|| संगीता जोशी
बा अदब, बा मुलाहिजा! शब्दांच्या पालखीत सजलेलं तिचं दु:ख आज पुन्हा समोर येत आहे. तिच्याच अश्रूंचे भोई पालखी ‘वाहून’ आणताहेत.. तिनं दु:खाचा नेहमी सन्मानच केला, कारण ते ‘त्यानं’ दिलेलं होतं. त्यानं दिलेली दु:खाची ‘वदीयत’.. दु:खाचा ठेवा.. तो जिवापाड जपायला हवाच नं?
‘कहाँ अब मैं इस गम से घबराके जाऊं
कि यह गम तुम्हारी वदीयत हैं मुझको..’
यातला ‘तो’ आहे तरी कोण? आणि ‘ती’? जिनं, त्यानं दिलेलं प्रत्येक दु:ख खुशीनं स्वीकारलं ती? ‘ती’ होती माहजबीन.. अर्थात चंद्रानना! आणि तो? तो म्हणजे ते ‘प्रेम’. भरभरून, आसुसून तिनं केलेलं प्रेम. या प्रेमातून तिला मिळालं ते केवळ दु:ख.. दु:ख.. आणि फक्त दु:खच!
‘मेरा जीना-मरना तुम्हारे लिए था
तुम्ही हो मसीहा, तुम्ही मेरे कातिल..’
प्रेमाची आस मनात धरून त्याची वाट पाहाणं हे तिचं जीवन होतं. तोच तिला जगवणारा होता. याच प्रेमासाठी तिनं मरणही स्वीकारलं, कारण प्रेम हेच तिचं जगण्यासाठीचं अमृत होतं आणि प्रेमापायीच तिनं अनंताची वाट पत्करली. ती त्या प्रकाशवाटेनं निघून गेली, त्या घटनेचं पन्नासावं वर्ष आता सुरू होईल. ३१ मार्च १९७२ हा तो दिवस. पुण्यात ‘हिंदविजय’ या त्या वेळच्या प्रतिष्ठित चित्रगृहात तिचे चाहते त्यांच्या आवडत्या ‘पाकीजा’ला रुपेरी पडद्यावर पाहात होते, तोच पडद्यावर शब्द उमटले.. ‘मीनाकुमारी जी का अभी अभी इन्तकाल हो गया; खुदा उन्हे जन्नत बख्शें’ तिला काय ‘जन्नत’ची, स्वर्गाची आस होती? तिला एकच हवं होतं, प्रेम! तिच्यावर वर्षांव करणारं, धबधब्यासारखं निखळ, नि:स्वार्थी प्रेम. पण ते स्वप्न अधुरंच राहिलं. प्रेम या कल्पनेवरच ती प्रेम करत होती. आपल्याला हवंय ते प्रेम मिळालं आहे याच कल्पनेत मश्गूल होती, पण कल्पना अन् वास्तव कधी एक असतात का?
‘मेरे ही ख्वाब मेरेलिए जहर बन गए
मेरे तसव्वुरात ने ही डस लिया मुझे..’
माझ्या कल्पनांनीच (तसव्वुरात) मला दंश केला आणि माझी स्वप्नं माझ्यासाठी विष ठरली. ‘प्यार एक ख्वाब था’ या कवितेत ती म्हणते,
‘वक्त ने छीन लिया हौसला-ए-जब्ते-सितम
अब तो हर हादिसा-ए-गम पे तडप उठता हैं दिल
हर नए जख्म पे अब रूह बिलख उठती हैं
होंठ अगर हंस भी पडे, आँख छलक उठती है..’
खूप अत्याचार सोसून झाले, आता त्यांच्यावर ताबा मिळवण्याचं सामर्थ्य माझ्यात उरलं नाही. आता प्रत्येक दु:खद घटनेचा सामना करताना हृदय तडफडतं, प्रत्येक नवी जखम सहन करताना आत्मा तळमळतो. वरवर ओठांवर हसू आणलं, तरी डोळे मात्र अश्रू ढाळत राहतात.
