News Flash

नात्यांची उकल : चालू राहणारा नात्यांचा निरंतर शोध..

‘नात्यांची उकल’ ही काही क्षणांत, काही दिवसांत, किंवा काही काळात होण्यासारखी बाब नाही.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

‘नात्यांची उकल’ ही काही क्षणांत, काही दिवसांत, किंवा काही काळात होण्यासारखी बाब नाही. नाती हा जगण्यासारखाच सुंदर प्रवास आहे. त्यामुळे जगत असताना, नात्यांच्या प्रत्येक अंगाला कुरवाळत, सावकाश सामोरं जात, ती उकल अंतापर्यंत करत राहणे, हा तो प्रवास. त्यात कायम उपयोगी पडणाऱ्या बाबी, म्हणजे आत्मभान, प्राधान्यक्रम, प्रेम, जिव्हाळा आणि डोळसपणे बघण्याची वृत्ती. वर्षभर याच शाश्वत सत्याची चर्चा करणाऱ्या सदरातील हा समारोपाचा लेख..

‘असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!’

कवी गुरु ठाकूर यांच्या या काव्यपंक्ती सकाळी अचानक कानावर पडल्या आणि या समारोपाच्या लेखात, आपल्यासारख्या सुजाण वाचकांपर्यंत नेमकं काय घेऊन यावं बरं, हा पेच अलगद उलगडला.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात जितकी आश्वासक, तितकीच आव्हानात्मक असते. तसेच त्या गोष्टीच्या समारोपाचेही असते. त्यामुळे खरंतर आता आपली ‘चतुरंग’मध्ये गेले वर्षभर चालू असलेल्या ‘नात्यांची उकल’ या सदरामार्फत भेट होणार नाही, ही टोचणी मनात असतानाही; या सदरातील शेवटच्या लेखाची जबाबदारी कित्येक पटीने अधिक आहे;  हेही मन- मेंदू सतत समजावून सांगत होता. त्यामुळे ‘नाही’ म्हणायला हात एक क्षण का होईना, अडखळलाच आणि हे सरणारं वर्ष हसतमुखानं समोर येऊन उभं राहिलं.

या सदराची सुरुवातच एका खूप रंगतदार अशा चच्रेने झाली. संपादकांशी जवळपास तासभर झालेल्या चच्रेत, या विषयाचा आवाका, त्यातून नेमकं काय बरं मांडता येईल, त्यातही प्रत्येक विषयाला लेखाच्या ठरलेल्या शब्दमर्यादेत योग्य तो न्याय देणं कितपत शक्य होईल, असं सगळंच विस्ताराने बोलून, शेवटी याचा श्रीगणेशा झाला. पहिल्या लेखाचं नाव आणि लेखात असणाऱ्या मजकुरातून, प्रश्नच-प्रश्न मांडले होते. त्याचं साधं कारण इतकंच, की, या सदरातून नेमकं कशावर बोलण्याचा प्रयत्न होणार आहे, याची कल्पना सर्व वाचकांना यावी. लेखक आणि वाचक यांच्यामध्ये एक खूप मोठा महत्त्वाचा दुवा असतो, असं मला वाटतं. तो दुवा म्हणजे पारदर्शकतेचा. लिखाण किंवा लेखक हे वाचकांशी जितके मोकळे होऊन बोलतात, संवाद साधतात, तितकंच ते लिखाण वाचकांपर्यंत नुसतंच पोहचत नाही, तर ते रेंगाळत राहतं. लिखाणात मांडलेले विचार, अवतीभवती वावरण्यास सुरुवात होते. लेखातले दाखले आजूबाजूला आपल्या स्वत:च्या आयुष्यात सहज दिसण्यास सुरुवात होते. हे लिखाण वैयक्तिक, केवळ माझ्याचसाठी आहे, असं प्रत्येक वाचकाला वाटल्याशिवाय राहत नाही.

तिथेच वाचक लेखाशी, लेखकाशी, जोडला जाऊन त्यांचाच असा एक भावबंध तयार होतो. तो वाचकाच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा, त्यापेक्षा कित्येक पटीने लेखकासाठी तो तितकाच अनमोल. एकदा हे पारदर्शक राहण्याचं सूत्र म्हणा किंवा नियम म्हणा, किंवा स्वत:ला आवश्यक वाटणारा गुण म्हणा; स्वीकारला, की मग मात्र, ‘हे जे आपण लिहितोय, ते वाचकांपर्यंत पोहोचेल का?’ किंवा ‘मला नेमकं काय म्हणायचंय हे त्यांना कळेल का?’ किंवा ‘अर्थाचा अनर्थ तर नाही होणार ना?’ अशा शंका कुठेच उद्भवत नाहीत. तरीही हे प्रश्न पडणं अनेकदा साहजिकच असतं. त्यातही विशेषत: काही क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने, साध्या सुलभ भाषेत हाताळायचे असतात, त्या वेळेस तर खूपच गंमत येते.

