01 December 2020

News Flash

आशावाद

सुख पाहता जवापडे। दु:ख पर्वताएवढे॥ असं सांगणाऱ्या तुकोबारायांनी आपल्या जीवनात दुर्दैवाचे दशावतार अनुभवले तरीही ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा।’ असं म्हणत त्या संकटांवर ते

| July 13, 2013 01:01 am

सुख पाहता जवापडे। दु:ख पर्वताएवढे॥ असं सांगणाऱ्या तुकोबारायांनी आपल्या जीवनात दुर्दैवाचे दशावतार अनुभवले तरीही ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा।’ असं म्हणत त्या संकटांवर ते स्वार झाले.
दैनंदिन जीवनात आपल्याशी संबंधित अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला हवे तेच आणि पाहिजे तसेच घडेल याची शाश्वती देता येत नाही. अनेकदा अंदाज आणि आडाखे चुकतात माणसे निराश आणि हतबल होतात. ‘आमच्या बाबतीत हे नेहमी असंच घडतं’ असं उद्विग्न होऊन म्हणत राहतात. काही माणसे इतकी संवेदनशील आणि भावुक असतात की, ती आत्महत्येचाच मार्ग स्वीकारतात. आपण आपली दु:खं खूप सजवतो म्हणून असे घडते. इतरांच्या दु:खांशी तुलना केल्यानंतर आपली दु:खं किती छोटी आहेत आणि त्यातून निर्माण झालेले नराश्य किती अर्थशून्य आहे याची जाणीव होते.
वि. स. खांडेकर म्हणत, ‘जीवन एक यज्ञ आहे, सागर आहे, संग्राम आहे. ज्वालांशिवाय यज्ञ असू शकत नाही. लाटांशिवाय सागर असू शकत नाही आणि जखमांशिवाय संग्राम असू शकत नाही. हे ज्याला समजते आणि हे सत्य स्वीकारून ज्याची वाटचाल सुरू असते. त्यालाच जीवनाचा खरा अर्थ समजतो.’
सतत नकारघंटा वाजविणारी मंडळी एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने आणि आशावादी भूमिकेतून पाहायला तयारच नसतात. त्यांच्या बोलण्यात काही विधाने सातत्याने येत असतात. उदा. १. हे मला जमणारच नाही
२. हे केवळ अशक्य आहे. ३. हे मी अनेकदा करून पाहिलं पण..
४. हे मला जमलं नाही, तुला तरी कसं जमेल ?
जी माणसे आशावादी असतात. त्यांच्या बोलण्यात वरील विधाने खालील पद्धतीने येत असतात. १. त्याचा मी प्रयत्न करून पाहीन २. हे मला जमेलही ३. हे मी करून पाहिलं, अजून चांगल्या पद्धतीने करून पाहीन ४. हे मला जमलं नाही म्हणून काय झालं, तुला जरूर जमू शकेल.
आपण जे बोलत असतो त्याची स्पंदने आपल्या अंतर्मनात उमटत असतात. त्यानुसार आपली बुद्धी आणि कर्मेद्रिये काम करीत असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळातली अक्षर ओळख नसणारी एखादी आजी बजावत असे ‘घरात सतत नकारघंटा वाजवू नका. नन्नाचा पाढा वाचू नका. वास्तू तथास्तु म्हणत असते.’ यातला भाबडा आशय सोडून दिला तरी ती आजी आशावादाचे एक झाड मुलांच्या मनात लावत होती हे नक्की!
१ ऑक्टोबर १९१९ रोजी तेव्हाच्या दक्षिण साताऱ्यातील शेटफळ नावाच्या छोटय़ाशा गावातील काशिनाथपंत कुलकण्र्याच्या वाडय़ातली लहानथोर माणसे चिंतातुर होती. त्या घरात बाळ जन्माला येणार होते. बाळंतिणीच्या अंधाऱ्या खोलीकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. बाळंतिणीच्या खोलीचा बंद दरवाजा उघडला गेला आणि म्हातारी बायजा सुईण तोंडाला पदर लावत खिन्न चेहऱ्याने बाहेर आली. हे पाहून सगळी माणसे हवालदिल झाली. ‘काय झाले बायजा?’ सर्वानी विचारले. बायजा रडक्या स्वरात म्हणाली, ‘देवानं दिलं आणि कर्मानं नेलं. मुलगा होता, पण कसलीही हालचाल नाही. रडणे नाही.’ हे ऐकून संपूर्ण वाडय़ावर शोककळा पसरली. परसदारी खड्डा खणून त्यात त्या मांसाच्या गोळ्याला निजवून टाकण्याची तयारी सुरू झाली. ईश्वरी इच्छेपुढे कोणाचे काय चालणार? असा विचार मंडळी करीत होती. परसदारी खड्डा खणला गेला, पण त्या बायजा सुईणीला काय वाटले कोणास ठाऊक? या बाळाला खड्डय़ात निजवायचेच आहे कारण ते गतप्राण आहे. पण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असा विचार करून तिने चुलीतला एक फुललेला निखारा एका चिमटय़ात पकडून आणला आणि बाळाच्या नाभीजवळ नेला. बाळ रडले. घरात आनंदी आनंद झाला. ते बाळ म्हणजे मोठेपणी ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे बिरुद अभिमानाने मिरविणारे गीतरामायणकार गजानन दिगंबर माडगूळकर तथा गदिमा! त्या अशिक्षित बायजा सुईणीच्या मनात एक आशा चमकली आणि तिने ती कृतीत आणली. अन्यथा हा महाकवी महाराष्ट्राच्या वाटय़ाला आला असता का? तेच गदिमा सांगतात, ‘एक धागा सुखाचा। शंभर धागे दु:खाचे। जरतारी हे वस्त्र मानवा। तुझिया आयुष्याचे॥’ शंभर दु:खाचे धागे असूनही जीवनाचे वस्त्र जरतारी आहे हा आशावाद समजून घेतला पाहिजे.
पुण्यात (कै.) पु. ग. वैद्य यांनी ‘नापासांची शाळा’ सुरू केली. अनेक संस्थाचालकांना आपल्या शाळेचा परिसर हुशार मुलांनी गजबजून जावा असे वाटते. त्या पाश्र्वभूमीवर हे मोठे धाडसच होते. या शाळेची िनदा करणारी काही मंडळी या शाळेला ‘ड्रेनेज ऑफ पुणे सिटी’ म्हणत. वैद्य सरांना त्याची फिकीर नव्हती. एकाने त्यांना विचारले, ‘ही सगळी नापास मुले घेऊन तुम्ही काय करणार आहात ?’ त्यावर वैद्य सरांचे उत्तर होते. ‘सोन्याला कोणीही चकाकी आणून दाखवू शकतो, मला कोणताही धातू द्या मी त्याचे सोने करून दाखवितो.’ असे आशावादी शिक्षक असले तर विद्यार्थ्यांमध्ये कधीच नराश्य येणार नाही.
जीवनातल्या अनेक प्रसंगांना कर्तव्यकठोर होऊन सामोरे जाणे गरजेचे असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, ‘मढे झाकोनिया करती पेरणी। कुणबीयाचे वाणी लवलाही। तयापरी करी। स्वहित आपुले॥’ पाऊस पडल्यानंतर वाफसा होतो आणि त्याच काळात पेरणीसाठी पाभर धरावी लागते. अशा काळात जर शेतकऱ्याच्या घरात मयत झाली तर काय करायचे? महाराज सांगतात, मढे झाकून ठेवून आधी पेरणी करा. मढय़ावरती नंतर अंत्यसंस्कार करता येतील, पण पेरणीची वेळ निघून गेली तर तुमच्यावरच मरणाची वेळ येईल.’ ज्यांना अशी कर्तव्यकठोरता जमते, त्यांचेच जीवन तावूनसुलाखून निघते. अधिक परिपक्व  होते.
सुख पाहता जवापडे। दु:ख पर्वताएवढे॥ असं सांगणाऱ्या तुकोबारायांनी आपल्या जीवनात दुर्दैवाचे दशावतार अनुभवले तरीही ‘पिटू भक्तीचा डांगोरा। कळी काळासी दरारा।’ असं म्हणत त्या संकटांवर ते स्वार झाले. आयुष्यभर उपहास, उपेक्षा, उपमर्द वाटय़ाला येऊनही संत ज्ञानदेवांनी खळांची व्यंकटी सांडण्यासाठी आणि दुरितांचे तिमीर जाण्यासाठी सकारात्मक भावनेने ‘जो जे वांछिल। तो ते लाहो।’ अशी प्रार्थना करीत पसायदान मागितले. निराशेतून आशेचा किरण शोधत, नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करीत या संतांनी आणि थोर माणसांनी आपले जीवनमंदिर अधिक देखणे केले. म्हणूनच त्यांच्या जीवनमंदिराच्या कळसाचे दर्शनही आपल्याला प्रेरणा देते.
(कै.) वसंतराव कानेटकरांच्या ‘एकच कारण’ या नाटकातला तो तरुण विचारतो, ‘मला असे एक तरी कारण सांगा मी या देशात का राहायचे? सत्तेशिवाय पत, पशाशिवाय मान आणि शिफारशीखेरीज नोकरी मिळणारच नसेल तर काय करायचे?’ त्या मुलाचा प्रश्न चिंतन करायला लावणारा असला तरी निराश करणारा मुळीच नाही.
थोर माणसांच्या जीवनचरित्राकडे पाहत सर्वानी स्वत:ला बजावायला हवे, इतके निराश होण्याचे कारण नाही. इथे काटे आहेत तसे गुलाबही आहेत. कपाळावरच्या आठय़ा आहेत तशा गालावरच्या खळ्याही आहेत. नुसत्या अंधाराच्याच पारंब्या नाहीत त्यातून येणारे प्रकाशाचे कवडसेही आहेत. म्हणूनच सतत मांगल्याचा, पावित्र्याचा, आशावादाचा जयघोष करायला हवा. त्यामुळे जीवन सुंदर तर होईलच, पण जगायचं कसं? कशासाठी? हेही उमजेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:01 am

Web Title: optimism
टॅग Spiritual
Next Stories
1 विवाहपूर्व समुपदेशन
2 ओंजळभर फुलं…
3 दडपणं – तुमची, माझी, सर्वाची!!
Just Now!
X