यात तिनं, ‘वक्त ने छीन लिया’ म्हटलंय.. शेवटी वक्त म्हणजे तरी काय? जन्मापासून मरणापर्यंतचा काळ- अर्थात जीवन. जीवनानं तिचं जगण्याचं सामर्थ्यच हिरावून घेतलं होतं. तिचे वडील अली बक्ष यांनी परिस्थितीवश तिला जन्मत:च
(१ ऑगस्ट १९३३) अनाथालयाच्या पायरीवर नेऊन ठेवलं होतं. अपराधी भावनेनं त्यांनी तिला परत आणलं खरं, पण ते आणण्यामागे प्रेम नव्हतंच. त्याचं कायम ‘बोझ’च झालं तिला. तेव्हापासूनच सुरू झालं होतं तिचं निष्प्रेम जगणं. ती लिहिते,
‘टूट गए सब रिश्ते आखिर
इस दुनिया में कौन किसीका झूठे सारे नाते..’
वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच तिला कॅमेऱ्यासमोर जावं लागलं. तेव्हा या क्षेत्रात ग्लॅमर नव्हतं. उलट चित्रपटात काम करणं हे कमी दर्जाचं समजलं जायचं. त्याला प्रतिष्ठा नव्हती. वडिलांच्या संसाराचं ओझं तिच्या चिमुकल्या खांद्यांवर आलं होतं. पहिल्या दिवसाच्या कामाचे एकदम पंचवीस रुपये मिळाले, त्या दिवशी हे कुटुंब पोटभर जेवलं! आई-वडील, मोठी बहीण खुर्शीद आणि धाकटी मधू. पुढे हे तिचं कर्तव्यच ठरून गेलं. ती बनली पैशाचं मशीन!
‘सुबह से शाम तक, दूसरों के लिए कुछ करना हैं
जिस में खुद अपना कोई नक्श नहीं,
जिन्दगी क्या हैं, कभी सोचने लगता हैं ये जहन
दर्द के साएं, उदासी का धुआँ, दुख की घटा
दिल में रह रह के ये खयाल आता हैं
जिन्दगी यह हैं, तो फिर मौत किसे कहते हैं?’
सारं जीवन ती दुसऱ्यांसाठी जगली. स्वत:साठीचा एक अंशही त्यात नव्हता. तिच्या वाटय़ाला आल्या फक्त दु:खाच्या काळ्या सावल्या, दु:खाचे ढग आणि औदासीन्य. या मरणप्राय जगण्याला जीवन म्हणायचं, तर मरण आणखी वेगळं काय असणार?
‘हर एक मोड पर बस दो ही नाम मिलते हैं
मौत कह लो, जो मुहब्बत नहीं कह पाओ..’
प्रेम सोडून जातं तेव्हा उरतं, ते फक्त एकाकीपण, तन्हाई, एकटेपणा.
तिनं प्रेम केलं, त्याच स्वप्नातल्या राजकुमाराशी तिचं लग्नही झालं. कमाल अमरोही तिचे पती, पण त्यांचं हे दुसरं लग्न होतं, तीन मुलंही होती, ते तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते, पण तिला हे सर्व मान्य होतं. ती इतकं प्रेम करत होती, की तिची दृष्टी जणू अंध झाली होती, पण प्रेमात ‘पझेसिव्ह’ असणाऱ्या माहजबीनला- मंजूला अपूर्णत: भासू लागली. कमाल यांना ती चंदन म्हणे. स्वतंत्र वृत्तीच्या मंजूच्या करिअरला चंदनची बंधनं आड येऊ लागली. नंतर ती स्वतंत्र एकटी राहू लागली. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असूनही एकटेपणा तिच्या वाटय़ाला आला. शायरी आणि डायरी हे दोनच विरंगुळ्याचे विषय होते.. मंजूचा राजकुमार मात्र दुरावला..
‘यह रात, यह तन्हाई,
ये दिल के धडकने की आवाज
यह सन्नाटा,
जज्बाते-मुहब्बत की आखरी अंगडाई
बजती हुई हर जानिब, यह मौतकी शहनाई..
सब तुमको बुलाते हैं..
