23 October 2020

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : सामाजिक जाणीवबिणीव!

सकाळपासून भेटलेल्या जवळपास प्रत्येकानं अंताभाऊंना ‘सामाजिक जाणीव’ कशी नाही, हे अधोरेखित केलं होतं.

आपण अगदीच ‘गॉन केस’ प्रकारात मोडतो की काय, या भीतीनं ते कमालीचे अस्वस्थ झाले, आणि त्यांनी वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावला.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

सकाळपासून भेटलेल्या जवळपास प्रत्येकानं अंताभाऊंना ‘सामाजिक जाणीव’ कशी नाही, हे अधोरेखित केलं होतं. आपण अगदीच ‘गॉन केस’ प्रकारात मोडतो की काय, या भीतीनं ते कमालीचे अस्वस्थ झाले, आणि त्यांनी वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावला. त्यांचा प्रश्न तळमळीचा होता, ‘‘जगताना क्षणोक्षणी अशी एवढी सामाजिक जाणीवबिणीव हवीच का? आणि जे ‘सामाजिक जाणीववाले’ आपल्याला दिसतात, त्यातल्या सगळ्यांना ती खरोखरच असती, तर समाजातले बरेचसे प्रश्न पूर्वीच संपले नसते का?’’

‘‘वत्सलावहिनी.. आज मी फार खचलोय हो! आपलं आयुष्य बरंचसं वाया गेलं की काय असं वाटायला लागलंय मला..’’ अंताभाऊ विव्हळत ‘व्वा हेल्पलाइन’च्या वत्सलावहिनींना म्हणाले, तर त्या एकदम हसल्याच. म्हणाल्या, ‘‘एवढंच ना? अहो,  जसजसं वय वाढत जातं ना, तसतसा आयुष्य वाया गेल्याचा साक्षात्कार दृढ होत जातोच पुष्कळांचा. काय होतं, आधी बराच काळ पोटापाण्याच्या ‘व्हाया’ घालावला, की पुढे कधीतरी ‘वाया’ गेल्याचा भास होणारच.’’

‘‘नुसतं तेवढंही नाही. माझी तर मुदलातच खोट वाटत्येय मला. मला मुळी सामाजिक जाणीवच नाहीये बहुतेक..’’ अंताभाऊ.

‘‘ ही जाणीव तुम्हाला नेमकी कधी झाली?’’

‘‘आज सकाळपासून वारंवार होत्येय बघा. एका दिवसात दहा लोकांनी तरी मला ऐकवलंय, की बुवा, एवढीही सामाजिक जाणीव कशी नाही तुम्हाला?  सकाळी वऱ्हाडपांडेचा छोटा नातूसुद्धा मला असं म्हणाला.. म्हणजे..’’ अंताभाऊंना नुसतं आठवणीनंही भरून आलं.

आज सकाळी-सकाळीच वऱ्हाडपांडेंनी नातवाला पावतीपुस्तक घेऊनच पाठवलं होतं अंताभाऊंच्या घरी. कुठल्या तरी आश्रमशाळेसाठीच्या इमारत निधीला हातभार लावायला. वऱ्हाडपांडे पुष्कळदा अशी सामाजिक कामं शोधतच असत. कशाची पत्रकं काढ, कशाची घोषणा बनव, कशावर तरी लोकांकडून २००, ५०० सह्य़ा गोळा कर, कुणाचा तरी निषेध कर, असे उपक्रम त्यांना फार आवडत. फार दिवस कुठलीच चळवळ समोर आली नाही, तर त्यांना मनोमन हळहळ वाटे, आणि एकदाचा कुठेतरी कुणावर तरी अन्याय झाला, की त्यांना तळमळीनं त्याविरुद्ध बोलायला मिळे. आपल्या अशा तेजतर्रार सामाजिक जाणिवेनं ते शेजाऱ्यापाजाऱ्यांना हाक घालत. (त्यांच्या भाषेत, ती ‘सह्य़ाद्रीची साद’, ‘वंचितांचा वाद’, धरणग्रस्तांसाठी धरणं’, असं कशा ना कशाला धरणं असे) शेजारीपाजारीही आपल्या खिशांवर फार भार पडणार नाही इतपत हातभार लावत. आजही अंताभाऊंनी सवयीनं एक छोटी नोट त्यांच्या नातवापुढे धरली, तर तो मात्र नाराजीनं म्हणाला,‘‘आज एवढीच सामाजिक जाणीव दाखवणार तुम्ही अंकल?’’ त्याच्या दातपडक्या मुखातून चणे-फुटाणे उडावेत तशी ‘सामाजिक जाणीव’ टपकताना पाहून अंताभाऊंना हसू आलं. त्या नादात त्याची गंमत करत ते म्हणाले, ‘‘काय दाखवणार म्हणालास?’’

