23 September 2020

News Flash

महामोहजाल : ‘ऑनलाइन’ शिक्षण ‘इष्टापत्ती’ मानताना..

कदाचित मुलांचं ऑनलाइन शिक्षण आपल्या पालकत्वाच्या प्रवासाला एक वेगळा, समृद्ध आयाम देणारं ठरू शकेल..

प्रसाद शिरगांवकर – prasad@aadii.net

शाळा, शिक्षक, पालक आणि मुलांच्याही ध्यानीमनी नसताना ‘करोना’मुळे शाळा अचानक ‘ऑनलाइन’ भरू लागल्या. ऑनलाइन शिक्षणातली तांत्रिक आणि इतर आव्हानं पार करण्याची धडपड अजूनही सुरू आहे. या लेखमालेत आपण आतापर्यंत ऑनलाइन जगातल्या धोक्यांविषयी आणि उपाययोजनांविषयी अनेक लेख वाचले, मात्र आता रीतसर होत चाललेल्या ऑनलाइन शाळांमुळे वेगळी आव्हानंही समोर येत आहेत.  त्यावर मात करणं गरजेचं आहे. कदाचित मुलांचं ऑनलाइन शिक्षण आपल्या पालकत्वाच्या प्रवासाला एक वेगळा, समृद्ध आयाम देणारं ठरू शकेल..

‘ऑनलाइन शाळा’ हा सध्या सर्व पालक, शिक्षक, शाळा आणि मुलामुलींच्याही जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. टाळेबंदीच्या काळात सरकारनं शाळा ऑनलाइन सुरू करायला परवानगी दिली आणि अनेक शाळांनी हे ऑनलाइन वर्ग सुरू केले. टाळेबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अद्याप शाळा आणि शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष सुरू करायला परवानगी मिळालेली नाही आणि आणखी किमान महिना-दोन महिने तरी ती मिळेल असं दिसत नाही. ती परवानगी जेव्हा मिळेल तेव्हाही जर ‘करोना’वर रामबाण उपाय किंवा लस सापडलेली नसेल, तर किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील, हाही एक मोठा प्रश्न आहे.

याचं मुख्य कारण म्हणजे शाळेत ‘सामाजिक अंतर’ राखणं शक्य नसतं. मुलं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून गप्पा मारतात, एकमेकांच्या उरावर बसून दंगामस्ती करतात, एकमेकांच्या डब्यातलं अन्न वाटून घेऊन खातात, मैदानावर भरपूर अंगमस्ती असलेले खेळ खेळतात. हे सगळं शाळांमध्ये होणं सामान्य आहे, ते व्हायलाच हवं. या सगळ्यामधून मुलांना मिळत असलेलं सामाजिक शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. पण एखाद्या संसर्गजन्य रोगाची जागतिक साथ आलेली असताना हे सगळं होऊ देणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्यक्षातल्या शाळा इतक्यात सुरू होणं शक्य नाही, किंबहुना नाही झाल्या तरच उत्तम. अशा परिस्थितीत मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून सरकारनं ऑनलाइन शाळा सुरू करायला सांगितलं. अनेक शाळांनी स्वत:हून त्या सुरू केल्या. शाळा, शिक्षक आणि पालक कुणालाही पुरेसा विचार किंवा पुरेशी तयारी करायची संधी न मिळताच ऑनलाइन शाळा सुरू झाल्या. त्यामुळे अर्थातच सुरुवातीचे काही दिवस अत्यंत गोंधळाचे होते, जे अजूनही अनेक ठिकाणी दिसत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी कोणता ‘सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म’ वापरायचा, तो प्रभावीपणे कसा वापरायचा याचा काहीही अभ्यास किंवा प्रशिक्षण नसताना शाळांनी जे समोर उपलब्ध आहेत ते प्लॅटफॉम्र्स वापरून शाळा सुरूकेल्या. काही शाळांनी तर पाच-सहा तासांचे सलग वर्ग सुरू केले. आणि इथपासून पालकांची धावपळ आणि तगमग सुरू झाली. अर्थात सुरुवातीच्या अडचणींवर मात करून ऑनलाइन शाळा गेले दोनेक महिने भरत आहेत. पण आता काही महत्त्वाची आव्हानं समोर येत आहेत ज्यांच्यावर सर्व पालक, शिक्षक आणि शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी विचार करणं गरजेचं झालं आहे.

पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान म्हणजे मुलांचा शाळा आणि शिक्षणातला रस टिकवून ठेवणं आणि जमलंच तर तो वाढवणं, हे आहे. ऑनलाइन शाळा हा मुलांसाठी पूर्णपणे नवा अनुभव आहे. वर्गात इतर मित्रमैत्रिणींसोबत बसून हसतखेळत, दंगामस्ती करत शिकण्याऐवजी आपल्या घराच्या एका कोपऱ्यात एकटय़ानं बसून ‘व्हिडीओ कॉल’वर स्वत:ला ‘म्यूट’ करून ठेवून शिकणं हे दोन पूर्णपणे वेगळे अनुभव आहेत. एखाद्या विषयात रस नसेल, एखादा विषय नीट समजत नसेल, एखादा शिक्षक नीट समजावून सांगत नसेल, तर त्या ऑनलाइन वर्गात लक्ष भरकटून जाणं आणि मुलांनी ‘बोअर’ होऊन वेगळंच काही करत बसणं इथे सहज शक्य असतं. काही मुलांना मुळातच शिक्षणात रस असतो. ती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आपलं शिकणं सुरू ठेवतीलच. पण अनेक मुलांना शिक्षणात फारसा रस नसतो, फार मजा येत नसते. अशा मुलांना शैक्षणिक विषय रोचक वाटणं आणि त्यांचं ऑनलाइन वर्गात लक्ष टिकून राहाणं यासाठी शिक्षकांना अनेक नावीन्यपूर्ण उपाय आणि प्रयोग करणं गरजेचं आहे. आपला विषय समजावून सांगण्यासाठी फळा-खडूसोबतच सादरीकरणांचा (‘प्रेझेंटेशन’) वापर करणं, ते सादरीकरण अत्यंत रोचक वाटेल अशा पद्धतीनं बनवणं, ऑनलाइन वर्गावरच पूर्ण भर देण्याऐवजी आपल्या विषयाशी संबंधित छोटे-छोटे व्हिडीओ मुलांना पाठवणं आणि ते त्यांच्या सवडीनं दिवसभरात बघायला सांगणं, यांसारखे अनेक प्रयोग अनेक शिक्षक करत आहेत. अशा प्रयोगांची माहिती अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचवायला हवी अन् त्यांनी ती आत्मसात करायला हवी.

या बाबतीत पालकांचा दृष्टिकोन अन् त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. अनेक पालकांना ऑनलाइन शाळा ही कल्पनाच रुचलेली किंवा पचलेली नाही. शाळा ऑनलाइन सुरू झाल्या म्हणून त्यांनी मुलांना ‘गॅजेट्स’ इत्यादींची सोय करून दिली खरं, पण एकूणात या प्रकाराबद्दल त्यांचा अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन आहे असं दिसतं आणि तो ते मुलांसमोर सतत मांडत राहतात असंही दिसतं. पालकांना या कल्पनेत किंवा उपक्रमात रस नसेल किंवा ते अत्यंत बळजबरीनं केल्यासारखे प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणात रस वाटणं आणि त्यांनी मनापासून शिक्षण घ्यायचा प्रयत्न करणं, हे दोन्ही अवघड बनतं. आणखी दोन-तीन महिने शाळा ऑनलाइन सुरू राहिल्या, तर हे निम्मं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन होणार आहे. अन् त्यापुढेही ऑनलाइन शिक्षणातले अनेक पैलू सुरूराहण्याची शक्यता आहे (किंवा राहायला हवेत). असं असताना पालकांनी ही तात्पुरती मलमपट्टी आहे, हा विचार बाजूला ठेवून मुलांच्या ऑनलाइन शाळेत मनापासून सहभागी होणं गरजेचं आहे.

