ते तृतीयपंथी, पण समाज त्यांना हिजडा म्हणूनच ओळखतो, वागवतो. मग त्यांच्या समोर पर्याय असतो तो विशिष्ट टाळ्या वाजवत भीक मागण्याचा किंवा मग वेश्याव्यवसाय स्वीकारण्याचा. पण आता काळाबरोबर त्यांचीही मानसिकता बदलते आहे. आपल्यालाही आत्मसन्मानाने जगता येतं हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यासाठी ते पदवीपर्यंतचं, कायद्याचं, एमबीएपर्यंतचं शिक्षण घेताहेत, व्यवसायात उतरताहेत, बँकेत नोकरीही करताहेत. अशाच या काही सत्य कहाण्या. समाजाची क्रूरता सहन केल्यानंतरही त्यांनी आपल्यातील संवेदनशीलता कायम ठेवली. मेलेल्या मनाला आणि शरीराला जगवत ते आजही टाळी देत आहेत, पण एकमेकांच्या हातावर.. यशस्वितेची!
‘मला तुझी लाज वाटते, तू हिजडा आहेस. कुठेतरी जाऊन जीव दे.’’ जन्मदात्या आईचे ते विखारी शब्द. आईच्या त्या शब्दांनी तो सरभेर झाला खरा, परंतु तेच शब्द त्याच्या मानसिक आंदोलनांना पूर्णविराम देऊन गेले. वयात येत असताना मी नेमका कोण आहे, अशी स्वत:चाच शोध घ्यायला लावणारी, नको त्या विचारांनी भीतीचा सरसरता काटा, अनेकदा अंगावर सहन करायला लावणारी त्याच्या मनाची आंदोलनं त्याला अस्वस्थ करत होती. १५-१६ र्वष या विचारांच्या आणि प्रश्नांच्या मागे अस्वस्थपणे धावताना, त्याच्या या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आईनेच दिलं होतं. एक शोध संपला होता, मात्र खरी परीक्षा नंतरच्या काळात होती. कारण शरीर पुरुषाचं आणि मन स्त्रीचं घेऊन जन्माला आलेल्या आशीषला समाजाचाही अनुभव यायचा होता. तो आला.. आईच्या बोलण्याइतक्याच वाईट आणि तितक्याच क्रूरपणे.. त्याच्यावर झाले अनन्वित लैंगिक अत्याचार. एक-दोन नव्हे तब्बल पंचवीस जणांकडून.. आशीष सांगत होता.. बोलता बोलता त्याचा बांध फुटला. त्याच्या अश्रूंना थोपवणारे शब्द माझ्याकडे नव्हते.. तो जणू त्या क्षणी आपला भूतकाळ जगत होता.
त्याचं नाव आशीष शिगवण, त्याचा मित्र परिवार प्रेमाने त्याला तमन्ना म्हणतो. आज वय २७ र्वष. आईने अव्हेरलेल्या आशीषला वडील आणि बहिणीच्या पाठिंब्यामुळे मात्र शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा मिळाली. गेली ९ र्वष आशीष पुरुषांचे अधिकार, तृतीयपंथी, लहान मुलं यांच्या मानवी हक्कांसाठी काम करणारी ‘प्रयास एक कोशीश’ ही संस्था चालवतोय. त्याच्या या स्वयंसेवी संस्थेमुळे काही तरुण-तरुणींना रोजगार तर मिळालाच, शिवाय जे तृतीयपंथी वेश्याव्यवसाय करतात, भीक मागतात अशांचे आपले आयुष्यातले ते कटू मार्ग बदलले आहेत. मात्र हे पुरेसं नाही याची जाणीव असल्यानं आशीषनं नुकतंच कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलंय. पण आता आशीषने आपला वाईट अनुभव जाणीवपूर्वक मागे टाकलाय. आपल्यासारखा अनुभव इतर तृतीयपंथीयांना मिळू नये म्हणून तो प्रयत्नशील आहे. आजघडीला मुंबईतल्या सुमारे दोनशे तृतीयपंथीयांचं नेतृत्व तो करतोय. आशीषचे काम फक्त मुंबईपुरतेच मर्यादित नाही तर त्याने जागतिक पातळीवरही झेप घेतली आहे. माझा या समाजावर राग नाही, पण किमान आम्हाला माणुसकीची वागणूक द्या आणि माणुसकी म्हणजे सहानभूती नव्हे तर खरोखर माणूसपण, ही त्याची कळकळीची विनंती आहे.
