‘रोज रोज तेच ते आणि तेच ते’चा अनुभव कंटाळवाणा असला तरी आपण आपल्या घरापासून, माणसांपासून जेव्हा लांब येऊन पडतो तेव्हाचा एकटेपणा काय असतो याची भयंकर जाणीव त्यावेळी झाली आणि मनोमन मी आयुष्यातल्या सर्व ‘त्याच त्या’ माणसांचे आभार मानले, माझ्याबरोबर असण्यासाठी.. माझ्या आयुष्याचा एक भाग असण्यासाठी. या लेख मालिकेतील भाग ३
सकाळी रोज त्याच वेळेला उठणे, मुलीला शाळेत पाठवणे, व्यायाम- स्वयंपाक- नाश्ता- स्वत:चा डबा भरणे, कॉलेजला जाणे-येणे, आल्यावर स्वयंपाक, मग जेवण- झोपणे.. रोज तेच ते.. वर्षांनुवर्षे तेच ते.. कंटाळवाणा दिनक्रम. रोज जायच्या त्याच त्या जागा. तेच ते रस्ते. तेच ते जेवण. तीच ती माणसं आणि त्याच त्या गप्पा. पळून जावे आणि थोडे काही तरी वेगळे करावे असे वाटायला लावणारा कंटाळा, पण काही दिवसांसाठी या रोजच्या गोष्टींपासून लांब जावे लागले की, त्या सवयीच्या गोष्टींमधले सुख समजते, पण त्यासाठी सक्तीने लांब जाऊन दणके बसावे लागतात..
..तुरीनमध्ये पोहोचले आणि पहिला दणका मला विमानतळावरच बसला. ‘मला घ्यायला टॅक्सी पाठवा’ असे मी माझ्या कॅम्पसच्या स्वागतकक्षात सांगून ठेवले होते आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बाहेर येऊन खुणेच्या जागेवर उभी राहिले होते. १०-२० मिनिटं झाली.. अर्धा तास झाला.. ४० मिनिटे झाली तरी टॅक्सीचा पत्ताच नाही. माझ्याकडे असलेल्या तात्पुरत्या मोबाइल फोनवरून अनेकदा कॅम्पसवरच्या स्वागतकक्षात फोन केला, पण तो कुणीही उचलेना. बाहेर येऊन टॅक्सी शोधायचा किंवा जायला बस किंवा मेट्रो असे काही मिळते का ते शोधायचा प्रयत्न केला; पण इंग्रजीमध्ये उत्तर देणारे कुणीही सापडेना. फोनवर इंटरनेट नसल्याने रस्ता शोधणे किंवा मला काय म्हणायचेय ते इटालियनमध्ये भाषांतरित करणे जमेना किंवा कुणालाही ई-मेल करता येईना.
दीड तास होऊन गेला तरी माझी टॅक्सी येईना. आता माझा धीर संपला आणि मी चांगलीच रडकुंडीला आले आणि शेवटी एकदाची माझी टॅक्सी आली. जवळ जवळ ४० कि.मी.चे अंतर होते. ते अंतर कापत जात असताना माझ्यापुढे पुढचे काही महिने काय वाढून ठेवले आहे याची जाणीव होऊ लागली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कॅम्पसमध्ये माझ्या रूमवर पोचले आणि स्वत:ला सावरून जवळ होतं त्यातलेच थोडे फार पदार्थ खाऊन झोपी गेले.
जागी झाले तर रात्रीची जेवणाचीच वेळ झालेली होती. आवरून बाहेर पडले आणि कँटीन शोधून काढले. कँटीनमध्ये गेले आणि दुसरा झटका बसला. मी शंभर टक्के शाकाहारी. अगदी अंडेही न खाणारी. आमच्या कोर्स को-ऑर्डिनेटरचा भारतात असताना ई-मेल आला होता की, तुझ्या काही खाण्यापिण्याच्या विशेष गरजा आहेत का? असतील तर कळवाव्या. त्यानुसार मी पूर्ण शाकाहारी आहे आणि मला काय काय जेवायला चालेल हे मी तिला कळवले होते. माझा ई-मेल तिने कँटीनची प्रमुख क्लौडियालाही पाठवला होता. त्यामुळे आपली सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था नीट होईल असा माझा आपला समज! पण तशी परिस्थिती अजिबात नव्हती. फक्त टोमॅटो सॉस आणि चीज घातलेला चिवट पिझ्झा, पास्ता, सॅलड आणि योगर्ट इतकेच मला चालण्यासारखे होते. पहिल्या दिवशी ते खायला बरे वाटले तरी पुढे त्याचा किती त्रास होणार आहे याची मला तेव्हा कल्पना आली नाही. बाकी सगळीकडे फक्त पोर्क आणि बीफ.
जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे कँटीनमध्ये जेवणे मला अशक्य होऊ लागले. काऊंटरवर ठेवलेले उसाच्या गुऱ्हाळातल्या चरकासारखे यंत्र आणि बाजूला ठेवलेला कातडी सोललेला स्मोक केलेला कुठला तरी प्राणी. लोक त्याच्या हव्या तशा चकत्या काढून घेत आणि खात आणि हे पाहिले की पोटात भूक असूनही माझी जेवणाची इच्छाच मरून जाई. तरीही जसजसे दिवस पुढे सरकले तसतसे चिकन किंवा बीफचे तुकडे आणि भाज्या घातलेल्या रश्शातले बीफ काढून टाकून उरलेल्या रश्शात ब्रेड बुडवून खायला मी हळूहळू सुरुवात केली किंवा भल्यामोठय़ा तव्यावर बीफ भाजले जात असताना त्याच तेलात ग्रिल केलेले झुकीनी किंवा वांगे मुकाटय़ाने खाऊ लागले. न खाऊन सांगते कुणाला? घरात लेक आणि नवऱ्याला अंडी शिजवायला वेगळी भांडी वापरणाऱ्या माझ्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट होती; पण तरी माझे पोट एकही दिवस भरायचे नाही. नंतर नंतर तर खोलीमधल्या चहाच्या इलेक्ट्रिक किटलीत मी काय वाट्टेल ते शिजवून खाऊ लागले. इन्स्टंट खिचडी किंवा मॅगी किंवा ओट्स; पण खाऊन झाले की, ती निमुळते तोंड असलेली किटली आत हात घालून घासण्यात माझा एक तास जायचा.. आणि नीट घासली नाही की दुसऱ्या दिवशी चहाला वास यायचा. आपल्या घरात इतकी मुबलकता असते की, खायला न मिळणे याची आपण कल्पनाच करू शकत नाही; पण इथे मात्र शिल्लक असलेले मॅगी आणि उरलेले दिवस यांची गणितं सतत करावी लागायची आणि कधी अर्धी, तर कधी पाव मॅगी आणि मग एखादे फळ किंवा दही खाऊन दिवस ढकलावा लागायचा. त्यातच एक दिवस मला कॅम्पसमध्ये काम करणारा दिल्लीचा एक गृहस्थ भेटला आणि त्याने मोठय़ा प्रेमाने मला एक लोणच्याची बाटली दिली आणि माझा आनंद गगनात मावेना. सकाळी नाश्त्याच्या वेळी कँटीनला गेले की, ४-५ पावांचे तुकडे, लोणी, एखादे फळ आणि योगर्ट घेऊन यायचे आणि पावाला लोणी आणि लोणचे लावून रात्री खोलीतच जेवायचे असा शिरस्ता मी सुरू केला, कारण आताशा कँटीनमध्ये गेले की, तिथली दृश्ये आणि वासाने माझ्या घशाखाली घासच उतरायचा नाही.
तुरीनमधला माझा मुक्काम संपत आला तेव्हा घडलेला एक प्रसंग. माझ्याकडे बरेच भारतीय मसाले, तिखट, जिरे इ. वस्तू होत्या. परत येण्याची बॅग सामानाने आणि पुस्तकांनी एवढी जड झालेली की, ते मसाले परत नेण्यात काहीच अर्थ नव्हता. विचार केला की, फेकून देण्यापेक्षा तिथे कुणाला तरी देऊन टाकावेत. आमच्या कॅम्पसजवळचे ‘रेस्तोरांते केटू’ हे आमचे लाडके पाकिस्तानी हॉटेल. इथे भारतीय अन्न चाखायला मिळायचे. तिथे काम करणारा मत्ती हा पाकिस्तानी मुलगा आमचा चांगला मित्र बनलेला. विचार केला की, त्याचा जाताना निरोप घ्यावा आणि हे मसाले त्यालाच देऊन टाकावे. म्हणून तिथे गेले. आज मत्तीचा मालक तिथे नव्हता. मी त्याला मसाले दिले आणि तिथेच जेवण ऑर्डर केले, तर मत्ती आज जेवणाचे पैसे घ्यायलाच तयार होईना. म्हणाला, ‘‘आज माझ्यातर्फे तुला पार्टी. तू परत मला कधी भेटशील असं वाटत नाही आणि मी तरी तुला काय देणार ना?’’ एवढे म्हणून त्याने मला मनसोक्त खायला तर घातलेच आणि रात्रीच्या जेवणासाठी बिर्याणी आणि गुलाबजाम बांधून दिले. मी जड मनाने त्याचा निरोप घेतला आणि लेकीसाठी खरेदी करायला समोरच्या मॉलमध्ये शिरले. वेगवेगळ्या दुकानांतून बरीच खरेदी केली. इथून आमचा कॅम्पस बराच लांब. जवळ जवळ ५ कि.