News Flash

निरामय घरटं : निंदा निभावताना..

आपली स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल आणि आत्मविश्वास विकसित झालेला असेल तर आपण बाहेरचे ताण सहन करायला सक्षम असतो, असं मानसशास्त्रात म्हटलं जातं.

कठीण परिस्थितीशी जुळवून घ्यायची कुवत असेल, आपल्या निर्मळ हेतूंवर विश्वास असेल, तर अनुचित सामाजिक दडपणाला अनुसरून आपली प्रतिमा सांभाळायला हवी, हे भूत मानगुटीवर स्वार होत नाही.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

आपली स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल आणि आत्मविश्वास विकसित झालेला असेल तर आपण बाहेरचे ताण सहन करायला सक्षम असतो, असं मानसशास्त्रात म्हटलं जातं. त्याला ‘मानसिक टणकपणा’ असंही म्हणता येईल. आपल्या निर्मळ हेतूंवर विश्वास असेल, तर अनुचित सामाजिक दडपणाला अनुसरून आपली प्रतिमा सांभाळण्याची गरज नाही. स्वत:चं वागणं उचित आणि हेतू निर्मळ असताना प्रसंगी निंदा निभावण्याचा आणि ‘पण लोक काय म्हणतील’ या चिंतेला आमंत्रण न देण्याचा ‘सहज संस्कार’ रुजवता येतो.

अनेकदा मनात विचार येतो, सावित्रीबाई फुले यांनी जननिंदेमुळे मुलींना शिकवणं बंद करून टाकलं असतं तर?  त्यांनी टीका सहन के ली म्हणून मुली प्रगती करू शकल्या. मग आज शिक्षण आणि त्या अनुषंगानं मिळणाऱ्या अनेक सुविधा सहज उपलब्ध असतानाही अनेकांना एखादी टीका का सहन करता येऊ नये? का चांगल्या गोष्टीसाठी निंदा सहन करायला अनेक जण बिचकतात?

मागच्या लेखात (‘निर्मोही संयम’ २५ एप्रिल) जसं एका आजींचं उदाहरण बघितलं. त्या आजारी शेजाऱ्यांना दवाखान्यात भेटायला न जाता त्यांच्या नातेवाईकांना चहा करून देऊन मदत करायच्या. त्या दवाखान्यात रुग्णाला भेटायला गेल्या नाहीत यावरून काही जण त्यांना नावं ठेवू शकतात; पण नावं ठेवण्याकडे दुर्लक्ष करता येणं, ही सुरुवात असते आणि नावं ठेवण्याच्या दडपणामुळे आपलं योग्य वागणं न बदलणं ही पुढची पायरी. स्वत:पुरता प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर शक्यतो टाळणारी अस्मिता हळदी-कुंकू केलं की, मात्र मैत्रिणी काय म्हणतील म्हणून नव्या कोऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मनातून पटत नसतानाही विकत आणते. याउलट ‘लोक काय म्हणतील’ याची अजिंक्य मुळीच चिंता करत नाही. हात धुवायची सोय असतानाही उगाचच हात पुसायला टिश्यू पेपर वापरणं अजिंक्यला वायफळ वाटतं. त्याच्याकडे कधी स्वागत समारंभ असला, की तो पाहुण्यांची हात धुवायची आणि कापडी टॉवेलनं हात पुसायची पुरेशी व्यवस्था करतो.  बऱ्याच मुलांना खेळताना साधे, सुटसुटीत  कपडे घालणं सोयीचं वाटतं. तरीही कधी-कधी काही पालक विशिष्ट प्रकारचे (त्यांच्या मते ‘भारी’ असे) कपडे घालायची जबरदस्ती मुलांवर करू पाहतात. तेव्हाही, ‘अरे, पण जरा बरे कपडे घाल, लोक काय म्हणतील?’ हा बागुलबुवा तयार केला जातो. मुळात तयार केलेला बागुलबुवाच तो; मग विकतची चिंता न ओढवली तरच नवल! त्यातून पालक आणि मुलं कुणाचीच सुटका होत नाही.

