News Flash

‘भटक्यां’चं विविधरंगी जग

९३ वा ऑस्कर सोहळा अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये झाला आणि तो ऐतिहासिक ठरला.

दीपा देशमुख adipaa@gmail.com

यंदाचा ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळा गाजवला तो ‘नोमॅडलँड’ या आगळ्या चित्रपटानं. तो ऐतिहासिकही ठरला. कारण पहिल्या आशियायी स्त्रीला, क्लोई झोओला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आणि निर्मितीचाही. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी आणि निर्माती म्हणूनही एकत्रित पुरस्कार पटकावला फ्रान्सिस मॅक् डॉरमंडने. जगभरात चित्रपटक्षेत्रात येऊ पाहाणाऱ्या आणि अभिनयासह निर्मिती आणि दिग्दर्शनासारखी क्षेत्रंही खुणावत असलेल्या मुली व स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या क्लोई झाओ आणि फ्रान्सिस मॅक् डॉरमंड यांचा हा परिचय.  

आंतरराष्ट्रीय चित्रपट जगातला सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’ किंवा ‘अकॅडमी पुरस्कार ’. ‘करोना’ संकटामुळे या सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं, मात्र सगळ्या कुशंका बाजूला सारत हा ९३ वा ऑस्कर सोहळा अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये झाला आणि तो ऐतिहासिक ठरला. या मागचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण म्हणजे मूळची चीनची क्लोई झाओ आणि अमेरिकेची फ्रान्सिस मॅक् डॉरमंड या दोन स्त्रिया!

ऐतिहासिक अशासाठी की क्लोई झाओ ही आशियातली ऑस्कर मिळवणारी पहिली स्त्री, तर जगभरातली दुसरी ऑस्करविजेती स्त्री दिग्दर्शक ठरली आहे. कॅथरिन बिगेलो हिनं पहिली स्त्री दिग्दर्शक म्हणून २०१० मध्ये ‘द हर्ट लॉकर’साठी ऑस्कर पुरस्कार मिळवला होता. तर तब्बल दहा वर्षांनंतर २०२० चा ऑस्कर पुरस्कार क्लोई झाओला मिळाला, आणि तिचा ‘नोमॅडलँड’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटही ठरला. क्लोई झाओ आणि फ्रान्सिस  मॅक् डॉरमंड ‘नोमॅडलँड’ या चित्रपटाच्या निर्मात्याही आहेत. ऑस्करच्या इतिहासात निर्माती आणि अभिनेत्री म्हणून दोन पुरस्कार एकाच वर्षी मिळवणारी फ्रान्सिस मॅक् डॉरमंडही पहिलीच स्त्री ठरली आहे. तसंच अभिनयासाठी तीन ‘ऑस्कर’ मिळवणारी ती जगातली दुसरी स्त्री आहे ( सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी यापूर्वी इनग्रीड बर्गमन, मेरिल स्ट्रीप यांना प्रत्येकी तीनदा, तर कॅ थरीन हेपबर्नला ४ वेळा ‘ऑस्कर’ मिळालं आहे.)

क्लोई झाओ हिचा २०१५ मधला ‘माय ब्रदर टॉट मी’, २०१७ चा ‘द रायडर’ आणि यानंतर आताचा ‘ऑस्कर’नं गौरवलेला ‘नोमॅडलँड’ हा चित्रपट. ‘नोमॅडलँड’ या चित्रपटानं तिच्यातल्या कुशल दिग्दर्शिकेवर शिक्कामोर्तब झालं आहे. आशियातल्या तरुणींसाठी क्लोई झाओ ही प्रेरणास्थान असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ‘नोमॅडलँड : सव्‍‌र्हायव्हिंग अमेरिका इन द ट्वेंटी फर्स्ट सेंन्चुरी’ या  जेसिका ब्रुडर लिखित नॉन फिक्शन पुस्तकावर आधारित या चित्रपटाची पटकथा, संक्षिप्तीकरण, निर्मिती, दिग्दर्शन असं सबकुछ क्लोई झाओनं केलं आहे.

पाच फूट पाच इंच उंची असलेली सडपातळ बांध्याची, चॉकलेटी डोळ्यांची आणि हसतमुख चेहऱ्याची ही दिग्दर्शिका. ४० वर्षांच्या क्लोई झाओचं मूळ नाव झाओ टिंग असून तिचं टोपण नाव क्लोई झाओ असल्यानं पुढे तेच नाव सर्वत्र रूढ झालं. सध्या तिचं वास्तव्य  अमेरिकेत आहे. तिचा जन्म चीनमधल्या बिजिंग शहरात झाला  असून एका स्टील कंपनीत क्लोईचे वडील युजी झाओ हे सरव्यवस्थापक म्हणून काम करत असत. ती शाळेत असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि तिच्या वडिलांनी साँग दांडन या अभिनेत्रीशी दुसरं लग्न केलं.

