16 July 2020

News Flash

‘पान पे खाना और पत्ते पे रहना’

महाराष्ट्रातले पहिलवान आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी प्रत्येक कामाची सुरुवात बजरंगबलीचा जयजयकार व पूजेने होते.

| June 6, 2015 01:01 am

ch20महाराष्ट्रातले पहिलवान आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी प्रत्येक कामाची सुरुवात बजरंगबलीचा जयजयकार व पूजेने होते. यांची भटकी पाश्र्वभूमी व सामजिक, आíथक दर्जा लक्षात घेता ते भटक्या जमातींच्या यादीत असायला हवेत; परंतु राज्य शासनाच्या कोणत्याही मागासवर्गाच्या यादीत ते नाहीत. त्यामुळे विकास प्रक्रियेत आजही दुर्लक्षित आहेत.
‘‘साहेब लोकांवर किंवा अधिकाऱ्यांवर आमचा भरोसा उरलेला नाही. आम्ही जगतोय फक्त देवावर
भरोसा ठेवून. नाशिकमध्ये आलो, त्यानंतर आज आमची चौथी पिढी इथे वावरते आहे. आम्ही पालात राहतो. फुटबॉलची अवस्था झाली आहे आमची. एका जागेवरून टोलवलं की दुसऱ्या मोकळ्या जागेवर, तिथून टोलवलं की तिसऱ्या जागेवर. अशा रीतीने आजपर्यंत मुंबई नाका, टक्कलमाळ, फुलेनगर, आडगाव नाका, पाथर्डी नाका, मेडिकल कॉलेज, दूर्गानगर आणि पंचवटी भागातल्या अनेक जागांवर बसलो व उठलो. गेली १५ वष्रे कुंभमेळा स्टॅण्डजवळील सरकारी मोकळ्या तपोवन मदानावर सुमारे २०० पालांची आमची वस्ती होती. ती नुकतीच उठवली. पालं उठविण्याची नोटीस आली तेव्हा अर्जवे करूनसुद्धा कोणताही पुढारी आमच्याकडे फिरकला नाही. जिथे जिथे आमची वस्ती होती तिथे तिथे आमची नावे त्यांनीच मतदार यादीत टाकून घेतली व मतदान करवून घेतले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी घरकुल देण्याचे आश्वासन दिले. काही उपयोग झाला नाही. मागच्या निवडणुकीत मतदान करायचे नाही असे आम्ही ठरविले होते; परंतु मतदान नाही केले तर पालांची वस्ती उठवली जाईल, अशी धमकी दिली तेव्हा नाइलाज झाला. रतन सांगळे या सहानुभूतीदार कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने तपोवन मदानाच्या पत्त्यावर आम्हापकी बऱ्याच जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत. पण त्यावर कधी आम्हास धान्य मिळालेच नाही. मिळालेल्या आधार कार्डाचाही उपयोग होत नाही. आता तर तिथली वस्तीच उठवल्याने आम्ही नाशिक परिसरात दूर दूर विखुरले गेलो आहोत. जिथे जाऊ तिथे टांगती तलवार आहेच.
