03 August 2020

News Flash

दिल.. दोस्ती.. समाजऋण

मैत्री ही भावनिक नात्याने घट्ट होत जाते खरी, पण तिला जर सामाजिक भान मिळालं की त्याच मैत्रीला एक वेगळा आयाम मिळतो.

| August 1, 2015 01:10 am

मैत्री ही भावनिक नात्याने घट्ट होत जाते खरी, पण तिला जर सामाजिक भान मिळालं की त्याच मैत्रीला एक वेगळा आयाम मिळतो. ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून आज तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या मैत्रीला उजाळा मिळतो आहे. नव्याने मैत्री आजमावली जाते आहे. शाळा-महाविद्यालयातल्या मैत्रीला अनेक वर्षांनंतर ताजंतवानं करत एकत्रितपणे सामाजिक कार्य हाती घेणारे अनेक ग्रुप तयार होताहेत. त्यातल्याच काही ग्रुप्सविषयी
उद्याच्या जागतिक मैत्री दिनानिमित्ताने..
आयुष्यात नोकरी, करिअरमागे धावतानाही काही बंध अतूट ठरतात, ते असतात मैत्रीचे! ही मैत्री अनेकांसाठी जीव की प्राण असते किंवा ठरते, कारण ही असते निखळ मैत्री, कोणत्याही कसोटय़ांच्या पलीकडची. पण अलीकडे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या वरदानामुळे, सोशल नेटवर्किंग साइट्समुळे थेट लहानपणीचे वा तरुणपणीचे मित्र मैत्रिणी एकत्र येताहेत. अगदी तीस चाळीस, पन्नास वर्षांनंतर. त्या त्या अभ्यासक्रमानंतर दुरावलेल्या देशातल्याच नव्हे तर विदेशांतल्या मित्र-मैत्रिणींना ‘व्हच्र्युअली एकत्र’ आणायची मोठीच कामगिरी फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल साइट्स करत आहेत. त्या काळी जे कधी एकमेकांशी बोललेही नसतील ते मुक्तपणे बोलताहेत, सुखदु:खाची देवाणघेवाण करताहेत.. आणि त्यातूनच खूप काही विधायकही घडतंय..
अशा अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या या मित्रमैत्रिणींचा साहजिकच सुरुवातीचा टप्पा असतो तो आठवणींना मुक्तपणे वाहू द्यायचा. शाळा किंवा कॉलेजमध्ये असतानाच्या गमती-जमती नि फजितीदेखील सांगायचा. शिक्षकांच्या आठवणी आणि सहली, गॅदरिंगच्या आठवणी जागवायचा.. हा पहिल्या भेटीचा भर ओसरला की मग होतात स्नेहसम्मेलनं नि सहली. नव्याने नातं आजमवण्याच्या प्रयत्नात हे मित्र-मैत्रिणी अधिक जवळ येतात. आपण यापूर्वी का भेटलो नाही यासाठी खंतावतातही. अगदी रुसवे फुगवेही होतात. ग्रुपमधून बाहेर पडणं, त्यांना पुन्हा बोलवणं असेही अनेक मानवी स्वभावाचे खेळ सुरू होतात. मैत्रीच्या सगळ्या कसोटय़ा आजमावल्या जातात. अर्थात त्यानंतर बरेच ग्रुप्स फक्त मेसेज फॉर्वर्ड करण्यात नि टीपी करण्यात धन्यता मानतात. काळाच्या ओघात काही ग्रुप्समधील संवादांचा वेग कमी कमी होत जातो. आणि काही वेळा थांबतोही.
