News Flash

आयुष्याच्या संध्याकाळी

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नवीन मत्री ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट. कित्येकदा काही पूर्वीची नातीच जिवंत केली जातात.

|| डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नवीन मत्री ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट. कित्येकदा काही पूर्वीची नातीच जिवंत केली जातात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, आयुष्याच्या संध्याकाळी, आता आपली सगळी कर्तव्ये व्यवस्थित पार पडलेली आहेत, थोडासा मोकळा श्वास घेता येईल, असा विचार. वयस्क व्यक्तींना बोलण्याची, आपले मन मोकळं करण्याची तितकीच गरज आहे, जितकी इतर कोणत्याही वयात. इथे बऱ्याचदा त्यांना समजून घेतले जातच नाही. आणि मग जवळची माणसे परकी होऊ शकतात..

‘‘आयुष्यात पहिल्यांदाच असं होतंय की मी काय करू असा प्रश्न पडलाय. मला बोलायचंय तुमच्याशी.’’ साठी उलटून गेलेल्या काकू, खूपच चिंताग्रस्त वाटत होत्या. यांची आणि यांच्या कुटुंबाची माझ्याशी ओळख तशी फार जुनी. त्यामुळे एकंदर घरातली परिस्थिती ठाऊक असल्याने यांना अचानक काय झालं हे वाटणं साहजिकच.

काकू कायमच एकत्र, मोठय़ा कुटुंबात राहिलेल्या. कालांतराने सोय म्हणून जशी प्रत्येकाची घरटी वेगवेगळी होतात, तसं यांचंही झालं. दोन मुली, दोन मुलगे, नातवंडं, असा सगळा उत्तम गोतावळा. घरातलं वातावरणही निरोगी म्हणावं इतके सगळ्यांचे संबंध सुदृढ. तीन वर्षांपूर्वी त्यांचे यजमान वारले. सध्या एका मुलासोबत राहणाऱ्या काकू त्यानंतर फारच अबोल, आणि आत्ममग्न राहू लागल्या. आयुष्यभर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून राहिलेल्या, त्यामुळे मित्र-मंडळी, विद्यार्थी यांचीही वानवा नाही. तरीही, ‘आपला स्वत:चा जोडीदार आता नाही.’ ही खंत सतत त्यांना पोखरत होतीच. अशातच त्यांची एका समवयस्क व्यक्तीशी ओळख झाली. गाठी-भेटी वाढल्या, आणि त्या काकांनी यांना चक्क लग्नाचे विचारले.

इथे काकू गोंधळल्या. नेहमीसारखं आपल्या सगळ्या मुलांसमोर त्यांनी हे व्यवस्थित मांडलं आणि तिथे सारं बिनसलं. ‘‘या वयात तुम्हाला हे असलं कसं सुचतंय आई?’’ हा त्यांच्या परदेशस्थ सुनेचा सूर. त्या मुलाने तर बोलणंच टाकलं. मुली आपापल्या संसार, मुला-बाळांत. त्यांनी ‘आम्ही काय सांगणार?’ असा सावधगिरीचा पवित्रा घेतला. ज्या मुलाकडे त्या राहत, त्याने यावर फार काही कटू प्रतिक्रिया दिली नाही, परंतु समर्थनही केले नाही. मात्र त्यांची इथली सून त्यांना माझ्याकडे घेऊन आली. ती एकमेव व्यक्ती, जिने त्यांना काय म्हणायचंय हे व्यवस्थित समजावून घेतले. काकूंना धीर आला.

आयुष्याच्या टप्प्यावर कोणते वळण कधी येईल हे सांगणे खूपच अवघड. सगळी आखणी करून, मोजूनमापून आयुष्य जगण्याची अपेक्षा, हेच मुळात स्वत:ची फसवणूक करण्यासारखं. किंवा काही बाबी सुस्पष्टपणे दिसत असूनही, त्याकडे काणाडोळा करत राहण्यासारखं. परंतु म्हणून वैयक्तिक प्रश्न पडत नाहीत, असे होत नाही. ते प्रश्न, शंका मन पोखरत नाही राहिल्या तरच आश्चर्य. तसेच या काकूंचे झाले.

