तळहाताच्या प्रत्येक बोटापेक्षा मुठीची एकत्रित ताकद कैकपटींनी जास्त असते. ‘स्त्रीसमर्थ’ या यशस्वी सदरानंतर त्याचं पुढचं पाऊल म्हणून यंदाच्या वर्षी स्त्रियांच्या एकत्र मुठीची ताकद ‘चतुरंग’च्या वाचकांना अनुभवायला मिळणार आहे ती ‘आम्ही साऱ्या’ या सदरातून. पाच किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रियांनी एकत्र येऊन केलेलं विधायक काम असो, उद्योग-व्यवसाय असो की इतर काही, त्यांच्या अनुभवाचं, त्यांच्या संचिताचं हे सादरीकरण दर पंधरवडय़ाने..
त्या सात जणी एकत्र याव्यात असा कोणताच बंध त्यांच्यात नव्हता. ना धर्माचा, ना शिक्षणाचा किंवा ना रक्ताच्या नात्याचा. महाराष्ट्राच्या नकाशावर वेगवेगळ्या बिंदूंवर अगदी भिन्न कौटुंबिक परिस्थितीत वाढलेल्या त्यांना एकत्र आणलं ते प्रत्येकीच्या नवऱ्याच्या नोकरीने. ते सगळे ‘टेल्को’चे (आता टाटा मोटर्स) कर्मचारी. टेल्को कंपनीच्या नावामागेच ‘टाटा’ नावाचा मोठा इतिहास आणि संस्कार. कर्मचाऱ्यांमधील माणूस, त्याच्या भावनिक- कौटुंबिक गरजा जाणणारे हे संस्कार. कंपनीत काम चोख हवे असेल तर त्याच्यासाठी घरात स्वास्थ्य आणि समाधान हवे. मग त्यासाठी घरातील गृहिणीलाही बरोबर घेतलं तर? कसं साधता येईल हे? कंपनीची नोकरी आठ तासांची, पण गृहिणीवर घराची, मुलाबाळांची, पै-पाहुण्यांची जबाबदारी. दोन्ही कामांचे वेग भिन्न आणि धर्मही भिन्न, पण तरीही या दोघांमध्ये काही नातं निर्माण करता येईल? विचार सुरू झाला, प्रयत्न सुरू झाला आणि बीज पडलं ‘टेल्को गृहिणी’चं;  अर्थातच ‘टाटा मोटर्स गृहिणी सोशल वेलफेअर सोसायटी’चं.
१९७३ साली, सुमारे चार दशकांपूर्वी अवघ्या सात स्त्रियांनी सुरू केलेल्या या चळवळीची आजची सदस्यसंख्या आहे एक हजार आणि त्यांच्या वेगवेगळ्या चार विभागांमार्फत होणारी उलाढाल आहे तब्बल तेरा कोटी! सर्व व्यवहार संगणकामार्फत, कामावर येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा नेटका युनिफॉर्म, निवृत्त सभासदांना पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड अशा सगळ्या सोईंची-नियमांची आखीव चौकट असलेल्या या सगळ्या व्यवहारांना एक जिव्हाळ्याचा स्त्रीसुलभ स्पर्श आणि म्हणून स्त्रियांच्या प्रश्नांचं नेमकं भान. एखाद्या उद्योगाचं, त्यातील कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नातं किती परस्परपूरक आणि परस्परांना समृद्ध करणारं होऊ शकतं याचं अतिशय वेधक उदाहरण म्हणून या चळवळीची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात करावी लागेल.
