01 April 2020

News Flash

अनोखे दुकान

ज्याला जसा वेळ मिळेल तशी काही मुलं त्या अनोख्या दुकानात जात होती. मोठं कुणी नव्हतं. हिशोब करणारं कुणी नव्हतं, हळूच एखादं चॉकलेट उचलण्याचा मोह होणं

| July 5, 2014 01:04 am

ज्याला जसा वेळ मिळेल तशी काही मुलं त्या अनोख्या दुकानात जात होती. मोठं कुणी नव्हतं. हिशोब करणारं कुणी नव्हतं, हळूच एखादं चॉकलेट उचलण्याचा मोह होणं शक्य होतं. डब्यात सुटे पैसे होते. जे नेहमी घडतं त्यातलं काहीच घडलं नाही, चोरी-लबाडी-फसवाफसवी-लांबवणं.. काहीच नाही. ‘आपण असे नाहीत. आपण खूप चांगले आहोत’ हा विश्वास मुलांच्या मनात शिक्षकांनी निर्माण केला होता.
बरेच दिवस शहरातल्या शाळेच्या मनात होतं खेडय़ातल्या शाळेला भेटावं. उठून तर जाता येत नव्हतं. पण एकमेकींना त्या वेबसाइटवर बघू शकत होत्या. शहरातल्या शाळेची वेबसाइट होती www.urbanschool.com आणि खेडय़ातल्या शाळेची वेबसाइट होती www.ruralschool.com. तसा दोघींचा ई-मेल आयडीही होताच : urbanschool @gmail. com,  ruralschool@gmail.com दोघी बरेच वेळा मेलवर गप्पा मारत असत. या गप्पा त्यांच्या त्यांच्यापुरत्याच मर्यादित होत्या. दोघींना हे माहीत होतं की खूप फरक आहे दोघींच्यात! वातावरण, सोयीसुविधा, पालकांच्या जाणिवा, दर्जा, स्तर, आर्थिक स्थिती.. आणि कितीतरी! वेगवेगळे शब्द दोघींच्याही कानावर पडत होते. तेही दोघींनी आपल्या मनात साठवून ठेवले होते. कारण दोघींनाही कळत होतं की किती त्याच त्याच तक्रारी, गाऱ्हाणी, कुरबुर. म्हणूनच दोघींनी याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं आणि दोघींच्या मनात एकच वाक्य होतं ‘मुलं ती मुलंच.’आणि एकदा का ‘मुलं’ हा मुद्दा पुढं आला की इतर अनेक गोष्टी अगदी बाजूला करून टाकल्या पाहिजेत, असं शाळांना वाटत होतं. कारण मुलं म्हणजे काय, कशी असतात, काय हवं असतं त्यांना हे सारं शाळांनी समजून घेतलं होतं. शाळेला प्रश्न होता माणसं का नाही हे सारं समजून घेत? ‘आम्हा मुलांना वाटतं की..’ असं अभिव्यक्ती फलकावर जेव्हा शब्द उमटले तेव्हा जी उत्तरं आली ती शहरातल्या मुलांची नि खेडय़ातल्या मुलांची खूपशी सारखी होती. वस्तूंच्या मागण्या थोडय़ाफार वेगळ्या होत्या.
मुलं प्रामाणिक असतात. मुलांना खरं बोलायचं असतं. मुलांच्या मनावर अनेक गोष्टींचा पटकन परिणाम होतो. मुलं हळवी असतात आणि  तरी त्यांच्या कानावर शब्द पडतात ‘खोटं बोलतोस? फसवतोस? लांडीलबाडी करतोस?..’ किती पराकोटीची गुणवैशिष्टय़े मुलांमध्ये असतात हे शाळेलाच फक्त माहीत होतं. म्हणूनच मुलांमध्ये मूलत: किती प्रामाणिकपणा असतो हे सगळ्यांना समजूदेच एकदा असं शाळेला वाटलं. त्यासाठी तिनं एक गमतीशीर प्रयोग केला. त्या प्रयोगाची संकल्पना तिनं अनेक ठिकाणी वापरली.