लहान असताना क्लोई आणि तिचे वडील एकत्र चिनी कविता म्हणत असत आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असत. कधी कधी एकानं अर्धवट ओळ म्हणायची, तर दुसऱ्यानं ती पूर्ण करायची, असंही करत. लहान असल्यापासूनच क्लोईला चित्रपट बघायला आवडायचं. शाळेत असताना बंडखोर, पण आळशी म्हणून ती ओळखली जात असे. त्या वेळी तिला ‘मंगा’ प्रकारातली चित्रं काढायला आवडत. ती गोष्टीही लिहीत असे, प्राण्यांचंही तिला प्रेम. पाश्चिमात्य पॉप संस्कृती तिच्या आवडीची याला कारण बहुधा तिच्या घरातलं मोकळं वातावरण हे असावं.

क्लोईचं शालेय शिक्षण लंडनमध्ये झालं. त्यानंतर तिनं मॅसॅच्युसेट्स इथल्या महिला कला महाविद्यालयातून राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याच काळात आपल्याला इतिहासात अधिक रस असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच आवडीतून तिनं चित्रपट निर्मितीचा अभ्यास न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ‘टिश स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये केला. इथे शिकत असताना दिग्दर्शक व प्रोफेसर स्पाईक ली यांचा तिच्यावर खूप प्रभाव पडला. स्पाईक ली आणि क्लोई झाओ नेहमी तावातावानं एखादा मुद्दा घेऊन चर्चा करत असत. हळूहळू शांतपणे सुरू झालेली चर्चा उग्र रूप धारण करत असे आणि मग दोघांचेही आवाज तारसप्तकात जाऊन पोहोचत. इतके की घाबरून स्पाईक लीचा सहाय्यक धावत आत येऊन सगळं आलबेल आहे ना याची खात्री करून जात असे. दोघंही वाद-विवाद- चर्चेत इतके गुंग झालेले असत, की त्यांना तो येऊन गेला हेही लक्षात येत नसे. आजही क्लोई त्या आठवणींत रमून जाते. आपल्यासाठी ते दिवस अत्यंत आनंदाचे आणि शिकण्याचे होते असं ती सांगते.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच क्लोईनं अनेक लहानमोठय़ा नोकऱ्या केल्या. खरं तर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉटर्स’ या माहितीपटामुळे ती सगळ्यांना माहीत झाली.  या माहितीपटासाठी ‘बेस्ट स्टुडन्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट’ हा पुरस्कार तिनं ‘पाम स्प्रिंग इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पटकावला. एवढंच नाही, तर २०१०च्या ‘सिनेक्वेस्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तिनं स्पेशल ज्यूरी प्राईझ मिळवलं. क्लोईनं या माहितीपटात चीनमधल्या खेडय़ातली १४ वर्षांची एक मुलगी घरच्यांनी ठरवलेल्या लग्नापासून स्वत:चा बचाव कसा करते, हे अतिशय उत्कृष्टरीत्या दाखवलं आहे. तिच्या या माहितीपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. या सगळ्यातून तिची प्रतिभा लोकांच्या लक्षात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये आलेल्या ‘साँग्ज माय ब्रदर टॉट मी’ या चित्रपटात एकटं राहाणाऱ्या स्त्रीच्या दोन मुलांची गोष्ट क्लोईनं सांगितली. याही चित्रपटानं अनेक महोत्सवातली पारितोषिकं मिळवली. त्यानंतर ‘द रायडर’ या चित्रपटानं तिला अधिक मोठं यश दाखवलं. या चित्रपटात एका गुराख्याची गोष्ट असून दक्षिण डकोटाच्या सिओक्स समुदायाच्या जीवनाचं दर्शन आहे. क्लोई झाओला स्वत:ला अनोळखी प्रदेशांमध्ये भटकंती करायला, तिथल्या माणसांना भेटायला खूप आवडतं. आज क्लोई हिचं वास्तव्य जरी अमेरिकेत असलं, तरी तिथे आपण ‘आऊटसायडर’ असल्यासारखं वाटतं, असं ती सांगते. पण विरोधाभास म्हणजे क्लोईनं काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत  आपल्या लहानपणीचं वर्णन करताना  ‘चीनमध्ये मला सर्वत्र खोटेपणा आढळतो,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की तिचा हा चित्रपट चीनमधल्या सगळ्या थिएटरमधून काढला गेला, इतकंच नाही तर ‘ऑस्कर’ सोहळ्याच्या वेळी ती पुरस्कार स्वीकारतानाचा तितकाच भाग वगळून दाखवण्यात आला, असं सांगतात.  हा चित्रपट तिथल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शितही  झाला नाही. तिला ऑस्कर मिळाल्यानंतर चीननं त्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दाखवल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. असं असलं तरीही ‘नोमॅडलँड’साठी क्लोईचं  काम खूपच वाखाणलं गेलं. समीक्षकांनीही प्रशंसा के ली.