आपली स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल आणि आत्मविश्वास विकसित झाला असेल तर आपण बाहेरचे ताण सहन करायला सक्षम असतो, असं मानसशास्त्रात म्हटलं जातं. ‘सायकॉलॉजिकल रेझिलियन्स’ अशी एक संज्ञा वापरली जाते. त्याला साध्या भाषेत ‘मानसिक टणकपणा’ असं म्हणता येईल. जशी शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजूबाजूच्या विषाणूंचा शरीरावर परिणाम होऊ शकत नाही, तसं कठीण परिस्थितीशी जुळवून घ्यायची कुवत असेल, आपल्या निर्मळ हेतूंवर विश्वास असेल, तर अनुचित सामाजिक दडपणाला अनुसरून आपली प्रतिमा सांभाळायला हवी, हे भूत मानगुटीवर स्वार होत नाही. याची बहुविध रूपं अनुभवायला मिळतात. निदान काही लोकांना तरी मोबाइलचा वापर आजच्या काळातलं एक उपयोगी साधन इतपतच करताना वावगं वाटत नाही. मोबाइल कोणता, किती भारी याच्याशी जेव्हा आपली प्रतिमा जोडली जात नाही, तेव्हा इतरांकडे कोणता मोबाइल आहे आणि माझा त्याहून किती साधा आहे, ही तुलना स्पर्श करून जात नाही. मग त्याचा येणारा ताण किंवा इतरांनी आपल्या ‘मागासलेपणाबद्दल’ चिडवण्यानं व्यथित होणं, हे आपोआप कोसभर दूर राहतं. अशा वातावरणात वाढताना मुलंही बारीकसारीक गोष्टीतल्या चिडवाचिडवीला उपद्रव मानत नाहीत. अशा वातावरणात वाढलेला मुलगा गाडीवरचे, उघडय़ावरचे पदार्थ मित्रांबरोबर खायला नाही म्हटल्यामुळे मित्रांचं चिडवणं हळूहळू झेलायला शिकतो. ‘शाळेच्या चाचणी परीक्षेत एखादं उत्तर मैत्रिणीला सांगितलं तर एवढं काय झालं; ती कुठे कॉपी आहे?,’ असं वातावरण हल्ली काही माध्यमिक शाळांमध्ये बघायला मिळतं.  शिक्षक दक्षता घेण्याचा प्रयत्न करतात; पण मुळात मुलांना परीक्षेत प्रामाणिक राहण्याचं पुरेसं गांभीर्य वाटत नाही. काही मुलं, मुली याला अपवाद ठरतात. ती वर्गातल्या मित्रांच्या अशा दबावाच्या भरीस पडत नाहीत. इथे मुलांनी घरातल्या वागणुकीचा अस्सल अनुभव घेतला आहे किंवा नाही यानं फरक पडू शकतो.

निंदा निभावणं, ती सहन करणं म्हणजे कमीपणा असं नसतं. निमूटपणे, घाबरून ऐकणं असंही  नाही. बहुसंख्य लोक एखादी गोष्ट करत असले तरी ते मी का करणार, त्यामागचा विचार  काय, हे आधी पडताळून पाहून योग्य तेच करणार, ही सवय लावून घ्यावी लागते. आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा ती का करतो, ती कशी योग्य आहे, असा ठाम विश्वास असावा लागतो. जसं अजिंक्यला माहीत होतं, की त्याची बांधिलकी पर्यावरणाशी आहे. प्रस्थ म्हणून पेपर टॉवेल वापरण्याची आवश्यकता नाही. हे नेमकं उमगलेलं असल्यामुळे डगमगायचा प्रश्न नव्हता.  कधी आधी विरोध झेलावा, पचवावा लागतो. झेलायला जमलं तर नंतर जे एखाद्या गोष्टीला विरोध करत असतात त्यांनाच त्याची दुसरी बाजू पटवून द्यायची ताकद त्यांच्यात येऊ शकते. जसं प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या जागी एका भाजीविक्रेत्या काकांनी कापडी पिशवीतच भाजी  देण्याचा आग्रह धरला. पहिल्यांदा त्यांना काही ग्राहकांकडून विरोधही झाला; पण त्यांनी कापडी पिशव्यांतच भाजी देणं चालू ठेवलं, वेगवेगळ्या आकारांतल्या कापडी पिशव्या बनवून घेणं,प्लॅस्टिकचा पर्यायच हळूहळू कमी करणं, हे सुरुवातीला विरोध झेलत केलं. काही महिन्यांत बऱ्याच  ग्राहकांना शिस्तच लागली. काकांनी त्यांचा मुद्दा प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिला. प्लॅस्टिकबंदी नंतर झाली. भाजीवाल्या काकांनी सुरुवातीपासूनच प्लॅस्टिक पिशव्या टाळून कापडी पिशव्या वापरण्याविषयी आपणहून  कळकळीनं बोलायला सुरुवात के ली होती. त्यामुळे ग्राहकांचा प्लॅस्टिक पिशव्या विकत घ्यायचा खर्चही वाचत होता. प्लॅस्टिकचा कचरा कमी होतो हेही त्यांना जाणवायला लागलं होतं. म्हणून ते स्वत:ही तसा प्रयत्न करू शकले. योग्य गोष्टी अनुभवलेल्या असतील, योग्य गोष्टी करता याव्यात असे संस्कार झालेले असतील आणि योग्य गोष्टींसाठी कुणाचा कुठून तरी थोडा पाठिंबा असेल तर हे बळ मिळू शकतं. ‘लोक काय म्हणतील’ ही टांगती तलवार मग उरत नाही.