मुलांना एकदा शाळेत सोडलं, की त्यांच्या शिक्षणाची आपली जबाबदारी संपली, असा अनेक पालकांचा दृष्टिकोन असतो. ऑनलाइन शाळेमध्ये हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलायची गरज आहे. मुलं ऑनलाइन शाळेत असली, तरी ती आपल्या डोळ्यासमोर बसून शिकत आहेत, पूर्णवेळ घरात आहेत, त्यामुळे त्यांचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे का, हे बघणं ही आता शिक्षकांइतकीच पालकांचीही जबाबदारी आहे. यासाठी नियमितपणे ‘आज शाळेत काय झालं,’ हे विचारणं, जे सुरूआहे, ते मुलांना समजतंय का, याचा अंदाज घेणं, कुठे अडत असेल, काही समजत नसेल, तर ते समजावून सांगणं किंवा त्या विषयासंबंधीचे व्हिडीओ मुलांसोबत एकत्र बघणं, अशा अनेक गोष्टी पालकांनी केल्या तर मुलांच्या ऑनलाइन शाळा जास्त सकारात्मक आणि प्रभावी ठरतील.

दुसरं महत्त्वाचं आव्हान गॅजेट्सच्या वापराचं आहे. नव्या पिढीतली बहुसंख्य मुलं ‘टेक्नोसॅव्ही’ असतात. नवी गॅजेट्स अन् त्यावरची ‘अ‍ॅप्स’ ती अत्यंत लीलया वापरू शकतात. ऑनलाइन शाळा सुरूहोण्याच्या आधी बहुसंख्य मुलं ही गॅजेट्स आणि अ‍ॅप्स प्रामुख्यानं मनोरंजनासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी वापरायची. त्या वेळी आपण बहुसंख्य पालक गॅजेट्सचा वापर कमीतकमी केला पाहिजे, असं त्यांना सतत सांगत राहायचो, त्याच्या वापरावर अनंत बंधनं घालायचो. ऑनलाइन शाळा सुरू झाल्यापासून मात्र आपण त्यांना गॅजेट्स देऊन ती मुक्तपणे वापरू देत आहोत. मनोरंजन आणि गेम्ससोबत ऑनलाइन शाळेसाठीही गॅजेट्स वापरत असल्यानं मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येणं, मानसिक थकवा येणं, पुरेशी शांत झोप न लागणं, असुखावह स्थितीत अनेक तास बसल्यानं अंगदुखी, पाठदुखी होणं, असे अनेक परिणाम दिसायला लागू शकतील. हे होऊ नये यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. दोन वेगवेगळ्या स्क्रीन टाइम्सच्या मधल्या काळात मुलांना पुरेशी ‘मधली सुटी’ घ्यायला लावणं, अन् त्या काळात काहीतरी शारीरिक कष्टाचं काम किंवा उपक्रम करायला सांगणं, हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. घरच्या घरी करता येतील असे दोरीच्या उडय़ा किंवा सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम करायला सांगणं, मुखपट्टी लावून बाहेर मोकळ्या हवेत सायकलवर फेऱ्या मारायला सांगणं, घरकामात मदत करायला सांगणं, स्वयंपाकघरात मदत किंवा (मुलांच्या वयानुसार) एखाद्या वेळी पूर्ण स्वयंपाकच करायला सांगणं, असे थोडे शारीरिक कष्टाचे अनेक उपक्रम मुलांना सांगता येऊ शकतात, सांगायला हवेत. याशिवाय सर्व कुटुंबीयांनी एकत्र बसून गप्पा मारणं, पत्ते किंवा ‘बोर्ड गेम्स’ खेळणं (अर्थात आई-वडिलांनीही आपापले फोन दूर ठेवून) हाही स्क्रीन टाइम कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे.