क्लोईनं तिच्या प्रत्येक चित्रपटातून माणसातला चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाचं आयुष्य साधं असलं, तरी जगण्यातलं समाधान, सुख आणि आनंद कशात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न तिचे चित्रपट करतात म्हणूनच ‘चौकटीतल्या कथांवर चित्रपट करण्याऐवजी चौकटीबाहेरच्या कथानकाकडे मी जास्त खेचली जाते,’ असंही क्लोईचं म्हणणं सार्थ ठरतं. म्हणूनच ऑस्कर स्वीकारतानाही तिनं म्हटलं, की ‘सगळं जग चांगुलपणावर चाललेलं आहे आणि माणसांमधला हाच चांगुलपणा मला माझ्या आयुष्यात वेळोवेळी भेटत गेलाय. कठीण परिस्थितीतही आपल्यातला चांगुलपणा टिकवला पाहिजे.’ लवकरच क्लोईचा सुपरहिरो मालिकेतील ‘इटरनल्स’ हा चित्रपट येतो आहे. तसंच बॅस रीव्हज् यांच्यावर ती एक चरित्रपर चित्रपटही करत आहे.

ऑस्कर विजेता ‘नोमॅडलँड’ हा चित्रपट २७ एप्रिल रोजी ‘वॉल्ट डिस्ने स्टुडिओज होम एन्टरटेंनमेंट’द्वारा प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी झाला. अमेरिका, कॅनडा इथे लोकांनी दाद दिली. हा चित्रपट भटके, जिप्सींविषयी बोलतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नावलौकिक या चित्रपटास मिळाला. ‘गोल्डन लायन’ हा व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार, टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हॉलचा पीपल्स चॉईस् अ‍ॅवार्ड, आणि ‘ऑस्कर’सह अनेक पुरस्कारांचा वर्षांव त्यावर झाला.‘नोमॅडलँड’मधून फर्न हे प्रमुख पात्र जिवंत करणारी अभिनेत्री फ्रान्सिस मॅक् डॉरमंडही अमेरिकन अभिनेत्री. ६४ वर्षांच्या फ्रान्सिसचं मूळ नाव सिंथिया अ‍ॅन स्मिथ. पुढे ती दत्तक गेल्यावर तिचं नाव फ्रान्सिस लुई मॅक्डॉरमंड झालं. फ्रान्सिसनं ‘येल स्कूल ऑफ ड्रामा’मधून ‘मास्टर ऑफ फाईन आर्ट्स’ ही पदवी घेतली. तिनं बहुतांश ‘क्राईम थ्रिलर’ चित्रपट केले. पण तिनं साकारलेल्या भूमिका वैविध्यपूर्ण आहेत. विचित्र, विक्षिप्त असलेल्या, ग्लॅमरस नसलेल्या भूमिका ती ज्या पद्घतीनं रंगवते ते आणि कुठल्याही पात्रात जीव ओतण्याचं तिचं कसब वाखाणण्याजोगं आहे.  चित्रपटात काम करत असूनही फ्रान्सिस मॅक् डॉरमंडला मेकअप करायला आवडत नाही. प्रसिद्घीच्या मागे लागणंही तिच्या स्वभावात नाही.