आशीषची भेट झाल्यानंतर मला तृतीयपंथीयांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घ्यावा असं तीव्रतेने वाटलं, परंतु याचं बीज पेरलं गेलं ते त्याही पूर्वी. दोन वर्षांपूर्वी. तेव्हा एक पुस्तक वाचनात आलं, ‘आय अ‍ॅम विद्या.’ एका पुरुषाचा स्त्री होण्यापर्यंतचा हा प्रवास होता. या पुस्तकानं प्रचंड अस्वस्थ केलं. जाणीव झाली, आपण किती सहजपणे एखाद्याला त्याच्या न्यूनत्वावरून दुखावतो. पुस्तक वाचल्यानंतर आलेली अस्वस्थता जायचं नावच घेईना. सतत वाटू लागलं या विषयासंदर्भात अधिक जाणून घ्यायला हवं. याच जाणिवेतून या विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. या दरम्यान एक लक्षात येत गेलं, पुस्तकं वाचून आपण शांत होण्याऐवजी अधिकच अस्वस्थ होतोय. मग साहजिकच त्यावेळेस करत असणाऱ्या पत्रकारितेच्या लघुशोधनिबंधासाठी विषय ठरवला, ‘तृतीयपंथीयांविषयी माध्यमांची भूमिका आणि माध्यमांनी मांडलेला दृष्टिकोन’. त्यातून समोर आलं ते तृतीयपंथीयांचं हे भलंमोठं विश्व जे आपल्या सामान्यांच्या आयुष्यापासून खूप लांब, भयावह क्रूर असलेलं.
या विषयाचा अभ्यास करत असताना अनेक तृतीयपंथीयांना भेटण्याचा योग आला. त्यांची आयुष्यं जवळून बघता आली. त्यांच्या भावना जाणून घेता आल्या. निसर्गाने त्यांना घडविताना त्यांच्यावर अन्याय केलाच, परंतु समाजाच्या विकृतीची, क्रूरतेची किंमत पावलोपावली चुकविल्यानंतरही त्यातलं कुणीच त्यांचं होऊ शकलं नाही. हे दु:ख त्यातल्या प्रत्येकाचं आहे. जेव्हा जन्म देणाऱ्या नात्यांनीही पाठ फिरवली, तेव्हा त्यांना स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करावं लागलं. आज हिजडा हा शब्द त्यांना शिवीसारखा वाटतो तो समाजानेच त्यांना बहाल केलाय.
आजघडीला भारतात सुमारे ५ ते ६ लाख तृतीयपंथी असल्याचे सांगितले जाते. पण तरीही ते अल्पसंख्याकच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागून त्यांना उदरनिर्वाह करावा लागतोय. शिक्षण असूनदेखील अनेकजण नोकरी मिळत नसल्याने उदरनिर्वाहासाठी  वेश्या व्यवसायाच्या गत्रेत ओढले गेलेत. परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काही तृतीयपंथीयांनी समाजात आपलं स्थान, आपली ओळख निर्माण केलीय आणि आपल्या इतर साथीदारांच्या उन्नतीसाठीही ते प्रयत्न करतायत. हा समाजही बदलतो आहे. त्यातले अनेकजण आपल्या शारीरिक व्यंगा(?)पलीकडे जाऊन स्वत:चं अस्तित्व निर्माण करताहेत.
