प्रेम, लाड करून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. मात्र प्रेम व्यक्त करणं फार कठीण वाटतं आपल्या लोकांना. पण हळूहळू धीटपणा यायला लागलाय आणि सगळ्या नात्यांमध्ये मोकळेपणा दिसू लागलाय. नातं कुठलंही असो, प्रेम व्यक्त व्हायला लागलंय, आपल्याला हवं असणारं, हळूच सांगून जाणारं, ‘लव्ह यू डियर’..
कालच व्हॅलेंटाइन डे झाला. अनेकांनी अनेकांना आपल्या मनीचं गोड गुपित सांगितलं असेल. खरंच कोणीतरी येऊन हळूच कानात कुजबुजावं- ‘लव्ह यू, डिअर’. किती छान असते ना ही भावना! आपलं कुणीतरी आहे हे सांगणारी. जीव आसुसतो अशा शब्दांसाठी. माझ्यावर प्रेम करून आपलं म्हणणारं कोणी आहे, ही जाणीव अंतर्बाह्य़ सुखावून जाते. अनामिक लहर उत्साह िशपडीत जाते. जाणवतं, जगात मी एकटी नाही. प्रेमाने जवळ आलेली, वेगवेगळ्या नात्यात बांधलेली अनेक जण आपली आहेत ही जाणीव बळ देते. त्या शाब्दिक बळावर चढून जाता येतो अवघड कडा. अपयशाने दु:खी झाल्यावर समजून घेऊन नव्याने उभं राहण्यासाठी शाब्दिक आधार देणारे लोक आजूबाजूला आहेत, म्हणजे नक्कीच मी भाग्यवान, हे समजून येतं!
ऐन तारुण्यात स्वप्नाळू मनात गुलाबी छटा लेवून तो चीतचोर रेंगाळत राहतो. वाटत राहतं, अचानक येऊन म्हणेल, ‘लव्ह यू डाìलग, विश्वास ठेव माझ्यावर.’ त्याचं ते प्रेम स्वीकारायचं की नाकारायचं हे मात्र ठरत नसतं. मात्र ओढ असते गुलाबी प्रेमाची. दोघांनी भेटून एकरूप होणं याची धुंदी राज्य करते तरुण वयात. याच वयात असं होतं? नाही, तसं नाही, तर हे असं प्रेम कुठल्याही वयाला भुरळ घालतं, वेड लावतं, घोंघावत राहतं. कधी कधी न बोलताही ओळखता यावं लागतं रोमांचित प्रेम. तरीही जेव्हा शब्दातून व्यक्त होतं, ‘लव्ह यू डिअर’ तेव्हा सर्वागात पोहोचतं. तो क्षण अनमोल असतो. भिडलेली नजर आणि हळूवार स्पर्श.
जेवढी नाती तेवढय़ा प्रेमाच्या तऱ्हा, असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही होणार. काही नाती  जैविकतेतून आलेली, तर काही लग्नाने बांधली गेलेली. भेटलेली, तुटलेली, उघड, झाकलेली, स्पष्ट, अस्पष्ट, वरवरची, जिवाभावाची, घट्ट, सल, एखादं प्रेम उत्कट तर दुसरं अबोल. नात्यानात्यात तसंच, त्यातल्या भावनिक गुंतवणुकीत वेगवेगळ्या छटा. सहवासातल्या लहानांची काळजी वाटते, लाड कौतुक करतो त्यांचे आपण. आंधळी माया निरागस प्रेम करते. बरोबरीच्या मित्रमत्रिणी तर काळजाचा तुकडाच होतात. खरी मत्री ओळखणं, जपणं, वाढवणं आणि टिकवणं म्हणजेच बंधुभाव मनात जपणं. तारुण्यात भेटतात, निदान भेटावेसे वाटतात ते प्रियकर आणि प्रेयसी. अतिशय उत्कट तारुण्याची प्रेमभावना. काहीजण मुंडावळ्या बांधून होतात एकरूप, करतात प्रेमाची उधळण!