‘‘समथिंग लाइक..‘सामाजिक जाणीव’. आजोबा म्हणालेले, की पीपल विथ गुड सामाजिक जाणीव नॅचरलीच थोडी हायर अमाउंट देतील. आफ्टर ऑल.. आपण काही समाजाचं देणं लागतो की नाही?, असंपण विचारलेलं त्यांनी.’’ यावर एखाद्यानं त्या पोराला ‘‘पांडय़ा.. पांडय़ा.. लेका बारिष्टर का रे झाला नाहीस?,’’ असं विचारलं असतं. पण इथे खरा बोलविता धनी ज्येष्ठ ‘वऱ्हाडपांडय़ा’ आहे हे ओळखून अंताभाऊंनी चेष्टा सुरू ठेवली. ‘‘काय सांगतोस? असं विचारलेलं? कुणाला?’’

‘‘जनरल हो! द्या ना जी भरके. मी चांगलं कलेक्शन केलं तर आजोबा पिझ्झा मागवणार म्हणालेले..’’

एकूण आपण याच्या पिझ्झाचं देणं लागतोय हे ओळखून अंताभाऊंनी थोडा हात सैल सोडला. तरीही पावती देताना पोरातला पढवलेला पोपट पुटपुटलाच, ‘‘ते म्हणालेले तुम्ही चांगली घसघशीत सामाजिक जाणीव दाखवाल म्हणून.. पण ओके..’’

‘‘तर वत्सलावाहिनी, त्या एवढय़ाशा पोरालाही माझी सामजिक जाणीव ‘ओके’च वाटली हो.. यानं माझ्या जाणिवा किती बरं दुखावल्या असतील, विचार करा.’’

‘‘लहान मुलाचं बोलणं कसलं मनावर घ्यायचं?’’ वत्सलावहिनी.

‘‘नुसते लहानच नाही.. मोठेही तसंच म्हणाले ना.. भर रस्त्यावर.’’ रस्त्यावरच्या प्रसंगाच्या आठवणीनं अंताभाऊंना पुन्हा कसंकसं झालं.

झालं असं होतं, की गेले काही दिवस त्यांनी खूप खटपटीनं लिहिलेला एक लेख आज त्यांच्या उपसंपादक मित्राला द्यायला त्यांना जायचं होतं. सकाळी वऱ्हाडपांडेंच्या नातवाबरोबर जरा जास्तच वेळ गेल्यानं निघायला उशीर झाला होता. पण नेमके ते एका मोर्चामागे अडकले. समोर चांगले १००-१२५ तरुण हातात फलकबिलक घेऊन घोषणा देत चालले होते, ‘‘भीक नको. हक्क द्या.’’, ‘‘छोटय़ा उद्योजकांना गृहीत धरू नका.’’, लघुउद्योजकांवर होणाऱ्या कोणत्या तरी अन्यायाविरुद्ध मोहीम सुरू होती तर. मिरवणुकीच्या अग्रभागी काही पोळलेली माणसं असतील कदाचित, पण मोर्चातली मागची माणसं बऱ्यापैकी सक्षम होती. आपसात गप्पा मारत, टिंगलटवाळ्या करत रस्त्यावर वावरत होती. त्यांचा एकूण थाट असा, की रस्ता आपल्या तीर्थरूपांचाच आहे. समजून कडेला होणं, रहदारीला वाट करून देणं, वगैरेचं नाव नाही. अंताभाऊंना तर पोहोचण्याची घाई होती. त्यांनी दोनतीनदा स्कूटरचा हॉर्न वाजवला. ‘‘अहो.. बाजूला व्हा, जाऊ द्या..’’ वगैरे पुकारा केला. शेवटी त्रासून रस्त्याकडेच्या झाडाखाली स्कूटर थांबवून, उतरून त्यांनी मोर्चातल्या एका गटाला सुनावलं, ‘‘अहो.. रहदारीची वेळ आहे हो. माणसं खोळंबताहेत.’’

