रती भोसेकर ratibhosekar@ymail.com

‘हे विश्वची माझे घर’ याचा याची देहा.. साक्षात्कार आपल्याला करोनामुळे अनुभवायला मिळाला आहे. कुठे दूर वुहान या चीनच्या एका शहरात उगम पावलेला हा विषाणू सर्व देशांच्या वेशी वेशीवर टांगून सर्व विश्वाला आपलं घर मानून बसला आहे. आपल्याला कळून चुकलंय, की आता आपलं जग हे पूर्वीच्या जगापेक्षा खूप वेगळं असणार आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्च २०२० पासून आपण भारतात याला सामोरं जात आहोत. वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग, उद्योग क्षेत्र, शेती, शिक्षण, आदी सर्वच क्षेत्रांना कोलमडून पडायची वेळ आली होती. पण प्रत्येक क्षेत्रानं आपापल्या वाटा शोधल्याच आणि अजूनही शोधत आहेत. वैद्यकीय क्षेत्रानं तर अशी काही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे, की आता त्यातील प्रत्येक जण अतिशय आत्मविश्वासानं या आजारातून जास्तीत जास्त जणांना बाहेर काढत आहे. एका डॉक्टरांशी बोलताना ते म्हणाले, की ‘करोना बहरूपियाँ हैं। कब कैसे सामने आए। हम भी सिख रहे हैं।’

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हा बहरूपिया प्रत्येक क्षेत्राला काही ना काही नवीन शिकवत आहे.  शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतही गेल्या वर्षभरात आपल्याला कितीतरी सकारात्मक बाजू आढळून आल्या. शिक्षण क्षेत्र- जे बदलता येणं कठीण आहे, असं वाटत होतं त्यात कितीतरी बदल घडून आले. बहुतांशी शिक्षकवर्ग तांत्रिक बाबींपासून लांब राहायचा. फळा आणि खडू यांनाच शिक्षणाची साधनं मानायचा तो आता धडपडत का होईना तांत्रिक बाबी शिकण्यास तयार झाला. सुरुवातीला गोंधळलेले सगळेच आपापल्या परीनं मार्ग काढत राहिले. शाळा ही फक्त शाळेच्या इमारतीत न भरता ती घरोघर पोहोचेल याचा प्रत्येक स्तरावर विचार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्नही झाला.

एकूण शाळेचे वेगवेगळे प्रकार आजमावले गेले. पण हे असं असलं, तरी अनेक विद्यार्थी  शिक्षण प्रवाहाबाहेर गेले आहेत हे भीषण वास्तव समोर आहे. त्याची अनेक कारणं आहेत- जसं नोकरी धंदा बंद झाल्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुटुंब स्थलांतरित झाली आहेत, दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण पोहोचवता आलं नाही, तर कित्येक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाला पूर्णविराम मिळून बालविवाहाचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच गेल्या वर्षभरात बालमजुरीचंही प्रमाण वाढलं आहे. या मुलांना प्रवाहात आणणं हा वेगळा महत्त्वाचा विषय आहे.

पण जे विद्यार्थी या ना त्या प्रकारे शिक्षण प्रवाहात टिकले आहेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत.  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला दूरस्थ पध्दतीनंच संपर्कात राहावं लागणार आहे हे आता नक्की झालं आहे. या मुलांच्या क्षमताविकासाचा अंदाज कसा घ्यायचा आणि घेतला असेल तरी तो कितपत बरोबर असेल, हा प्रश्न भेडसावतो आहे. त्या मुलांसाठी

‘ब्रिज कोर्स’ची निर्मिती करण्याचं काम सुरूआहे. त्यानुसार पुढच्या वर्गात गेल्यावरही मागच्या वर्गाची उजळणी कशी असावी, कोणत्या स्वरूपात घ्यावी, याचं मार्गदर्शन शिक्षकवर्गाला देण्यात येणार आहे. तसेच पालकांनाही पाठय़पुस्तकांवरून उजळणी करुन अभ्यासक्रम किती कळला आहे याची चाचपणी करून घ्यायची आहे.

शिक्षकांबरोबर पालकही यात सामावले हे योग्य. पण त्याचबरोबर मुलांनाही काय शिकायचं आहे व कसं शिकायचं, हे ठरवण्याच्या  प्रक्रियेत सामावून घेतलं पाहिजे. सद्यपरिस्थितीनुसार शिक्षणाचं स्वरूप कसं असावं या विचारात मुलांना कसं सामावून घेता येईल, हा विचार मोठय़ा प्रमाणात करायला हवा. आपण त्यांच्यासाठी काय योग्य, काय योग्य नाही हे ठरवत आहोत. आपण त्यांना काय येतं याची चाचपणी करणार आहोत. हे सगळं मुलांच्या संमतीनं व मतानं व्हायला पाहिजे. तर ती खऱ्या अर्थानं  शिकण्याची प्रक्रिया होईल.

