‘‘इंद्रधनु या मालिकेनंतर काही दिवसांनी ‘सारा जहाँ हमारा’ या मालिकेसाठी विचारणा झाली. या भूमिकांबाबत मी श्रीरामला, हे कसं करू, म्हणून विचारत नसे. मलाही विचार करता येतो, असं कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात होतं का, हे आता सांगता यायचं नाही. पण श्रीरामनंही माझ्या भूमिकांबद्दल मला उगीचच काही शिकवू पाहिलं नाही. सगळ्याला त्याचा पाठिंबा होता. पण वर्चस्व गाजवणं नव्हतं. ग्रेसफुली कसं काम करायचं, मूल्यांशी तडजोड न करता कसं जगायचं, हे त्याच्या आचरणातून माझ्यावरही प्रभाव टाकत गेलं,’’ सांगताहेत दीपा लागू आपले पती डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबरच्या ४३ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
अभिनय हे जरी डॉ. श्रीराम लागू आणि मी, आम्हा दाम्पत्याचं समान क्षेत्र असलं, तरी आमच्या अभिनयकलेच्या वाटा समांतर आहेत. त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत, व्याप्ती भिन्न आहे. आमचं लग्न झालं ही मात्र अभिनयकलेमुळेच आमची ओळख झाल्याची परिणती. लग्नाला आता ४३ र्वष झालीत. लग्नाच्या सुमारे दीड वर्ष आधी आमची परस्परांशी ओळख झाली होती.
मोहन राकेश यांनी लिहिलेल्या ‘आधे अधुरे’ या हिंदी नाटकात मी काम करीत होते. त्यातल्या मोठय़ा मुलीची, म्हणजेच बिन्नीची भूमिका मी करायचे. त्या सुमारास श्रीराम पुण्याला आणि मी मुंबईला राहात असे. ‘आधे अधुरे’चे प्रयोग अनेक शहरांमध्ये झाले. मुंबईतले प्रयोग बघायला मराठी माणसं जास्त येत. ते पाहून हे नाटक बसवणाऱ्या पं. सत्यदेव दुबे यांना हे नाटक मराठीत आणावंसं वाटू लागलं. मग विजय तेंडुलकरांनी त्याचा अनुवाद केला. या मराठी प्रयोगांमध्ये ‘पुरुष’ ही भूमिका श्रीरामकडे आली. मूळ हिंदीत ती अंबरिश पुरी करीत असत. श्रीराम ‘पुरुष’च्या चार भूमिका यात करायचा.
याआधी मराठी नाटकांशी माझा तेवढासा संबंध नव्हता. किंबहुना प्रायोगिक आणि व्यावसायिक असे नाटकांचे दोन प्रकार असतात, हेसुद्धा मला ठाऊक नव्हतं. अशोक कुलकर्णी या नाटय़रसिक स्नेह्य़ामुळे मला नाटकांविषयी नवनवीन माहिती मिळू लागली. त्याच्याचमुळे दुबेंशी परिचय झाला. अशोकमुळे कळलेली नाटकातली जादू इतकी प्रभावी ठरली की मलाही भूमिका करायची इच्छा झाली. ती मी अशोकपाशी व्यक्त केली. त्यानंतर मला दुबेंनी संधी दिली.
मराठी प्रयोगांमध्ये अमोल पालेकर, ज्योत्स्ना कार्येकर आणि भक्ती बर्वे या मंडळींच्या मराठी भाषेचा काहीच प्रश्न नव्हता. पण माझी मातृभाषा कोकणी असल्याने माझ्या मराठी उच्चारांची काहीशी अडचण होई. दुबेंनी तेव्हा श्रीरामला मला ते उच्चार शिकवायला सांगितलं. माझं शिक्षण मुंबईत झालेलं असलं तरी इंग्रजी माध्यमातून. शेजारीपाजारी व घरकामाला येणाऱ्या मदतनीस बाईशीच फक्त घरात मराठीतून बोललं जायचं. तेव्हा माझ्या मराठी उच्चारांमध्ये सुधारणा करण्यासाठी श्रीराम मला मार्गदर्शन करायचा.
