18 March 2019

News Flash

ओ वुमनिया – आई, आयफोन आणि अटी

तेरा वर्षीय शाळेत जाणाऱ्या ग्रेगला त्याच्या आईने गिफ्ट म्हणून आयफोन दिलाय. मात्र अख्खं जग सामावलेल्या त्या अति छोटय़ाशा वस्तूतली अफाट ताकद जबाबदारीनं हाताळता आली नाही

| April 25, 2015 01:48 am

आई, आयफोन आणि अटी
शाळेत असताना ‘अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस पत्र’ वाचलं होतं. शिक्षकानं आपल्या मुलाच्या जाणिवा विकसित कराव्यात, त्याला जगण्याचं भान द्यावं, अशी विनंती करणारं ते पत्र! ती जबाबदारी शिक्षकाचीच हे मानण्याचा तो काळ होता. पण आताचा काळ मुलंच आपल्या उपजत जाणिवांना विकसित करतील या विश्वासाचा! त्यासाठी फक्त आपण त्यांच्यामागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे, या समजुतीचा! म्हणूनच ग्रेग हॉफमनच्या आईचं, जुनेल हॉफमनचं आपल्या मुलाला लिहिलेलं, जगण्याचं भान देणारं पत्र सध्या नेटवर गाजतंय, कारण अनेकांना ते मनोगत आपलं वाटतंय.
तेरा वर्षीय शाळेत जाणाऱ्या ग्रेगला त्याच्या आईने गिफ्ट म्हणून आयफोन दिलाय. मात्र अख्खं जग सामावलेल्या त्या अति छोटय़ाशा वस्तूतली अफाट ताकद जबाबदारीनं हाताळता आली नाही तर माणूसपण हरवून जाऊ शकतं हे जाणूनच या आईने आपल्या लेकराला १८ अटी घातल्यात. तिच्या ब्लॉगवर या अटींसह असणारं तिचं पत्र म्हणजे आईचं आपल्या लेकाबद्दलचं प्रेम आहे, विश्वास आहे, त्याचं मोठं होणं जाणून घेणं आहे आणि त्याला अनुभवसंपन्न करण्याला वाव देणंही आहे.
 ग्रेगला अटी घालताना ती म्हणते, ‘‘प्रिय ग्रेग, हा माझा फोन आहे, मी तो पैसे देऊन विकत घेतला आहे, तुला तो मी कर्जाऊ देते आहे. आहे ना मी ग्रेट आई? मला आयफोनचा पासवर्ड नेहमीच माहीत असेल. शाळा सुरू असताना संध्याकाळी साडेसात आणि सुट्टीच्या दिवशी रात्री ९ वाजता तो आमच्या हातात असायला हवा. सकाळी साडेसातला तो पुन्हा सुरू होईल. फोन वाजला तर तो घ्यायचा, हॅलो म्हणायचं, मॅनर्स वापरायचे. तुझ्या मोबाइलच्या स्क्रीनवर ‘आई’ किंवा ‘बाबा’ येईल, त्या कॉलकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही!
हा फोन तुझ्याबरोबर कधीही शाळेत जाणार नाही. ज्यांना तू मेसेज पाठवतोस त्यांना प्रत्यक्षात भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची ती संधी आहे आणि तेच आयुष्यभरासाठीचं तुझं कौशल्य असणार आहे. एखाद्या व्यक्तीशी तू जे प्रत्यक्षात कधीही बोलू शकणार नाहीस तसा ईमेल वा टेक्स्ट तू कधीही करू नकोस, इतकंच नाही तर मित्राच्या पालकांसमोर जी गोष्ट तू मोठय़ाने बोलू शकणार नाहीस अशी कोणतीही गोष्टी तू त्यांना आयफोनवरून पाठवू नकोस. ना ईमेल, ना मेसेज. तुझ्या मनावर तुझा ताबा हवाच!
हे तंत्रज्ञान कुणालाही मूर्ख बनवण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, फसवण्यासाठी नाही.  हॉटेलमध्ये असताना, चित्रपट पाहताना किंवा कुणाशी बोलताना फोन ‘सायलेन्ट’वर टाक किंवा बंद कर. तू उद्धट नाहीस आणि तुझी ही प्रतिमा आयफोनला बदलायला देऊ नकोस.
नो पोर्न. वेबसाइटचा उपयोग त्याच माहितीच्या शोधासाठी कर, ज्याविषयी तू आमच्याबरोबर सहजपणे बोलू शकशील. तुला कोणतेही प्रश्न पडले तरी आम्हाला बिनदिक्कत विचार. मला किंवा तुझ्या बाबांना! इतकं नाही तर तुझे स्वत:चे किंवा इतरांच्या खासगी अवयवांचे फोटो पाठवू वा स्वीकारू नकोस. हसू नकोस. जरी तू बुद्धिमान असलास तरी कदाचित कधी तरी ते पाठवण्याचा मोह तुला होऊ शकतो. ते धोकादायक आहे. ते तुझं पौगंडावस्थेतील, महाविद्यालयीन किंवा त्यानंतरचं आयुष्य बरबाद करू शकतं.
तुझ्या आयफोनवरुन उगाचच लाखो फोटो वा व्हिडीओ घेत बसू नकोस. प्रत्येक गोष्ट म्हणजे काही दस्तावेज नाही. उलट ज्याचा फोटो काढावासा वाटतो तिथे थांब. तो अनुभव प्रत्यक्ष जग, मग ती गोष्ट तुझ्या आठवणीच्या कप्प्यात अमर होऊन जाईल. तुमची पिढी नशीबवान आहे. तुम्हाला यापूर्वी कुणालाही न मिळालेला गाण्याचा भरगच्च ठेवा मिळाला आहे. तुझ्या मित्रांपेक्षा काही तरी वेगळं, नवं, क्लासिक संगीत डाऊनलोड कर. ते मनापासून ऐक. तुझ्या जाणिवांच्या कक्षा रुंदावतील. मधून मधून शब्दांशी खेळ, कोडी सोडव, बुद्धीला कार्यरत ठेव. एक महत्त्वाचं, तो फोन पडू शकतो, बिघडू शकतो, हरवू शकतो. तसं झालं तर बदलीची वा दुरुस्तीची जबाबदारी तुझी, मात्र त्याचबरोबर असं होऊ शकतं याचंही भान ठेव.
डोळे उघडे ठेव, अवतीभोवती काय चाललंय हे जाणीवपूर्वक बघ. कधी खिडकीतून बाहेर डोकाव. पक्ष्यांचं कूजन ऐक. मधूनच दूपर्यंत चाल, अनोळखींशी गप्पा मार. ‘गुगलिंग’शिवायही अचंबित करणाऱ्या गोष्टी अनुभव आणि हो, कधी कधी फोन घरी विसर आणि त्याच्याशिवाय राहायला शीक. हरवेल म्हणून घाबरू नकोस, त्या भीतीत जगण्याऐवजी त्याच्यापेक्षा मोठा आणि सामथ्र्यवान हो.
शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, या फोनमुळे जर काही घोळ झालाच तर मी तो फोन काढून घेईन. आपण एकत्र बसून बोलू आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू. मी आणि तू. मी तुझ्याच टीममध्ये कायमच असणार आहे, याची खात्री बाळग.’’
 जुनेलचं हे पत्र वा या अटी वाचल्या की जाणवतं की ते तिच्या १३ वर्षांच्या मुलासह सगळ्यांसाठीच आहे, कारण यात प्रत्येकाचं स्वत:ला वाढवणं आहे, मोठं होणं आहे. जबाबदारीचं भान, वास्तवाची जाण आहे, मनावर ताबा ठेवायला शिकणं आहे, नि प्रत्यक्ष अनुभवातला आनंद घेणं आहे, कटू अनुभवाच्या शक्यतांचं आणि त्यातून बाहेर पडू शकण्याच्या आशेचा भाव  त्यात आहे. गरज न बनण्याचं, मोहावर आवर घालू देण्याचं भान आहे आणि माणूस असण्याला वावही आहे, म्हणून हे सगळय़ांसाठीचं आत्मचिंतन आहे. स्वत:कडे स्मार्टफोन असताना करायचं आणि नसतानाही करण्यासाठीचं!    