फ्रान्सिस मॅक् डॉरमंड हिने साकारलेल्या बहुतांश भूमिका प्रशंसनीय असल्या तरी ‘ब्लड सिंपल’ या चित्रपटातली तिची अ‍ॅबीची भूमिका खूपच गाजली. आपल्या बायकोचं -अ‍ॅबीचं दुसऱ्या कुणाबरोबर तरी अफेअर असल्याचा संशय मार्टीला येतो आणि तो वायझर नावाच्या डिटेक्टिव्हची नेमणूक करतो. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणाऱ्या या चित्रपटात अ‍ॅबीची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या फ्रान्सिसनं अ‍ॅबीचं पात्र जिवंत केलंय. या चित्रपटानंतर तिनं या चित्रपटाचा निर्माता/दिग्दर्शक/लेखक जोएल कोईन याच्याशी लग्न केलं. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिसिसिपी बर्निग’ या चित्रपटात नागरी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची हत्या, समाजाची उदासीनता, भ्रष्ट अधिकारी, एफबीआयचा तपास असं दाखवलं होतं. यात मिसेस पेलची भूमिकाही फ्रान्सिसने साकारली होती. त्यानंतर १९९६ मध्ये जोएल आणि इथन कोईन यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘फार्गो’ या ब्लॅक कॉमेडी प्रकारातल्या चित्रपटात फ्रान्सिसने सात महिन्यांच्या गर्भवती पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली. आपल्या सासऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी आपल्याच बायकोला किडनॅप करायला लावणारा लालची सेल्समन कुठल्या थराला जाऊ शकतो, किडनॅप करणारे गुंड, आणि या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये होणारे खून हे सगळं चित्र.  या चित्रपटात अनेक कंगोरे बारकाईने दाखवले आहेत. यातल्या फ्रान्सिसला तिच्या संयत भूमिकेसाठी ‘ऑस्कर’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

तिचा आणखी एक चित्रपट आला २००८ मध्ये, ‘बर्न ऑफ्टर रिडिंग.’ या चित्रपटात फ्रान्सिस एका जिममध्ये काम करत असते. तिच्या हातात एकाच्या आत्मचरित्राची प्रत पडते आणि तो खूपच महत्त्वाचा दस्तावेज असल्याचं समजून त्या बदल्यात पैसे कसे मिळवता येतील याचा प्रयत्न ती करते. यानंतरचा २०१७ चा

‘थ्री बिलबोर्डस आउटसाईड एबिंग, मिसुरी’ या चित्रपटात आपल्या किशोरवयीन मुलीच्या हत्येचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करणारी आई तिनं साकारली आणि या भूमिकेसाठी तिला दुसरा ‘ऑस्कर’ मिळाला.

खरं तर तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रशंसा होत राहिली आहे. फ्रान्सिस मॅक् डॉरमंड हिने आजवर (नोमॅडलँडसह) ३ अ‍ॅकेडमी अ‍ॅवार्डस,

* गोल्डन ग्लोब अ‍ॅवार्डस्, ३ बाप्टा अ‍ॅवार्डस्,

* एमी अ‍ॅवार्डस्, याशिवाय टोनी अ‍ॅवार्ड असे अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. तिने आपल्या प्रत्येक भूमिकेतला भावनिक धागा जास्त बळकट केला. दृढनिश्चयी असणं, स्वावलंबी असणं, स्वतंत्र असणं, तिच्या ‘नोमॅडलँड’मधल्या भूमिकेतून क्षणोक्षणी जाणवत राहतं.

फ्रान्सिस हिचं वैशिष्टय़ असं, की ती फर्न या व्यक्तिरेखेमध्ये पार विरघळून गेलीय. तिचा चेहराच तिच्याआधी बोलतो. फ्रान्सिससारखी कसलेली अभिनेत्री आणि क्लोईसारखी कुशल दिग्दर्शक यांच्यातली केमिस्ट्री चांगली जमून आलीय. आणि त्यातूनच तयार झालाय तो प्रेक्षणीय नोमॅडलँड.

हा चित्रपट शांत पहुडलेल्या वातावरणातून प्रवास करणाऱ्या एखाद्या कवितेसारखा वाटतो. फ्रान्सिसची ‘फर्न’ जिप्सीचं जगणं जगत असली, तरी ती आपला कायमचा निरोप न घेता, पुन्हा भेटू असंच म्हणणारी वाटते. त्यामुळे क्लोई झाओ असो की फ्रान्सिस मॅक् डॉरमंड, या दोघींनीही ‘ऑस्कर’ मिळवून जागतिक चित्रपटांच्या कारकीर्दीत एक मानाचा तुराच खोवला आहे, हे निश्चित!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 1:06 am

Web Title: oscars 2021 chinese born director chloe zhao american frances mcdormand makes history with oscar wins zws 70
Next Stories
1 स्मृती आख्यान :  उपाय सोपे, परिणाम मोठे!
2 जगणं बदलताना : हटके  विचारांचा ‘थरार’
3 पुरुष हृदय बाई : मी गोंधळलेला पुरुष
Just Now!
X