चारचौघांसारखे सामान्य जीवन म्हणजे आपापले शिक्षण पूर्ण करणे, त्यानंतर आपापल्या शैक्षणिक कुवतीनुसार, किंवा वारसाहक्काने असणाऱ्या बाबींना अनुसरून अर्थार्जन. पुढे लग्न, मुले, संसार. दरम्यान जोपासता येतील तितकी नाती, या गुंत्याला सांभाळत, या डोलाऱ्याला झुलवत जात राहणे. यातच स्वत:ला वेळ देणे, जमल्यास काही छंद जोपासणे आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढीला आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे. खरे पाहता ही सगळी सरधोपट चौकट आपणच निर्माण केलेली आणि त्यात असहाय्यपणे अडकणारे आपणच. कालपरवापर्यंत नावामागे काहीतरी हुद्दा चिकटलेले किंवा अमुक ठिकाणी अमुक पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्ती उत्तर आयुष्यात केवळ कोणाचे तरी आई-वडील, आजी-आजोबा बनून अवघडल्यासारखे होतात, याचा आपण विचार करतो का? ज्यांना यात काही वावगं वाटत नाही, असंच आनंदानं जगावंसं वाटतं, त्यांचा काहीच प्रश्न नाही. परंतु आपल्या बऱ्याचशा इच्छा केवळ अपरिहार्यपणे गुंडाळून ठेवत, ‘‘आता काय करायच्यात या गोष्टी?’’ असे त्यांच्याकडे पाहत कुढत जगण्याची खरंच गरज असते का?

याच वयोगटातल्या एक उत्तम लेखिका. वृत्तपत्र, मासिकांमध्ये सातत्याने लिहिणाऱ्या. पण एकदा मुलीने सुनावले, ‘‘तुझ्या लिखाण कामापेक्षा नातीकडे लक्ष दे. त्याची जास्त गरज आहे आता.’’ इथे त्यांचं लेखिका असणं अगदीच दुर्लक्षित होऊन अमुक एक आजी, इतकंच राहिलं. आणि उगाच वाद कशाला, म्हणून त्यांनी ते पत्करलंदेखील. असे दुसरे उदाहरण म्हणजे, निवृत्तीनंतरही केवळ स्वत:ला आवडते म्हणून ग्रंथालय चालवणारे काका. परंतु त्यांच्या मुलांच्या मते, ‘‘तिथे बसून वेळ घालवण्यापेक्षा थोडय़ा घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर आम्हालाही मदत होईल.’’ इत्यादी.

अशा वेळेस, या वयोगटातील लोकांकडून मुख्यत्वे दोन प्रतिक्रिया दिसतात. एकतर काहीही न बोलता, मुलं सांगतायत किंवा त्यांना अपेक्षित आहे तसं जगत राहणे. आणि दुसरी म्हणजे, अगदी टोकाची भूमिका घेणे. आपल्याला हवे तसे स्वातंत्र्य घेण्याच्या नादात संपूर्ण अविचारी वागणे.

या सगळ्याच व्यक्तींना वयोमानाने लागलेली बिरुदे, नात्यात किंवा त्याबाहेर; जसे की, कोणाचे तरी आई-वडील, आजी, आजोबा, काका, मामी, आत्या, अमुकतमुक कंपनीचे माजी संचालक, किंवा सुप्रसिद्ध वकील, डॉक्टर, पत्रकार. हे सगळे पुसून टाकून केवळ एक माणूस म्हणून आपल्याला त्यांचा विचार करता येईल. आणि मग त्यांना व्यक्ती म्हणून काय प्रकारचे आयुष्य हवे आहे याचासुद्धा.