काही ग्रुप्स मात्र अखंड  सुरू राहतात. कारण त्या  मैत्रीमध्ये ‘मी’, ‘तू’ असे काही असण्यापेक्षा अधिक महत्त्व असतं ते ‘आपण सारे मित्र आहोत’ या संकल्पनेला. या ‘आपण सगळे मिळून’च्या संकल्पनेला पारखून, समजून नि पडताळून घेतलं तर त्यातून चार चांगल्या गोष्टी सहजगत्या घडू शकतात हे जाणूनच काही ग्रुप्स आपली शाळा, महाविद्यालयं आणि समाजाचं ऋण अंशत: का होईना फेडायचा प्रयत्न करत आहेत. त्या ऋणाचा आदर राखत आपला मदतीचा हात पुढं करत आहेत. कधी हा हात आर्थिक असतो, कधी मानसिक असतो, कधी ती सामाजिक जबाबदारी ठरते तर कधी त्यामुळे सांस्कृतिक संचितात भर पडते.
सोशल नेटवर्कच्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या किंवा त्या माध्यमामुळे घट्ट नातं टिकवणाऱ्या या काही ग्रुप्सविषयी उद्याच्या मैत्री दिनानिमित्त..
कुल्र्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूलचा  ‘उबंटु’ ((UBUNTU) हा ग्रुप.  त्या काळात,१९७९ ला दहावीत आसताना, आपापसात कधी न बोलणारे मुलगे-मुली ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातून एकत्र आले नि तयार झाला सामाजिक बांधीलकी जपणारा उत्साही गट! तो दिवस होता, १३ जून २०१४. अर्चना पिंटो यांच्या पुढाकाराने या बॅचमधली मुलं-मुली एकत्र आली. अर्चना यांना एक मेसेज आला होता. त्या गोष्टीचा मथितार्थ होता, UBUNTU in the Xhosa culture means: “I am because we are.” – ‘तुमच्या सगळ्यांमुळेच, मी आहे.’ हीच कल्पना हा ग्रुप तयार करण्यामागे होती. त्यामुळे त्यांनी ग्रुपचं नाव तेच ठेवलं. ग्रुपमधल्या सदस्यांना सामाजिक बांधीलकीचं भान होतंच. एकत्र आल्याने या जाणिवा अधिक स्पष्ट झाल्या. त्याच दरम्यान पुणे येथील माळीण गावची दुर्दैवी घटना घडली नि या सगळ्यांनी एकत्रितपणे  एका वृत्तपत्राच्या मदतनिधीद्वारे गावासाठी धनादेश पाठवला. त्याच वेळी एका मित्राच्या अकाली मृत्यूनंतर गावात राहणाऱ्या त्याच्या पालकांनाही आर्थिक आधार दिला.
ज्या शाळेनं त्यांच्या कलागुणांना वाव दिला, करिअर उंचावण्यात मोठा वाटा ठरली अशा शाळेच्या ऋणात राहायला त्यांना कायमच आवडेल, असं सांगत असतानाच फूल ना फुलाची पाकळी म्हणून माजी शिक्षकांसाठी सत्कारसमारंभही आयोजित केला गेला.
आत्तापर्यंत काय केलं याचबरोबरच यापुढे काय करता येईल याचाही या ग्रुपमध्ये विचारविनिमय सुरू असतोच. त्यातूनच सगळ्यांनी मिळून एक जागा घेऊन ठेवावी, असा विचार सुरु आहे. दुर्दैवाने कुणाला काही कारणास्तव म्हातारपणी बेघर व्हायची वेळ आली तर त्या जागेत त्याची राहायची सोय करता येईल असा त्यांचा मानस आहे. आपल्या मैत्रीला सतत ताजंतवानं ठेवण्यासाठी प्रत्येक मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस त्यांचा डीपी आठवणीने ठेवून भरभरून शुभेच्छांसह साजरा केला जातो. एकूण ५६ पैकी काहींना शेरोशायरी-अंताक्षरीची आवड असल्यामुळे त्यांचा आणखी एक ग्रुप तयार झालाय नि त्यावर सातत्याने त्यांचे शेअरिंग सुरू असतेच. ‘तुमच्या सगळ्यांमुळेच, मी आहे.’ या आपल्या संकल्पनाविचाराचा पुरेपूर वापर ‘उबंटु’ करतंय आणि आपल्या मैत्रीला अमरत्वाकडे नेतोय.
