डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टीत तसूभरही चूक नसावी, असं अनेकांना वाटतं. वरवर पाहता असं वाटण्यात काहीच वावगं नाही. पण परिपूर्णतेचा हा ध्यास हट्टात परिवर्तित होतो, तेव्हा आपण सतत स्वत:ला (आणि सहकाऱ्यांनाही) त्याच तराजूत तोलतो, एकही त्रुटी राहायला नको यासाठी धारेवर धरतो. परिपूर्णतेचा हट्ट केवळ आपलंच मन अस्वस्थ करतो असं नाही, तर तो प्रसंगी इतरांच्या मनातही आपल्याबद्दल नकारात्मकता निर्माण करतो. पण विचारांचे काही नियम स्वत:ला घालून घेतले तर हा स्वभावही बदलता येईल.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आणि काटेकोर झाली पाहिजे, यावर स्वातीचा कटाक्ष असतो. मग ती घरातली स्वच्छता असो, नाही तर कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन असो. स्वातीचं प्रत्येक काम अगदी परिपूर्ण असतं. पण गेले आठ दिवस मात्र ती अस्वस्थ आहे. या महिन्यात तिचं वजन एक किलोनं वाढलं आहे. आपण इतकी दक्षता घेऊन, तोलूनमापून खात असूनही असं झालं, याचं दु:ख तिला डागण्या देत आहे. या महिन्यात आपण गोड पदार्थ जास्त खाल्ले होते. त्यामुळे आपला व्यवस्थित जमलेला तोल बिघडलाय, असं तिला वाटतंय. त्या खाण्याचा मोह आपण टाळू शकलो नाही, याबद्दल ती स्वत:ला पुन्हा पुन्हा दोष देत आहे.

अजय एका वित्तगुंतवणूक कंपनीत व्यवस्थापक आहे. कामाच्या बोज्यानं तो आधीच वैतागला आहे. त्यात त्याच्या हाताखाली काम करणारा मिहीर त्याच्या वैतागात भर घालतोय. अजयला वाटतं, की कुठलीही गोष्ट तपशिलात जाऊन करण्याची मिहीरला सवय नाही, उठवळासारखं काम करतो. काम सुरळीत पार पाडण्यासाठी अजयनं कामांचं वेळापत्रक आखलं आहे, पण त्यानुसार काम करणं मिहीरला काही के ल्या जमत नाही. त्याच्या प्रत्येक कामात अजयला लक्ष घालावं लागतं. एकही काम स्वतंत्रपणे त्याच्यावर सोपवता येत नाही. मिहीर समोर आला तरी अजयची चिडचिड होते. स्वाती आणि अजयच्या अस्वस्थतेत एक वैशिष्टय़ समान आहे. ते म्हणजे परिपूर्णतेचा हट्ट!

स्वातीचा परिपूर्णतेचा हट्ट स्वत:बाबत आहे, तर अजयचा इतरांबाबत. या हट्टाबाबत ते म्हणतात, की आम्ही परिपूर्णतेचा हट्ट धरतो म्हणून आमची कामं उत्कृष्ट होतात. इतकंच नाही, तर आम्ही इतरांकडूनही तशीच उत्कृष्ट कामं करून घेतो. तो हट्ट धरला नाही, तर काम सुमार दर्जाचं होईल. इथेच त्यांची गल्लत होते. कारण उत्कृष्ट काम आणि परिपूर्ण काम यात फरक आहे. उत्कृष्ट काम हे परिपूर्ण असतंच असं नाही. काम उत्कृष्ट आहे की नाही हे ठरवण्याचे काही वस्तुनिष्ठ मापदंड असतात. याउलट परिपूर्णतेचे परिपूर्ण मापदंड जगात कुठेच नसतात. ते त्या-त्या व्यक्तींनी स्वत:च्या मनानं ठरवलेले असतात आणि विशिष्ट काम स्वघोषित मापदंडांनुसारच व्हायला पाहिजे, असा हट्ट ते धरत असतात. उदाहरणार्थ- ‘वजनात तसूभरही फरक होता कामा नये म्हणजे परिपूर्ण आरोग्य’ हा स्वातीनं स्वत:च्या मनानं ठरवलेला मापदंड आहे किंवा  ‘वेळापत्रकानुसार काम झालं तरच ते काम परिपूर्ण’ असा मापदंड अजयनं ठरवला आहे. हे मापदंड सार्वत्रिक नाहीत. त्यांना वास्तवाचा आधार नाही. थोडक्यात ‘परिपूर्णतेचा हट्ट’ ही एक अवास्तव, हटवादी विचारसरणी आहे.