पलभर को तुम आ जाओ..’
या एकाकीपणाचा शेवट कधी होईल? कधी तो प्रेमी येईल? अशा वेळी शायरीचाच आधार.
‘घंटो बैठकर सोचती हूँ,
कि कौनसी धडकन नज्म करूं?
कौनसा रंग मुट्ठीमें भर लूं,
किस लम्हे को कैद करूं?
हर शेर हैं भीगा-भीगासा
और नज्म हैं रूठी रूठी सी..’
तन्हाईच्या शिंपल्यात आसवांचे थेंब पडून कवितेचे मोती तयार होतात, हे त्या एकाकीपणाचं सुंदर फलित असतं. मी कोणत्या हृदय-स्पंदनाची कविता करू? कोणते रंग मुठीत, कवितेत धरून ठेवू? ते तर हातातून निसटताहेत..
एकदा मीनाकु मारीला कोणी तरी विचारलं, ‘तुम्ही शायरी-कविता का लिहिता?’
तिनं दिलेलं उत्तर मार्मिक होतं. ती म्हणाली, ‘‘मी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करते. ती व्यक्तिमत्त्वं म्हणजे मी नसते. जरी मी त्या भूमिका समरसून करते, त्या भूमिका मी जगते, तरी ते व्यक्त होणं ‘माझं’ नसतं. कविता ही माझी स्वत:ची अभिव्यक्ती असते. कविता ‘माझी’ असते आणि मी तिच्यात असते.’’ ती उत्तम कवयित्री असल्यामुळेच तिला हे उत्तर सुचलं.
शिवाय काव्य तिच्या रक्तातच असावं. तिची आई इक्बाल बेगम ही मूळची प्रभावती. तिला गोड गळ्याची ईश्वरी देणगी होती आणि तिचे वडील अली बक्ष हार्मोनियम वाजवत असत. त्यामुळे सूर आणि लय महाजबीनमध्ये जन्मत:च होती. शिवाय तिच्या आजीचं नातं थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबियांशी असल्याचं सांगितलं जातं. मग ती शायरीपासून दूर कशी राहाणार?
‘बिरहन’ या नज्ममध्ये ती लिहिते,
‘जवाँ बरसात की रात जलतरंग बजाती रही
लहक लहक के नयी लय के संग गाती रही
चमकती बूंदों की पाजेब झनझनाती रही..’
अल्लडपणे रिमझिमणाऱ्या रात्रीचं हे सुंदर वर्णन तिच्या निसर्गतादात्म्याची झलक दाखवतं. रात्र जलतरंग वाजवत आहे, नाचत नाचत लयीत जणू गात आहे आणि तिच्या पावलातल्या, थेंबांचे पैंजण (पाजेब) छुन छुन वाजत आहेत.
हे निशासंगीत ऐकत ती मात्र जागीच आहे हे लक्षात घ्यायला हवं, कारण ती विरहिणी आहे, प्रेमापासून वंचित आहे. निसर्गातील रूपकांच्या माध्यमातून तिनं आपली मन:स्थिती व्यक्त केलेली आढळते.
‘अनदेखे कदम’ या कवितेत ती लिहिते,
‘न जाने चाँद निकले कितने दिन हुए
देखो ना, कमसिन चाँदनी ने
समंदर में एक राहगुजर बना रक्खी हैं..
जिसपर कोई राहरौ नजर नहीं आता
मगर कदमों की चाप सुनाई देती हैं
बेशुमार अनदेखे कदमोंकी चाप..!’
चंद्राच्या कोवळ्या किरणांनी समुद्राच्या लाटांवर, पाहा ना, एक सोनेरी ‘वाट’ तयार केली आहे.. लाटांबरोबर हेलकावे घेणारी, पण त्यावर कोणी पथिक का बरं दिसत नाही? ही वाट अस्थिर आहे म्हणून? मग ही प्रेमाची वाट असावी! पण मला कुणाची तरी चाहूल का जाणवतेय? अनेक अनोळखी माणसं या वाटेवरून चालत येत आहेत, असा भास मला का होतो आहे?..