या सदरात आपण नात्यांचे कित्येक कंगोरे पाहिले, अगदी आबालवृद्ध सगळ्या वयांत, साधारण ‘काय, कसे, कुठे’, असं समस्यांना मध्यवर्ती ठेवून आपण त्यांची छान ओळख करून घेतली. त्याचबरोबर, आता ही समस्या, तिची झालेली ओळख, त्याच्यापुढे यातून बाहेर पडण्याचा हा मार्ग, हेसुद्धा समजावून घेतलं. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहचवताना मात्र सगळ्यात मोठं आव्हान होतं, ते ही उकल नेमकी कशी करून मांडावी, याचं. मानवी मन-मेंदू, त्याच्या भाव-भावना, विचार, त्यातली अप्रतिम विविधता, त्यातून उमटणारे कित्येक रंग, हे काहीएक शब्दांत बांधून, त्यांना कायद्याप्रमाणे समोर उभं करणं, म्हणजे त्यांच्यावर अन्यायच नाही का? किंवा शिस्तबद्ध मुलं कशी रांगेत, अगदी एका पाठी एक उभी असतात किंवा कडक गणवेषात असतात, तसं त्यांना बजावून उभंही करता आलं असतं, पण त्यात काय गंमत? शिवाय जशी कडक शिस्तीतली मुलं हाताळायला, सांभाळायला सोपी, अगदी तसंच या विषयाचं. ठरीव साचेबद्ध शब्द, त्यांच्यासाठी वापरलेली शास्त्रोक्त भाषा किंवा काही वैद्यकीय, तितक्याच क्लिष्ट व्याख्या, या सरसकट लिहीत राहूनही, हे विषय हाताळता आलेच असते. परंतु, तिथे मात्र कदाचित, त्यांच्या खऱ्या स्वरूपापेक्षा त्यांच्या शिस्तबद्ध असण्याकडे लक्ष गेलं असतं. त्यांना मुळापर्यंत जाऊन समजावून घेणं कदाचित नकोसं वाटलं असतं.

याच्यावर विचार केला तेव्हा म्हटलं, असं करू या का? यांच्यातली शिस्तच मुळात मोडून टाकू या. त्यांना हवं तसं बागडू दे, दंगा घालू दे आणि भरपूर हसून-खिदळून हवं तसं वागू दे. बस्स., या सगळ्याच विषयांना असं मोकळं सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत वाहवत जाताना जी काही मजा आली, ती आपण मिळून अनुभवली, मिळूनच! कारण लेखक म्हणून या बाजूने आम्ही कितीही ज्ञानाचे कलश पालथे करून, त्यातले शब्दकण पसरवत राहत असू, तरीही, ते करत असताना, सतत स्वत:कडेही एक डोळा आपसूक असतोच. स्वत:लाही चिमटे काढलेच जातात. स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडतात, कधी, ‘आपल्याला हे माहीत आहे की, पण आपण करून पाहिलंय का? असे प्रश्न धाड्कन समोर येऊन उभे राहतात. कधी, एखादा लेख लिहीत असताना, मनावर साचलेलं मळभ दूर होत राहतं, पुढचं स्वच्छ दिसायला लागतं. कारण माणूस म्हणून जगत असताना आपल्या सगळ्यांनाच त्याच परीक्षा द्यायच्या आहेत आणि तसेच प्रसंग आहेत. अगदी एकसारख्या अडचणी आहेत.

लिखाण हा अत्यंत आनंददायी असा अंतर्मनाकडे नेणारा, तिथून डोळस बनवणारा आणि प्रसंगी, साक्षात्कार घडवणारा उत्तम साथीदार. त्यामुळेच या सदरातील प्रत्येक विषय हाताळताना, त्याला जशी व्यवसायातील अनुभवाची शिदोरी पाठीशी होती, तसेच कित्येक निरीक्षणे, इतरांची दुरूनच पाहिलेली पण संवेदनशील मनाने कधीतरी त्यात घुसून जगून घेतलेली आयुष्यं, असं सगळंच साथ-सोबत करत होतं. यातून वाचकांइतकाच आनंद मलाही मिळत होता. कारण यातून प्रत्येक लेखागणिक पुन्हा नव्याने कित्येक बाबींची भर माझ्यातही पडत होती.