परिपूर्णतेचा हट्ट धरणाऱ्या व्यक्ती स्वाती व अजयप्रमाणे स्वत:ही अस्वस्थ असतात. कारण आपण ठरवलेल्या मापदंडानुसार काम पार पडत आहे की नाही, याची सततची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असते. स्वाती आणि अजय जेव्हा परिपूर्णतेचा हट्ट धरतात, तेव्हा केवळ स्वत:चे मापदंड ठरवून थांबत नाहीत, तर ते पाळण्यासाठी कसोशीनं झटतही राहतात. ते पाळताना बारीकशीही चूक होऊ नये म्हणून स्वत:ला किंवा इतरांना नियमांनी इतके करकचून आवळून बांधतात, की त्यांचं थोडंसं उल्लंघनही त्यांना घोर अपराध वाटतो. म्हणूनच स्वाती कठोर आत्मनिंदा करून स्वत:ला दोषी ठरवते आणि अजय मिहीरवर चिडचिड करत राहतो. थोडक्यात ते स्वत:च्या किंवा इतरांच्या चुकांबाबत अतिसंवेदनशील होतात.

कुठलाही कार्यक्रम ठरवायचा असेल, तर स्वातीच्या मैत्रिणी ‘तुझ्यासारखं ‘परफेक्ट’ काम आम्हाला नाही जमत,’ असं म्हणत अंग काढून घेतात आणि सर्व कामं स्वातीच्या अंगावर पडतात. अजयचंही तसंच होतं. त्याच्या परिपूर्णतेच्या चौकटीत बसत नसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचं कामही त्यालाच करावं लागतं. त्यामुळे त्याचं काम वाढत जातं. परिपूर्णतेचा हट्ट धरल्यामुळे अजयला कामाचं प्राधान्यही ठरवता येत नाही. सरसकट सगळ्याच कामांच्या तो तपशिलात जातो. तसंच काम कसं करायचं याचं स्वातंत्र्य मिहीरला न दिल्यामुळे त्याच्याही कामात लक्ष घालावं लागतं. परिणामी, आधीच वाढलेल्या त्याच्या कामाचा ढीग आणखीनच वाढत जातो.

स्वाती आणि अजय स्वत:च्या कामाबाबत असमाधानी राहतात. काम पार पाडल्यावरही त्याबद्दल अविरत विचार करत राहतात. स्वत:ला िंकंवा इतरांना मोकळं सोडणं म्हणजे त्यांना अक्षम्य चूक वाटते. याचा परिणाम असा होतो, की स्वाती वजन कमी करण्याऐवजी चुकांचाच विचार करत राहते किंवा अजय मिहीरवर सतत चिडत असल्यामुळे मिहीरच्या चुका आणखीच वाढतात. थोडक्यात, परिपूर्णतेचा हट्ट या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम तर करतोच पण कार्यक्षमताही कमी करतो.

जेव्हा मनुष्य परिपूर्णतेचा हट्ट बाळगत असतो तेव्हा ती परिपूर्णता फक्त त्याच्यापुरती सीमित राहात नाही. त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तीही तिच्या कचाटय़ात सापडतात. आपल्यावर इतरांची परिपूर्णता नाहक लादली जात आहे, अशी भावना त्यांच्या मनात तयार होते. याला ‘लादलेल्या परिपूर्णतेची मानसिकता’ असं म्हणतात. अजयच्या हाताखाली काम करणारा मिहीर हा या मानसिकतेचं उदाहरण आहे. त्याला अजयबद्दल प्रचंड कडवटपणा आहे. तो म्हणतो, ‘‘अजयच्या हाताखाली काम करताना माझा श्वास घुसमटतोय. ऑफिसमध्ये मला चालण्या-बोलण्याचंही स्वातंत्र्य नाही. प्रत्येक गोष्ट अजयच्या तंत्रानंच करावी लागते.’’ परिपूर्णतेचा हट्ट करून स्वाती आणि अजय केवळ स्वत:च्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करून घेत नाहीत, तर आजूबाजूच्या व्यक्तींनाही त्यांच्याबद्दल नकारात्मक भावना जोपासण्यास प्रोत्साहन देतात.

परिपूर्णतेचा हट्ट जोपासण्यात समाज महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जेव्हा एखादा अभिनेता ‘माझं काम कसं ‘परफेक्ट’ आहे,’ असं अभिमानानं सांगतो किंवा एखादा उद्योजक यशस्वितेचं सर्व श्रेय स्वत:च्या ‘परफेक्ट’ असण्याला देतो, तेव्हा त्याचं झपाटय़ानं अनुकरण होतं. मग पालकही नुसतं ‘ ‘गुड इनफ’ नाही, तर तू ‘बेस्ट’च असायला पाहिजेस,’ असा संदेश मुलांना देत राहतात. स्वत:ची योग्यता परिपूर्णतेच्या कसोटीवर पारखून घेण्याची मुलांना सवय लागते. त्यात भर म्हणजे हल्ली प्रत्येक गोष्टीला असंख्य पर्याय उपलब्ध असतात. जेवढे पर्याय जास्त, तेवढं परिपूर्ण राहण्याचं दडपण जास्त येत राहतं. मग हा एखाद्-दुसऱ्याच्या मानसिकतेचा प्रश्न राहात नाही, तर ती सामाजिक मानसिकता बनते. परिपूर्णतेचा हट्ट धरणाऱ्या आणि ‘लादलेल्या परिपूर्णतेच्या मानसिकतेचा’ बळी ठरलेल्या व्यक्तींची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या हा मानसशास्त्रज्ञांच्या चिंतेचा विषय आहे.

