शुभा प्रभू साटम

एखाद्या स्त्रीला पूर्ववैमनस्यामधून चेटकीण, डाकीण ठरवणं, तिच्यावर अत्याचार करून तिला वाळीत टाकणं हे आजही कित्येक गावांमधलं वास्तव आहे. अशा अपमानाचे चटके  सोसलेल्या झारखंडच्या छुटनी देवी एका संस्थेच्या सहाय्यानं उभ्या राहिल्या आणि आपल्यासारख्या इतर पीडित स्त्रियांना आधार देण्याचा वसाच त्यांनी घेतला. छुटनी देवींनी प्रचंड संघर्षांतून उभ्या के लेल्या कार्यावर या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्काराची मोहोर उमटली.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

सर्वसाधारण गरीब घरातून आलेली छुटनी. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झालं. मुलं, संसार, सगळं सुरू होतं. मुलांना शिकवायचं याच एका ध्यासानं त्यांनी अफाट कष्ट सुरू  केले. सगळं तसं ठीकठाक चाललेलं असताना जुनाट कुरबुरींवरून भाऊबंदकी विरोधात गेली. छुटनींबद्दल गावात हेतुपुरस्सर गैरसमज पसरवले गेले. ती कुजबुज नंतर ‘छुटनी जादूटोणा,चेटूक करते,’ या आरोपात बळावली.

‘गावातील कोणी एक मुलगी तुझ्या चेटूक आणि करणीमुळे आजारी पडली. आता तिला तूच बरं कर,’ असा आदेश एकदा गाव पंचायतीनं दिला. तेव्हा ‘‘तिला दवा द्या, डॉक्टरकडे न्या. मी काही करू शकत नाही.’’ असं छुटनी यांनी सांगितलं. पंचायतीचा आदेश मानत नाही म्हणून त्यांची भर गावात अर्धनग्न धिंड काढली गेली, गावकऱ्यांसमोर त्यांच्या तोंडात मूत्र, विष्ठा भरली, त्यांच्या घरावर हल्ला झाला.. छुटनी जीव वाचवण्यासाठी पळाल्या. मुलांना सोबत घेऊन काही दिवस त्यांनी माहेरी आश्रय घेतला. नवरा हताश झालेला, पूर्ण गाव, नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले. पंचक्रोशीत ‘ही बाई चेटूक, जादू-करणी करते,’ असं बघता बघता पसरलं.

मग छुटनी यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, स्थानिक आमदारांची भेट घेतली. पण उपयोग झाला नाही. ही घटना १९९९ मधली. तेव्हा छुटनी गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागल्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांचा संघर्ष अथक होता. याच सुमारास त्या ‘आशा’ या स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आल्या. एखाद्या बाईला हडळ समजून बहिष्कृत करण्याच्या ज्या कुप्रथा गावखेडय़ात आहेत, त्यांच्यासंदर्भात ही संस्था लक्षणीय काम करते. छुटनी देवी यांनी तिथे त्यांच्या कामाचा ओनामा  केला. हे सगळं वाचायला सहज वाटत असलं तरी वास्तवात ते कित्येक पटींनी भयानक असतं.

भारतात अनेक गावांत आजही स्त्रियांना चेटकीण, डाकीण, जादूटोणा करणारी ठरवून बहिष्कृत केलं जातं. याबाबतीत स्थानिक लोकभावना इतकी प्रखर असते, की मनात असूनही अनेकदा पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था काही करू  शकत नाही. छुटनी देवींच्या मते दुष्काळ असो अथवा रोगराई, एखाद्याचं लग्न मोडणं अथवा निवडणूक हरणं, काहीही वाईट घडलं, तर खापर अशा कोणत्या तरी स्त्रीवर फोडलं जातं. त्यात स्त्री जर एकटी राहाणारी, निराधार, अपत्यहीन असेल तर तिच्या छळाला पारावार राहात नाही. अनेक बायका आजही असं जीवन जगत आहेत. छुटनी यांच्या नशिबानं त्यांचा नवरा त्यांच्याबरोबर होता, पण असं नेहमी घडत नाही. स्त्री पूर्ण एकटी पडते.