‘कार्टी’ या शब्दाला काहीसा इरसाल नि उपरोधिक वास येतो खरा, पण बोरिवलीच्या ‘श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक संस्थे’च्या चोगले हायस्कूलच्या ‘१९९९ दहावी अ’च्या बॅचने त्याला जुमानलेलं नाही. सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांच्या ‘व्हॉटस् अ‍ॅप’ ग्रुपचं नाव ठेवलं आहे, ‘चोगलेची कार्टी.’ मधली तीन र्वष तुकडय़ा बदलल्यामुळे ही दुरावलेली ४८ मित्रमंडळी पुन्हा एकत्र आली. बालवाडीपासून ते अगदी दहावीपर्यंतच्या या प्रवासातले हे मैत्र इतकं अतूट आहे की, प्रत्येकाला एकमेकांची ‘कुंडली’ माहिती आहे. या मित्रमंडळींपैकी काहींचे जोडीदारही एकमेकांची ओळख असल्यानं या गटात सामील झालेत. सदस्यांपैकी ट्रेकिंगप्रेमी राजेंद्र देशपांडेने ‘भरारी ट्रेकिंग ग्रुप’च्या पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमण मोहिमेदरम्यान गरजूंना केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती ‘कार्टी’शी शेअर केली. त्यावरून सोनिया भोसलेला भाईंदरच्या बालकाश्रमात मदतीचा हात देता येऊ  शकेल, अशी कल्पना सुचली. या कल्पनेवर इथल्या नि परदेशस्थ मित्रांची चर्चा होऊन बालकाश्रमाला मदत द्यायचा विचार पक्का ठरला. काही जणांनी आश्रमात जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि मग सोनिया, प्रतीक्षा सावंत नि अरविंद गाडगीळ यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन लहान मुलांचे कपडे नि पैसे द्यायचे ठरवले. त्या लहानग्यांना कपडे हातात घेताना झालेला आनंद अवर्णनीय होता.. ४० मुले-मुली असलेल्या या आश्रमाला गेली दोन र्वष हे सदस्य मदतीचा खारीचा वाटा देताहेत.
केवळ मदत करून न थांबता आश्रमाच्या जवळपास राहणारी ही मंडळी शक्य होईल तेव्हा तिथं जाऊन आपल्या मदतीचा विनियोग कसा होतोय, हेही पाहतात. इतर मैत्री ग्रुप्सवर आश्रमाच्या मदतीसाठी शेअरिंग केलं जातं. सध्या आश्रमात संगणकाची गरज आहे का, ते पडताळून तो घेऊन द्यायचा विचार सुरू आहे. शक्य तेवढी, अधिकाधिक मित्रमंडळी महिन्यातून एखाद्या रविवारी चहाच्या कट्टय़ावर किंवा मग नॅशनल पार्कमध्ये भेटतातच. केवळ जुन्या आठवणींच्या मोहळाला न चिकटता वर्तमानाचे भान ठेवतात. विविध पोस्ट किंवा फॉरवर्ड्स शेअर केल्याने त्यावर होणाऱ्या चर्चामुळे अनेक गोष्टींच्या वास्तवाची जाणीव होते व अनेकादा दृष्टिकोन बदलायला मदत होते असं ते म्हणतात. आता सगळ्यांच्या सोयीने ताडोबा जंगल सफारीला जायचा बेत आखला जातोय, तो व्हॉटस् अॅपच्या दिमतीने पूर्ण होईलच.