मी. आणि चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. चालत रूमवर आले आणि झोप काढली. जेवण कधी नव्हे ते भरपेट झाल्यामुळे चांगलीच झोप लागली. मत्ती महाशयांनी रात्रीचे जेवणही बांधून दिल्याने आज दोन्ही वेळ आपले पोट भरणार या आनंदात मी होते. रात्री जेवायला कँटीनलाही गेले नाही. रात्री भूक लागल्यावर बिर्याणी पिशवीतून बाहेर काढायला गेले. बघते तर बिर्याणीचा पत्ताच नाही. खरेदी केलेल्या सगळ्या सामानाच्या पिशव्या धुंडाळून पहिल्या; पण नेमकी बिर्याणी आणि गुलाबजामची पिशवी त्यातून गायब. मग डोक्याला ताण दिला तेव्हा आठवले की, मॉलमधल्या कुठल्या तरी दुकानात मी ती पिशवी बहुतेक विसरले. खाली जाऊन पाहाते तर एव्हाना कँटीन बंद झालेले.. बाहेर जोरदार हिमवर्षांव सुरू.. आणि चांगलाच अंधार.. त्या क्षणी मला कमालीचे हताश वाटले! असे काही प्रसंग घडले की, मनावर हताशपणाचे मळभ दाटून यायचे. आपण कुठे येऊन पडलोय इथे हे विचार मनात गर्दी करायचे आणि मन ओढाळपणे घराकडे धाव घेऊ लागायचे.
असाच एक प्रसंग घडला जेव्हा प्रा. रिकोल्फिंच्या सांगण्यावरून मी एका प्रसिद्ध पेटंट अ‍ॅटर्नीला भेटायला गेले. त्यांचे कार्यालय माझ्या कॅम्पसपासून खूप दूर. दोन बस आणि मग मेट्रो घेऊन जावे लागणार होते. एव्हाना गुगल मॅप्समधून डायरेक्शन घेत अख्ख्या तुरीनभर एकटय़ाने फिरण्यात मी चांगलीच तरबेज झाले होते. दुपारी निघाले तेव्हा वातावरण निरभ्र होते; पण इथल्या लहरी हवेचा फटका एक-दोनदा बसल्याने छत्री पर्समध्ये टाकली. सगळी कसरत करून वेळेत पोचले. मीटिंग उत्तम झाली. परत निघून मला ११ नंबरची बस पकडायची होते. ऑफिसबाहेर पडले तर चांगलेच अंधारून आलेले. माझ्या लक्षात आले की, मी तुरीनपासून फारच लांब येऊन पोचले होते. हे कुठले तरी गरीब उपनगर असावे. रस्त्यावर सगळीकडे कृष्णवर्णीय लोक दिसत होते आणि त्यांच्या वस्त्या मुख्य तुरीनच्या मानाने कंगाल वाटत होत्या. ११ नंबरची बस पकडण्यासाठी मी फोनवर गुगल मॅप्स उघडले, पण काही केल्या मला फोनमध्ये इंटरनेट नेटवर्क मिळेना. मी खूप खटपट केली, पण व्यर्थ. मग आपला आपण बसथांबा शोधून काढायचा ठरवलं. त्यासाठी फिरफिर फिरले, पण बसथांबा सापडेना. कॅम्पसवरच्या रिसेप्शनिस्टला फोन केला, पण मी नक्की कुठे आहे हे मला अजिबात सांगता येईना. रस्त्यात अनेक लोकांना विचाराचा प्रयत्न केला, पण कुणालाही इंग्रजी समजेना. फोनवर इंटरनेट बंद. त्यामुळे मला काय म्हणायचेय ते इटालियनमध्ये सांगता येईना. येणारे-जाणारे लोक अतिशय चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहू लागले. तुरीनमधल्या अशा वस्त्यांमध्ये लूटमार फार होते. नुकताच आमचा एक वर्गमित्र अशा वस्तीत पासपोर्टसकट लुटला गेलेला. भीती दाटून आली. मी आता माझ्या कॅम्पसमध्ये पोचू कशी हेच मला कळेना. एका चुकीच्या थांब्यावर उभी असताना एक ट्रॅम आली आणि ती पोर्तो नुओवो मेट्रो स्टेशनला चाललीये हे मला कसेबसे समजले. तिच्यात बसले. स्टेशनवर उतरले. इथून बाहेर येऊन माझ्या कॅम्पसला २५ नंबरची बस जाते मला माहीत होते आणि तिचा थांबाही ठाऊक होता. बसमध्ये चढले आणि उभी राहिले. रस्त्यात आमच्या कॅम्पसच्या बाहेर आहे तसा ओव्हरब्रिज दिसला. म्हणून माझा स्टॉप आला असे समजून उतरले. उतरल्यावर लक्षात आले की, आपण दोन थांबे अलीकडेच उतरलोय. आता चालत जायचे ठरवले, पण बाहेर चांगलाच जोरदार हिमवर्षांव सुरू झालेला. छत्री उघडून चालू लागले पण थंडीने हात गोठलेले आणि माझ्याकडे हातमोजे नाहीत, छत्री हातात धरवेना. थोडे अंतर गेल्यावर आपल्याला अशा हवेत चालत जाणे शक्य नाही हे समजले. म्हणून परत उलटी चालत उतरले होते त्या बस थांब्यावर गेले आणि पुढच्या बसची वाट पाहू लागले. एव्हाना स्नो पडणं वाढलेलं. बाहेर काळाकुट्ट अंधार आणि थांब्यावर चिटपाखरू नाही आणि मी एकटीच कुडकुडत उभी. एक-दोन पुरुष येता-जाताना विचित्र नजरेने पाहत थांबले. एक-दोन कार जाताजाता थांबल्या आणि त्यातील पुरुष उतरून इटालियनमध्ये काही अगम्यपणे बोलले. मला काहीही कळले नाही, पण त्यांचे हावभाव अतिशय किळसवाणे होते आणि मग मला काही दिवसांपूर्वी आम्हा सगळ्यांना आमचा वर्गमित्र मार्कने सांगितलेले आठवले की, शक्यतो अंधार झाल्यावर एकेकटय़ा बाहेर जात जाऊ नका. बाहेर वेश्या व्यवसाय जोरात चाललेला असतो. हे त्याचे वाक्य आठवताच मला ब्रह्माण्ड आठवले. अरे, आपण कोण आहोत, आपण करतो काय, या कुठल्या अनोळखी रस्त्यावर रात्रीच्या अशा असहायपणे उभ्या आहोत, अशा नजरेने कसे पाहू देतो आहोत या पुरुषांना आपण आपल्याकडे.. असे विचार मनात आले आणि रडू कोसळले. त्या क्षणाला धावत घरी जाण्याची ओढ लागली, पण ते शक्य नव्हते. शेवटी एकदाची माझा अंत पाहून झाल्यावर बस आली. तिच्यात चढले. दोन थांब्यांनंतर मला उतरायचे होते म्हणून उभीच राहिले. माझा चौक आला, पण बस थांबलीच नाही. माझ्याशिवाय त्या थांब्यावर उतरणारे कुणीही नव्हते आणि मी मला उतरायचे म्हणून ड्रायव्हरला सांगण्यासाठी बसमध्ये जागोजाग लावलेले एक लाल बटन असते ते दाबलेच नव्हते. बस पुढे निघून गेली. मी ड्रायव्हरकडे गेले, पण त्याने मला आता पुढच्या थांब्यावर उतरवले. खाली उतरले तर बाहेर अंधार.. सोसाटय़ाचा वारा आणि आधीपेक्षा दुप्पट प्रमाणात बर्फ. आता मुकाटय़ाने छत्री उघडली. हातात मोजे नव्हते. बोटं गारठलेली. तशीच कुडकुडत निघाले आणि अर्धा तास चालून कशीबशी माझ्या रूमवर येऊन पोचले. त्या काही मिनिटांत मला जी असहायता जाणवली तशी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही अनुभवली नव्हती.
आपण असे कुठे तरी आपल्या घरापासून, माणसांपासून लांब येऊन पडतो तेव्हाचा एकटेपणा काय असतो याची भयंकर जाणीव आतून झाली. मनोमन मी माझ्या घरातल्या आणि आयुष्यातल्या सर्व ‘त्याच त्या’ माणसांचे आभार मानले, माझ्याबरोबर असण्यासाठी.. माझ्या आयुष्याचा एक भाग असण्यासाठी. काही दिवसांतच मी परत माझ्या माणसांत, माझ्या रोजच्या ‘त्याच त्या’ जागा.. ‘तेच ते’ अन्न, ‘तोच तो’ कंटाळवाणा दिनक्रम.. ‘तीच ती’ एकच मराठी बोलणारे लोक यांच्यात जाणार होते खरी.. पण तुरीनमधले हे चारच महिने इतक्या छोटय़ा कालावधीत मला काय काय शिकवू पाहत होते!
(क्रमश:)
प्रा. डॉ. मृदुला बेळे – mrudulabele@gmail.com