पाली गावातील फायनलपर्यंत शिकलेली आणि उत्तम पोहणारी भीमा ही पहिलीच मुलगी. भीमा लग्न करून, निर्मला दातार बनून मुंबईत आली आणि शिक्षणाचा वसा हाती घेतला. घाटकोपरच्या मुलांना शिकण्यासाठी दादर, गिरगाव किंवा ठाण्याला जावं लागे. त्यांच्यासाठी समविचारी ७-८ स्त्रियांना एकत्र करून ‘वनिता विकास’ मंडळाची स्थापना केली. आज ही शाळा कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत वाढली आहे. त्या करारी निर्मला दातार यांच्याविषयी.
‘‘सातवीपर्यंत शिक्षण घेतलेली, एका खेडय़ातली मुलगी. लग्नानंतर मुंबईत, घाटकोपरला येते. ७-८ महिलांना एकत्रित करून एक महिला मंडळ स्थापन करते. या मंडळाच्या माध्यमातून बालवाडीला सुरुवात होते आणि तिने लावलेल्या या रोपटय़ाचा वेलू ५० वर्षांत, तिच्या डोळ्यांसमोर ज्युनियर कॉलेजपर्यंत जाऊन पोहोचतो.. सारे स्वप्नवतच!.’’ त्या माझ्या सासूबाई निर्मलाताई दातार.. पुढची आणखी १० मिनिटं ही सून, नीताताई आपल्या सासूबद्दल भरभरून बोलतच राहिली. बोलताना अनेकदा तिचा कंठ दाटून येत होता आणि ऐकताना, अफाट कर्तृत्वाच्या त्या स्त्रीच्या कर्मभूमीला भेट देण्याचा माझा निश्चय पक्का होत होता.
घाटकोपर पूर्वेला स्टेशनपासून ५-१० पावलांवरच ‘विकास विद्यालया’ची चार मजली भव्य वास्तू उभी आहे. आत शिरल्या शिरल्या निर्मलाताई दातार यांचा अर्धपुतळा दृष्टीस पडतो आणि पाय नकळत थबकतात.. केतकी गोरा वर्ण, सरळ नासिका, हिरवट घारे डोळे, तेज:पुंज चेहरा आणि करारी भावमुद्रा! त्या पुतळ्यातही प्रतिबिंबित झाली होती. शाळा सुरू होती. नीताताई व मी तळमजल्यावरील ऑफिसमध्ये बसलो आणि त्या कर्तृत्वशालिनीची कहाणी ऐकण्यासाठी मी आतुर झाले.. पालीगावच्या बल्लाळेश्वराजवळ राहणाऱ्या कुंटय़ांच्या घरची ही माहेरवाशीण. नाव भीमा. वडील डॉक्टर. डॉ. कुंटेंनी मुलींच्या शिक्षणासाठी पालीत शाळा काढली होती. भीमाची आईही सुधारक विचारांची. तिनेही त्या काळात गावात महिला मंडळ सुरू केले होते. तेव्हा बायकांच्या हाती पैसा नसे त्यामुळे या मंडळाची वर्गणी होती मूठ-मूठ तांदूळ. अशा या दाम्पत्याच्या पोटी आलेल्या भीमेची पावलं काळाच्या पुढे पडली नसती तरच नवल! त्या छोटय़ाशा गावात फायनलपर्यंत शिकलेली आणि उत्तम पोहणारी भीमा ही पहिलीच मुलगी. तिच्यातील नेतृत्व गुणांची झलक लहानपणीच दिसली..