तिला बघायला मुंबईतून एका संस्थेची काही मंडळी आली होती. कारण ती शाळा वेगळी होतीच मुळी. मुंबईची मंडळी म्हणाली, ‘‘ही शाळा वेगळी आहे. वाटतं, आपण स्वप्नात आहोत.’’ शाळेला हसू आलं होतं. त्या संस्थेत लहानांपासून मोठय़ा वयाच्या माणसांपर्यंत सभासद होते. ‘प्रामाणिक स्टोअर्स’ ही त्यांचीच कल्पना त्यांनी मांडली. या शाळेनेही ही कल्पना प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. मुलांना लागणाऱ्या अनेक वस्तू शिक्षकांनी खरेदी केल्या. त्या वस्तूंवर त्यांच्या किमती
लिहिल्या. मुलांनी तिथे जायचं. आपल्याला हवी ती वस्तू
घ्यायची नि वस्तूवर जी किंमत लिहिलीय तेवढे पैसे डब्यात टाकायचे. सुटे पैसे नसले तर आपणच आपल्या हातांनी
घ्यायचे. खरं तर परीक्षा होती ही! वेगळी परीक्षा. प्रश्नाचा
संबंध थेट मनाशी होता. शिक्षकांनाही खात्री नव्हती. पण या अनोख्या दुकानाची त्यांनी कल्पना मांडली. ज्या संस्थेकडून त्यांना ही कल्पना सुचली. त्या संस्थेचं नावही सांगितलं. शाळेला खात्री होती. प्रत्येक मुलामध्ये हा प्रामाणिकपणा असतो. तो व्यक्त करायची संधी मिळणं गरजेचं. कारण प्रत्येक ठिकाणी कुणीतरी रखवालदार असतो, ‘असं कधी असतं का?’ अशी शंकाही अनेकांनी घेतली. ‘बाहेरच्या जगात कशी टिकाव धरणार ही मुलं?’ असंही कुणाला वाटलं. तर ‘असं प्रामाणिक राहून चालतं का?’ असाही कुणाला प्रश्न पडला.
आज मुलंच काही सिद्ध करून दाखवणार होती. ज्याला जसा वेळ मिळेल तशी काही मुलं या अनोख्या दुकानात जात होती. मोठं कुणी नव्हतं. हिशोब करणारं कुणी नव्हतं, हळूच एखादं चॉकलेट उचलण्याचा मोह होणं शक्य होतं. डब्यात सुटे पैसे होते. पण जे नेहमीच्या जगात घडतं त्यातलं काहीच घडलं नाही, चोरी-लबाडी-फसवाफसवी-लांबवणं.. काहीच नाही. ‘आपण असे नाहीत. आपण खूप चांगले आहोत’ हा विश्वास मुलांच्या मनात शिक्षकांनी निर्माण केला होता. मुलांनाही नवनवीन आव्हानं स्वीकारण्याची सवय लागली होती.
संध्याकाळ झाली. दप्तरं घेऊन मुलं आपापल्या घराचा रस्ता चालू लागली. एकदम वेगळा अनुभव होता हा! काहीतरी गडबड होणारच असंही वाटत होतं! यातलं काही घडलं नाही, शिक्षकांनी हिशोब केला, तो अगदी तंतोतंत जुळला. एका पैशाचाही घोळ झाला नाही. मुलांमधल्या या गुणांना व्यक्त होण्याची संधी तर उपलब्ध करून द्यायला हवी. यानंतर मुलांच्या प्रामाणिकपणाला व्यक्त करायची संधी शाळेनं शोधली.
या उपक्रमाबद्दल शिक्षक मुलांशी बोलले, ‘‘एक जण फसवतो. मग आम्हाला पण वाटतं फसवावं.’’ ‘एकानं चोरी केली की मग..’ ‘आज छान वाटतंय.’ ‘टेन्शनच नाही. चोरलं की टेन्शन येतं. खाल्लेलं गोड नाही लागत. एकदम भारी वाटलं.’ मुलांना या अनोख्या दुकानाचा आलेला अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ‘असं घडू शकतं’ यावरचा विश्वास बळावला होता. बाहेरच्या फसव्या जगाला या अनुभवानं छेद दिला.