कित्येकदा बरीच नाती आजूबाजूला असूनही, एक प्रकारचा एकटेपणा या वयात सर्रास दिसतो. अशा वेळेस, काही नवीन नाती निर्माण झाली, किंवा वर म्हटल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तर काय? मुळात अशी परिस्थिती निर्माण का होते? एकतर कोणत्याही वयाच्या टप्प्यावर नवीन मत्री ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट.  कित्येकदा काही पूर्वीची नातीच जिवंत केली जातात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, आता आपली सगळी कर्तव्ये व्यवस्थित पार पडलेली आहेत, थोडासा मोकळा श्वास घेता येईल, असा विचार. अशा वेळेसही म्हटले तर कठीण प्रसंग समोर उभे राहू शकतात. या वयातील व्यक्तींनासुद्धा बोलण्याची, आपले मन मोकळं करण्याची तितकीच गरज आहे, जितकी इतर कोणत्याही वयात. इथे बऱ्याचदा त्यांना समजून घेतले जातच नाही. त्यांनी सुचवलेल्या बाबी, काही बदल किंवा आवडीनिवडी; सतत सूचना, किंवा स्वत:चे वर्चस्व न सोडण्याचा खटाटोप, या सदरात सहजतेने जाऊन अडकतात. इथे अनुभवाने येणारे शहाणपण व त्यातून सुचलेल्या बऱ्याच बाबी असतात. या सगळ्यालाच थोडेसे डोळसपणे पाहून त्याला सर्व तार्किक पातळ्यांवर पडताळून, ते कोणाकडून येत आहे यापेक्षा ते उपयोगी पडणारे असेल, तर नवीन पिढीला त्या मार्गाने जाणे जास्तच सोपे. काही प्रसंगी त्यात आवश्यक बदल करूनही. परंतु, त्याआधीच त्याकडे ‘हे अनावश्यक आहे, किंवा आता लागू नाही’, असे पाहणे म्हणजे एक शक्यता नाकारण्यासारखेच.

इथे चालू होते ती नात्यांमधली, विशेषत: जुन्या खोडांची घुसमट. त्याला वाट करून देण्यासाठी समविचारी, समवयीन किंवा लहान-मोठेपण समजून घेणाऱ्या व्यक्ती शोधणे हे आपसूक घडते. तिथे आपले विचार मनमोकळे मांडता येतायत हे लक्षात येते. त्याशिवाय वयानुसार अपेक्षित असणारा व्यक्तीचा, ज्ञानाचा, अनुभवाचा, म्हणजे एकंदरीत मतांचा आदर होतोय हेसुद्धा. अशा पद्धतीने तयार झालेली ही नाती मग हवीशी वाटायला लागतात. तिथे जास्त सुरक्षित वाटायला लागते. कारण या वयात महत्त्वाची बाब म्हणजे जोडीदार. इतर कितीही नाती असली, तरी जोडीदाराशिवाय येणारा एकटेपणा हा फारच जीवघेणा. त्यामुळे, एक कोणी मागे राहिल्यास, त्यांच्या दृष्टीने हे एकटेपण सहन करणे अवघड जाते. आपले आयुष्यभर जोडीदाराशी पटले आहे किंवा नाही यापेक्षा ‘सध्याच्या प्रवासातील सोबती’ असे त्याच्याकडे बघितले जाते. त्यातही, ‘सवय’ हा मोठा भाग. एकमेकांचा चित्रविचित्र स्वभाव, वागणूक, सगळ्याचीच सवय. त्यामुळे त्यांचे असे एक वेगळे विश्व असते. त्यात मानसिक दिलासा जास्त. तोच आणि तसाच दिलासा नवीन नात्यात पाहिला जातो.