त्याकाळी शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नसे. शिक्षकांना किंवा मुलांना तहान लागल्यास आसपासच्या घरातून तांब्याभांडं भरून दिले जात असे. साहजिकच जवळपासच्या बायका कंटाळत. यासाठी भीमाने एक युक्ती केली. पाटीपूजनाला प्रत्येक विद्यार्थ्यांने हेडमास्तरांना दोन पैसे देण्याची प्रथा होती. ते पैसे तिने परस्पर गोळा केले आणि त्यातून रांजण आणून शाळेत बसवला, त्यासाठी हेडमास्तरांचा रोषही पत्करला. अशी ही मुलगी लग्नानंतर निर्मला दातार बनून मुंबईत घाटकोपरला आली. दातारांचा चित्रपट वितरणाचा व्यवसाय. घाटकोपरचं प्रसिद्ध ‘उदय’ थिएटर त्यांच्या मालकीचं. पुढे निर्मलाताईंच्या यजमानांनी काढलेल्या ‘तुका झालासे कळस’, ‘बायांनो नवरे सांभाळा’ या चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले. अर्थातच या घरातलं वातावरण एकदम भिन्न. मात्र घरात सुबत्ता होती. उभं आयुष्य गाद्यागिरद्यांवर लोळत काढलं तरी चालण्यासारखं होतं, पण निर्मलांचा स्वभाव स्वस्थ बसण्यातला नव्हता. विचार करता करता शिक्षणासाठी काही तरी करायचं हा निर्धार पक्का झाला आणि हात कामाला लागले.
राहता परिसर म्हणजेच घाटकोपर हे कार्यक्षेत्र ठरलं. त्या काळी म्हणजे ७० वर्षांपूर्वी घाटकोपर हे एक खेडं होतं. शिक्षणाच्या, विकासाच्या संधी फक्त गुजराती समाजापुरत्या मर्यादित होत्या. मराठी शिक्षणासाठी पालिकेव्यतिरिक्त कोणतीच सोय नव्हती. त्यासाठी मुलांना दादर, गिरगाव किंवा ठाण्याला जावं लागे. तेव्हा ‘मराठीतून शिक्षण’ हे ध्येय ठरवून त्यासाठी निर्मलाताईंनी प्रथम समविचारी ७-८ स्त्रियांना एकत्र करून अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ‘वनिता विकास’ मंडळाची स्थापना केली. २३ सप्टेंबर १९६१ हा तो दिवस. हळूहळू स्त्रियांची संख्या वाढत गेली. पुढे १९६५ मध्ये मंडळासाठी भाडय़ाची जागा घेईपर्यंत ‘वनिता विकास’ मंडळाचा पत्ता ‘मु. पो. दातारांचं घर’ हाच होता.
वनिता विकासच्या माध्यमातून लगेचच म्हणजे ४ जून १९६२ रोजी नऊ लहान मुलांना घेऊन ‘शिशुविकास’ ही बालवाडी सुरू झाली. मंडळाची आणि पर्यायाने शाळेची वाढ या एकाच ध्येयाने निर्मलाताईंना झपाटून टाकलं. पुढचे वर्ग सुरू करण्यासाठी पैसा उभा करणं ही पहिली गरज होती. घाटकोपरमध्ये एक हाती मोठी देणगी देणारा व्यापारीवर्ग होता, आहे, पण ‘आमचं नाव शाळेला द्यावं’ ही त्यांची अट कोणालाच मान्य नव्हती. वेळ लागला तरी चालेल पण आम्ही ‘मिळून साऱ्याजणी’ पडेल ते कष्ट करून पै-पै साठवू असा एकमुखी ठराव पास झाला आणि मंडळाच्या ‘उद्योग विभाग’ सुरू झाला.
सरकारी फाइल्स तयार करणे, हळद, तिखट, मसाले, लोणची, पापड, भाजणी करून विकणे, दिवाळीत फराळाच्या ऑर्डर घेणे, शिकेकाई कुटून देणे असे रोजगार सुरू झाले. उन्हाळ्यात मीठागरातून मीठाच्या गोणी आणूनही विकल्या. मंडळातर्फे पाळणाघर चालवले, मॅट्रिकच्या परीक्षेच्या काळात सेंटरबाहेर कॅन्टिनची सोय केली. बँकेतील पार्टीसाठी ऑर्डर घेणं सुरू झालं. ध्येय एकच ‘मंडळासाठी निधी उभा करणे’. हे व्रत इतकं प्रामाणिक होतं की, ‘एखादे वेळेस बटाटेवडे उरले तर मेहनत करणाऱ्या बायका ते विकत घेत आणि पैसे जमा करत.’