पुरीसाहेबही मोठे ग्रेट आर्टिस्ट. त्यांची धाटणीही खासच. श्रीरामची पद्धतही फारच आगळीवेगळी होती. दररोजच्या तालमींमध्ये तो सतत काही नवं शोधायचा. त्यातले बारकावे थक्क करणारे होते.  कलावंत म्हणून त्याची थोरवी मला त्याआधी माहितीच नव्हती. ती तेव्हा कळू लागली. मला एकदा तो म्हणाला, भूमिका एकदा तंत्रात बांधून घेतली की खूप मोकळेपणा, सहजस्फूर्तपणा जाणवेल अशा तऱ्हेने करता येते. या म्हणण्यातली सखोलता मला त्या वेळी  फारशी उमगली नव्हती, पण फार पुढं ‘चारचौघी’तली  भूमिका करताना मला त्याचा उलगडा आणि मदतही होत गेली. त्या त्या वेळी तर कधी कधी प्रयोगावेळी हा श्रीराम म्हणून वेगळा नाहीच, हे तर प्रत्यक्ष हे पात्रच जिवंत झालेलं आहे असं वाटायचं.
कलावंत  म्हणून सातत्यानं आत्मशोध घ्यायची दृष्टी मला श्रीरामकडून मिळाली. प्रयोगात (त्याहीआधी नाटक बसवताना) एक जरी माणूस अत्यंत प्रामाणिकपणे भूमिकेचा धांडोळा घेऊ लागला की बाकीचे कलाकारही आपोआपच त्या प्रवाहात सामील होऊ लागतात. परिणामी सगळंच्या सगळं नाटक फार वरच्या पातळीला जाऊन पोहोचतं. दुबे तेव्हा मला कधी कधी म्हणायचा, ‘यू आर नॉट प्रोफेशनल इनफ’. ते मला फारसं कळायचं नाही. पण अमुक वाक्यालाच बरोबर तमुककडे बघायचं, तमुक वाक्यानंतर चष्मा काढणं, विशिष्ट शब्दांसाठीचा टोन, त्यांचे खास तऱ्हेने उच्चार अशा प्रकारे टेक्निकली एखादी भूमिका कशी बांधायची, याच्याशी माझी श्रीराममुळे ओळख होत गेली.
‘गिधाडे’ हे नाटक श्रीरामबरोबर करतानाही मला त्याच्याकडून काही धडे गिरवायला मिळाले. त्याआधी नाटक म्हणजे माझ्यासाठी एक गोष्ट सांगणारं सूत्र होतं. फक्त ‘सेन्स ऑफ एन्जॉयमेंट’ होतं. दुबे आणि इतरांकडूनही तसं माझ्या कामाचं कौतुक व्हायचं. पण श्रीरामकडून जे समजत होतं, ते अवाक् करून टाकणारं काहीतरी असायचं. टेक्निकली बांधून घेऊनही फक्त टाळ्यांसाठी केलेलं काम बरोबर नाही. टाळ्यांसाठी अमुक एक करण्याच्या मोहापलीकडे जाऊन नाटकाचा आशय प्रेक्षकांच्या मनात- मेंदूत जास्तीतजास्त उतरविण्याचं काम असावं, ही भावना श्रीराममुळेच माझ्यात संक्रमित  झाली. ‘चारचौघी’ करताना तर संयमानं, नियंत्रण ठेवून नाटकाच्या गरजेप्रमाणे भूमिका साकारायची हा विचार मला दीपस्तंभाप्रमाणेच वाटला.