प्रेमाला रंगरूप नसतं. आजूबाजूच्या ज्येष्ठांची काळजीही अशाच प्रेमातून व्यक्त होते. हवं नको, आवडीनिवडी त्यांच्यासाठी जपल्या जातात. त्यांनी दिलेल्या संस्कारांचे आचरण आणि आदर एक प्रकारचे प्रेमप्रतीक असते. हक्काची माणसं लागतातच काहीतरी मागायला, बोलायला तर कधी रडायला खांदा त्यांचा. पाठीवरून फिरवलेला हात लागतोच धीर देणारा. नतमस्तक व्हावं अशी माणसं भेटणं श्रीमंतीचं लक्षण असतं. निर्मळ प्रेमाचा ओघवता स्रोत जिथे असतो ते तीर्थस्थान असतं. परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याच्याशी एकरूपता साधणं, त्यांच्या प्रेमात असते फक्त भक्ती. या झाल्या प्रेमाच्या थोडय़ाशा काही छटा. अजूनही खूप आहेत जीवनाला कलाटणी देणाऱ्या. ज्याला अशी सगळी नाती मिळतात तो भाग्यवान असतो. पण अनेकदा आपण ते व्यक्त करत नाही. अनेकदा मग ते अव्यक्तच राहतं आणि नंतर त्याचा पश्चातापही होतो.
‘आपल्या संस्कृतीत हे असं प्रेम शब्दांत व्यक्तबिक्त करत नाही,’ ग्रुपमधला एक मित्र आमच्याशी वाद घालत होता. ‘ते ‘आय लव्ह यू’, ‘मिस यू’ हे सगळं आंग्लाळलेली मंडळी करतात. आपण नाही. आपल्याकडे प्रेम हे समजून घ्यायची गोष्ट आहे. कृतीतून उमजून घ्यायची गोष्ट आहे. आपल्या माणसाचं प्रेम कळतंच.’’
आम्ही विचारलं, ‘आणि कळत नसेल तर?’
‘छे छे असं नसतं. शब्दाबिब्दात सांगत नाही. वेडेपणा आहे हा.’
‘आपल्या माणसाचं प्रेम आपल्यावर असतंच रे, पण ते शब्दांतही व्यक्त करावं की, त्याने खूप जवळ येतो आपण’ आम्ही सांगत होतो, पण त्याचा विश्वास बसत नव्हता.
‘तुझ्या बाबांशी तुझं नातं कसं आहे?’ आम्ही विचारलं.
‘कसं म्हणजे? चांगलं आहे की.’
‘म्हणजे कसं, तू त्यांच्याशी कधीही, कोणतीही गोष्ट बोलू शकतोस?’
‘छे छे, काहीतरीच काय. मला बाबांची भीती वाटते. आज तिशीत आहे मी, पण धाडस गोळा करावं लागतं बोलताना.’
गावात राहणाऱ्या आणि पारंपरिक संस्कारात वाढलेल्या त्याच्या घरी असं वातावरण असणार हे गृहीत होतं म्हणूनच आम्ही त्याला छेडत होतो. ‘चल आत्ताच्या आत्ता बाबांना सांग ‘आय लव्ह यू’.
त्याने झटकला विचार. ‘वेडे आहात का?’
आम्ही म्हटलं, ‘हे बघ त्यांच्याकडे मोबाइल आहे ना. तू तुझ्या मोबाइलवरून फोन लाव. जास्तीतजास्त काय करतील? फोन ठेवून देतील. बघ तर खरं काय करताहेत. फोन स्पीकरवर ठेव, आम्हीही ऐकतो.’
‘छे छे. बाबांना असलं काही आवडणार नाही. मी नाही करणार.’ खूपदा सांगितल्यावर शेवटी त्याने फोन लावला. फोनची रिंग वाजू लागली तशी त्याची धडधड वाढली. फोन बाबांनी उचलला. तो म्हणाला, ‘मी बोलतोय. कसे आहात तुम्ही. आठवण आली म्हणून फोन केला.’
‘अरे बरं केलंस फोन केलास. आम्ही पण सकाळीच आठवण काढली तुझी.’ बाबा म्हणाले.
मग त्या मित्राने थोडा पॉज घेतला आणि म्हणाला, ‘बाबा एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला.’
बाबांनी सहज सुरात विचारलं, ‘काय रे.’
तो म्हणाला, ‘बाबा, आय लव्ह यू.’
क्षणभर शांतता. दुसऱ्या मिनिटाला त्यांनी पुन्हा विचारलं, ‘काय?’