यात काही गोष्टी नजरेआड करता येणार नाहीत. त्या वरकरणी कितीही अनैसर्गिक वाटल्या तरीही. त्या म्हणजे, मनुष्याला असलेली नावीन्याची आवड. एकच एक आयुष्याचा आलेला कंटाळा, कोणत्याही वयात घेता येणारी आव्हाने आणि त्यातून मानसिक पातळीवर जाणवणारा थरार किंवा रोमांचकारी भावना, त्यातून मिळणारे अभूतपूर्व समाधान. आपण या वयातही कोणाला तरी हवेसे वाटतो या भावनेतून जगायला मिळणारी ऊर्मी. आपल्या स्वत:च्या नात्यात सतत टाकाऊपणाची किंवा दुर्लक्षित झाल्याची भावना अनुभवास येत असताना आणि त्याउलट या अशा नवीन मत्री, नात्यात सतत असणारी ओढ. अंगावर नवीन येऊन पडलेली कर्तव्ये, जबाबदाऱ्या. त्यातून ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी, या वयात येणाऱ्या नालस्तीपोटी अकारण त्या रेटत राहणे. त्यापेक्षा या नवीन नात्यात हे काहीच नाही, केवळ निवांतपणे जगता येणार आहे ही भावना. सततच्या शारीरिक व्याधीतून येणारी असुरक्षितता. अशा वेळेस माझा म्हणून असणारा जोडीदार, सोबत हवा, अशी रास्त भावना.

बऱ्याच कुटुंबांत, वयाच्या पन्नाशीच्या आसपास, एका जोडीदाराने, दुसऱ्याला फसवल्याच्या घटना उघडकीस येतात. अशा वेळेस, आपल्या मुलांच्या आयुष्यात एक लोढणे बनून राहण्यापेक्षा आपला स्वतंत्र मार्ग धुंडाळावा असे वाटते. किंवा आयुष्यभर केवळ मुलांसाठी म्हणून, जोडीदारासह पटत नसताना खस्ता खात टिकलेले संसार, इथे या वयात येऊन काडीमोड घेणारे कित्येक! तारुण्यात झालेला काडीमोड, परंतु मुलांसाठी नव्याने न थाटलेले संसार, तेही या वयात येऊन जोडीदाराचा विचार करू लागतात.

या कोणत्याही कारणाने अशी मत्री किंवा नवीन जोडीदार हवासा वाटत असेल, तर आपल्या दृष्टीने वयोवृद्ध किंवा जबाबदार, कुटुंबातील मोठय़ा वगैरे व्यक्तींना आपण या सगळ्या बंधनातून मुक्त करून व्यक्ती म्हणून त्यांना हवा तो निर्णय घेऊन जगू देणेच योग्य.

इथे एक बाजू, नवीन पिढीचीही मांडावीशी वाटते. आपल्या आई-वडील, आजी-आजोबा यांना नव्याने सुचलेले वागण्याचे शहाणपण, किंवा त्यांच्यातील आकस्मिक बदल, हे पचनी पडणे अवघड असते. त्यातही, ही मोठी म्हणवणारी मंडळी, आपल्या अधिकाराचा, वयाचा दुरुपयोग करून, केवळ ‘आपले म्हणणे कुटुंबात प्रत्येकाने ऐकावे.’ या खाक्याचे असतील, तर तो अर्थातच आत्मकेंद्री विचार. किंवा या वयातही, स्वभावातच असणारा दुटप्पीपणा वाढीस लागून त्यातून ‘तुम्ही मला समजून घेत नाही किंवा वेगळे वागवता, किंवा दुर्लक्ष करता’, असे आरोप असतील तर त्यात काय तथ्य?