पुन्हा एकदा आमच्या लग्नाच्या विषयाकडे येते. वालचंद टेरेसवर दुबेंची नाटकांसाठीची जागा होती. तालमीनंतर तिथं कलावंतांमध्ये आपापसात चर्चा चालायची. त्या विचारमंथनाच्या वेळी श्रीरामच्या नाटय़विषयक ज्ञानाचा प्रचंड आवाका लक्षात यायचा. ज्योत्स्ना कार्येकर ही डॉक्टर असल्यानं तिची प्रॅक्टिस संपल्यावर रात्री आमच्या तालमी चालायच्या. हळूहळू असंही लक्षात आलं की नुसताच डॉक्टर म्हणून नाही तर माणूस म्हणूनही तो उच्च विचारांचा आहे. उदारमतवादी आहे. त्याचा ‘सेन्स ऑफ ह्य़ूमर’ही जबरदस्त आहे. तो अत्यंत शिस्तप्रिय आहे. या साऱ्याच गुणांची मोहिनी माझ्यावर पडत गेली.
माझी आई चंद्रा दिनकर बसरूर ही जे. कृष्णमूर्तीची अनुयायी होती. त्यांच्या व्याख्यानांना ती मला सोबत घेऊन जायची.  तिथं टिपणं घ्यायला लावायची. घरी आल्यावर त्या टिपणांचं स्पष्टीकरण करायला लावायची. तेव्हा मला वाटायचं, की कृष्णमूर्ती खूप छान बोलतात. ते अत्यंत मार्मिक अन् अर्थपूर्ण असतं. पण जर हे तत्त्वज्ञान आचरणात आणलं गेलं नाही तर काय उपयोग? इकडं श्रीराम, दुबे, तेंडुलकर, कुमुद मेहता, सुलभा आणि अरविंद देशपांडे यांच्या संपर्कात आल्यावर मला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटायचं. या सगळ्यांनी फिलॉसॉफी आचरणात आणलेली दिसायची. ‘गिधाडे’च्या संदर्भात दुबे आणि श्रीरामनं सेन्सॉर बोर्डशी जो लढा दिला, त्यावरून तर मला खात्रीच पटली. हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की आपल्याला हवा तसा हा माणूस आहे.  मूल्यांशी तडजोड न करणारा, सतत आपल्या कामाचा दर्जा वाढवू पाहणारा. २१ मार्चला, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यानं मला ‘प्रपोज’ केलं. ज्योत्स्ना आणि शरद कार्येकर यांच्यासोबत आम्ही महाबळेश्वरला गेलो असताना तिथं हे घडलं.
 मला प्रश्न पडला की यानं माझ्यात काय पाहिलं? भक्तीनं जशी आयुष्यभर अभिनय क्षेत्राशी बांधीलकी जपलेली होती, तसं माझं नव्हतं. अभिनयाची इतकी अंगं असतात, तो इतका गंभीर बिझिनेस असतो, त्यासाठी एवढी पराकोटीची बांधीलकी असू शकते, असावी लागते, हेही मला तेव्हा नवंच होतं. यापूर्वी प्रसिद्ध कथ्थकगुरू मोहनराव कल्याणपूरकर हे माझ्या आईचे सख्खे मावसभाऊ. त्यांची नृत्याबद्दलची ध्येयासक्ती मला समजलेली  होती, पण अभिनयाबाबतचे नवेनवे शोध मला आता नव्यानं लागत होते. कुणी भूमिका दिली तर आपण करावी, इतपतच विचार माझ्या मनात असायचा. योग्य वेळी, योग्य जागी आणि अत्यंत योग्य सहकाऱ्यांसोबत मला संधी मिळत गेली, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. अ‍ॅमेच्युअर ग्रुप्सकडून खूप काम येत गेलं आणि मी फार खोलात जाऊन विचार न करता अभिनयातली मौज अनुभवण्यासाठी ते करत गेले. त्यातून आनंदित होत राहिले.