परिपूर्णतेचा हट्ट सोडून देणं म्हणजे उलटय़ा टोकाला जाऊन ‘मी वजनाबाबत बेफिकीर  राहणार आहे,’ असं स्वातीनं, किंवा ‘मिहीर काहीही करो, त्याला सुधारण्याच्या फंदात मी पडणार नाही,’ असं अजयनं म्हणणं. हे अभिप्रेत नाही. परिपूर्णतेचा हट्ट न धरताही स्वाती वजनाची काळजी घेऊ शकते आणि अजय मिहीरला सुधारू शकतो. इतकंच नाही, तर दोघंही हे उत्कृष्टपणे करू शकतात. त्यासाठी  खोलात जाऊन काम करणं, कामाची गुणवत्ता उच्च ठेवणं, सुधारण्याची प्रेरणा असणं, अशा त्यांच्या जमेच्या बाजूंचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि केवळ त्यांचंच नाही, तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं मानसिक स्वास्थ्यही ते सुधारू शकतात.

त्यासाठी पुढील ‘परिपूर्णता-प्रतिबंधक विचार’ त्यांना उपयोगी पडतील –

क्षमाशीलता- परिपूर्णतेचा हट्ट सोडायचा असेल तर स्वत:च्या व इतरांच्या चुकांकडे क्षमाशीलतेनं पाहा. याचा अर्थ चुकांवर पांघरुण घालणं नव्हे, पण क्षणोक्षणी तराजूत तोलत राहू नका. स्वातीला जेव्हा स्वत:ची चूक लक्षात येते किं वा अजयला जेव्हा मिहिरची चूक कळते, तेव्हा एकदम शिक्षेवर उडी न मारता त्यांनी स्वत:ला दहा मिनिटांचा कालावधी दिला पाहिजे. याला ‘कु लिंग टाइम’ असं म्हटलं जातं. ‘मनुष्य प्रमादशील आहे’ याचं स्मरण त्यांनी त्या काळात केलं तर चुका माफ करायला ते शिकतील आणि अपरिपूर्ण व्यक्तींमधले चांगले गुणही त्यांच्या लक्षात येतील. त्यांचा उपयोग करून ते चुकांऐवजी वर्तन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील.

नैसर्गिकतेचं भान- आपण निसर्गाचाच एक भाग आहोत आणि निसर्ग परिपूर्ण नाही. इंद्रधनुष्याचा आस्वाद घेताना आपण त्यातल्या सात पट्टय़ांची रुंदी किं वा छटा परिपूर्ण आहेत का, हे मोजत बसतो का? ते परिपूर्ण नसले तरी त्याच्या सौंदर्याला बाधा येत नाही. निसर्गाला जर आपण परिपूर्णतेची मोजपट्टी लावत नाही, तर त्याचाच भाग असलेल्या मनुष्याला का लावावी? निसर्ग सदैव बदलता असतो. तसाच मनुष्यही बदलता असतो. एकच एक मापदंड त्याला लागू होणार नाहीत. हे लक्षात घेतलं तर अपरिपूर्णतेचा स्वीकार तुम्ही करू शकाल आणि अपरिपूर्णतेतलं सौंदर्यही तुमच्या दृष्टीस पडू शकेल.

अपरिपूर्णता स्वीकारण्याचं धैर्य- आपण जर परिपूर्ण आखणी केली, तर परिस्थिती आपण आखलेल्या मापदंडाप्रमाणंच चालेल अशी हमी तुम्हाला हवी असते. परिस्थिती अपरिपूर्ण राहण्याची धास्ती तुम्हाला वाटते. तुमचा परिपूर्णतेचा हट्ट या धास्तीतूनच निपजलेला आहे. तुम्ही जर अपरिपूर्णता स्वीकारण्याचं धैर्य दाखवलं, तर तुम्हाला वाटतं तेवढी अपरिपूर्णता भयानक नाही. उलट तिच्याही काही जमेच्या बाजू आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ- काटेकोर नियमांत बद्ध झालेल्या व्यक्तींत उत्स्फूर्तता नसते. अपरिपूर्ण व्यक्ती जास्त उत्स्फूर्त असतात, सर्जनशील असतात, याचा शोध तुम्हाला लागेल आणि अपरिपूर्णतेबद्दल तुम्ही करत असलेला त्रागा कमी होऊ शकेल.

हे विचार आत्मसात करताना एक दक्षता मात्र जरूर घ्या. ‘आम्ही हे विचार परिपूर्णतेनं आत्मसात केलेच पाहिजेत आणि या हट्टातून स्वत:ला परिपूर्णतेनं सोडवलंच पाहिजे,’ असा नवीन हट्ट मात्र बाळगू नका.