वाचकांनी तर अगदी भरभरून प्रतिसाद दिला. दर पंधरवडय़ात येणारं हे सदर. त्यामुळे त्या शनिवारी, ‘चतुरंग’ पुरवणी प्रसिद्ध झाली, की सकाळीच माझा मेलबॉक्स भरून जात असे. अनेकांना उत्तरे दिली. काहींना देता आली नाहीत, त्याबद्दल दिलगिरी. ही सगळीच पत्रे वाचताना एक लक्षात आलं ते असं, की या लेखांचा, या सदराचा, वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कुठेतरी, काहीतरी परिणाम नक्कीच होतोय.

‘फायदा’ हा शब्द वापरण्याचे टाळते आहे. कारण त्या शब्दाला स्वार्थी असण्याच्या मर्यादा येतात. त्यामुळे परिणाम होणं, तो टिकून राहणं, हे मात्र सातत्याने दिसत राहील. शिवाय ‘हे सोप्या भाषेत येतंय’, ही पावतीही मिळत गेली. लेख वाचल्याने द्विधा मन:स्थिती निर्माण झाली, एखादा मुद्दा कळलाच नाही असे खचितच घडले. हां, काही वेळा, एखादा मुद्दा पटला नाही किंवा यावर अजून विस्तार हवा, हेसुद्धा आलंच. ते योग्यच आहे. परंतु लेख लिहिताना प्रत्येकच लेखकाला एक औचित्यभान ठेवावेच लागते. ते सांभाळत, जितकं सविस्तर लिहिता येईल, तितका प्रामाणिक प्रयत्न नक्कीच झाला. काही गमतीशीर प्रतिक्रियाही आल्या. अनेकदा तर अक्षरश: संपूर्ण ‘केस हिस्ट्री’ या पत्रांमध्ये लिहिलेली असायची. अशा वेळेस या निमित्ताने का होईना, या व्यक्तीला व्यक्त व्हावंसं वाटलं आणि होता आलं, याचं समाधान असायचं. अनेकदा काही खूपच चिंताजनक उत्तरंही आली. ‘मला आयुष्यात काहीच रस वाटत नव्हता.’ अशा आशयाचं एखादं पत्र वाचलं, की या व्यक्तीला का बरं असं वाटत असावं, असं मनात येत राहायचं. पण अशा प्रत्येकच पत्रात ‘पण तुमचा हा लेख अगदी योग्य वेळेस माझ्या वाचण्यात आला. त्यामुळे आता मी सकारात्मक विचार करत आहे.’ असं वाचलं की बरं वाटायचं. किंवा ‘आमच्या नात्यात काहीच अर्थ उरला नाही, असं मला वाटायला लागलं होतं. मात्र तुमचं सदर मी वाचते, त्यातून मला स्वत:मध्ये कित्येक सुधारणा कराव्याशा वाटतात’, ‘या विषयातील मार्गदर्शन हवे आहे..’ अशा कितीतरी प्रतिक्रिया लिखाणाचं समाधान देऊन जातात.

सदराचे नाव, इथपासून ते निवडलेले विषय, विषयाची मांडणी, ते करत असताना योजलेली भाषा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला सोपेपणा, या सगळ्यांसाठीच वाचक म्हणून तुम्ही कौतुकाचा अक्षरश: वर्षांव केलात. एक प्रसंग तर फारच गमतशीर. एका ठिकाणी मित्रमंडळींसह मी चहा घेत असताना, समोरच्या टेबलावरील, दोन स्त्रिया आणि एक साठीच्या पुढचे काका बराच वेळ आमच्या टेबलाकडे सतत पाहत होते. आम्ही अगदीच मजा-मस्ती करत होतो. मला वाटलं, ‘कदाचित आपला आवाज जास्त आहे का? त्याचा त्यांना त्रास होतोय का? म्हणून एकटक पाहतायत का?’ पण पुढच्या पाचेक मिनिटांत, ते तिघेही आमच्या टेबलावर आले आणि म्हणाले, ‘‘आपण ‘लोकसत्ता चतुरंग’ मध्ये लिहिता का?’’ क्षणभर गडबडून काय बोलावं हे कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘माझं कुटुंब, आम्ही सगळे, न चुकता तुमचं सदर वाचतो आणि आता त्यातल्या काही बाबी लिहून ठेवल्या आहेत. त्या जशाच्या तशा पाळतो. याही वयात तुम्ही आम्हाला शिकवलंत आणि करायला भाग पडताय, ही कमालच नाही का..’’

