News Flash

डोह अंतरीचा

..दु:खानं एकत्र बांधलेले तीन जीव! रडून अश्रू संपल्यावर काहीसं हलकं झालेलं मन. एकमेकांशी फक्त माणुसकीच्या नात्यानं जोडलेली.. एकमेकांच्या अस्तित्वानं आश्वस्त झालेली..हॉस्पिटलचं आवार. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांची येरझार.

| February 22, 2014 01:08 am

डोह अंतरीचा

..दु:खानं एकत्र बांधलेले तीन जीव! रडून अश्रू संपल्यावर काहीसं हलकं झालेलं मन. एकमेकांशी फक्त माणुसकीच्या नात्यानं जोडलेली.. एकमेकांच्या अस्तित्वानं आश्वस्त झालेली..
हॉस्पिटलचं आवार. तऱ्हेतऱ्हेच्या लोकांची येरझार. दु:खी, उदास, त्रासिक, चिंतित चेहरे.. आतबाहेर करणारे, कुणी ग्रुप करून कुजबुजणारे. ओढलेले चेहरे घेऊन रुग्णांचे नातेवाईक जेवण-चहा यांची ने-आण करताना सर्वत्र तणाव.. इथे आनंदाला मज्जाव.. हसण्यावर कर्फ्यू!
रात्री नऊची वेळ.. आता गर्दी बरीच पांगलेली. चुकून एखादी नर्स पांढराशुभ्र परीटघडीचा युनिफॉर्म घालून सँडल्सचा टॉक्  टॉक्  आवाज करत इकडून तिकडे जाताना.. चुकून एखादा डॉक्टर खांद्यावर स्टेथोस्कोप बेफिकीरपणे उडवून या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये जाताना.. मधूनमधून हिरवे कपडे घातलेले वॉर्डबॉइज हातातला औषधाचा ट्रे सांभाळत या कॉटकडून त्या कॉटकडे जाताना.. हॉस्पिटलचा कामगार वर्ग मुळात स्वच्छ असलेली फरशी पुन्हा एकदा मॉथ हातात घेऊन पुसताना.. फिनेलचा उग्र गंध वातावरणात मिसळून गेलेला..
जनरल वॉर्ड नंबर दहामधली तेवीस नंबर कॉट. शेवटचा प्रयत्न संपलेले, ‘ही इज नो मोर, सॉरी’ असं म्हणत पांढरी चादर मृताच्या चेहऱ्यावर ओढून निघून गेलेले डॉक्टर्स.. कॉटजवळ खुर्चीवर त्यांचा पुत्र, त्यांचा हात कुरवाळत आतून येणारे कढ आवरत खाली मान घालून बसलेला.. त्यांच्या पायाकडच्या स्टुलावर बसलेला सातआठ वर्षांचा त्यांचा छोटा मुलगा. आपल्या इवल्याशा हातांनी वडिलांना धीर द्यायचा प्रयत्न करत स्वत:च्या डोळय़ांतून टप टप पडणारे अश्रू सावरत..
वॉर्डभर नीरव शांतता.. फक्त गरगरणाऱ्या पंख्याचाच काय तो आवाज!.. प्रत्येक जण उदास, खिन्न, आपल्यापुढे काय वाढून ठेवलेय कोण जाणे, अशा विचारांत प्रत्येक रुग्ण शून्यात नजर लावून बसलेला.. त्याला भेटायला आलेल्या नातेवाईकांची हलक्या आवाजात चाललेली कुजबुज.. एखाददुसरा जवळ जाऊन लहान मुलाच्या डोक्यावरून सहानुभूतीने हात फिरवतो.. तेवढय़ा मायेनंही मुलाचा बांध फुटतो व तो ‘आजोबा.. आजोबा’ करत ओक्साबोक्सी रडू लागतो. वार्डमधले सगळेच शोकाकुल! त्यातला अजून एखादा धैर्यवान त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवतो, थोपटल्यासारखं करतो. तेवढय़ा माणुसकीच्या ओलाव्यानंही चिंब झालेला तो मृत व्यक्तीचा मुलगा स्फुंदून स्फुंदून रडू लागतो.. आपल्या एवढय़ा मोठय़ा वडिलांना असं धाय मोकळून रडताना पाहून आणखीनच कासावीस झालेला तो छोटा मुलगा आपल्या वडिलांना मिठी मारतो!
थोडय़ा वेळाने हॉस्पिटलचा स्टाफ येऊन काही पेपर्सवर सही घेऊन जातात.. वॉर्ड बॉइज येऊन निष्प्राण शरीर दुसऱ्या खोलीत घेऊन जातात. आता त्या रिकाम्या कॉटजवळ, जिथं काही वेळापूर्वीच एका जीवाचं अस्तित्व होतं ती रिकामी जागा न पाहवून तो गृहस्थ उठतो. पाठोपाठ तो छोटाही! दोघेही हळूहळू वॉर्डबाहेर येतात. तिथून सवयीच्या वाटेवरून खाली येतात. खाली बाकडय़ा बाकडय़ावर लोक पेंगत असतात. एखाददुसरा माणूस ये-जा करत असतो. तिथल्याच एका रिकाम्या बाकडय़ावर ते गृहस्थ बसतात. आता गृहस्थाच्या मनाच्या अंगणात आठवणींचे असंख्य पक्षी उरतात. गोड आठवणी, कटू आठवणी, आनंदी आठवणी, दु:खी आठवणी, बालपणीच्या आठवणी, ताज्या घडून गेलेल्या आठवणी.. सगळय़ा आठवणींची सरमिसळ होऊन परत दु:खाचे कढ दाटून येतात. काही चुका कबूल करायच्या राहूनच गेलेल्या असतात.. काही प्रश्न अनुत्तरित असतात. आज पाहू, उद्या पाहूच्या यादीत.. एक नातं निखळून गेलेलं असतं, कायमचं!
घडय़ाळात कुठेतरी अकराचे टोले पडतात.. आठवणींचा भार असह्य़ होऊन वडील जागेवरून उठतात. तिथेच फेऱ्या मारू लागतात. मुलगाही अस्वस्थपणे त्यांची ती येरझार पाहत, झोपेने जड झालेल्या पापण्यांवरील झोप झिडकारत बसून राहतो..