गेल्या १५ वर्षांच्या स्थिरतेमुळे आमची मुले आत्ता कुठे शाळेत जात होती. कोण पाचवीत तर कोण सातवीत शिकत होते. आमच्या वाडवडिलांसारखे आम्हीही ठार अडाणी आहोत. ही पहिली पिढी, जिने शाळेचे दार ठोठावले. वस्ती उठवल्याने आता तिचेही शिक्षण बंद झाले. आमचे एकही मूल आता शाळेत जाऊ शकत नाही. पुढारी लोकांनी हाक दिली की घर मिळेल या आशेने औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली येथील अनेक मोर्चाना अनेकदा मोठय़ा संख्येने स्वखर्चाने गेलो. नाशिकमध्ये तर दरसाल ‘बोंबाबोंब मोर्चा’ला व धरणे कार्यक्रमाला लेकरा-बाळांसह उपाशीपोटी जायचो. गेल्या पन्नास वर्षांच्या या संघर्षांने आमचा कवडीचा लाभ झालेला नाही. पुढाऱ्यांना मात्र पदे, बंगले मिळाले. पन्नास वर्षांचा हा अनुभव आहे. नशिबात असेल ते देवावर भरोसा ठेवून भोगायचे एवढेच आमच्या हातात आहे.’’ अशा पराभूत मानसिकतेच्या भावना ओकत होते, ‘सय्यद’ जमातीचे लला, रोशन, अकिल व गुलाब सय्यद यांच्यासह इतर बऱ्याच जणी. आम्ही होतो नाशिक-येवला रोडवर, ‘ओढा’ गावाच्या परिसरात एका वीटभट्टीच्या मदानावर नुकत्याच वसलेल्या पाल वस्तीत.
सय्यद हा अरबी शब्द आहे. सय्यद म्हणजे जो प्राण्याची शिकार करतो तो शिकारी. मुळात शिकार करून व जंगलात अन्न गोळा करून जगणारी ही जमात. कालांतराने गावोगाव फिरून पुरुषांनी कसरतीचे व शक्तीचे अचाट प्रयोग करून लोकांची करमणूक करण्याचा भटका व्यवसाय स्वीकारला, जो आजपर्यंत चालू आहे. केसाने ट्रक ओढणे, चाळीस-पन्नास किलोचा दगड धाग्याच्या साहाय्याने दाताने उचलून मागे फेकणे किंवा हाताने फोडून त्याचे तुकडे करणे, पापण्यांना दोरा बांधून खुर्ची उचलणे, केसांना सायकली बांधून गरागरा फिरविणे, नारळ हवेत उडवून डोक्याने फोडणे, ओळीने उभ्या असलेल्या आठ माणसांवरून उडी मारणे आदी विस्मयजनक प्रयोग पुरुषांकडून केले जातात. ही सारी कामे जोखमीची आहेत. प्रसंगी धोक्याचीही ठरतात. हात मोडणे, डोके फुटणे असे अनेक प्रकार घडलेले आहेत. डोक्यावर नारळ फोडणाऱ्यांचे कान काही वर्षांत बधिर होतात. हे काम करूनच ५० वर्षांचे जब्बार सय्यद दोन्ही कानांनी ठार बहिरे झाले आहेत. ग्रामीण भागात यांच्या खेळाला ‘पहिलवानांचा खेळ’ म्हणतात. यांच्या महिला त्या त्या गावात घरोघर फिरून गोंदण काढण्याचे काम करायच्या; परंतु आता ते कालबाह्य़ झाले आहे. पुरुषांचे गावोगावी रस्त्यावर होणारे शक्तीचे खेळसुद्धा आता पुरेसे उत्पन्न देत नाहीत. शिवाय रस्त्यावर खेळ करणे आता बेकायदेशीर ठरले आहे. म्हणून यात्रा समिती, गाव पंचायत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, शाळा-कॉलेजेस आदींकडून किमान तीन ते पाच हजार रुपयांची सुपारी घेऊन त्यांच्या कार्यालयात खेळ करण्याचा यांचा प्रयत्न असतो. खेळ सादरीकरणासाठी यांचा सात-आठ जणांचा गट असतो. सुपारी मिळविण्यासाठी कार्यालयांना खेटे घालण्याचे काम नेहमी चालू असते. सुपारी नाही मिळाली तर मोल-मजुरीची कामे करतात किंवा शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना उंटावर बसवून ‘सवारी’ करण्याचे कामही काही जण करतात. मात्र उंट सांभाळण्याचे, त्याला चारापाणी करण्याचे काम मात्र स्त्रियांना करावे लागते. त्यासाठी त्यांना दिवसभर रानात फिरावे लागते. याबरोबर गावकऱ्यांच्या गोधडय़ा शिवून देण्याचे कामही स्त्रियांनी सुरू केले आहे. लग्नाच्या सीझनमध्ये फेटे बांधण्याचे कौशल्यही काही पुरुषांनी शिकून घेतले आहे.