‘मॉब’ हा शब्दच कसा जरा अंगावर येणारा.. त्यातल्या ‘जमाव’ किंवा ‘झुंड’ या अर्थासारखाच. पण मॉबला योग्य दिशा द्यायची ठरवली तर ती देता येते नि ती द्यायचा प्रयत्न झालाही. माटुंग्याच्या
‘डी. जी. रुपारेल महाविद्यालया’तील माजी विद्यार्थ्यांनी मिळून ‘मॉब’ अर्थात ‘मेंबर्स ऑफ ब्रदरहूड’ ही स्वयंसेवी संस्था २००६ मध्ये स्थापन केली. तिचे संस्थापक सदस्य आहेत गिरीश ढोके, अमित जठार, विनायक मुणगेकर, गोपाळ पालव, प्रियदर्शन जाधव आदी मंडळी. पुढे त्यांना आणखी काही जण मिळाले नि कारवाँ बढता गया.. ‘मॉब’चे फेसबुक पेज आहे. त्यांचा व्हॉटस् अॅप ग्रुपचे नाव आहे ‘ऑफिस ऑनलाइन’. माजी रुपारेलकर असणाऱ्या या २० मित्रांच्या संस्थेची टॅगलाइन आहे ‘पीपल फॉर पीपल’. पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या या मंडळींनी ‘हेल्पिंग पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल’ असं आपलं ध्येय ठेवलेय. पाणी व्यवस्थापनात निरनिराळ्या प्रकल्पांद्वारे त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाच्या पाण्याचा किंवा नदी, तलाव इत्यादी जलसाठय़ांचा नियोजित व काटेकोरपणे वापर करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई सहजतेने दूर करणं. उपलब्ध पावसाच्या पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचा जास्तीत जास्त योग्य पद्धतीनं वापर करण्यासाठी योजना राबवणं. ‘मॉब’ने आतापर्यंत रुपारेल महाविद्यालय, शिवाजी पार्क, वाडिया महाविद्यालय (पुणे) या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविला आहे. शिवाय २०१३ मध्ये बदलापूरचा जलधारा प्रकल्प राबवून १५ गावं दुष्काळमुक्त केलीत.
एकदा हाती घेतलेलं काम त्यांना पुढे चालू ठेवायचं आहे, ब्लड ग्रुप रजिस्ट्रेशनच्या डेटाबेस प्रकल्पाचं काम सुरू असून, द्रुतगती मार्गावरचे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करायची आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आरोग्यविषयक जागृती करायची आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ई-लॅबची सोय करणे आदी कामे त्यांनी हाती घेतली आहेत. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या मित्रमंडळींना या सगळ्या प्रकल्पांवर चर्चा नि विचारविनिमय करण्यासाठी एकत्र यायला नेहमीच वेळ मिळतो असे नाही. अशा वेळी ‘व्हॉटस् अॅप’ नि ‘फेसबुक’ची फारच मदत होते. आपल्याला सुचलेली कल्पना, त्यावर इतरांचे विचार, त्यातून आकार घेणारा प्रकल्प नि त्याची पूर्तता हे सारं या समाजमाध्यमांमुळं सुकर होतं. माजी रुपारेलकरांपैकी सीनिअर्स आणि ज्युनिअर्स ‘मॉब’मुळे एकत्र येऊन सामाजिक बांधीलकी जपताहेत.
‘शाळेपासून समाजापर्यंत..’ हे ब्रीदवाक्य आहे ते विहंग प्रतिष्ठानचे. कुल्र्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधील (शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय) १९८१ च्या बॅचचे विद्यार्थी ३० वर्षांनी एकत्र भेटले नि त्यानंतर काही काळातच विचारपूर्वक स्थापन झाले ते ‘विहंग प्रतिष्ठान’. केवळ एका बॅचपुरती मर्यादित न राहता हळूहळू अनेक जण येऊन आता ही माजी विद्यार्थ्यांची संस्था झाली आहे. काळाच्या ओघात कुर्ला येथे होत असलेले सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाले. ते आता पुन्हा नव्याने सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार नोव्हेंबर २०१२ मध्ये पहिल्या ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. १७ जानेवारी २०१३ मध्ये ‘विहंग प्रतिष्ठान’ रजिस्टर करण्यात आलं असून सदस्य संख्येत वाढ होत होत ती आता शंभरी गाठतेय. संस्थेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजलेल्या ‘पतंगोत्सवा’च्या माध्यमातून शाळेची माजी विद्यार्थिनी अपघातग्रस्त         मोनिका मोरेला मदत करण्यात आली, तेव्हा सर्व स्तरांतील आणि वयोगटातील लोकांच्या मन:पूर्वक प्रतिसादामुळे अवघ्या दोन तासांत पावणेदोन लाख रुपयांची रक्कम उभी राहिली.वांगणीच्या स्किझोफ्रेनिक रुग्णांच्या वृद्धाश्रमात बायोगॅसचा प्रकल्प बसवण्यात आला. कविसंमेलनात मान्यवर कवींसोबत स्थानिक कवींनाही काव्य सादरीकरणाची संधी देण्यात आली. गेल्या दिवाळी पहाटेला रांगोळी नि चित्रकला स्पर्धेत स्थानिकांसोबत चेंबूरच्या ‘थडानी हायस्कूल’मधील मूकबधिर मुलेही उत्साहाने सामील झाली होती.