त्या सात जणींना एकत्र आणण्यामागे प्रेरणा होती ती टेल्कोला आपले कुटुंब मानून त्याचं संगोपन करणाऱ्या सुमंत व लीलाताई मुळगावकरांची. त्या सातांपैकी दोघी जणींशी माझ्या गप्पा सुरू होत्या, उज्ज्वला मराठे आणि शकुंतला पोळेकर अगदी आठवून सांगत होत्या, ती फसलेल्या पापड प्रकल्पाची कहाणी. १९७३ मध्ये सुरू झालेली.. मुळात स्त्रियांना अशा काही कामासाठी एकत्र आणणं हेच त्या वेळी त्यांच्यापुढील मोठं आव्हान होतं. ऊर्मिला भोसले, रोहिणी झेंडे, सरूबाई गावडे, सुमती होनकळस, ताराबाई प्रभुणे आणि वर उल्लेख केलेले मराठे-पोळेकर अशा सात जणी दर बुधवारी पुणे ते लोणावळा आणि परिसरात टेल्को कामगारांच्या घरोघरी जात.. बायकांशी बोलायला, त्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रवृत्त करायला. पण असं बाईनं घराबाहेर वगैरे पडणं बहुसंख्य स्त्रियांना मंजूर नव्हतं. ‘टेल्को’त नवरा काम करीत असताना आम्ही करण्याची गरजच काय, असाही कित्येकींचा सवाल होता. पण तरीही पहिला प्रयत्न म्हणून अर्थातच पापड बनवणं सुरू केलं. पीठ भिजवून प्रत्येकीच्या घरी देणं आणि असे घरोघरी लाटलेले पापड गोळा करणं. या पापडांना खात्रीची अन् हक्काची बाजारपेठ होती ती अर्थातच टेल्को कँटीनची. पण घरोघरी लाटल्या गेलेल्या या पापडांचे वेगवेगळे आकार, आकारमान, रंगरूप हे कंपनीच्या स्टॅण्डर्डायझेशनच्या स्वभावाला मानवणारं नव्हतं. शिवाय बायकांच्या घरी बनणाऱ्या या पापडांना पावसाळ्यात ओल लागून बुरशी धरायची, असा सगळा तो आतबट्टय़ाचा व्यवहार ठरत होता. मग कल्पना पुढे आली ती अधिक टिकाऊ आणि वेगळ्या प्रकारचं काम सुरू करण्याची. त्यामुळे पुढील पर्याय होता तो अर्थात शिवणकामाचा. कंपनीला लागणारी डस्टर्स शिवून देण्याच्या या कामातील कच्चा माल कंपनीकडून मिळत असे आणि एका डस्टरमागे मजुरी मिळते असे चार आणे.
१९७३ ते ७९ अशी तब्बल सात वर्षे या स्त्रिया लढत होत्या. पहिल्या तीन वर्षांत सातावरून सत्तावीस स्त्रिया एकत्र येण्याइतपत त्यांनी मजल मारली होती. तरीही ‘गृहिणी’मध्ये येण्यासाठी स्त्रियांचं मन वळवणं हे आव्हान होतंच, पण त्यामुळेच गृहिणींच्या कामातील एक नियम पक्का झाला तो म्हणजे, इथे येणारी गृहिणी फक्त चारच तास काम करेल. शक्य असल्यास काम तिच्या घरी दिलं जाईल किंवा तिच्या घराजवळ उपलब्ध करून दिलं जाईल. पारंपरिक नोकरीच्या नियमांना निग्रहाने दूर ठेवणारा आणि तरीही अर्थार्जनाची संधी देणारा हा दृष्टिकोन या चळवळीला बळ देणारा ठरला. या चळवळीला वेगळी दिशा मिळाली ती आणखी एका गोष्टीमुळे. गृहिणींनी काम करताना पोळपाट लाटण्यापलीकडे जाऊन विचार करावा, या लीलाताई मुळगावकर यांच्या दृष्टिकोनामुळे.