त्यातलीच एक अनघा ऊर्फ जॉर्ज (नाव बदललं आहे) पुण्यात सध्या ती स्वत:ची एक्स्पोर्ट-इम्पोर्टची फर्म चालवते आहे. लंडनला जाऊन एमबीए पूर्ण केलेल्या अनघाने प्रचंड संघर्ष करत इथपर्यंत मजल मारली आहे. नववीत असताना म्हणजे पौगंडावस्थेच्या काळात अनघाला जाणवलं की, आपण ‘वेगळे’ आहोत. याची जाणीव घरच्यांना करून देताच घरच्यांनी हे नसतं खूळ डोक्यातून काढण्यासाठी तिची रवानगी केली दिल्लीला तिच्या काकाकडे.  घरच्यांना वाटलं प्रश्न सुटला, पण त्या अविवाहित सख्ख्या काकानेच तिचा छळ करायला सुरुवात केली. रोज होणाऱ्या बलात्काराला कंटाळून तिनं काकाचं घर सोडलं. या दरम्यान तिची ओळख एक मुलाशी झाली होती. त्यानं तिला स्वत:च्या घरी आसारा दिला. घर तर मिळालं पण पोटाचा प्रश्न होताच. त्यासाठी तिनं या मित्राच्या मदतीनं मसाज पार्लरची नोकरी स्वीकारली. इथेही काही बरी परिस्थिती नव्हती. मसाज पार्लरचा मालक मसाज करणाऱ्या मुलांना गिऱ्हाईकांसमोर ओळीने उभं करायचा. गिऱ्हाईक त्यातून स्वत:ला आवडणाऱ्या ‘मुला’ची निवड करायचे. गिऱ्हाईकाने निवड केली तर पसे मिळणार अन्यथा काहीच नाही. मनाविरुद्ध हे काम करत असतानाच तिला एका कंपनीत नोकरी लागली. त्या कंपनीच्या अधिकार पदावर असलेल्या बॉसचा प्रभाव अनघावर पडला. एक स्त्री इतकी मोठी कंपनी लिलया हाताळू शकते, तर आपण का नाही? या जाणिवेतून तिने एमबीए करण्याचा निर्णय घेतला. जमवलेल्या पैशातून तिने लंडनला जाऊन एमबीए पूर्ण केलं. आणि फर्म उभारली.  अनेक तृतीयपंथीयांना तिच्यामुळे रोजगार मिळू लागलाय. उत्तम नृत्यांगना असण्यासोबत ती खूप सुंदर गिटारही वाजवते. आजही समाजाच्या घृणास्पद नजरा आणि कुत्सित शब्द टाळण्यासाठी तिने खरं नाव द्यायला नकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार समाजाचा स्वीकार हा या समाजाला पुढे नेऊ शकतो.
तृतीयपंथीयांमध्ये दोन गट आहेत एक गुरुपरंपरा (तृतीयपंथीयांमध्ये गुरुपरंपरेला एक विशिष्ट स्थान आणि अर्थ आहे)मान्य करणारे आणि दुसरे अमान्य करणारे. आशीष गुरुपरंपरेत नाही. त्यातून बाहेर पडणं म्हणजे एका अर्थाने बंडखोरीच म्हणावी लागेल. त्याला ही परंपरा मान्य नाही. कारण त्याच्या मते ही तृतीयपंथीयांना मदत करण्याऐवजी त्यांना परंपरेतच जखडून ठेवते, बऱ्याचदा गुरू-चेला परंपरेत नसल्याचा त्रास त्याला सहन करावा लागतोच. परंतु आता त्याला त्याचं फारसं भय वाटत नाही. भीक, देहविक्री यासारख्या गोष्टींचा आधार न घेता स्वत:सोबतच इतर तृतीयपंथीयांचं आयुष्य सावरणारा आशीष इतर तृतीयपंथीयांसाठीही प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याने स्वत:च्या संस्थेमार्फत मार्गी लावलेल्यांमध्ये आहेत सपना, नीलिमा ऊर्फ नीलेश, दुर्गा. चाळीस वर्षांची सपना १४-१५ वर्षांपूर्वी बिहारमधून दिल्लीला पळून आली, तिथे ती गुरू करून राहू लागली. कचरा वेचण्याचं काम करून सपना स्वत:चं पोट भरायची, पण तिला हे कचरा वेचण्याचं काम मान्य नव्हतं. म्हणून मग ती दिल्लीहून मुंबईला निघून आली. इथे आल्यावर तिची गाठ ‘प्रयास एक कोशीश’ मधील इतर तृतीयपंथीयांशी पडली. त्यांच्या मदतीने तिने अंधेरीला भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायाच्या मिळकतीतून तिने अंधेरीला स्वत:चं घर घेतलं. आज ती स्वत:च्या घरात रहाते. आणि स्वत:च्या जीवावर व्यवसाय करत इतरांना रोजगारही पुरवतेय.