‘‘लोकांची आयुष्य खोळंबताहेत उद्योगातल्या कोंडीनं. त्याचं तुम्हाला काही नाही.’’ एक  चट्टेरीपट्टेरी टी-शर्टवाला ओरडला.

अंताभाऊ सामोपचारानं म्हणाले, ‘‘नाही.. त्यांचे प्रश्न आहेतच गंभीर.. पण इतरांच्या रोजच्या जगण्यात का खो घालता? आम्हाला वाट द्या ना..’’

‘‘जंटलमन दिसता आणि फक्त सोताचाच विचार करता का राव? काही सामाजिक जाणीव आहे की नाही?’’ एक फाटकी जीन्सवाला खेकसला.

‘‘आहे हो..’’ अंताभाऊ.

‘‘मग मोर्चात सामील व्हायचं सोडून पळायला का बघता? आँ? आपण समाजाचं काही देणं लागतो एवढंही कळेना या साहेबछापांना? अजून अडवा रे रस्ता. राडा करा त्या सिग्नल बिग्नलचा. अरे, हमारी मांगे पूरी करो..’’ एक कपाळावर गॉगल चढवलेला ‘सामाजिक’वाला म्हणाला. तेव्हा अंताभाऊ सावध झाले. यांच्याशी पंगा घेणं म्हणजे कदाचित मार खाऊन लघु काय, कोणत्याच उद्योगाच्या लायक न उरणं, असं व्हायचं, म्हणून ते बराच वेळ एक पाय रस्त्यावर टेकत टेकत स्कूटर ओढत मोर्चामागे जात राहिले.

या गोंधळात लेख पोहोचायला उशीरच झाला. उपसंपादक मित्र त्याच्या ऑफिससमोरच्या एका उडप्याकडे कॉफी पीत बसलेला होता. त्याला अगोदर कॉफी आणि नंतर (लेखाची) कॉपी द्यायची, या नेहमीच्या सरावात थोडा व्यत्यय आला. लेखावर त्याची धावती नजर अंमळ त्रासिकपणेच फिरली, तेव्हा अंताभाऊंनी लेखाची स्वत:च माफक भलावण केली. मित्र खुलला तर नाहीच, मात्र जांभई देत म्हणाला, ‘‘ते ठीक आहे. पण तुमच्या लेखात काही सामाजिक जाणीव आहे की नाही?’’

‘‘अरे?  खूप पूर्वी लव्हबर्ड्स पाळले होते. त्यांच्यावर आठवणलेख आहे. तिच्यात सामाजिक जाणीव कुठून आणायची?’’

‘‘ठरवलं तर कशातही आणता येते हो. सध्या सामाजिक जाणीव इज द इन थिंग यू नो.’’

‘‘ते एवढुस्से लव्हबर्ड्स. त्यांना त्यांच्या अंगावरचे रंगसुद्धा पेलतील की नाही असं वाटतं. त्यांना सामाजिक जाणीव कशी झेपेल?’’ अंताभाऊ.

‘‘का? ते जगाला प्रेमाचा संदेश नाही देऊ शकत?  समाज तरला तर फक्त प्रेमानंच तरेल.. इत्यादी.. इत्यादी..’’

‘‘माझा लेख मात्र बुडेल ना या कृत्रिम चिकटवा चिकटवीनं!’’