छुटनी ‘आशा’ संस्थेत आल्या आणि त्यांचं आयुष्य पालटलं. गावोगावी सभा घेणं, पथनाटय़ात सहभागी होणं, अशा कामांमधून त्या हळूहळू पुढे येऊ लागल्या. अशा तऱ्हेनं प्रताडित केलेली, असहाय्य स्त्री बघून छुटनी यांना आपल्या यातना आठवायच्या आणि ते भोग कोणाच्या नशिबी येऊ नयेत यासाठी त्या जिद्दीनं काम करायच्या. त्यांचा निर्भीड, रोखठोक स्वभाव कामी येऊ लागला. आज घडीला छुटनी यांच्यासोबत ६२ स्त्रिया आहेत. या सगळ्या जणी चेटकीण, हडळ म्हणून बहिष्कृत झालेल्या, अपमानित जीवन जगणाऱ्या. आपल्या कामात छुटनी यांनी त्यांना सहभागी करून घेतलं आहे.

निरक्षर असलेल्या छुटनी यांना हिंदी, बंगाली, ओरिया या भाषा येतात. त्यांच्या  ‘खबऱ्यां’चं मोठं जाळं आजूबाजूच्या अनेक गावखेडय़ांत आहे. कोणतीही स्त्री अशा प्रकारे चेटकीण ठरवली जाते आहे, हे कळल्यावर छुटनी तिथे पोहोचतात. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी असतात. पंचायत, गावकरी यांच्याशी त्या बोलतात, प्रसंगी पोलीस, कायद्याची मदत घेतात आणि त्या स्त्रीला वाचवतात. अनेकदा अशा स्त्रियांना घरचे परत घेत नाहीत. मग छुटनी त्यांना आश्रय देतात, जेवू-खाऊ घालतात. या कार्यात त्यांना कधी आर्थिक मदत मिळते, पण अनेकदा त्यांना त्यांचेच पैसे खर्च करावे लागतात. सरायकेलामधील बिरबस गावात छुटनी राहातात. फक्त झारखंडच नव्हे, तर देशाच्या अनेक भागांतून त्यांच्याकडे स्त्रिया, त्यांच्या घरची मंडळी मदतीसाठी येतात.

छुटनींच्या म्हणण्यानुसार स्त्रीला दोषी ठरवणं अतिशय सोपं असतं. एक तर या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं, शिवाय त्यांच्या शब्दाला काही किं मत दिली जात नसल्यानं निर्णयक्षमता नसते. त्यात पराकोटीचं दारिद्रय़ असतं. कुटुंबीयही काही करू शकत नाहीत. स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जातील या भीतीनं आमदार, खासदार, राजकीय नेते मंडळी, पोलीस शक्यतो मध्ये पडत नाहीत. पण त्याच वेळेला छुटनी यांच्यासारखी स्त्री धैर्य दाखवते, लोकांशी संवाद साधते. अनेकदा पोलीस प्रशासन त्यांच्याशी संपर्क साधून मदत घेतं. कोणे एके काळी गावातील संकट म्हणून ज्या छुटनींना बहिष्कृत करण्यात आलं, त्यांनाच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

याआधी त्यांना अनेक स्थानिक पुरस्कार मिळाले आहेत. पण ‘पद्मश्री’ पुरस्कार त्यांच्या कार्यावर मानाची मोहोर उमटवणारा आहे. अर्थात छुटनी यावर थांबणाऱ्या नाहीत. त्यांच्या दृष्टीनं ही लढाई कायम असणार आहे.  गावात आजही गावकी-भावकीचं महत्त्व अबाधित आहे. घटनेचे अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य, हक्क यांना इथे दुय्यम स्थान. आणि या उतरंडीत बाई तळाला. पण त्यातूनही छुटनीसारखी कोणी तरी पेटून उठते, अथक प्रयत्न करते. लोककथा, परिकथेतील हडळ, चेटकीण, जखीण आजही ग्रामीण जनमानसात जागृत आहेत. देव-देवी दिसो अथवा न दिसो, अशा राक्षसी प्रतिमा मात्र कोणत्या तरी स्त्रीच्या नशिबी येऊन तिच्या कपाळावर यातनांची तप्तमुद्रा उठवून जातात. छुटनी देवींसारखी एखादी मात्र ती जखम फक्त भरून थांबत नाही, तर ती जखम अन्य कोणाला होऊ नये यासाठी झटते.

परीकथेतील परी येईल की नाही ते गैरलागू , पण आज छुटनीदेवी अनेक असहाय्य स्त्रियांसाठी देवीचं रुप झाली आहे.

shubhaprabhusatam@gmail.com