सायनला राहणारी बेचाळीस वर्षीय दुर्गाही  राजस्थानहून पळून मुंबईला आली. मुंबईची कसलीच माहिती नाही, पण भीक न मागता किंवा देहविक्री न करता जगायचं म्हणून तिने एका मेरवाड आईस्क्रीमच्या गाडीवर काम करायला सुरुवात केली. परंतु हे काम करताना गुंड तिला खूप त्रास द्यायचे, त्यामुळे तिला हे काम बंद करावं लागलं. तिच्या स्त्री वेषामुळे आणि पुरुषी दिसण्यामुळे तिला कुठे कामं मिळेनात. तेव्हा स्त्री वेष बदलून, केस कापून दुर्गा पुरुषी रूपात काही घरांमध्ये जेवण बनवण्याचं काम करू लागली. हीच दुर्गा आता ‘पुकार’ या संस्थेमार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक संशोधन कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन स्वत:च्या समाजाविषयी महत्त्वाच्या विषयावर संशोधक म्हणून काम बघते. ‘प्रयास एक कोशीश’मध्ये चालणाऱ्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला प्रवेश घेऊन तिने इंग्रजीवरही उत्तम प्रभुत्व मिळवलंय.
आणखी एक उदाहरण नीलेशचं. घरातले मनाविरुद्द लग्न लावून देणार म्हणून राजस्थानहून पळून आलेला हा नीलेश पंचविशीतला देखणा तरुण, परंतु निसर्गाची किमया अशी की शरीर पुरुषाचं पण मन मात्र स्त्रीचं. सुखी कुटुंबातला नीलेश ऊर्फ नीलिमा सध्या बििल्डग मेंटेनन्सचं अवघड असं पुरुषी काम सांभाळतोय. वयाच्या सोळाव्या वर्षी नीलेश मोठय़ा भावासोबत सुतारकाम करण्यासाठी मुंबईला आला. तो, त्याचा भाऊ व भावाचे मित्र एकत्र राहू लागले. त्याच्याविषयी लक्षात आल्यावर त्याच्या भावाच्या मित्रांनी त्याचे लंगिक शोषण करायला सुरुवात केली. त्याने विरोध केल्यावर त्यांनी त्याच्या भावाला त्याच्याविषयी सांगितलं. आपला भाऊ तृतीयपंथी आहे हे समजल्यावर भावाने त्याला बेदम मारलं. घरच्यांनीही त्याला ‘लग्न कर नाहीतर घर सोड’ अशी धमकी दिली. एका मुलीच्या आयुष्याचं नुकसान नको म्हणून व आयुष्यभर स्वत:ची मुस्कटदाबी नको म्हणून नीलेशने घर सोडण्याचा पर्याय स्वीकारला. पण अशा माणसाला आयुष्य जगणं केव्हाही कठीण असणारच होतं. त्याच्या समोरचे नेहमी स्वीकारले जाणारे दोन पर्याय होते, भीक मागणे किंवा वेश्याव्यवसाय करणं. पण त्याला ते दोन्ही मान्य नव्हते. पण मुंबई एक असे शहर आहे जे काही करू इच्छिणाऱ्याला पर्याय देतेच. नीलेश लोकांच्या घरी जाऊन घरकाम करू लागला. त्यानं हळूहळू जेवण बनवणं शिकून घेतलं व विविध ठिकाणी महाराजा म्हणून काम करू लागला. परंतु ही सगळी कामं करत असताना त्याला स्वत:ची ओळख मात्र लपवून ठेवावी लागते. अन्यथा काही सहकारी शारीरिक, मानसिक  त्रास देतात. पण आता त्याला बििल्डग मेंटेनन्सचे काम मिळाले आहे. परंतु त्याची शारीरिक ठेवण थोडी नाजूक असल्यामुळे त्याला हे काम अवघड जाते. पण यात कष्टाची कमाई आणि मान असल्याने तो हे काम खूप आनंदाने करतोय. त्याला इतक्यावरच थांबायचे नाही म्हणून सध्या तो इंग्लिश भाषेचे रीतसर प्रशिक्षण घेतोय.