‘‘बघा बुवा. आपण समाजाचं काही देणं लागतो असं वाटत असेल, तर लेखात शेवटी तरी सामाजिक जाणीव आणा. तेवढं काही कठीण नाही ते.’’

उपसंपादक उठता उठता म्हणाले खरे, पण त्यानं खरंतर अंताभाऊं च्या काळजावरच चरा उठला. ते काकुळतीनं वत्सलावाहिनींना म्हणाले, ‘‘आता मी काय त्या लव्हबर्ड्सना पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात मार्चिग करायला लावून ‘पुढे चला.. पुढे चला’ छाप गाणं बॅकग्राऊंडला लागल्याचं दाखवू का?’’

‘‘काय हरकत आहे? अं? त्यांना सामाजिक जाणीव दाखवायला हवीये ना? मग दाखवावी. एकदा त्यात पडल्यावर कच खायची नाही बघा.’’

‘‘कच कशानं? मातीच खाल्ल्यासारखं वाटेल मला असं काही लिहिताना. जगताना क्षणोक्षणी अशी एवढी सामाजिक जाणीवबिणीव हवीच का वत्सलावहिनी?’’

‘‘असं बाहेर चाललेलं दिसतंय खरं.’’ त्या म्हणाल्या.

‘‘इतकी सगळ्यांना सर्व काळ खरीखरी सामाजिक जाणीव असती, तर आपल्या समाजातले बरेचसे प्रश्न कधीच मिटले असते, नाही का? ’’ अंताभाऊ.

‘‘शक्य आहे.’’

‘‘पण मिटले नाहीत. उलट सारखं आपलं ‘कुणालाही सामाजिक जाणीव आहे का?,’ हे तपासून बघण्याचा नवाच प्रश्न उपटला. जाणीव एकीकडे, उणीव एकीकडे. प्रत्येक वेळेला समाजभान जपायला पुरेसा वेळ, पैसा, ताकद नसूच शकते ना माणसांमध्ये? मग ते समजून घेण्याऐवजी आमच्यासारख्या साध्या माणसांना लोक सारखा ‘कॉम्प्लेक्स’ का देतात? कसे तुम्ही गयेगुजरे, तुम्हाला सामाजिक जाणीवच नाही, वगैरे?’’

‘‘कॉम्प्लेक्स येतोय? सिंपल उत्तर. तो घेऊ नका.’’ वत्सलावहिनी.

‘‘आता घरी बायकोपोरानंही तसं ऐकवलं तर जडच जाणार ना स्वीकारायला?’’ अंताभाऊ नुसत्या आठवणीनंही गहिवरून म्हणाले. आज संध्याकाळी त्यांची बायको एक छानशी साडी विकत घेऊन बाहेरून घरी आली होती. बायकोच्या खरेदीला नेहमीच तोंड भरून वाखाणायचं असतं, या सनातन कायद्यानुसार अंताभाऊंनी दादही दिली होती. पण तेवढय़ात बायकोची सामाजिक जाणीव जागी झाली.

‘‘साडी घ्यायला नव्हते गेले मी. पण नंतर लक्षात आलं, चार बायकांनी मिळून ते बुटिक काढलंय. ‘चूल-मूल’च्या बाहेर पडून काहीतरी करायला बघताहेत. स्त्रियांमधल्या या उद्योजकतेला एका स्त्रीनंच प्रोत्साहन द्यायला हवं ना? एवढी सामाजिक जाणीव दाखवायला काय हरकत आहे?’’ बायको म्हणाली होती.

‘‘हरकत तशी नाहीये. पण थोडी आर्थिक जाणीवही असावी की नाही?’’ अंताभाऊ हळूच म्हणणार, तोवर समोरून हल्ला झाला.

‘‘तुम्ही खुसपटं काढू नका.. तरी बरं, मी सामाजिक जाणिवेपोटी साधी साडीच घेतलीये. लवकरच त्या बायका दागिन्यांच्या व्यवसायातही शिरणार आहेत म्हणे..’’

