सकाळच्या न्याहारीसाठी खाल्ल्या जाणाऱ्या बहुतेक सीरिअल्समध्ये मुख्यत्वेकरून ओट्स असतात. लो कॅलरी फूड असूनही भरपूर चोथा, ई, बी १, बी २ ही जीवनसत्त्वं असलेले ओट्स मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, मलावरोध अशा अनेक व्याधींत उपयुक्त ठरतात. ओट्सला स्वत:ची चव किंवा स्वाद नाही, त्यामुळे ते तसेच किंवा पीठ करून उपमा, धिरडी, इडली, थालीपीठ किंवा गोड पदार्थ- कशातही घालून खावे.
खट्टामीठा ओट बार
साहित्य : १ वाटी ओट्स, १/२ वाटी कुरमुरे किंवा भाजके पोहे, १ हिरवी मिरची, प्रत्येकी १ मोठा चमचा जवस, भाजलेले शेंगदाणे, काजू, बेदाणे. बदाम (किंवा अक्रोड), दोन मोठे चमचे मध, एक चमचा तूप, दोन मोठे चमचे पिठीसाखर ,पाव चमचा आमचूर, पाव चमचा जिरेपूड, चवीपुरतं मीठ, एक चमचा तेल, चिमूटभर हळद.
कृती : जवस भाजून घ्यावे. ओट्सही भाजून घ्यावे. मिरची बारीक चिरावी, तेल तापवून त्यात मिरची परतावी, हळद घालावी आणि त्यात कुरमुरे घालून कुरकुरीत करून घ्यावे. त्यातच शेंगदाणे, काजू, बदाम, बेदाणे, ओट्स, जवस घालावेत. त्यात चवीला मीठ आणि आमचूर घालावं. जिरेपूड मिसळावी. मध, तूप आणि पिठीसाखर एकत्र करून गरम करावं. साखर विरघळून पाक झाला की खाली उतरून त्यात हे मिश्रण मिसळावं, तुपाचा हात लावलेल्या थाळीत घालावं आणि पसरून दाबावं. गार झाल्यावर मोठय़ा वड पाडाव्यात.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com