आशीष, सपना, नीलेश, दुर्गा या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे हे चौघेही गुरू परंपरेत नाहीत. गुरू चेला ही पारंपरिक चौकट मोडून ते जगू पाहतायत. गुरू नाही म्हणून इतर तृतीयपंथीच त्यांना त्रास देतात पण बदल करायचा तर तो स्वत सोबत व्यवस्थेतही करायचा हे त्यांचं तत्त्व आहे. त्यासाठी आधी स्वत:ला अनेकदा आगीतून तावून सलाखून बाहेर पडावं लागतं. तसं तावून सुलाखून आयुष्य गेलं ते विद्याचं. ज्या पुस्तकामुळे मला या विषयात रस निर्माण  झाला, त्या पुस्तकाची नायिका सर्वानन ऊर्फ लििवग स्माईल विद्या हिची कथा या समाजासाठीसुद्धा आदर्श ठरेल अशी आहे. विद्याने एक पुरुष ते स्त्री होण्याचा काळ या दरम्यान अनेक शारीरिक, मानसिक यातना भोगल्या. अमानुषपणे मारही खाल्ला. पण स्वत:च्या तत्त्वांशी तिने कधीही तडजोड केली नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध नाटय़कर्मी प्रा. मु. रामास्वामी यांची ती विद्यार्थिनी. भाषाशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या विद्याला समकालीन नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रात खूप रस आहे. २००६ पासून विद्या एका खाजगी बँकेत नोकरी करत असून सोबतच विविध नाटकांमध्ये कामही करत आहे. चेन्नईच्या स्टेला मारिस महाविद्यालयाच्या बी.ए.च्या इंग्रजी अभ्यासक्रमात विद्याच्या ‘आय एम विद्या’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अष्टपलू म्हणावे असं विद्याचं व्यक्तिमत्त्व आहे. कवयित्री, अभिनेत्री, स्केच आर्टस्टि, दिग्दíशका, कार्यकर्ती, लेखिका अशा विविध भूमिका ती लिलया पेलतेय आणि वैशिष्टय़ म्हणजे सगळ्या आघाडय़ांवर काम करत असताना ती अनेक पुरस्कारांची मानकरीही ठरली आहे. तामिळनाडूतल्या त्रिची या छोटय़ाशा गावात जन्मलेली ३१ वर्षीय विद्या आज तृतीयपंथींमधील यशस्वी व्यक्तिमत्त्व आहे. मदुराई आणि पुण्यात कित्येक र्वष संघर्षांत काढल्यानंतर सध्या ती चेन्नईत स्वयंसेवी संस्थेतही कार्यरत आहे.              
याव्यतिरिक्त लक्ष्मी त्रिपाठी, (वैशाली रोडे शब्दांकित ‘मी हिजडा, मी लक्ष्मी’ या आत्मचरित्राच्या तीन आवृत्याही निघाल्यात), भोपाळमध्ये निवडणूक लढवून आमदारपद मिळवणारी शबनम मौसी हीसुद्धा यशस्वी उदाहरणे आहेत.