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे तिसरे पुत्र खंडेराव गायकवाड महाराज कुस्तीचे, पहिलवानकीचे भोक्तेहोते. त्यांनी यांच्यापकी काहींना राजाश्रय दिला होता, पण तेवढय़ापुरता. हा पहिलवानकीचा खेळ करीत गावोगाव फिरणारे लोक आता भारतभर विखुरले गेले. उत्तर भारतात अशांना ‘बाजीगर’ म्हणतात. िहदू, मुस्लीम व शीख या तिन्ही धर्मात हे बाजीगर आहेत. जिवाची बाजी लावून खेळ करतात म्हणून बाजीगर असे नाव पडल्याचे सांगतात. हरयाणा, पंजाबमध्ये िहदू-बाजीगर अनुसूचित जातीत आहेत. ते स्वत:ला ‘चव्हान राजपूत’ समजतात. औरंगजेब बादशहाच्या छळाला आणि जबरदस्तीच्या धर्मातराला घाबरून भटके बाजीगर बनलो आणि जे औरंगजेबास बळी पडले ते मुस्लीम झाले असे ते सांगतात. मात्र साऱ्या बाजीगरांचा सामाजिक-आíथक दर्जा एकच आहे.
महाराष्ट्रातले हे पहिलवान मात्र आपली ओळख आणि जात ‘सय्यद’ अशीच सांगतात. मुस्लीम असले तरी यांच्या खेळाची सुरुवातच नव्हे तर त्यांचे कोणतेही शुभकाम बजरंगबलीचा जयजयकार व पूजा केल्याशिवाय होत नाही. यांची भटकी पाश्र्वभूमी व सामाजिक, आíथक दर्जा लक्षात घेता ही ‘सय्यद’ किंवा ‘खेळकरी’ पहिलवान जात भटक्या जमातींच्या यादीत असायला हवी. परंतु राज्य शासनाच्या कोणत्याही मागासवर्गाच्या यादीत ती नाही. त्यामुळे अतिवंचित असूनही एकाही व्यक्तीकडे जातीचा दाखला नाही. विकास प्रक्रियेत आजपर्यंत दुर्लक्षित आहे.
सय्यद जमातीची स्वतंत्र बोलीभाषा आहे. ते तिला ‘सूशी’ भाषा असे संबोधतात. त्यांच्यात जात पंचायत आहे. दोषी व्यक्तीस सव्वा रुपयापासून तीन रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची परंपरागत पद्धत आजही चालू आहे. प्रश्न पशांचा नाही. डाग लागण्याचा आहे. दोषी ठरून बट्टा लागला तर समाजातली प्रतिष्ठा जाते. यालाच ते जास्त भितात. तेरा-चौदाव्या वर्षी मुलींचे लग्न लावले जाते. मुलीच्या बाजूस खर्चाचा बोजा नाही. विवाह ठरविताना एकमेकांची पसंती झाली की मुलाकडून दोनशे किंवा तीनशे रुपये मुलीला देऊन लग्न पक्के केले जाते. या २०० ते ३०० रुपयांच्या रकमेला व्यवहारात फार महत्त्व आहे. ते अध्रे लग्न झाल्यासारखेच आहे. चार दिवसांचे जेवण मुलाकडून दिले जाते. पाचव्या दिवसाचे जेवण मात्र मुलीकडून दोन बकरे कापून दिले जाते. सोने, चांदीची अट नाही. हुंडा पद्धत मुळीच नाही. प्रेमविवाह केला तर लग्नानंतर तीन पिढय़ांना जातीबाहेर टाकले जाते. चौथ्या पिढीस जातीत घेतले जाते. पण त्याआधीच्या पिढीत मुले लग्नाला आली तर परिस्थितीनुसार दंड ठोठावून लग्न लावले जाते.
ch19वंशपरंपरेनुसार सय्यद जमातीच्या महिला या रंगाने गोऱ्या व नाकीडोळी नीटस असतात. लग्नात वधूच्या दाताला दातवण लावले जाते. त्यामुळे हिरडे व दात काळे दिसतात. यावरून महिला विवाहित आहे हे कळते. विवाहित महिलेने दररोज दातवण लावलेच पाहिजे असा दंडक आहे. गावोगाव भटकताना इतरांच्या डोळ्यात तिचे सौंदर्य भरू नये यासाठी ही प्रथा असल्याचे सांगताना सदा सय्यद म्हणाल्या, ‘पान पे खाना और पत्ते पे रहना’ यह हमारी जिंदगी है. कुमारिकांचे कान टोचले जातात आणि कानभर चांदीच्या िरगा (बाली) घातल्या जातात. पण लग्नानंतर त्या िरगामध्ये झुमके अडकवले जातात. विवाहित महिलेसाठी दातवण, कानात झुमके, गळ्यात काळ्या मण्यांची पोत आणि दंडात बाजूबंद या आवश्यक बाबी आहेत. अंगावरचे सारे दागिने चांदीचे असतात. बँकेत खाती नसल्यामुळे अडचणीच्या काळात पसे उभे राहावेत व स्त्रियांची दगिन्यांची हौसही भागावी म्हणून परवडणाऱ्या चांदीत गुंतवणूक करण्याचा यांचा कल असतो. बहुतेक साऱ्या महिलांची बाळंतपणे पालातच होतात. ‘फारच तकलीफ झाली तरच दवाखान्यात नेतो,’ असे लाली अब्दुल सय्यद म्हणाल्या.
सय्यद जमातीत विधवा विवाहास व महिलांच्या पुनर्वविाहास बंदी आहे. एखादी महिला लहान वयात विधवा झाली आणि तिने पुनर्वविाह केला तर तिला समाजातून बाहेर काढले जाते. सोडचिठ्ठी, काडीमोड, असले प्रकारच नाहीत. एकदा झालेले लग्न तुटत नाही. माहेरी गेलेली मुलगी परत सासरी आली नाही तर पंचायत त्या कुटुंबालाच वाळीत टाकते. या बाबतीत पशाच्या रूपात दंड करण्याचा प्रकारच नाही. प्रेम प्रकरणातून मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिली तर त्यांचा विवाह न लावता म्होतर लावले जाते. त्या जोडीला शुभकार्यात मान दिला जात नाही. त्यांच्या आई-वडिलांना मात्र कसलाही दोष दिला जात नाही.
हा सय्यद समाज महाराष्ट्रात चोहीकडे, परंतु विरळ अवस्थेत. नाशिक, बीड, मुंबई, लातूर, सोलापूर, अहमदनगर, करमाळा, टेंभुर्णी, पाथर्डी आदी ठिकाणी वर्षांला काही काळ समूहाने राहतो. निफाड तालुक्यात लासलगावच्या पुढे लालपहाडी गावात ‘सय्यद’ यांची चार कुटुंबे तीस वर्षांपासून राहतात. त्यांच्या नावे घरकुल मंजूर झाली. पण गावकऱ्यांनी विरोध केला. घरकुल दिली तर ते स्थायिक होतील. ते चाराचे आठ, आठाचे सोळा असे वाढत जातील. गावावर हक्क सांगतील. हे होता कामा नये म्हणून त्या प्रकरणाला िहदू-मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न करून घरकुल अडवून ठेवलेली आहेत.
यांच्याजवळची कला-कौशल्ये जपली जाऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार व विकासाची योग्य संधी कशी मिळेल याचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे.
अॅड.पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 1:01 am

Web Title: pahelwan
Next Stories
1 कतरा कतरा है जिम्न्दगी
2 घण लोखंडावर घण आयुष्यावर
3 जगणे झाले अवघड
Just Now!
X