असं ‘विशफुल थिंकिंग’ या शब्दांतून व्यक्त होत आहे. उर्दू शायरीची ही खासियत आहे, की शब्दांच्या आडूनही खूप काही व्यक्त होत असतं. ते अदृष्ट आपण डोळसपणे वाचायचं. लाटांवरच्या या वाटेवरून मला तिच्याच ‘पाकीजा’मधलं एक दृश्य आठवलं. तसाच चंद्र, ती लाटांवरची सोनेरी वाट, त्यावर प्रेमिकांना घेऊन चालणारी एक शिडाची नाव. ती म्हणतेय, ‘चलो दिलदार चलो, चांद के पार चलो..’ पण पलीकडे म्हणजे कुठे न्यायला हवं होतं त्यानं? ते तर झालं नाही आणि रस्ताच चुकला. त्या प्रेमिकाचीच सोबत नाही आणि रस्ता दाखवणाऱ्या दिव्याचीही नाही.
‘यह दिया बुझ गया आज किस मोडपर
खो गई हैं अंधेरे में राहगुजर..’
निसर्गातल्या प्रतिमांचं आणखी एक उदाहरण-
‘शांत समंदरका ठहरा हुआ पानी
अचानक तूफाँ बन जाए
और पलभर में समंदर की छातीपर
लहरों का पहाड बनता चला जाए..’
आणि हे दुसरं-
‘पत्थरों से टकराकर
कतरे रेजा-रेजा हो जाते हैं
और सूरज की किरनें
उनपर कौसे-कुजह बुन देती हैं..’
आयुष्यात ‘दगडांवर’ आपटून आपण विखरून जातो, पण किरणांसारखं कोणी तरी येऊन त्या विखुरलेल्या कणांतून आयुष्यात इंद्रधनुष्य फुलवून जातं. इथं तर तिनं वैज्ञानिक सत्यच शायरीत गुंफलं आहे.
दुसऱ्या एका कवितेत-
‘यह दोस्त हैं या दुष्मन मेरा
सर पे जो टंगा हैं नीला फलक..’
हे वर टांगलेलं निळं आकाश (इथे परमेश्वर असा अर्थ) माझा शत्रू तर नाही ना? केवळ दु:खच लिहिलंय त्यानं माझ्या नशिबात!
‘गम वहाँ नहीं हैं? इस कोने के पीछे?
उस मोडपर गमही का साया तो हैं
यह गम के कदमों की चाप हैं
जो चुपके चुपके साथ चल रहा हैं
तआकुब कर रहा हैं..
गम की तलाश कितनी आसान हैं..’
दु:ख सतत तिचा पाठलाग (तआकुब) करत राहिलं. तिनं एका परीनं दु:खाचा स्वत: शोध घेतला असंही काही अंशी म्हणता येईल. ती प्रेमाच्या मागे धावली, कदाचित शरीरमीलन झालं, पण हृदयाशी नाती जुळलीच नाहीत.
एका ठिकाणी तिनं लिहिलंय,
‘अपने अंदर महक रहा था प्यार
खुद से बाहर तलाश करते थे..’
प्रेम तर तिच्याच रोमारोमांत भरलं होतं. तीच ते इतरांना देत होती, पण तिच्या नशिबात मात्र तरसणं होतं.
‘तकदीर ने मारा वह पत्थर,
मेरी कांच की दुनिया टूट गई..’
आणखी शेर पाहू या-
‘मौत की गोद मिल रही हैं अगर
जागे रहने की क्या जरूरत हैं?
अयादत होती जाती हैं,
इबादत होती जाती हैं
(शोकप्रदर्शन व प्रार्थना)
मेरे मरने की देखो,
सब को आदत होती जाती हैं..
राह देखा करेगा सदियों तक
छोड जाएंगे यह जहाँ तन्हा..’
माहजबीन,चंद्रानना, मंजू, मीनाकुमारी, तू आम्हाला ‘एकटं’ सोडून गेलीस, पण आम्ही तुला विसरलो नाही.. कधीच विसरणार नाही!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2021 12:06 am