माझ्या या अभ्यासाच्या दरम्यान ‘उडान’ या तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी माझा परिचय झाला. पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या ‘उडान’च्या कार्यालयात बऱ्याचदा येणं-जाणं सुरू झालं तेव्हा एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की या स्वयंसेवी संस्थेत येणारे बरेचसे तृतीयपंथी हे शैक्षणिक, वैचारिकदृष्टय़ा पुढारलेले आहेत. त्यांची राहणी नीटनेटकी आहे. मराठी, िहदी, इंग्रजी अशा भाषांवर त्यांचं फर्ड प्रभुत्व आहे. ‘उडान’मध्ये मला भेटलेली सुरेखा भावे म्हणजे एक देखणं व्यक्तिमत्त्व. सुखवस्तू कुटुंबातल्या सुरेखालाही स्वत:ची ‘ओळख’ पटल्यानंतरचे दिवस हलाखीत काढावे लागले. प्रसंगी स्वत:चं घरही सोडावं लागलं. परंतु तरीही न डगमगता परिस्थितीशी सामना करत सुरेखाने स्वत:ची ओळख निर्माण केलीय. एक कार्यकर्ता म्हणून ‘उडान’मध्ये दाखल झालेली सुरेखा आज प्रोजेक्ट मॅनेजरचं महत्त्वाचं पद सांभाळतेय. सध्या पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ती एमएसडब्लूचं पदव्युत्तर शिक्षण घेतेय. सुरेखाच्या मते, समाजाने आम्हाला स्वीकारायला हवं. आमच्या कलागुणांना वाव द्यायला हवा. आमच्या शिक्षणाच्या पात्रतेप्रमाणे आम्हाला नोकऱ्या मिळायला हव्यात. होतं काय की आम्ही किंवा आमचं काम हे फक्त एनजीओपुरतंच मर्यादित राहतं. शासनाने आमच्यासाठी अनेक योजना आणल्यात पण त्यासुद्धा बरेचदा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. समाजाने नाही पण किमान शासनाने तरी आमच्या हक्कांचा गांर्भीयाने विचार करायला हवा.
आपल्या समाजावर चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. आणि भारतीय चित्रपट तृतीयपंथीयांचं बऱ्याचदा नकारात्मक चित्रीकरण करतात. याचा परिणाम आपल्या समाजावर होतोच. माझ्या या अभ्यासाच्या निमित्ताने श्याम बेनेगल, सदाशिव अमरापूरकर या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांशी माझं बोलणं झालं होतं. सदाशिव अमरापूरकरांच्या मते, ‘आपल्या समाजाचं, सरकारचं एक कर्तव्य आहे. आपण त्यांना वाळीत टाकता कामा नये. आपल्या वाळीत टाकण्याने त्यांच्या वागण्याला विषारी असे वळण लागते. आपल्या समाजामध्ये जसे सर्व जात, धर्माना सामावून घेतले जाते तसे याही जातीला पूर्वी सामावून घेतलं जायचं. या लोकांचीही समाजामध्ये विशिष्ट अशी भूमिका होती. पण आता बदलत्या परिस्थितीत भूमिकाही बदलत गेल्या.’  श्याम बेनेगलांच्या मते, ‘आपल्या समाजात तृतीयपंथीयांना सामावून घेतलं जात नाही. कारण आपल्या भारतात सामाजिक प्रश्नांसंदर्भात खूप कमी सहनशीलता आहे. यासाठीही वेळ लागेल. तृतीयपंथीयांना समाजात सामवून घेण्याची तरतूद आपल्या सार्वभौम अशा घटनेतच केलेली आहे. आपली घटना सेक्युलर आहे. याच घटनेने प्रत्येक भारतीयाला समान हक्काने राहण्याचा अधिकार दिला आहे. पण माझ्या निरीक्षणानुसार िलगपरिवíतत व्यक्तींना भारतात फार वाईट पद्धतीने वागवलं जातं. आणि हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.’
आपल्या समाजाला तृतीयपंथीयांचं एक रूप दिसतं ते म्हणजे टाळ्या वाजवून भीक मागणारं. पण त्यांच्यावर ही वेळ आपण आणलीय हे समाज सोयीस्कररीत्या विसरतो. त्यांना सामावून घेतलं तर त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक ताकदीचा उपयोग समाजाला करुन घेता येऊ शकतो. म्हणूनच समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा आहे, आम्ही समाजाचा भाग आहोत, आम्हालाही तुमच्यासारखं माणूस म्हणून जगू द्या.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!