हॉस्पिटलच्या आवारात अनेक मोटारसायकली असतात. त्यातल्याच एकावर ‘ती’ बसलेली असते. वीस-बावीस वर्षांचं कोवळं वय! अतीव दु:ख चेहऱ्यावर दाटलेलं.. लोकांची ये-जा जवळजवळ संपलेली.. मुलगी आपल्याच विचारांच्या गर्तेत हरवून गेलेली.. आई त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली.. संध्याकाळीच तिने आपल्या आईचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखविलेले असतात. ते पाहून डॉक्टरांचा आधीच गंभीर असलेला चेहरा अधिकच गंभीर होतो. ‘ब्लड कॅन्सर’चं निदान होतं.. पुढं ते जे काही बोलले ते फक्त शब्द बनून कानावर आदळले. अर्थबोध काहीच झाला नाही. भोवतालचं सर्व जग गरगर फिरू लागलं तिच्याभोवती, सगळा भूतकाळ सजीव होऊन नाचत राहिला.. भविष्यकाळ काळ्याकुट्ट अंधाराने झाकोळून गेलेला..
तिला आठवलं, सहा वर्षांपूर्वी झालेलं वडिलांचं आकस्मिक अपघाती निधन! त्यांच्याशिवाय कुठेच घराबाहेरही न पडलेली आई, मोकळय़ा कपाळानं अडखळत उभी राहिली.. कपडे शिवून, फराळ करून डबे पोहोचवून जमा केलेली पै न पै! काडीकाडी करून जमलेले पैसे पोटालाच पुरायचे. शिक्षकांनी सरकारी अनुदान घ्यायला लावून तिची फी माफ झाली. शिक्षण चांगल्या रीतीनं पूर्ण केलं, चांगली नोकरीही पटकावली! दोन-चार वर्षांत एक बेडरूम प्लॅटही घेतला हप्त्यांवर! अंगाखांद्यावर झुळझुळीत कपडे आले. चार दागिनेही करून झाले. एकमेकींना सांभाळत आनंदात राहत होत्या दोघीही! घरात सर्व काही असताना आईची अन्नावरची वासनाच उडाली. काही कारण नसताना ती दिवसेंदिवस खंगू लागली. वजन अचानक कमी होऊ लागलं, काम करताना धाप लागू लागली. चक्कर येऊ लागली. फॅमिली डॉक्टरांनी वीकनेस म्हणत व्हिटामिन्स दिल्या, पण काही फरक पडेना तेव्हा ब्लड रिपोर्ट्स काढायला सांगितले. त्यावरचे ‘डब्लू.बी.सी.चे हाय काऊंट्स’नी ‘प्रेझेंस ऑफ क्लस्टर्स ऑफ प्लाझ्मा सेल्स इन ब्लड’ पाहून ते चिंतेत पडले. मोठय़ा हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स दाखवायला लावले. तिथे एक-दोन टेस्ट्स केल्या नि शेवटी या निष्कर्षांवर डॉक्टर आले होते!..
डॉक्टरांच्या केबिनमधून ती कशीबशी बाहेर आली. डोळय़ापुढे अंधार आला म्हणून बराच वेळ बसून राहिली पायऱ्यांवर! मग यांत्रिकपणे एक एक पायरी उतरत खाली आली. पायातलं बळच गेल्यासारखं झालं. आवारातल्या एका स्कूटीवर ती बसून राहिली. डोकं सुन्न झालं होतं! मेंदूच चालेनासा झाला. होतं काय नि झालं काय! विचार करून डोकं फुटायची पाळी आली. काय करू? कोणाला सांगू? कुठं जाऊ?.. नुसते प्रश्न! उत्तर एकालाही नव्हतं! आयुष्यच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून उभं ठाकलं होतं! कुठून सुरुवात करावी?.. काही कळत नव्हतं!

येरझाऱ्या घालून पाय दुखून आल्यावर मुलाचे वडील पुन्हा बाकडय़ावर बसले. त्यांनी दूरगावी असलेल्या आपल्या भावाला फोन लावला. ‘‘दादा गेले..’’ दोनच शब्द! काळीज विदीर्ण करणारे.. बऱ्याच वेळाने पलीकडून आवाज, ‘‘..’’
‘‘नऊ वाजता.. नको, एवढय़ा रात्री नको सांगूस!.. सकाळी कळव!’’ फोन बंद करून ते आवारात येतात. थंडगार झोंबणारा वारा वाहत असतो. अचानक आगंतुकासारखा मुसळधार पाऊस कोसळू लागतो.. सरीवर सरी! क्षणांत पागोळय़ा गळू लागतात. त्या साचून जमलेल्या थारोळय़ाकडे ते शून्य नजरेने पाहत राहतात.. वडिलांवर नजर ठेवून असलेला छोटा मुलगा बाहेर येतो. त्यांचा हात आपल्या कोवळय़ा हातात घट्ट पकडून ठेवतो.. पाऊस कोसळत असतो.. अविरत..
अचानक छोटय़ा मुलाची नजर स्कूटीवर जाते. तिथं ती मुलगी निश्चल बसून असते.. पाऊस धो धो कोसळतोय.. पण तिला शुद्धच नाही! पाऊस तिला आडवातिडवा झोडपून काढू लागतो.. ती मास्तरांचा मार मुकाटय़ानं खाणाऱ्या मुलासारखं स्वत:ला पावसाच्या स्वाधीन करून टाकते! छोटा मुलगा वडिलांना बोट करून दाखवतो. वडील क्षणाचाही विलंब न लावता तिथं जाऊन जवळजवळ तिला ओढून आत आणतात.. एक नॅपकिन तिच्या हातात देतात.. ती उभीच! नॅपकिन हातात घेऊन!.. परक्या माणसानं दाखविलेल्या आत्मीयतेनं ओलं झालेलं तिचं मन, मघापासून घुसमटणारा दु:खाचा आवेग कोसळून टाकत. ती धाय मोकलून रडू लागते.. हॉस्पिटलच्या आवारात.. तीन दु:खी माणसं.. दु:खाला वाट करून देत राहतात!
हॉस्पिटलचं कँटीन. रात्री एक वाजता वडील, मुलगा व स्कूटीवरील मुलगी कॉफी पितात. पावसाची रिपरिप चालूच.. दु:खानं एकत्र बांधलेले तीन जीव! रडून अश्रू संपल्यावर काहीसं हलकं झालेलं मन. एकमेकांशी फक्त माणुसकीच्या नात्यानं जोडलेली.. एकमेकांच्या अस्तित्वानं आश्वस्त झालेली..
उद्या नवीन पहाट होईल. नवा दिवस उगवेल.. त्याला सामोरं जायला आपापल्या परीने सिद्ध झाले..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 1:08 am

Web Title: pain at hospital
Next Stories
1 बाप जातो परदेशी, लेका भेटीसाठी
2 वृद्धत्वात तारुण्य जपताना
3 चला चॅटींग करूया..
Just Now!
X