शेवटचं महत्त्वाचं आव्हान म्हणजे मुलं ऑनलाइन जगात सुरक्षित राहतील याची काळजी घेणं. मुलांचा गॅजेट्सचा वापर जसजसा वाढतो आहे, तसतशी ऑनलाइन जगातली जोखीमही वाढते आहे. ऑनलाइन दादागिरी (‘बुलीइंग’) पासून ते तोतयेगिरी (‘फिशिंग’) आणि अश्लीलतेपर्यंत अनेक धोक्यांना मुलं सहज बळी पडण्याची शक्यता असते. या लेखमालेत गेले सात महिने ऑनलाइन जगातल्या धोक्यांविषयी आणि त्यावरच्या उपाययोजनांविषयी अनेक लेख लिहिले गेले आहेत. ऑनलाइन शाळांमुळे मुलांच्या वाढलेल्या ऑनलाइन वावराच्या संदर्भात त्या लेखांची पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे, आणि ऑनलाइन जगात मुलं सुरक्षित राहतील यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी प्रत्येक पालकानं केली पाहिजे.

‘करोना’च्या  जागतिक साथीचं संकट लवकरच संपावं अन् आपलं आयुष्य पूर्वीसारखं सुरू व्हावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत आहे. आपल्या मुलांनाही हेच वाटत असणार आहे. प्रत्यक्षातली शाळा, मित्रमैत्रिणींसोबतची दंगामस्ती, मैदानावर भरपूर खेळणं, हे सारं मुलं ‘मिस’ करत असणार आहेत. प्रचंड ऊर्जा असलेल्या वयात घरात कोंडलं जाणं, हा त्यांच्यासाठी खूप वेगळा आणि नकारात्मक असा अनुभव आहे. अशातच ऑनलाइन

शाळा या नव्या शिक्षणपद्धतीशी जुळवून घेण्याचा नवा ताणही त्यांच्यावर असणार आहे. या काळात त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं, त्यांनी चिडचिड करणं, छोटय़ा-छोटय़ा कारणांनी संतापणं, वा रडणं, हे सारं घडू शकतं. त्यांची कोंडी, त्यांचे ताण, त्यांच्या भावविश्वातली वादळं, ही आपण समजून घेतली पाहिजेत आणि शक्य होईल तेवढा त्यांच्यासाठी भक्कम आधार झालं पाहिजे.

‘करोना’च्या संकटामुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शाळा हे संकट सरल्यावर बंद होतील. प्रत्यक्षातल्या शाळा सुरूही होतील. मात्र नजीकच्या भविष्यातच ‘ऑनलाइन’ आणि ‘ऑफलाइन’ अशा दोन्ही पद्धतींमधल्या फायद्यांचा विचार करून, त्या दोन्हींचा समावेश असलेली अशी संमिश्र शिक्षण पद्धत सुरू होण्याची शक्यता आहे. हे होईल तेव्हा मुलांचं ऑनलाइन शिक्षण प्रभावी व्हावं म्हणून आज करत असलेले सर्व प्रयत्न मोलाचे ठरतील. याशिवाय ऑनलाइन शाळेच्या निमित्तानं पालक म्हणून आपल्या मुलामुलींच्या शिक्षणात होत असलेला आपला सहभाग आणि त्यांच्या भावविश्वात आपल्याला मिळू शकणारं स्थान, यानं पालक म्हणून आपला प्रवास अधिक समाधानी आणि अर्थपूर्ण होत राहील.

‘करोना’ची आपत्ती अन् त्यातून घाईनं सुरू झालेल्या ऑनलाइन शाळा ही आपल्यासाठी ‘इष्टापत्ती’ ठरून आपला पालकत्वाचा प्रवास समृद्ध करणारी ठरावी, यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. ते करत राहू या.

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक व वक्ते आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 2:57 am

Web Title: online education mahamohajal dd70
Next Stories
1 चित्रकर्ती : ‘मंजूषा’ चित्रशैली
2 सायक्रोस्कोप : अपराधीपणाचं ओझं!
3 पडसाद : शाळेत सामाजीकरणाचे फायदेच!
Just Now!
X