असा सारा प्रवास घडत असताना श्रीरामच्या मागणीला मी होकार दिला  आणि आमचं लग्न २४ जुलै १९७१ रोजी झालं. लग्नानंतर श्रीरामनं मला विचारलं, ‘तुला राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात शिकायला जायचंय का? त्यावर मी त्याला, हे काय असतं?’ असा प्रश्न विचारला. त्यानं ते सगळं सांगितलं. मी नाही म्हटलं. अभिनयाबाबतचं शिक्षण- प्रशिक्षण एका-एका  नाटकाच्या तालमींमधूनच होत गेलं. श्रीराममुळे माझा आत्मशोध सुरू झाला. पण माझा अभिनय माझाच राहिला. तो श्रीराम किंवा आणखी  कुणाहीसारखा झाला नाही.
बहुधा माझ्यातली ही इतरांमधलं चांगलं टिपूनही स्वत: त्या छायेत  झाकोळून न जाता ‘स्वत्त्व’ जपण्याची असोशी श्रीरामला आवडली असेल का? ठावूक नाही. माझ्यातलं काय आवडलं, यावर आम्ही तशी कधी चर्चा केली नाही. अडचणी आल्या तरी सोबत असण्याचा विश्वास वागण्यातून दिला. लग्नाच्या वेळीच श्रीरामनं सांगितलं होतं, समजा आयुष्यात काही चढ-उतार आले, तरी आपलं वैवाहिक जीवन अबाधित राहायला हवं. याला धक्का लागता कामा नये. पुढं ९ डिसेंबर १९७६ रोजी आमच्या तन्वीरचा जन्म झाला. त्याला वाढवताना मला माझी आईची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची वाटली.  म्हणून मी अभिनय क्षेत्र सहज सोडलं. घट्ट बांधीलकी नव्हती म्हणून ते जमू शकलं.
हे सारं व्हायच्या दरम्यान श्रीराम नाटक आणि चित्रपटांमध्ये कमालीचा व्यस्त झाला होता. त्याचे प्रयोग आणि शूटिंगसाठीच्या अनियमित वेळांमुळे तो पुष्कळ बाहेर असायचा. मला वाटलं की अभिनयाच्या करिअरसाठी मीही सतत बाहेर राहू लागले तर मग घर, कुटुंब स्थापन करण्याचा काय उपयोग? तरीही पूर्णपणे स्वस्थही बसवत नव्हतं. तन्वीर प्ले ग्रुपला जायचा. त्याच्या वेळा सांभाळून मी एस.एन.डी.टी.तून स्पेशल एज्युकेशनचा अभ्यास पूर्ण केला. त्याआधी सोशिओलॉजी घेऊन एम.ए. झालेलं होतंच. त्यानंतर मी सरू पारेख या आमच्या टीचरच्याच एका प्रकल्पासाठी थोडं काम करू लागले. धारावीतल्या विशेष मुलांच्या शिक्षकांमधली सर्जनशीलता वाढवण्यासाठी काम केलं. त्या प्रकल्पात मी सुमारे साडेतीन वर्षे काम केलं. दीडेक वर्ष आणखी एक प्रकल्प केला.
दरम्यान १९७३  मध्ये आम्ही ‘रूपवेध’ ही संस्था स्थापन करून काही प्रायोगिक नाटकं केली होती. त्याचं व्यवस्थापन मी बघायचे. ‘गाबरे’त तर मी कामही केलेलं होतं. ‘गाबरे’त श्रीराम, दत्ता भट आणि अमोल पालेकर अशी मोठी स्टारकास्ट होती. ते फारसं चाललं नाही. तेव्हा व्यवस्थापक म्हणून मी एक गोष्ट शिकले की, केवळ मोठी कलाकार मंडळी असल्यानं नाटक यशस्वी होत नाही. त्यासाठी बऱ्याच गोष्टी जमून याव्या लागतात. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आणि ‘अ‍ॅन्टिगनी’ या  ‘रूपवेध’च्या नाटकांमध्येही मी श्रीरामसोबत होते. नाटकाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन मला दिपवून टाकत होता. साध्या गोष्टी, साधे प्रसंग घेऊन केलं गेलेलं लिखाण नाटय़कर्मीना वैश्विक पातळीवर नेऊन ठेवायचं. हा प्रकारच रोमहर्षक होता. फार पूर्वी कोकणात ‘तुझे आहे तुजपाशी’ आणि ‘आधेअधुरे’ प्रयोग करणारी मी आणि आताची मी या दोन्हीतही खूप फरक पडलेला होता.
    प्रायोगिक नाटकांच्या चळवळीत सहभागी होण्याच्या ओढीमुळे आम्ही दोघांनी आणखी एक पाऊल उचललं. सुलभा देशपांडेंची ‘अविष्कार’ ही संस्था नव्या जोमानं रंगमंचावर नवनवीन प्रयोग करीत होती. या संस्थेच्या ‘प्रतिमा’ या नाटकात मी आणि श्रीरामनं काम केलं. चि. त्र्यं.  खानोलकरांनी मुक्तछंदात लिहिलेलं हे काव्यात्म नाटक. माझ्यासाठी ते फार मोठं आव्हान ठरलं. ते करताना खूप धमाल आली.
यानंतरच्या वाटचालीत एके दिवशी ‘इंद्रधनुष’ या मालिकेतल्या आईच्या भूमिकेसाठी मला अचानक विचारणा झाली. गिरीश कर्नाडची यात महत्त्वाची भूमिका होती. मी विचारणा करणाऱ्या त्या सहनिर्मात्याला म्हटलं, की कॅमेऱ्याचं लेफ्ट-राइटसुद्धा मला माहिती नाही. पण आनंद महेंद्रु या प्रसिद्ध दिग्दर्शकानं मला हुरूप देऊन ते काम करवून घेतलं. काही दिवसांनी ‘सारा जहाँ हमारा’ या मालिकेसाठी अशीच विचारणा आली. त्यासाठी गिरीश कर्नाडनंच माझं नाव सुचवलं होतं. भूमिकांबाबत मी श्रीरामला, हे कसं करू, म्हणून विचारत नसे. माझ्या परीनं सर्वस्व ओतून मी भूमिका फुलविण्याचा प्रयत्न करायचे. मलाही विचार करता येतो, असं कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात होतं का काय, हे आता सांगता यायचं नाही. पण श्रीरामनंही माझ्या भूमिकांबद्दल मला उगीचच काही शिकवू पाहिलं नाही. मी जे जे करत होते, त्या सगळ्याला त्याचा पाठिंबा होता. पण वर्चस्व गाजवणं नव्हतं. नवरा-बायको तर आम्ही होतोच. मी त्याच्या मुलाची आई होते त्याचबरोबर मला माझं काही स्वतंत्र अस्तित्व आहे, यावर कुरघोडी करू नये, असंच त्याचं वागणं होतं. यात साक्षीभाव होता. ग्रेसफुली कसं काम करायचं, मूल्यांशी तडजोड न करता कसं जगायचं, हे त्याच्या आचरणातून माझ्यावरही प्रभाव टाकत गेलं. घरात त्यानं गांधीजींचा एक फोटो लावला आहे. पंधरा दिवसांनी त्याच्या पाठीमागच्या बाजूच्या चार्ली चॅप्लिनला आम्ही पुढं आणतो. हे दोन्ही त्याचे आदर्श.
एकेकदा असंही वाटलं की मी फारच तुकडय़ा तुकडय़ांमध्ये जगतेय का? नाटक, मालिका, शिक्षण क्षेत्र, नाटय़संस्थेचं व्यवस्थापन, घर असे हे निरनिराळे तुकडे वाटले. कुठंतरी त्यांना एकसंध करण्याची ओढ वाटू लागली. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या दशकपूर्तीनिमित्ताने १९९९ मध्ये ‘कहाणी साऱ्याजणींची’ बसवताना त्यामुळेच की काय, फार मजा आली.
‘किमयागार’ या हेलन केलरच्या जीवनावरच्या नाटकाचं दिग्दर्शन करताना आपला कस लागल्याचं  समाधान मिळालं नाही. मात्र ‘स्वयम्’ बसवताना उलट खूपच समाधान मिळालं.
तन्वीर साडेसतरा वर्षांचा असताना (१६ जुलै १९९४) आम्हाला सोडून गेला. रेल्वेमार्गाजवळ राहणाऱ्या काही मुलांनी भिरकावलेला दगड त्याचा जीव घेणारा ठरला. श्रीराम म्हणाला, ‘तुमचा देवच असा बरोबर नेम धरून मारू शकतो.’ मुंबईत बांद्रय़ाला आम्ही त्याच्या नावानं फ्लॅट घेतलेला होता. तो विकून आलेल्या पैशांमधून ‘तन्वीर सन्मान’ पुरस्कार देण्यासाठी आम्ही ट्रस्ट स्थापन केला. लक्षवेधी कारकीर्द घडवणाऱ्या ज्येष्ठ नाटय़ कलावंतांसाठी हा पुरस्कार आहे. २००४ पासून हा सन्मान सुरू झाला. आमच्या विश्वस्तांपैकीच एक असलेल्या अतुल पेठेनं सुचवल्यानुसार २००५ पासून ‘नाटय़धर्मी’ हा पुरस्कारही सुरू केला. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाटय़कलावंतांसाठी तो आहे.
१९९५ पासून आम्ही पुण्यात राहायला आलो. आमचा मोठा मुलगा आनंद अमेरिकेत राहतो. तिथून तो आमच्याशी फोनवरून नियमितपणे संपर्कात असतो. इथल्या त्याच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहू लागलो. काही दिवसांनी मला वाटू लागलं, की इथं खूपशा भिंतींमुळे कप्पेकप्पे जाणवतात. इथली रचनाच तशी आहे. आपली स्वत:ची एक मोकळी स्पेस असावी. योगायोगानं वरच्या मजल्यावरचा एक फ्लॅट विकणार असल्याचं समजलं. तो मनाजोगता होता म्हणून श्रीरामही आनंदला. आता या फ्लॅटमध्ये मी भरपूर पुस्तकं, संगीताच्या सीडीज्, आईचा नृत्य करतानाचा फोटो, राधा-कृष्णाचे फोटो आणि शिल्पं, काही कलात्मक वस्तू ठेवल्या आहेत.
दिवसाकाठी स्वत:साठी खास मोकळा वेळ मिळाला की मी इथे येते. माझ्या काही मैत्रिणींसोबत महिन्यातून एकदा इथं गप्पांची मैफल रंगते. मध्यंतरी काही गतिमंद विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण मी इथंच घ्यायचे. सकाळी हास्यक्लबला जाते. एरवी  श्रीरामपाशी असते. अधूनमधून काही संस्थांसाठी स्पेशल एज्युकेशनच्या कार्यशाळाही मी घेतलेल्या आहेत. सध्या श्रीरामचं वय ८७ आणि माझं ७०. आता वार्धक्यानुसार होणाऱ्या प्रकृतीच्या त्रासामुळे तो  माझ्यावर जास्तीतजास्त अवलंबून असतो. सध्या आमची कॉमन आवड एकच, फिटनेस. त्यासाठी रोज संध्याकाळी  आम्ही जवळच्या टेकडीवर फेरफटका मारायला जातो. निरनिराळ्या सामाजिक- सांस्कृतिक कार्यक्रमांना जमेल तेवढे उपस्थित राहतो.
 हाच सध्याचा दिनक्रम!                              
(शब्दांकन : नीला शर्मा)
neela5sharma@gmail.com