त्याने पुन्हा सांगितलं. तसं ते खो खो हसायलाच लागले. म्हणाले, ‘अरे आमचंही आहे तुझ्यावर प्रेम. तू नसतोस ना इथे. खूप काळजी वाटते तुझी..’ मग काही मिनिटं त्याचं खूपच भावनिक बोलणं झालं. त्याने फोन ठेवला. आणि तो चक्क ढसाढसा रडायलाच लागला. म्हणाला, ‘माझ्या बाबांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे आणि मी इतकं मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकतो हे मला आतापर्यंत कळलंच नव्हतं. आणि कधी कळलंही नसतं. थँक्स.’
त्याला म्हटलं, ‘आता जेव्हा घरी जाशील तेव्हा पाया नको पडूस थेट त्यांना मिठी मार. आपण लहानपणीच फक्त आई-बाबांना मिठी मारतो. मोठेपणी काय आडवं येतं? बघ त्या मिठीची किमया. त्याला आता ते शंभर टक्के पटलं होतं. आणि ते तो नक्कीच करणार याची खात्री पटली.
या तीन शब्दांची अशी जादू असते, न कळणारी!
नातं आहे म्हणून गृहीत धरू नये, नातंही काही मागत असतंच. फक्त व्यक्त व्हावं लागतं. असाच प्रेमाचा अनुभव अनुभवला सासू सुनीताबाईंनी. गुजरातमध्ये भूकंप झाला त्या वेळची गोष्ट. सासूबाई स्वत:च्या जुन्यापुराण्या कागदपत्रांतून काहीतरी शोधत होत्या. इतरांच्या लक्षात येणार नाही असाच शोध घेत होत्या. पण हुशार सुनेच्या, मेघाच्या लक्षात आलंच. काय शोधताय म्हटल्यावर, ‘काही नाही’ म्हणून पहिल्यांदा आढेवेढे घेतले, अन् लगेच सांगून टाकलं, ‘अगं, माझी जिवलग मत्रीण राहायची गं भूजला. तिचा पत्ता, फोन नंबर लिहिला होता कुठेतरी. कुठल्या भागात घर होतं, आठवत नाही, म्हणून शोधते सगळं.’ मेघाने गप्पा मारता मारता मत्रिणीचं नाव विचारलं. नाव कानी पडताच तिला ते परिचयाचं वाटलं. मेघा बँकेत आहे. तिला आठवलं या नावाने दरमहा कोणीतरी पसे पाठवतं. बँकेत जाऊन तिनं शोध घेतला. नाव तेच, तसं फार शोध घ्यावाच लागला नाही तिला. सासूबाईंची मत्रीण नंदा मराठे आणि पसे पाठवणारी रमा नाईक. रमा आपल्या आईला दरमहा पसे पाठवत होती. तिचा पत्ता, फोन नंबर होताच नोंदवलेला. शोध घेतला आणि मेघा व रमा दोघींनी मिळून जंगी कार्यक्रमच आखला. भूकंप झाला तेव्हा नंदामावशी पुण्यात होत्या, घरात कोणीच नव्हतं. हे कळल्यावर सगळेच सुखावले. चला, त्यानिमित्ताने पार्टी करता येईल. या दोन जिवलग मत्रिणींबरोबर आणखीन शोधूयात, असं म्हणून त्यांच्या इतर मत्रिणींची नावं, पत्ते, माहिती गप्पांच्या ओघात दोघींनीही काढली. एके दिवशी मेघाने, वय वष्रे ७५ असलेल्या तिच्या सासूबाईंच्या आणखीन पाच मैत्रिणींना आपल्या घरी निमंत्रण दिलं. रमानं दोघींना आणलं. बाकीच्यांच्या घरच्यांनीसुद्धा या दोघींना सुंदर साथ दिली. मत्रिणी आल्या. सप्तकन्या एका शाळेतल्या, शेजारच्या वाडय़ात राहणाऱ्या जवळ जवळ ४०-४५ वर्षांनी एकत्र आल्या. मेघानं मस्त गेटटुगेदर केलं, मस्त भेटवस्तू दिल्या. सगळ्याजणी गळा पडून रडल्या. हे पाहून सासूबाई गहिवरल्या. शब्द मुके झाले. सगळे आपापल्या घरी परतल्यावर सुनेला जवळ मिठीत घेऊन सासूबाई म्हणाल्या, ‘काय म्हणू तुला? शब्द नाहीत गं माझ्याकडे. तुला आवडतात त्याच शब्दात सांगायचं तर, ‘लव्ह यू, डिअर.. सूनबाई!’

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे