15 December 2019

News Flash

सुत्तडगुत्तड : वारी

वारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या!

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

कृषीजनांनी कृषीजनांसाठी शोधलेली वारी. त्यात विठ्ठलाला भेटायला निघालेल्या साऱ्या बायाबापडय़ा. सगळ्या मुक्त झालेल्या. कितीतरी दिवस घरात कोंडलेल्या. रोजच्या रामरगाडय़ात विलक्षण पिचलेल्या. खेडय़ापाडय़ातल्या पुरुषसत्ताक जाचानं पुरत्या पिळवटून निघालेल्या. वारी खेडय़ापाडय़ातल्या बायांच्या जगण्याचा उत्सव. घरात परपुरुषाबरोबर बोलायलाही कचरणाऱ्या. उंबरा न ओलांडता चुलीत आयुष्य धुमसत ठेवणाऱ्या. इथं मात्र मोकळ्या भोवतालात मोकळा श्वास घेणाऱ्या. वारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या!

बाळूआत्या  हातात पताका, काखेत गठुडं घेऊन गावात यायची. अंगात पांढरं पण पूर्ण विटलेलं लुगडं, कपाळावर गंध, गुडघ्याच्या वर कासोटा खोचलेला, पायात काहीच नाही. रापलेला चेहरा आणि पाणीदार डोळे. चालता चालताच तिचं चाललेलं असायचं ‘‘रामकृष्ण हरी ऽऽ ’’ गल्लीत कोणी भेटलं की तिच्या पायाला हात लावून नमस्कार करायचे. तीही तसाच नमस्कार करुन पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ म्हणत पुढं सरकायची. बोलत काहीच नसायची. पण सतत घाईत. तिला कुठं जायचं असायचं कुणास ठाऊक? मध्येच महिना पंधरा दिवस गायब व्हायची. पुन्हा दिसायची. विठ्ठलाच्या मंदिरात तिचा मुक्काम. दोन भांडी, चूल मंदिराच्या पडवीत. ती नसली की ती भांडी कोनाडय़ात आणि चूल थंड. बाळूआत्या गावातील पाटलाची लेक. वाजतगाजत लग्न केलं.  पांढऱ्या कपाळानं परत आली, माहेरात राहिलीच नाही. सरळ तिनं विठोबाचं मंदिर गाठलं. विठ्ठलाशीच संसार मांडला असे लोक म्हणायचे. पण त्यातलं काही आम्हाला कळायचं नाही.

महिना पंधरा दिवसात देवळात कीर्तन असायचंच. सगळं गाव मंदिरात जमायचं. आम्ही सगळी चिल्ली पिल्ली देवळाच्या वरच्या मजल्यावर. तेथून खाली चालू असलेलं कीर्तन पूर्ण दिसायचं. ‘विठोबा रुकमाई’चा गजर. टाळ मृदंगाची आवर्तने. आम्ही आपलं किलकिल्या डोळ्यांनी सगळं बघत बसायचो. कळत काहीच नव्हतं. सगळे वाजवतात टाळ्या म्हणून आपणही वाजवायच्या. वीणा घेतलेला माळकरी तिथल्या तिथंच तल्लीन होऊन नाचायचा. आमच्यातले अध्रे टाळ मृदंगाच्या आवर्तनात गारद व्हायचे. बसल्या जागीच झोपी जायचे. कीर्तन मध्यावर आल्यावर तर माडीवर जवळजवळ सगळेच घोरायला लागलेले असायचे. मग आमचे उद्योग सुरु व्हायचे. झोपलेल्या पोरांना दाढीमिशा काढा, कुणाची चड्डी काढून पाकाडय़ात लपवून ठेवा, कुणाच्या शर्टाला सुतळी बांधून दुसऱ्याच्या पायाला बांध असल्या भानगडी. कीर्तन संपले तरी सगळे तिथंच पडलेले असायचे. कुणाची आई कुणालाच उठवायला यायची नाही. उजाडलं की सगळी जागी व्हायची. मग उडालेला गोंधळ बघून आमचं खॅ खॅ खू खू सुरु व्हायचं. बाळूआत्या  माडीवर येऊन आमचा हा खेळ बघून खळखळून हसायची. एखादा धपाटा हलकेच आमच्या पाठीवर घालायची. आम्ही धूम!  त्यामुळे देवळातल्या कीर्तनाची आम्ही वाटच बघत असायचो. विठ्ठल जगताना भेटला तो असा आमच्या देवळातल्या कीर्तनात.

नंतर शिकायला बाहेर पडलो. विठ्ठल पुस्तकात भेटायला लागला वारंवार. तुकोबाच्या अभंगात. जनाईच्या रचनेत, चोखोबाच्या अभंगात. पुढं शिकवाय लागलो, विठोबा किती ग्रेट. असं काय काय. पण पंढरीची वाट चालायचा योगच नव्हता आला. घरात वडील दरवर्षी वारी करायचे. घराच्या जबाबदारीतून मुक्त झाले तेव्हा त्यांनी फक्त विठ्ठलाचाच ध्यास घेतला. गावातल्या मंदिरात, घरात सगळीकडं त्यांचं इठ्ठल ऽऽ इठ्ठल ऽऽ असं चाललेलं असायचं. नंतर त्यांनी पंढरपुरात चक्क घरच खरेदी केलं. दोन पायली तांदळाची पिशवी खांद्यावर टाकली की निघाले पंढरीला. चांगला आठ-पंधरा दिवसाचा मुक्काम टाकायचे. पुन्हा यायचे. पुन्हा पंढरी. असं त्यांचं चाललेलं असायचं. आम्ही कोणीच काही त्यांना विचारायचो नाही. आई फक्त तडतडायची. यांचं एकच विठ्ठलऽऽ विठ्ठलऽऽ.

मध्येच कधीतरी माझ्याकडे आले की कन्येला म्हणायचे, ‘‘एकदा पंढरीचं घर तुम्हा सगळ्यांना दाखवतो. जाऊया आपण.’’ पण ते घडलंच नाही. वयाच्या शहाण्ण्याव्या वर्षी त्यांनी ठरवून आम्हा सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांच्या पाठवणीला वारकऱ्यांचा मेळा आला. टाळ मृदंगाच्या साथीनं त्यांनी अखेरचा निरोप दिला. माझ्या मनात फक्त विठ्ठलच घुमत राहिला. त्यांना जाऊन सहा महिनेही झाले नाही. वारी जवळ येऊ लागली तसं माझ्या आत काही तरी हालायला सुरुवात झाली. ढग दाटायचे, चलबिचल व्हायचं मन. पापणीच्या कडाही ओल्या व्हायच्या असं का होतंय आपल्याला हेच कळत नव्हतं. मित्र म्हणाले, ‘‘चला वारीला.’’ तर मी थेट पंढरीच गाठली.

सगळा टाळ-मृदंगाचा आवाज आणि मध्ये ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊलीचे भोवतालात भरुन राहिलेले स्वर. कोठून कोठून आलेले रापलेले चेहरे. प्रत्येक चेहऱ्याभोवती फिरत असलेला विठ्ठल. कुणालाच कुणाचा सासूल नाही. प्रत्येकजण फक्त विठ्ठलासोबत फिरत, बोलत असलेला. चुकून लागलाच धक्का तर माऊलीऽऽ माऊलीऽऽ म्हणत क्षमाशील स्मित. पुन्हा आपल्यातच दंग होत विठ्ठलाशी संवाद. विठ्ठलाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली. प्रत्येक रापलेल्या चेहऱ्यात वडिलांचाच चेहरा दिसायला लागला. आवरता आवरताही आले नाही. डोळ्याचा बांध सारखा सारखा फुटायला लागला. मित्रांपासून चेहरा लपवत गर्दी जवळ केली. आयाबाया ‘विठ्ठल विठ्ठल’ करत चाललेल्या. जगण्याच्या सगळ्या व्यवधानातून मुक्त होऊन फक्त विठ्ठलाचे नाव. प्रत्येकजणच विठ्ठल झालेली. वाटही विठ्ठल श्वासही विठ्ठल. भोवतालचे सारे आसमंतच विठ्ठल. अशात अरुण कोलटकरांच्या ‘वामांगी’चा कोणीतरी विषय काढला. अठ्ठावीस युगांचा एकटेपणा, मध्येच अंगावर धडकणाऱ्या दिंडय़ांवर दिंडय़ा. काय आहे हे सारं? कोठून येतं हे सारं? हे सारे प्रश्नच निर्थक. अशातच मनात तुकोबारायाचा अभंग घुमायला लागला.

पंढरी जाय । तो विसरे मायबाप ।

अवघा होय पांडुरंग ।

राहे भरुनिया अंग । न लगे धन मान ।

देह भावें उदासीन ।

तुका म्हणे मळ । नासि तात्काळते स्थळ ।।

या अभंगाच्या धुंदीतच चालणारे कैक. मध्येच कोणी नाचणारे, साक्षात लोटांगण घालणारे. तर कोणी विठ्ठलाच्या दारात कान पकडून पुन्हा पुन्हा उंच उडी मारत विठ्ठल म्हणणारे. प्रत्येकाची रीत वेगळी. प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा. ज्याने त्याने विठ्ठलाजवळ जाण्याचा शोधलेला मार्ग वेगळा.

वाखरीत आलो तर सगळं शिवार माणसांनी फुललेलं. प्रत्येकजण प्रत्येकाला ‘माऊली’ म्हणून हाक घालत. रिंगणात पोलीसांचं सहृदयी वावरणं. रिंगणाभोवती लाखोंची गर्दी. कितीतरी खेडय़ापाडय़ातून धावलेल्या बाया. पुरुषांचे तांडेच्या तांडे. सगळे कष्टकरी, शेतकरी असे खेडूत. बायाबापडय़ा कोणी भरल्या कपाळाच्या तर कोणाचं कपाळ  तसंच मोकळं. प्रत्येकीच्या पायाला गती. कोण घोळक्यात बसलेली. कोण एकटीच सगळीभर फिरणारी. एखादी अकारण पळत सुटलेली. कोणी रानोमाळ नजर टाकत आपल्या माणसांना शोधणारी. कोणी अंगभर पदराची तर कोणी पदराचं भानच सुटलेली. कोणी एकटीच ‘ठ्ठोबाऽऽ रुकमाई’ म्हणत स्वत:च समाधी लावून उभी असलेली. सगळ्या गर्दीत कितीतरी आयाबाया. घरापासून, व्यापतापापासून दूर. प्रत्येकीच्या डोळ्यात जगण्याचा उत्सव. मध्येच पावसाची जोराची सर आली. गर्दीने प्लॅस्टिकचे कागद काढले. कुठंतरीच छत्री. एका कागदात आठदहा डोकी कोंबलेली. भिजतच उभ्या गर्दीत. तर एका कागदवाल्या बाईनं चक्क बकोट धरुन कागदात ओढलं. तोच ओळखीचा ममताभरला स्पर्श. बाळूआत्या कोठून आली? भर पावसातही अंगावर सर्क न काटा. त्या बायांच्या कागदात त्यांच्यापैकीच एक झालो. तर भरपावसात एकटी  बाई अंगावर कागद पांघरुन तल्लीन होऊन ‘विठोबा-माऊली’ म्हणत एकटीच बेभान होऊन नाचत होती. गर्दीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती केव्हाच सगळं विसरलेली. पावसाच्या थेंबाथेंबात तिला भेटत होता विठ्ठल. निथळत होता तिच्या चेहऱ्यावरुन.  सर थांबली. कागद गुंडाळले गेले. अचानक दोघी रिंगणात आल्या. चिखल माखल्या पायांनी एकदम एकमेकीचे हातात हात घेऊन फुगडी खेळाय लागल्या. खेळता खेळता बेभान झाल्या. त्यांच्या गोल फिरण्यानं त्यांच्या भोवतीच तयार झालं त्यांचं रिंगण. अशात एका माऊलीनं एका पुरुषाच्या हातात हात घालून बाजूलाच धरला फुगडीचा फेर. पुरुष भेलकांडून पडत होता तरीही ती त्याला फिरवत होती गरागर. हात सुटून पुरुष पडला तर त्याला उठवून गळाभेट घेऊन माऊलीनं पायाला हात लावून नमस्कार केला. पुन्हा नव्या माऊलीबरोबर खेळायला लागली फुगडी. न दमता. त्या साऱ्या माऊलींकडं बघत होतो.

कृषीजनांनी कृषीजनांसाठी शोधलेली ही वारी. त्यातीलच हे रिंगण. स्वत:भोवतीचे रिंगण खूप खूप विस्तारत क्षितिजापर्यंत रेटत नेणारी.  रिंगणात आलं की, मर्यादाही कळते आणि विस्तारणेही सहज फुटून जाते मनात. रिंगण निर्माण करते जगण्याची नवी उर्जाभरित वलयं. रिंगणात येणारा, रिंगणात नाचणारा होऊन जातो रिंगण. खेडय़ापाडय़ातल्या डोंगर कपारीतल्या या भोळ्याभाबडय़ा कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांनी भक्कम शोधलेला आधार म्हणजे विठ्ठल. त्या विठ्ठलाला भेटायला निघालेल्या या साऱ्या बायाबापडय़ा.   सगळ्या मुक्त झालेल्या आयाबाया. कितीतरी दिवस घरात कोंडलेल्या. रोजच्या रामरगाडय़ात विलक्षण पिचलेल्या. खेडय़ापाडय़ातल्या पुरुषसत्ताक जाचानं पुरत्या पिळवटून निघालेल्या. वारीत मात्र एकदम मोकळ्या झालेल्या. वारी खेडय़ापाडय़ातल्या बायांच्या जगण्याचा उत्सव. घरात परपुरुषाबरोबर बोलायलाही कचरणाऱ्या. उंबरा न ओलांडता चुलीत आयुष्य धुमसत ठेवणाऱ्या. क्षणाक्षणाला जगण्याचा आवंढा गिळणाऱ्या. शेण-पाणी, दळप-कांडप, शेती-भाती, रीती-रिवाज, रुढी परंपरा. सगळे काच. सगळे  ताप. इथं मात्र मोकळ्या भोवतालात मोकळा श्वास घेणाऱ्या. वारीतल्या पंधरा वीस दिवसात वर्षभर पुरेल एवढी उर्जा विठ्ठलाकडून घेऊन पुन्हा सगळ्या स्वत:ला पिळवटून घ्यायला रिकाम्या. अशातच समोर एक विधवा मोठय़ानं अभंग गात, ‘अवघा रंग एक झाला’ बेहद्द स्वरांच्या आरोळ्या. मध्येच टाळांची वाढणारी गती. पोलीस ‘माऊली माऊली’ म्हणत तिला बाजूस सारत होते तर ती बेभान होऊन गात होती. अशा कितीतरी माऊल्या दु:खं विसरून दु:खं सांडत विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या. मुक्तीचा अवकाश सापडल्यानंतर स्वत:ला रचत, विठ्ठलाला शोधत ओळखीच्या, अनोळखींच्या सोबत चाललेल्या. ना कशाची आठवण, ना कशाची चिंता. एक मुक्त स्वातंत्र्य अनुभवत. गाव, घराच्या, रीतीभातीच्या साखळदंडातून त्यांना विठ्ठलानेच असते सोडवलेले. कधी उंबऱ्याच्या बाहेर नाही, कधी कुठल्या गावाची शिव पाहिली नाही. मोठय़ा आवाजात एकही शब्द उच्चारला नाही. सततच दबलेपणा. त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे मुक्त झालेले स्वर ज्ञानोबा-तुकाराम, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली आजूबाजूच्या ओसाड रानालाही अचंबित करणारे. अशात पालखीचा सुगावा लागला. सगळ्या रिंगणात चतन्याची लहर फिरली. आयाबाया एकदम अंगात काही संचारल्यासारख्या सळसळाय लागल्या. रिंगणाचा घोडा. त्याला स्पर्श करण्यासाठी धावलेल्या आयाबाया. जिचा हात घोडय़ापर्यंत पोहोचला ती आभाळाला हात जोडून कृतकृत्य झालेली. जिचा हात पोहोचलाच नाही ती रिंगणातली माती कपाळाला लावून तुकोबा माऊली म्हणत सुटलेली. या सगळ्या आयाबाया माझ्या डोळ्यात रिंगण करत होत्या. या रिंगणातली माती त्यांना काय देते याचा साक्षात्कार घडवत होत्या. मध्येच त्या सगळ्या रिंगणात बाळूआत्याचं विटकं पांढरं लुगडं सायीसारखं पसरलेलं दिसलं. मला आठवली जनी.

देव खाते देव पिते । देवावरी मी निजते ।।

देव देते देव घेते । देवासवे व्यवहारिते ।।

देव इथे देव तिथे । देवाविने नाही रितें ।।

जना म्हणे विठाबाई ।  भरुनी उरले अंतरबाही ।।

वारी खेडय़ापाडय़ातल्या, गावगाडय़ातल्या आयाबायांची मुक्ताई. पुरुषांच्या बरोबरीने कैक शतकांचे अंतर कापून समानतेला भरभक्कम सुरुवात करणारी ही कृषीजनांची वारी. या साऱ्यात एकाद दुसरा वावरणारा पांढरपेशी एकदमच विसंगतीने नजरेत भरतो. वारी मातीत राबणाऱ्यांची, पशुपक्ष्यासोबतची, प्राणीमात्रांबरोबरची, निसर्गाच्या ओढीची वारी बायाबापडय़ांच्या अनंत उत्सव सोहळ्याची!

chaturang@expressindia.com

First Published on July 20, 2019 1:12 am

Web Title: pandharpur wari warkari rajan gavas abn 97
Just Now!
X