कारण त्यातून एका नव्या कामाचं दार या महिलांसाठी उघडलं. इलेक्ट्रॉनिक्स विभागाची सुरुवात झाली. एकूण चार वेगवेगळ्या औद्योगिक सहकारी संस्था आज टाटा मोटर्स गृहिणी सोशल वेलफेअर सोसायटी या ट्रस्टअंतर्गत काम करतात. शिवणकला विभाग, खाद्यपदार्थाची मोठी रेंज असणारा विविध कार्यकारी विभाग हे दोन विभाग अगदी नैसर्गिकपणे स्त्रीसुलभ कामाचे आहेत. याखेरीज टाटा मोटर्सच्या विविध उत्पादनांमधील काही भागांची जबाबदारी सांभाळणारा इलेक्ट्रॉनिक्स आणि केबल हार्नेसिंग असे दोन तांत्रिक विभागही या महिला चालवतात. एकीकडे चटण्या, चकल्या, लाडू, लोणची करणाऱ्या किंवा कंपनीला लागणारे ग्लोव्हज व गणवेश शिवणाऱ्या महिला ज्या तडफेने काम करतात, त्याच आत्मविश्वासाने त्या इलेक्ट्रॉनिक किंवा केबल हार्नेसिंग विभागात काम करतात. वेगवेगळ्या केबल्सचा कलरकोड आणि डिझाईन समजून घेत रिपेअरिंग, फॉल्ट फाइंडिंग, ड्रिलिंग, टॅपिंग, सोल्डरिंग, टेस्टिंग करतात. गाडय़ांच्या सुटय़ा भागांची जुळणी करतात. या दोन्ही विभागांसाठी लागणारा कच्चा माल तर त्यांना कंपनीकडून मिळतोच पण आवश्यक ते प्रशिक्षणही वेळोवेळी कंपनीकडून मिळत असतं. टाटा मोटर्सच्या अवाढव्य यंत्रणेतील एक छोटासा भाग असलेले हे विभाग त्या मोठय़ा यंत्रणेशी आता सहजपणे एकरूप झाले आहेत.
‘गृहिणी’मध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या आवडीचं काम निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच हातातील काम ‘कंटाळवाणे रुटिन’ बनत नाही. ‘गृहिणी’ची अनेक उत्पादनं ही आज केवळ टाटा मोटर्सपुरती मर्यादित न राहता खुल्या बाजारपेठेत जाऊन तेथील स्पर्धेला तोंड देत दमदारपणे उभी आहेत ती यामुळेच. येथे बनवलेले मसाले, लोणची अनेक हॉटेल्सना पुरवली जातात. एकूण विविध ७२ प्रकारची खाद्य उत्पादने टाटा मोटर्समधील कँटीनमध्ये तर वापरली-विकली जातातच, पण पुणे शहरातही त्यांची विक्री केंद्रं आहेत. यंदाच्या दिवाळीत या विभागाची निव्वळ फराळाची उलाढाल ही ४० लाख रुपयांची होती. सगळ्याच खाद्यपदार्थाना प्रचंड मागणी असलेल्या या विभागात आता खूप मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरण (अ‍ॅटोमायझेशन) येऊन सगळ्या कामाला वेगाचा आणि आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे. माल गाडीत भरणं-उतरवणं-वाहून नेणं यासारखी शारीरिक श्रमाची कामं वगळता घाऊक खरेदीपासून सर्व कामं स्त्रिया अत्यंत आत्मविश्वासाने सफाईने करीत आहेत.
जी प्रगती व झेप विविध कार्यकारी सोसायटीने घेतली आहे तीच तडफ शिवणकला विभागातही दिसते आणि तशीच आधुनिकताही. टाटा मोटर्सचे विविध गणवेश, ग्लोव्हज् शिवणाऱ्या या बायका आता पुण्यातील काही हॉस्पिटलनाही ग्लोव्हज पुरवतात. कटिंग मशिनच्या मदतीने सफाईने एका वेळी शंभर पँट्सचे कटिंग करणं, काज-बटणाच्या मशिन्सवर वेगाने काम करणं आणि प्रत्येक स्त्रीला दिलेल्या कामाचा अचूक तपशील, हिशेब ठेवणं हे करताना येणारा आत्मविश्वास, पटणारी स्वत:ची ओळख ही या गृहिणीतील स्त्रीच्या चेहेऱ्यावर मला दिसली!
एकोणचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘गृहिणी’मध्ये आज स्त्रियांची दुसरी पिढी काम करते आहे. या दोन्ही पिढय़ांना मिळालेलं नेतृत्वही तेवढंच दमदार आणि बहुआयामी होतं. टाटा मोटर्समधील वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी ही या सोसायटीची अध्यक्ष असते. लीलाताई मुळगावकरांबरोबर प्रभा काळे, मंजू नाथ, विदुला जकातदार, शमा मायरा, प्रभा गुजराथी आणि सध्या सुवर्णा हेगडे अशा स्त्रियांनी या संघटनेचं नेतृत्व करताना आपापली म्हणून एक छटा या कामाला दिलीच; पण मुख्य म्हणजे या कामाला समाजाच्या उच्चभ्रू वर्गात एक सन्मानाची ओळख प्राप्त करून दिली हे खूप महत्त्वाचं आहे.
 या चारही संस्थांत काम करणारी स्त्री ही त्या संस्थेची भागधारक असते. चारही संस्थांना स्वतंत्रपणे अध्यक्ष आणि कार्यकारी समिती आहे. या चारही संस्थांचे प्रतिनिधी मिळून टाटा गृहिणीची मध्यवर्ती कार्यकारिणी बनते, अशी एक नेटकी, सुटसुटीत चौकट या संस्थेला आहे पण त्यातील गोडवा आहे तो त्याच्या अंमलबजावणीत. इथे सगळ्या जणी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. प्रत्येकीने कधी ना कधी दुसरीच्या अडचणीत तिला आधाराचा हात दिला आहे, तिच्या पाठीवर मायेने हात ठेवला आहे.
त्यामुळेच, या मैत्रिणी आपल्या पाच तासांच्या कामापलीकडे स्वत:साठी आणि स्वत:बरोबरच इतरांसाठी ‘गृहिणी’मार्फत किती तरी गोष्टी करतात. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला रोज एक कॅल्शियमची  गोळी दिली जाते. आरोग्यतपासणी; त्यातही स्त्रियांच्या आरोग्य तपासण्या, आहारविषयक जागरूकता, अन्य व्याख्याने तर होतातच पण या सगळ्या एकत्र सहलीला जातात, वार्षिक सर्वसाधारण सभेत गाणी-नाटकं होतात आणि या जल्लोषाला, मौजमजेला त्यांनी समाजकारणाची जोडही दिली आहे.
स्वत:पलीकडे असणाऱ्या समाजाकडे करुणेने, आस्थेने बघण्याचा टाटांचा संस्कार या स्त्रियांपर्यंतही झिरपला आहे, त्यामुळेच सोसायटी प्लास्टिक पिशव्या वापरत नाही. गिरीश प्रभुणेंच्या समरसता गुरुकुलातील मुलांना धान्य देतात आणि ‘टाटा मोटर्स’तर्फे मेळघाटातील मुलांना पाठवल्या जाणाऱ्या मदतीमध्ये या बायकांनी बनवलेली दाणेगुळाची चिक्की आवर्जून असते.
या प्रचंड धडपडीने या स्त्रियांना काय दिले?  पुरस्कार, कौतुकाचे क्षण तर दिलेच पण त्यापलीकडे जाऊन दिला तो आत्मविश्वास आणि स्वओळख. रोज युनिफॉर्म घालून कामाच्या ठिकाणी येणारी मी ही निव्वळ गृहिणी नाही, त्यापलीकडे काही, ही जाणीव किती सुंदर असते याचा प्रत्यय रूपाली, सुप्रिया, जयश्री, छाया अशा ज्या-ज्या मैत्रिणींशी बोलले त्या प्रत्येक वेळी आला. जगण्यासाठी केवळ अन्न-पाणी नाही तर अशा आत्मविश्वासाचा प्राणवायूही हवा असतो, नाही? टाटा मोटर्सचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे याचा प्रत्यय ‘गृहिणी’ बघताना येतो. त्याचं अनुकरण करण्याची प्रेरणा अन्य मोठय़ा उद्योगसमूहांनी घ्यायला हवी, असं नक्की वाटतं.