निर्मलाताईंनी मा.वि.म.तर्फे ३५ ते ४० स्त्रियांना दूध सेंटर्स उघडून दिली, पण दूध उरलं तर डेअरी परत घेत नसे. तेव्हा फ्रीजही नव्हते. अशा वेळी आपल्या घरात  
(पान ३ वरून)    बर्फाच्या लाद्या आणून ‘दूध टिकवून धरण्याचं’ काम त्यांनी स्वत:हून अंगावर घेतलं होतं. या कष्टाचं फळ मिळू लागलं. २९ ऑगस्ट १९६३ला बालवाडी रजिस्टर झाली आणि अनुदान सुरू झालं. १९६४ मध्ये आजूबाजूला भाडय़ाच्या जागा घेऊन प्रायमरीला सुरुवात झाली. निर्मलाताई अध्यक्ष म्हणून काम करू लागल्या. तेव्हापासून वयाच्या ८६व्या वर्षांपर्यंत म्हणजेच २०११ च्या गुढीपाडव्याला देवाज्ञा येईपर्यंत त्या अध्यक्षपदावर कार्यरत होत्या. मंडळाच्या आजच्या अध्यक्षा सुनीताताई परचुरे याही निर्मलाताईंच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जात आहेत.
प्रायमरीने मूळ धरल्यानंतर निर्मलाताईंना शाळेच्या ‘स्वत:च्या वास्तूची’ आस लागली. त्याकरता मोठय़ा प्रमाणात निधी गोळा करणं आवश्यक होतं. यातून नाटय़महोत्सवाची संकल्पना पुढे आली. घाटकोपरमध्ये त्या काळी नाटय़गृह नसल्यामुळे एका शाळेच्या पटांगणात तीन मोठे नाटय़महोत्सव आयोजित करण्यात आले. गीतरामायण, जादूचे प्रयोग, सिनेमा शोही लावले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन तिकीट विक्री केली. यातून बऱ्यापैकी पैसा जमला.
मंडळाच्या मूळ आठ भगिनींपैकी हयात असलेल्या शरयू पत्की यांनी या संदर्भात एक आठवण सांगितली.. ‘शाळा मोठी करायची या एकाच विचाराने आम्ही पछाडलो होतो. आमच्या एक सभासद कदमबाई स्मरणिकेसाठी जाहिरात मिळवण्याकरता पतींसोबत बाईकवर बसून दादरला चालल्या होत्या. पण दुर्दैवाने रस्त्यात पतंग खेळणाऱ्या मुलांच्या मांजाचा फास त्यांच्या गळ्याभोवती बसला आणि तिथल्या तिथे खेळ आटोपला. नाटय़महोत्सव दोन-तीन दिवसांवर आलेला. आमचं तर अवसानच गळालं, पण निर्मलाताई मोठय़ा धीराच्या. त्यांनी सर्व परिस्थिती हिमतीने हाताळली. त्या मंडळींचं सांत्वन तर केलंच, त्याचबरोबर आम्हा कार्यकर्त्यांनाही बळ दिलं आणि नाटय़महोत्सव ठरल्याप्रमाणे पार पडला.’
फारशा न शिकलेल्या या महिलांनी शाळेच्या इमारतीसाठी म्हाडाकडून घाटकोपरच्या ‘पंतनगर’ परिसरात ५००० स्वेअर फूटचा प्लॉट मिळवणं हा स्त्रीशक्तीचा विजयच म्हटला पाहिजे. हे शिवधनुष्य उचलताना चिरीमिरी द्यायची नाही किंवा घ्यायची नाही हा पहिला नियम. दुसरं तत्त्व म्हणजे कायदेकानू यांची माहिती नाही, असं म्हणायचं नाही. जाणकारांकडून सर्व जाणून घ्यायचं आणि पुढे पाऊल टाकायचं. ह प्लॉट मिळवण्यासाठी बायकांना असंख्य हेलपाटे घालावे लागले. काखोटीला जेवणाचा डबा आणि कडेवर मूल घेऊन प्रसंगी दिवसदिवस कार्यालयात ठाण मांडून त्यांनी आपलं इप्सित साध्य केलं.