मृत्यूला सामोरं जाताना 
अफगाणिस्तानच्या नेहमीच्या टॅक्सी स्टॅण्डवर ती आपली टॅक्सी घेऊन ग्राहकांची वाट पाहात होती. इतक्यात काही जणी तिथे आल्या. त्यांना अंत्ययात्रेसाठी जायचं होतं. पण तो होता तालिबानप्रवण भाग! सगळय़ाच पुरुष टॅक्सी ड्रायव्हरांनी नकारघंटा वाजवल्या. पण मुळातच धाडसी असणाऱ्या साराला त्यांची निकड कळली. तिनं भलामोठा कोट घातला. डोक्यावर स्कार्फ आणि भला मोठा गॉगल लावला. टॅक्सी बाई चालवते आहे हे तालिबान्यांपैकी एकाला जरी कळलं तरी काय होईल याची तिला पूर्ण कल्पना होती. पण तरीही तिने टॅक्सीचा गियर टाकला नि त्यांना इच्छितस्थळी पोहोचवून ती परत आली. सुरक्षित!
 सारा बहायीच्या आयुष्यात गेल्या दोन वर्षांत असे अनेक वादळी प्रसंग आलेत. कारण ती आहे, अफगाणिस्तानातली पहिली आणि बहुधा एकमेव महिला टॅक्सी ड्रायव्हर! ३८ वर्षीय साराच्या बहिणीच्या नवऱ्याला तालिबान्यांनी ठार केलं ते साल होतं १९९०. बहीण, तिची सात मुलं, आई आणि भाऊ या साऱ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावर आली आणि पैसे कमावण्याचं तिला साधन सापडलं टॅक्सी!
   दोन वर्षांपूर्वी जेव्हा ती टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी प्रशिक्षण वर्गाला गेली तेव्हा ती एकटी आणि बरोबर ३० पुरुष होते. अनेकांनी तिला खिजवलं, अपमान केला, ‘तू आपल्या धर्माला कलंक आहेस, तुला नसेल पण आम्हाला तुझी लाज वाटते..’ तिनं सारं ऐकून घेतलं. वर्गात ती अगदी मागच्या बाकांवर बसायची. जेव्हा परवाने आले तेव्हा तिला परवाना मिळाला, पण ३० पुरुषांपैकी फक्त ९ जण पास झाले होते.
ती म्हणते, ‘मी टॅक्सी चालवते. कारण टॅक्सी चालवण्यात वाईट काहीच नाही. इस्लाम स्त्रीला गाडी चालवायला मनाई करतं, हा पुरुषांमधला गैरसमज मला दूर करायचाय.’ अनेक स्त्रियांना तिच्याबरोबरचा प्रवास सुरक्षित वाटतो. काही पुरुषही आपल्या कुटुंबांसाठी तिच्या टॅक्सीची निवड करतात. नवरा असता त्याने हे काम तिला करू दिलं नसतं म्हणून सारानं लग्नही केलेलं नाही. स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या साराला तिच्या देशातील स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा संपन्न करायचंय, किती दिवस पुरुषांच्या दबावाला आपण बळी पडायचं, असा तिचा सवाल आहे. आत्तापर्यंत तिने      ७ जणींना कार चालवायचं प्रशिक्षण दिलय. अर्थात त्या खाजगी कार चालवतात. त्यांना टॅक्सी ड्रायव्हर झालेल्या तिला पाहाचंय.
या प्रवासात पुरुषी टोमणे तिने खूप खाल्लेच, पण एकदा तर तिच्या घरावर पाच-सहा पुरुषांनी हल्ला केला. मध उत्पादनाच्या तिच्या जोडधंद्यावर नजर होती त्यांची! तेव्हापासून सारा आणि तिचा भाऊ रोज रात्री आळीपाळीने बंदूक घेऊन घराचं रक्षण करताहेत.
 संघर्ष सोपा नाहीच, मृत्यू समोर आहेच. तिची आईसुद्धा तिला विचारते, ‘अजून तू टॅक्सी चालवणं सोडलं नाहीस. एके दिवशी ठार करतील तुला ते.’ सध्या ती काही पुरुषांबरोबर कार डिलरशिपसाठी पार्टनरशिपचा विचार करतेय. तिला परवानाही मिळालाय. तिथेही तिला पुरुषांच्या जागी स्त्रियांना पाहायचंय. तिची महत्त्वाकांक्षा आता वाढलीय. तिचं हे स्वप्न लवकर पूर्ण व्हावं, अशा शुभेच्छा आपण देऊ या, कारण तेव्हा ती बनेल कार-डिलरशिपची मालकी असणारी अफगाणिस्तानातील पहिली स्त्री!

आरती कदम- arati.kadam@expressindia.com

First Published on April 25, 2015 1:48 am

Web Title: oh womaniya facing the death