शिक्षकांनी परीक्षाही अशीच घेतली. कुणीच नजर ठेवणारं नव्हतं. कारण मुलं एकमेकाचं बघून लिहिणारच नाहीत, हा विश्वास शाळेनं मुलांना दिला होता. तेव्हाही असंच झालं होतं. काही शिक्षक म्हणाले, ‘‘अहो, एवढं कडक लक्ष ठेवलं तरी जरा पाठ वळली की मुलांची चुळबुळ सुरू होते. मग निरीक्षकच नाही म्हटल्यावर काय रानच मोकळं.’’
‘‘हो ना! सर्वच मुलांना पैकीच्या पैकी मार्क्‍स पडतील.’’
‘‘मग पेपर तरी तपासायचे कशाला? फक्त ‘सीन’ म्हणून सही करू या..’’
हे सर्व शाळा ऐकतच होती. खरंच असं घडेल? मुलं प्रामाणिकपणे वागतील? तिच्याही मनात थोडी भीती होतीच. जेव्हा शिक्षकांनी ही गोष्ट मुलांना सांगितली तेव्हा मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. परीक्षा म्हणजे एकेकटं बसणं, कुणाचा तरी डोळ्यात तेल घालून पाहारा देणं, धमकावण्या.. यातलं काहीच होणार नाही. आपण आपल्या मनाने मनातलं लिहायचं. मग मुलांनी ठरवलं जर आपण दुकान प्रामाणिकपणे चालवू शकतो, मग याच प्रामाणिकपणाला आपण अनेक ठिकाणी वापरायला संधी देऊ. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे परीक्षा. आणि झालं. तसं घडलं. मुलांनी ठरवलं नि समजून घेतलं तर काहीही घडू शकतं हेच खरं.
मुलं मनापासून लिहीत होती आणि वर्गात रखवालदारी करायला कुणीच नव्हतं. ‘मागे बघू नका’, ‘बोलू नका’
‘कुणी कागद-चिठ्ठीचपाटी आणलीय का’ यातले कोणतेच
शब्द नव्हते नि मुलांच्या मनावरही ताण नव्हता कोणताच.
या विश्वासातून ‘चोरी’ संपली. मुलांच्या वस्तू जिथं असतील तिथे तशाच राहू लागल्या. मुलांमधल्या प्रामाणिकपणावर दाखवलेला हा विश्वास मुलांना बळ देऊन गेला. इतरांच्या
दृष्टीने ही कल्पना हास्यास्पद होती, भोळीभाबडी होती,
बाहेरच्या जगात वावरायला कुचकामी ठरवणारी होती. पण या शाळेच्या दृष्टीनं मला माझ्या गोष्टी घेण्याचा अधिकार आहे, इतरांच्या वस्तूवर माझा हक्क नाही’ ही जाणीव करून
दिली होती.
‘असं घडतं?’ या प्रश्नाचं उत्तर शाळेकडे एकच होतं ‘असंच घडतं नि ठरवलं तर काहीही घडवता येतं’ असं होतं. म्हणूनच शाळेनं आपल्या इतर मैत्रिणींना ‘मेल’ केला.
‘‘बघा ना! मुलांमधल्या गुणांना व्यक्त करायची संधी कशी देता येईल बरं!’’ खरं तर मुलंच मुलांना सावरतात, सांभाळतात, मदत करतात, डोळे पुसतात, मनमुराद हसतात. तिथं फक्त मुलं ही मुलं असतात. आपण मोठी माणसं तर त्यांच्या मनात भेदाच्या भिंती उभ्या करत नाहीत ना!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 1:04 am

Web Title: novel shop
टॅग Chaturang
Next Stories
1 ध्येयवेडा जलमागोवा
2 आशेचा किरण देणारा ‘नैराश्य कृष्णमेघी’
3 हस्त उत्थानासन
Just Now!
X