मुलांनी योग्य कारणांसाठी निंदा निभावणारं व्हावं, यासाठी त्यांना तसं वातावरण मिळणं हे समाजाच्या हातात आहे. बालवाडीपासून ते अगदी महाविद्यालयापर्यंत सगळ्या वयांत हे बळ गरजेचं असतं. रोज वापरायचं शाळेचं दप्तर कार्टूनच्या चित्राचं नाही म्हणून मित्र चिडवतात, जवळपासच्या ठिकाणी साध्या घरगुती सहलीला गेल्याचं सांगितलं तर मित्रमैत्रिणी खिल्ली उडवतात. अशा वेळी मुलांची समजूत कशी काढायची, असं विचारायला काही पालक भेटायला येतात तेव्हा परत एकदा हा घरातल्या वातावरणाचा, पूर्ण जीवनशैलीशी निगडित असा विषय आहे, याची व्याप्ती पालकांना प्रकर्षांनं जाणवून द्यावी लागते. मग त्यावर काय करता येईल यासाठी सुटसुटीत, व्यावहारिक पर्यायही चर्चिले जातात. लोकांची इच्छा तर असते साधं सरळ जगण्याची, पण समाजापुढे त्यांचा टिकाव लागणार नाही, असं वाटून जातं कधी. अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांना सामोरं तर त्यांचं त्यांनाच जायचं असतं; पण आश्वासक सल्ल्यांनी हिंमत वाढते. मुलांनाही यातून बाजूला, लांब ठेवून चालणार नाही हे मनोमन पटतं. मग प्रसंगानुरूप त्यातून आपली पाऊलवाट काढायची असते, हे तंत्र जमायला लागतं. ज्या कुटुंबाचा हा जगण्याचा स्थायिभाव आहे, त्या मुलांना ही आंदोलनं पेलायची असतात हे कळून चुकतं. कोणत्याही वयात त्याचं रूप बदललं तरी अडथळे येणं थांबत नाही. बदलत्या काळात बदलती टीका अधिक सामंजस्यानं पचवत राहणं हे निरोगी  जगण्यातलं जीवनकौशल्य बनून जातं.

समाज म्हणून आपल्याला कोणाला निंदा सहन करायला लावायची आहे, हे मात्र फिरून एकदा पडताळून पाहायची वेळ आली आहे. सत्प्रवृत्तीलाच तावून सुलाखून अधिक तेजस्वी करायचा हा मार्ग नक्की आहे. कसोटीच्या प्रसंगी जिवावर उदार होऊन करोनाग्रस्त रुग्णांना वाचवणाऱ्या वैद्यक सत्प्रवृत्तीला विरोध पत्करायची वेळ न यावी. समाजाची सकस धाटणी असेल तर चुकणाऱ्याला टीकेची भीती वाटेल असं वातावरण असणं ही खरी रीत व्हायला हवी. टाळेबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना अपराधी वाटावं, की जे सुशासन राखायला कार्यतत्पर आहेत त्या पोलिसांना झळ पोहोचावी?.. उचित वागणं हा अपवाद ठरू नये. पूर्वी गावात वेडंवाकडं वागण्याची कोणाची टाप नसायची. ही योग्य-अयोग्याची आदरयुक्त भीती आपण झुगारून टाकली. ती ताकद परत जागी व्हावी. उचित वागणाऱ्याला बिचकून नाही, तर ताठ मानेनं वागण्याचं बळ यावं. हे सारं आपणच करू शकतो; सुरुवात आपल्यापासूनच करत.

दिवे, पंखे बंद करणाऱ्याला काटकसरी म्हणून न चिडवता, गणपती उत्सवात आपल्या वसाहतीत लहान मुलांचे त्यांच्या वयाला साजेसे कार्यक्रम बसवायला हवेत. भल्यासाठी प्रसंगी टीका ऐकून घेणं कमीपणाचं नाही, हे आपल्या वागणुकीतूनच मुलांना सहजी अनुभवू  द्यायला हवं. घरटय़ात निरामयता अनुभवायलासुद्धा घरटय़ातली आणि घरटय़ाबाहेरची ही निंदा निभावता यावी यासाठी विवेकी विचाराचं बळ आपल्याजवळ साठवू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:01 am

Web Title: own image positivity confidence niyamanch gharta dd70
Next Stories
1 पडसाद: शिक्षकांप्रति कृतज्ञता
2 करोना संकट स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व
3 भूतकाळात  डोकावताना..
Just Now!
X