अर्थात यासाठी घरच्या मंडळींनी दिलेलं सहकार्य लाखमोलाचं होतं. निर्मलाताईंचे पती नानासाहेब तर प्रत्येक प्रसंगी पाठीशी खंबीर उभे होते. पण जागा ताब्यात यायच्या वेळीच नेमकं त्यांना आजारपण आलं आणि भूमिपूजनाच्या दिवशीच त्यांची साथ सुटली. तरीही निर्मलाताई डगमगल्या नाहीत. ठरल्याप्रमाणे इमारतीचं काम सुरू झालं आणि टप्प्याटप्प्याने २२ वर्षांत शाळेची चार मजली वास्तू उभी राहिली. निस्वार्थीपणे केलेल्या जीवतोड मेहनतीला फळं आले. शाळेच्या इमारतीचं उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटवीर व समाजसेवक विजय र्मचट यांच्या हस्ते झालं तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवाला पद्मश्री अनुताई वाघ यांचे आशीर्वाद लाभले. याच्या पुढचं पाऊल म्हणजे २००६ साली संस्थेचे ‘कनिष्ठ महाविद्यालय’ सुरू झालं. आज या शाळेत बालवाडीपासून १२वीपर्यंत ३००० मुलं शिकत आहेत. शिक्षण आणि शिक्षणेतर क्षेत्रात विद्यार्थ्यांची घोडदौड सुरू आहे.
निर्मलाताईंच्या कार्याचा झपाटा ऐकताना वाटत होतं की, त्यांच्यावर घरची जबाबदारी फारशी नसणार पण यासंदर्भात जे समजलं ते अवाक्  करणारं.. दाताराचं घर म्हणजे गोकुळ.. चार मुलगे, सुना, दोन लेकी, जावई, नातवंडे हा स्वत:चा संसार शिवाय लग्नकार्य, बाळंतपण, शस्त्रक्रिया, सणवार अशा निमित्ताने नातेवाईकांचे येणे-जाणे राहणे नित्याचेच. घरच्या आघाडीवर त्यांचे जातीने लक्ष असे. त्यांच्या चारही सुना २० वर्ष एकत्र नांदत होत्या.
दातार सासू-सुनांमधलं नातं तर हेवा करण्यासारखं. सुनांसाठी स्वेटर विणणारी, प्रत्येकीच्या आवडी लक्षात ठेवून, ते ते पदार्थ आवर्जून करणारी सासू कोणाला आवडणार नाही? आपल्या ‘सर्वगुणसंपन्न’ सासूबाईंबद्दल काय सांगू नि काय नको असं नीताताईंना झालं होतं.. ‘त्या पाककलेत जेवढय़ा निपुण होत्या तेवढय़ाच बॅडमिंटनमध्येही. आम्ही त्यांना कधीही रिकामं बसलेलं पाहिलं नाही. हातात भरतकाम, वीणकाम, क्रोशाचं काम, काही ना काही असायचंच. त्या पट्टीच्या पोहणाऱ्या होत्या आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे पोहायला घाबरणाऱ्या आपल्या नातीसाठी त्या ७१व्या वर्षी तरणतलावात उतरल्या आणि ते देखील स्विमिंग कॉस्च्यूम घालून.. कविता करून त्यांना चाली लावणं हा त्यांचा आवडता छंद. एकदा ‘एन’ वार्डतर्फे शाळाशाळांत देशभक्तीपर गीतांची स्पर्धा होती. आपलं वेगळंपण असावं म्हणून त्यांनी स्वत: गाणं रचले. त्याला चाल लावून मुलींकडून पेटी तबल्यावर बसवून घेतले आणि अर्थातच बक्षिसही पटकावलं. १९७४ ते १९७८ अशी चार र्वष या ‘एक्सिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट’ होत्या. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात त्यांना कमालीची आसक्ती होती. क्रिकेट व टेनिसच्या मॅचेस त्या जागून पाहायच्या. महिलांना एकत्रित करण्यासाठी मंडळातर्फे नवरात्रीत ‘उभ्याची महालक्ष्मी’ पूजनाची प्रथा त्यांनी सुरू केली, ती आजही सुरू आहे.’
मुलांच्या व स्त्रियांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी आयुष्य वेचणारी ही ‘अंधारातील सावित्री’ उभ्या आयुष्यात प्रसिद्धीपासून मात्र चार हात लांब राहिली. निर्मलाताईंच्या आयुष्याची ही कहाणी ऐकताना प्रवीण दवणे यांचं एक वाक्य आठवतं, राहिलं.. जन्म-मृत्यूची सरकारी कॅटलॉगमध्ये नोंद प्रत्येकाचीच होते हो; जन्म घेतल्यावर कुणाच्या काळजात नोंद करू शकलात तर खरे जगलात!     
(समाप्त.)