हे ऐकल्यावर कधीतरी आपण त्या बायांचं किती देणं लागू, या कल्पनेनं अंताभाऊंचा नुसता थरकाप उडाला होता. दुसऱ्या बायकांच्या प्रत्येक उपक्रमाला असा उदार आश्रय देण्याचं आपल्या बायकोनं ठरवलं, तर लवकरच आपल्याला धर्मशाळेचा आश्रय घ्यावा लागेल. हेच भय त्यांनी वत्सलावहिनींना  बोलून दाखवलं.

‘‘हे असंय बघा अलीकडे सामाजिक जाणिवेचं प्रकरण. जो तो आपल्या मनानं अर्थ लावतोय, आणि समोरच्याला नाहीये म्हणून हिणवतोय.’’

‘‘अशी वेळ आलीये होय सामाजिक जाणिवेवर?  सॉरी. तुमच्यावर, असं म्हणायचं होतं मला.’’

‘‘होय ना. आता माझ्यासारखा माणूस घ्या. समाजाचं देणं मान्य असलं, तरी वीज, पाणी, दूध, वाणी, वगैरेंचं देणं देता देताच भेलकांडतो की नाही एकेकदा?’’ अंताभाऊ.

‘‘कबूल आहे. मग स्पष्टपणे सांगावं ना तसं..’’

‘‘मग लोक चेष्टा करतात, किंवा कीव वगैरे! वर अपेक्षाही ठेवतात, की या सामाजिक जाणिवावाल्यांना इतरांनी आदरानं वागवावं वगैरे.’’

‘‘असंपण असतं का?’’ वत्सलावहिनींनी विचारलं.

‘‘मग? आमचे वऱ्हाडपांडे! मोर्चामध्ये गाडी चालवताना आपलं ड्रायव्हिंग लायसन्स संपलंय हे बघत नाहीत. दौऱ्यावर गेले एखाद्या उपक्रमाच्या, तर इथे सोसायटीचा मेन्टेनन्स चार्ज, वीज बिल वगैरे वेळेवर भरत नाहीत. यावरून कुणी टोकलं, दंड वगैरे लावला की उसळतात. आमच्या समाजकार्याची काही चाड आहे की नाही वगैरे? मी असा घरबश्या माणूस. इमानानं सगळे नियम, कायदे पाळतो. सगळ्यांची सगळी देणी वेळच्या वेळी चुकवतो. तेवढं एक समाजाचं देणं मागे राहतं या धकाधकीत.. म्हणून काय..’’अंताभाऊ.

‘‘करता ना हे सगळं? मग झालंच की.’’

‘‘काय झालं?’’

‘‘तुमच्यापुरतं सामाजिक जाणीव ठेवणं.  तुम्ही कोणत्याही प्रकारे नियम-कायदे मोडत नाही, व्यवस्था सुरळीतपणे चालण्याच्या आड येत नाही, सामाजविघातक कृत्य करण्याचा तर प्रश्नच नाही. हीपण एक प्रचंड मोठी सामाजिक जाणीवच आहे. ठळकपणे दिसणारी नसली म्हणून काय झालं? ठळकपणे दिसणाऱ्यांच्या मागे असं ‘असणारे’पण हवेतच की!’’ वत्सलावहिनी.

‘‘म्हणजे माझी अगदीच ‘गॉन केस’ नाहीये ना?’’

‘‘नाही. थेट दणदणीत सामाजिक काम करू शकलात तर छानच. हवंच आहे आपल्याला. पण नसेल ते जमत तरी स्वत:ला कमी समजू नका. सरळ, साफसुथरं जगण्याची शहाणीव ही सामाजिक जाणिवेची पहिली पायरी नक्कीच ठरू शकते!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 1:25 am

Web Title: our era was different old people saying apayashala bhidtana dd70 2
Next Stories
1 अपयशाला भिडताना : आमच्या वेळी असं नव्हतं!
2 निरामय घरटं : निकोप स्वातंत्र्य
3 सूर निरागस हो!
Just Now!
X