वयाने इतक्या वडील असलेल्या व्यक्तींवरही याचा इतका सखोल परिणाम होतोय, हे पाहिल्यावर मला पुढे फार काही बोलता आलं नाही. तसंच काही मंडळींनी मेल करत, या सदरात आणखीन काय-काय विषय यायला हवेत, याविषयीही सूचनाही केल्या, तेही भावलं. कारण कदाचित त्या प्रत्येक व्यक्तीलाच त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांवरील उत्तरं या सदरातून मिळू शकतील, असा विश्वास होता. याशिवाय एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे, आप्तेष्ट, स्नेही, यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, त्यांच्या त्या उद्गारांतून मिळणारी शाबासकी आणि माणूस म्हणून जगत असताना, आपण त्यांना अभिमानास्पद वाटेल असं काहीतरी करू शकतोय, याचं अंतर्बाह्य़ समाधान!

कसं असतं ना.. एक व्यासपीठ मिळणं आणि तिथे तुम्हाला मुक्तपणे संचार करता येण्याची लाखमोलाची संधी मिळून, त्यातून तुम्ही जे आहात, जसे आहात, तेच तसेच, पण आता मात्र एक वलयांकित व्यक्ती, असं आपसूक रूपांतर होतं. ती ताकद नक्कीच ‘लोकसत्ता’, त्याचे संपादक आणि त्याचा वाचकवर्ग या साऱ्यांची. ‘आपण समाजासाठी काही तरी केलं पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतो,’ हा विचार अतिशय उदात्त आहे. तितकाच, खरं तर खूपसा, अनेकदा नुसताच उद्धृत केला जाणारा. लेखणी हे त्यासाठी अत्यंत मोलाचे अस्त्र, प्रभावी माध्यम आहे, हे आजपर्यंत कित्येकांनी दाखवून, पटवून दिलंय. त्यामुळे अर्थातच ती जबाबदारी मोठी. आपल्या आजूबाजूच्या समाजात परिवर्तन व्हावं, एक निकोप समाज घडावा, ही आपल्या सर्वाचीच इच्छा.

परंतु त्यासाठी प्रबोधनाआधीची महत्त्वाची पायरी असते, ती म्हणजे अनेक बाबींत असणारं अज्ञान, त्याची जळमटं, काही समजुती, यांना सहज हात घालून, त्या कशा कायमच्या मोडून टाकता येतील, अज्ञानावरचा पडदा कसा दूर सारता येईल, हे बघण्याची. ‘प्रबोधन’ हा फार मोठा शब्द. परंतु त्यासंदर्भाने या लेखमालेतून काहीअंशी खारीचा वाटा उचलता आला, हेसुद्धा आपल्याच सगळ्यांच्या प्रतिक्रियेतून समजले. ‘नात्यांची उकल’, ही काही क्षणांत, काही दिवसांत, किंवा काही काळात होण्यासारखी बाब नाही. नाती हा जगण्यासारखाच सुंदर प्रवास आहे. त्यामुळे जगताना, नात्यांच्या प्रत्येक अंगाला कुरवाळत, सावकाश सामोरं जात, ती उकल अंतापर्यंत करत राहणे, हा तो प्रवास. त्यात कायम उपयोगी पडणाऱ्या बाबी, म्हणजे आत्मभान, प्राधान्यक्रम, प्रेम, जिव्हाळा आणि डोळसपणे बघण्याची वृत्ती.

यातूनच नाती हळूहळू सुलभ, सुसह्य़ होत जातात. मग ती जगताना येणाऱ्या अडथळ्यांपेक्षा, जगण्यासाठीची नितांतसुंदर गरज, अशा स्वरूपात सामोरी येतात. त्यामुळे या लेखाला ‘समारोपाचा लेख’ असं तरी कसं म्हणणार? वर म्हटलं त्याप्रमाणेच आयुष्याच्या नजरेत नजर मिसळून, आत्मविश्वासाने, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आव्हान पेलून, परंतु सहजतेने जगता आलं, तर जगण्याची मजा काही औरच, नाही का? त्यामुळे या लेखमालेला क्षणभर विश्रांती घेऊ दे. यात अर्धविराम असू दे. आपण मात्र ही उकल अव्याहत चालूच ठेवू या. असेच भेटत राहू या, या ना त्या कारणाने..

(सदर समाप्त)

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:17 am

Web Title: ongoing exploration of ongoing relationships abn 97
Next Stories
1 आभाळमाया : कलासक्त साहचर्य
2 पाणी नियोजनातही लिंगभेद?
3 तत्त्वज्ञ आणि उदासीन
Just Now!
X