हणून काम करताना हीच पद्धत वापरली.
माझा कर्मचारी वर्ग वेळेवर आलाच पाहिजे. त्यांनी सांगितलेले काम न चुकता केलेच पाहिजे. तेही वेळेत. ज्यांच्याकडून या वेळेचे पालन होत नाही त्यांना हा अधिकारी इशारा देतो, तोदेखील चढय़ा आवाजात. या अधिकाऱ्याची सुप्त इच्छा असते की माझा कर्मचारी वर्ग जेवढे जास्त काम करील तेवढी मला सफलता अधिक मिळेल. उत्पादन वाढल्यामुळे व त्यानुसार नफादेखील वाढल्यामुळे कंपनी माझे पद वाढवेल, माझा पगार वाढवेल व त्यामुळे मला खूप आनंद मिळेल. पण या वृत्तीमुळे तो अधिकारी कायम हाताखालच्या लोकांवर दबाव टाकत राहील, रागवत राहील. परिणामी तो स्वत:ही अशांत राहील व इतरांनाही अशांत करील. कर्मचारी वर्गाकडून काम करून घेणे हे त्या अधिकाऱ्याचे कामच आहे. मात्र त्यासाठी अवलंबिलेला मार्ग मात्र चुकीचा आहे. आपण सर्व जण आपल्या दैनंदिन आयुष्यात हाच फॉम्र्युला वापरत असतो. पण जर का अशी चुकीची समजूत घेऊन आपण चालत राहिलो तर नुकसान आपलंच होईल. खरे पाहता, क्रोध ही मनाला जाळणारी महाभयंकर आग आहे. सर्वसाधारणपणे आग ही एखाद्या वस्तूला एकदाच जाळून तिची राख करते. पण क्रोधाची आग मात्र मनुष्याला सतत जाळतच राहते. म्हणूनच म्हटले आहे,
 किस पर गुस्सा किया तो क्या किया,
 खुद ही को जलाकर खाक किया।
(अर्थात दुसऱ्यावर रागावणं म्हणजे खरं तर स्वत:लाच जाळून घेण्यासारखं आहे.)
काही जणांची अशीदेखील समजूत असते की, जीवन हा एक खेळ आहे. कुणी तरी जिंकणार, कुणी तरी हरणार. मग मीच का नाही जिंकायचं? मग अशा या खेळात जेव्हा समोरची व्यक्ती जिंकतेय आणि मी हरतोय हे लक्षात येतं, तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापेक्षा पुढे जाण्यासाठी काहीही करायला तयार होते-होतो. ती ऑफिसातील गोष्ट असो वा राजकारणातील.
नम्रता हा आत्म्याचा स्वधर्म आहे तर अहंकार हा परधर्म आहे. (परधर्मो भयावह-गीता) परधर्म हा भयानक असल्यामुळेच माणसाने स्वधर्माचे पालन केले पाहिजे. जेथे अहंपणाचा भाव तेथेच सगळय़ा आपत्ती व विविध समस्या उत्पन्न होतात. सार्थ काय नि व्यर्थ काय याचे यथार्थ ज्ञान हेच माणसाला खऱ्या अर्थाने समर्थ बनवत असते. मी माझ्या जावेवर खूप प्रेम करते. तिला फुले खूप आवडतात म्हणून नेहमी तिच्यासाठी मोगऱ्याची फुले आणते. जेव्हा ती आजारी पडते तेव्हा मी तिची संपूर्ण देखभाल करते. पण जेव्हा मी स्वत: आजारी पडले तेव्हा मला तिने साधं विचारलंदेखील नाही की तुझी तब्येत कशी आहे. आता तिच्या मनात काय आकारू लागतं? आता तिला माझी गरज पडू देतच, मीदेखील नाही जाणार तिच्या मदतीला.
आणखी एक प्रसंग बघू या. एखाद्याला खूप सवय असते लोकांना आपल्या घरी जेवायला बोलावण्याची. शिवाय भेटवस्तूही देण्याची. एवढं काही करतील समोरच्यांसाठी काही विचारूच नका. पण समजा, जेव्हा ही व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या घरी गेली आणि तिला फारसं आदरातिथ्य जाणवलं नाही किंवा फक्त विचारलं गेलं, ‘तुम्ही चहा घेणार की कॉफी?’ की ती आदरातिथ्याची सवय असलेली व्यक्ती खंतावते. ती आपल्या कामाची तुलना करते. मी एवढं मेहनतीने यांच्यासाठी जेवण बनवलं, एवढं आदरातिथ्य केलं आणि ही मला विचारते, ‘तुम्ही चहा घेणार का म्हणून?’ आपली घट्ट समजूत असते की मी जसं इतरांसाठी करतो. त्यांनीही आपल्यासाठी करावं. इतकंच नव्हे तर आपण हेही म्हणतो, ‘मी जर त्यांच्यासाठी एवढं केलं, तर त्यांचीही काही जबाबदारी नाही का?’ या आणि अशा अनेक प्रसंगातील वागण्याला, केल्या जाणाऱ्या अपेक्षांना योग्यच म्हटलं गेलं. पण यातूनच अनेकदा अपेक्षाभंगाचं दुखं पदरी येतं.
   आता यावर थोडा खोलवर विचार करा. प्रत्येकाचं व्यक्तित्व वेगळं, प्रत्येकाचा विचार वेगळा. जेवढं मी इतरांसाठी करते तेवढी क्षमता इतरांमध्ये नाही. माझ्यासाठी काही करण्याची त्यांची आर्थिक नाही आणि मानसिक ताकदही नाही. आणि आपण हे न स्वीकारल्यामुळे आपल्याला दु:खाची जाणीव होते. खरं तर आपण असं कर्म करावं, जे करताना आपल्याला स्वत:ला आनंद मिळतो. आपण आपला सन्मार्गाचा रस्ता, चांगुलपणाची वृत्ती इतरांसाठी सोडावी का?
पुरातनकालीन एक गोष्ट येथे आठवते. वाल्या कोळी लुटमार करून पोट भरायचा. जेव्हा त्याला नारदमुनी भेटले तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, तू कमवीत असलेला पैसा पापाच्या मार्गाने आलेला आहे. तुझ्या पत्नीचा व तुझ्या मुलांचा या पापात सहभाग आहे का, हे विचारून ये. एक श्रेष्ठ विचार नारदमुनींकडून निघाला व त्या विचाराने वाल्या कोळय़ाचे मन परिवर्तन झाले. त्याची जी समजूत होती की माझ्या पापात माझी बायको मुलेही सहभागी आहेत, ती या श्रेष्ठ विचारामुळे गळून पडली. वाल्या कोळीचा प्रभाव नारदांवर पडला नाही तर नारदांचा प्रभाव वाल्या कोळीवर पडला.
दुर्भावना मनातील वाल्यास जन्म देई।
सत्संग लाभता तो ऋषी वाल्मिकीच होई।
असा चांगल्या समजुतींचा सत्संग जर का आपण अंगीकारला, तर थोडंसं आपल्या समजुतींना, धारणांना जर का बदललं गेलं, तर केलेल्या प्रत्येक कर्मातून फक्त सुखाचीच अनुभूती होईल.      
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)