तसंच यात मागच्या वर्षीचे शिक्षक व या वर्षी तोच वर्ग घेणारे शिक्षक यांचा समन्वय होणं हा फार महत्त्वाचा धागा आहे. तोच शिक्षक पुढचा वर्ग घेणार असेल तर प्रश्न नाही, पण जर नवीन शिक्षक वर्ग हाती घेणार असेल तर मात्र त्याला या परिस्थितीत आपला विद्यार्थी व त्याचं घर समजावून घेण्यास बराच वेळ जाईल. त्यामुळे आधीच्या वर्गातील शिक्षकाची पुढच्या आपल्या सहकारी शिक्षकवर्गाला आपले विद्यार्थी व त्यांचे पालक समजावून देण्यास महत्त्वाची मदत होईल आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यातला पूल जोडला जाईल. यामध्ये विद्यार्थी समजावून घेताना आधीच्या शिक्षकाला पुढच्या वर्षीच्या शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थाच्या क्षमतांचे काय अंदाज आले आहेत, ती मुलं कोणत्या परिस्थितीला सामोरी जात आहेत, याचा आढावा देता येईल. तर त्या मुलांचं घर समजून घेताना आधीच्या शिक्षकानं गेल्या वर्षभरात अगदी शेवटच्या मुलाच्या पालकापर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न केले, प्रत्येक घरातील पालक कसा आहे, त्याचा काय व कसा सहभाग करून घेता येईल, याचा संपूर्ण आढावा देता येईल. हा ‘ब्रिजिंग’चा प्रयोग आम्ही  आमच्या शाळेत (सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे) इथे केला आहे. प्रत्येक पालकाचा आढावा आमच्या शाळेत आम्ही त्याच वर्गाच्या पुढच्या शिक्षिकेला दिला आहे. आमच्या ‘प्राथमिक’मध्ये जाणाऱ्या मुलांच्या पालकांचाही आढावा आम्ही प्राथमिक शिक्षिकांना दिला आहे. जेणे करून विभाग बदलला तरी त्या पालकांचं व विद्यार्थ्यांचं सुकर संक्रमण होईल.

सद्यपरिस्थितीनुसार मुलांच्या लेखन-वाचन क्षमतांपेक्षा भावनिक व मानसिक विकासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मुलांबरोबर बोलता येणं, त्यांना बोलतं करणं याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. या काळात मुलं किती व कोणत्या भीतीला सामोरी जात असतील आणि गेली असतील. कित्येक दिवसात मुलं एकमेकांना भेटली नाहीत, मैदानावर खेळली नाहीत. जर त्यांना एकत्र येण्याची संधी मिळाली, तरी त्यांच्या नुसतं या मोकळ्या वातावरणात असण्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच एकत्र येण्याची संधी मिळाली तरी त्यांना गणित, भाषा, किती व कसं शिकवायचं यावर सध्या भर देऊ नये. शिकण्यासाठी अनुकूल शारीरिक व मानसिक वातावरण असेल तरच आपल्याला त्यांच्या बौध्दिक क्षमतांच्या विकासासाठी उपाय करता येतील. प्रत्येक गावातील, घराघरांतील कहाण्या वेगळ्या असतील याची जाणीव ठेवून एकच अंगरखा न ठेवता, ‘टेलरमेड’ कार्यक्रम हाती घ्यायला हवा. त्यासाठी अगदी प्रत्येकानं केवळ शासनानं असं सांगितलं म्हणून तसं केलं, असं न करता आपल्या आपल्या परिस्थितीनुसार काय योग्य याचा आढावा घेऊन आपल्याला कशी मार्गक्रमणा करावी लागणार आहे, हा उलटा आढावा सादर केला पाहिजे. त्यासाठी शिक्षकानं फक्त आपल्या आपल्या वर्गापुरता सखोल विचार करून कार्यक्रम आखला पाहिजे.

बरेच पालक गावागावांत विखुरले गेले आहेत. तिथे वेगवेगळ्या वयोगटातील मुलं एकत्र असल्यामुळे, एकमेकांना शिकवण्याचे अनुभव अचंबित करणारे आहेत. शिक्षकवर्गानं त्याला एक औपचारिक स्वरूप दिलं, तर हे मोठे ताई-दादा चांगले शिक्षण-मदतनीस म्हणून मदतीला तयार होतील.

अजून एक असं वाटतं, की वर्गानुसार अभ्यासक्रमाबाबतही वेगळा विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. अभ्यासक्रमाकडे फक्त शैक्षणिक कौशल्यं शिकवणं या उद्दिष्टानं न पाहाता एक माणूस घडवणं, आलेल्या परिस्थितीला सक्षमपणे सामोरी जाणारी व्यक्ती घडवणं, असं उद्दिष्ट म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी इयत्तेनुसार अभ्यासक्रम न ठेवता मुलांच्या वयानुसार काही प्रत्यक्ष जीवनाधारित क्षमता ठरवून त्यावर काम करणं गरजेचं आहे.

एकूण शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या व मुलांशी निगडित असणाऱ्या प्रत्येकालाच ‘बहरुपिया’ होऊन आपल्या आपल्या मुलांपर्यंत पोहोचायला लागणार आहे.