शिवाय काही वयस्क, म्हणजे सत्तरीच्या घरात किंवा त्याच्या अलीकडे-पलीकडे, साठीत किंवा अशा वयात असणाऱ्यात मंडळींच्या अपेक्षाही दुटप्पीपणाच्या. ‘इथे मला माझे स्वातंत्र्य आहे.’ म्हणत जगत असताना, आपण घरातील व्यक्ती म्हणून काहीच जबाबदाऱ्या, कामे, वाटून न घेता स्वत:ला हवे तसे वागतो हे माहीत असूनही, मुलांकडून आपल्या तब्येतीची काळजी घेतली जावी, किंवा हवे तेव्हा लागतील तितके पैसे, सुविधा इत्यादी पुरवाव्यात अशा अपेक्षा करणारीही मंडळी असतात. इथे जसे वयात येणाऱ्या मुलांना त्यांचा नाठाळपणा, स्वैराचार थांबवण्यासाठी आपण नियम घालून देतो, तसेच असे वागणाऱ्या वयस्कांनाही हे लागू होणारच.

शिवाय आपल्याला स्वातंत्र्य हवे आहे ही अपेक्षा ठेवताना, या टप्प्यावरील प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करून, स्वत:ला काही प्रश्न विचारावेत, ‘आपण मुलांना त्यांना हवे होते तितके स्वातंत्र्य दिले का? की आपल्याला योग्य वाटते तसे दिले? याबाबत मुलांचे म्हणणे काय? आणि ते मला मान्य आहे का? आपण आता जरी पुढारलेले म्हणवत असू, तरी मुलांनी आपल्याला काहीही झाले तरी सांभाळावे याबाबत आपले विचार अगदीच बुरसट, किंवा जुनाट आहेत का?’ याची उत्तरे मिळाली, की आपण नेमके कुठे उभे आहोत, हे समजणे सोपे होईल.

अशी परिस्थिती असेल तर मग काय करावे?

ज्या वयस्क व्यक्ती अशा प्रकारच्या मत्री किंवा नात्यात गुंतू पाहत आहेत त्यांनी मोकळेपणाने हे सगळं त्यांच्या जवळच्या लोकांसमोर मांडावे. जसे की मुले, भावंडे, जवळचे स्नेही इत्यादी. हा तडकाफडकी घेतलेला निर्णय असू नये. हे मांडल्यानंतर त्यांनाही या एकंदरीत स्थितीकडे बघण्यासाठी थोडासा अवधी मिळतो. सुरुवातीचे आश्चर्य मावळल्यानंतर येतात त्या खऱ्या प्रतिक्रिया. त्यापैकी आपण कोणाच्या प्रतिक्रियांना महत्त्व द्यावे हे प्रत्येकाशी असणाऱ्या नात्यावर ठरते. अशा निर्णयाचे अनेकदा स्वागतच होते. नाही झाले तरीही, दडवल्याची डाचणी नसते.

विशेषत: मुलांनी याच्याकडे पाहताना, आपल्या पालकांची सध्याची परिस्थिती तटस्थ म्हणून समजून घ्यावी. त्यांची मानसिक, शारीरिक गरज केवळ आपल्याला पटत नाही किंवा अवघडल्यासारखे वाटते म्हणून नाकारू नये. ज्यांना लगेच स्वीकारणे शक्य नाही, त्यांनी कटुता ठेवण्याऐवजी याबाबत थोडासा वेळ जाऊ द्यावा. वडीलधारी मंडळी आणि तरुण पिढी या एकमेकांना पूरक गोष्टी. एकमेकांसाठी जाचक, नकोसे, टाकाऊ न होता त्यांच्यात प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण करता येते. असे नाते निर्माण झाले, की मग वर म्हटल्याप्रमाणे, एखाद्या सूनबाईंना सासूबाईंचे म्हणणे योग्य वाटते. त्यांचा, त्यांच्या सुखाचा स्वतंत्रपणे विचार होतो.

urjita.kulkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:03 am

Web Title: on the eve of life natyanchi ukal article dr urjita kulkarni mpg 94
Next Stories
1 चालते बोलते विद्यापीठ
2 दोन पिढय़ांतील वाढतं अंतर
3 शाळेतलं आजोळ
Just Now!
X