‘विहंग’च्या फेसबुक पेजमुळे विविध प्रकल्पांची माहिती देशा-परदेशातल्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नि पोहचतेय. त्यामुळे पुढच्या प्रकल्पांसाठी मदतीचे आणखी हात पुढे येताहेत. ‘विहंग’चा व्हॉटस् अॅप ग्रुप असून प्रत्येक बॅचचेही विविध ग्रुप आहेत. विविध वयोगटांतल्या ‘विहंग’ करांना शेअरिंगसाठी हे हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने सुखदु:खाच्या क्षणांना वाटून घेता येतेय. मधली दुराव्याची र्वष गळून पडून काहींचा एकटेपणा दूर झालाय. सामाजिक जाणिवांचा भाग म्हणून मोबाइल टॉवरच्या रेडिएशनविषयी जनजागृती, अवयवदानविषयक जागृती, माजी शिक्षिकांना वैद्यकीय मदतीचा हात आदी उपक्रम राबवले जात आहेत. माजी शिक्षिका विभावरी वाकडे यांच्या ‘बिननात्याचा माणूस’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ केला आणि त्यानिमित्ताने त्यांच्याच काळातल्या ११ माजी शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आला. नंतर पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. यंदा ‘विहंग’ करांनी वृक्षारोपणही केलंय. ऑगस्टमध्ये ‘सारेगमप’च्या धर्तीवर गाण्याच्या स्पर्धेच्या आयोजनात ‘विहंग’चं सदस्य गुंतले आहेत. ‘विहंग’कर समाजमाध्यमांचा वापर चांगल्या कामासाठी वापर करताहेत नि त्याला लोकांचाही तितकाच जोरकस प्रतिसाद मिळतोय. विश्वास आणि सचोटीच्या माध्यमातून ‘विहंग’ अधिकाधिक प्रकल्पांची भरारी घेईल..
मैत्रीच्या व्याख्येला कोणत्याही चौकटीत ठाकून ठोकून न बसवता तिला विस्ताराचा अवकाश देऊन या साऱ्यांनी ‘मिळून सारे जण’ असं म्हणत अनेक चांगल्या गोष्टींचा श्रीगणेशा केलाय. त्यांचा आदर्श घेऊन आता अनेक ग्रुप्स अशा सामाजिक कार्याकडे वळत आहेत, आपल्या मैत्रीला वेगळा आयाम देत आहेत. तेच सांगणारा एका मैत्री ग्रुपवरून फॉरवर्ड झालेला हा शेर, ‘जिंदगी में ‘दोस्त’ नहीं मिलते, दोस्तों में ‘जिंदगी’ मिला करती है’
जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
राधिका कुंटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2015 1:10 am

Web Title: on the occasion of the world friendship day
Next Stories
1 आशा उद्याची
2 मानवतेचा मधुर झरा
3 शिक्षण, देश आणि माणसं : नकारातून परिपूर्तीकडे..
Just Now!
X