आपलं मूल आनंदी, समाधानी आणि विचाराने संपन्न असावं, असं प्रत्येक आईला वाटत असतं, पण त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, तेही सातत्याने. डॉक्टर, सर्जन असलेल्या एका आईने आपल्या मुलाला- नचिकेतला- घडवताना जाणीवपूर्वक काही प्रयोग केले, तेही सातत्याने आणि त्याच्याबरोबर राहून. त्यांचे हे प्रयोग नक्कीच इतरांनाही उपयोगी पडतील असे आहेत.
आपले मूल सर्वार्थाने यशस्वी व्हावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक आई-वडील अथक प्रयत्न करत असतात. माझा मुलगा नचिकेत हा उमद्या व्यक्तिमत्त्वाचा, भक्कम शरीराचा आणि मनाचा, सामाजिक भान असलेला व्हावा, असं मला वाटतं. तो जे करिअर करेल त्यात यशस्वी, आनंदी व समाधानी व्हावा. कारण जीवनात आनंदी राहणं सर्वात महत्त्वाचं असं मला वाटतं. अर्थात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी जीवनात आपल्याला काय काय करायला आवडेल हे त्याला वेळीच ठरवता आलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळय़ा विषयांची ओळख हवी आणि आत्मविश्वासही हवा. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची गरज असते. त्यासाठी नचिकेतला जगाची ओळख घडवून द्यायचं मी ठरवलं.
आई म्हणून मी नचिकेतला भरपूर प्रेमाबरोबर भरपूर वेळही दिला. म्हणूनच मी एक सर्जन असूनही नचिकेत लहान असताना अतिशय मर्यादित वेळेतच मी काम केलं. तो घरी असताना मी घरी राहण्याच्या प्रयत्न केला आणि आजही करते. आता तो जसजसा मोठा होतोय, तसं मी माझं काम हळूहळू वाढवते आहे.
काही गोष्टी नचिकेतला यायलाच हव्यात त्याबाबत मी पहिल्यापासूनच आग्रही आहे. पोहता येणं, चोखंदळ वाचक असणं, सायकल चालवता येणं, एखादं वाद्य वाजवता येणं आणि रोजच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन असणं हे सर्व मला त्याच्या अंगी बाणवायचं होतं. त्याचबरोबर स्वावलंबी असणं आणि सामाजिक भान असणं ही तर आजची गरजच आहे. ही ध्येये ठेवून मी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक केली. त्याशिवाय त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठीही मी त्याची साथ दिली.
तीन-साडेतीन वर्षांचा असल्यापासूनच मी नचिकेतला नित्यनियमाने पोहायला नेऊ लागले. सुरुवातीला तो खूप रडत असे. पण मी कधी त्याला समजून, गोष्टी सांगून तर कधी रडण्याकडे दुर्लक्ष करून त्याला पोहायला नेत असे. सुट्टीत सकाळी लवकर नेऊ लागले. हळूहळू आमच्याबरोबर आमच्या बिल्डिंगमधली इतर मुलेही पोहायला येऊ लागली. पाहता पाहता सर्वानाच छान पोहता येऊ लागले! पहिल्या, दुसऱ्या मजल्यावरून उडय़ा मारण्यातही त्यांच्या स्पर्धा लागू लागल्या. पाण्यातच पकडापकडी खेळणे, बॉल खेळणे त्यात त्यांना आनंद वाटू लागला. आता तर नचिकेत म्हणतो, ‘‘आई, मी मासा आहे!’’ आता त्याला पोहायला फारच आवडतं.
मी लहान असताना वाचन करायचे, परंतु मी काही नियमित वाचक नव्हते. पण नचिकेत मात्र चांगला वाचक व्हावा यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. लहानपणापासूनच रात्री झोपताना मी त्यासाठी गोष्टीची पुस्तके वाचत असे, विविध गोष्टी सांगत असे. नुसत्या गोष्टीच नाही तर गाणी, कविताही म्हणत असे. मी आणि माझा भाऊ अश्विन, नचिकेतवर गाणी करत असू. स्वत:चे नाव गाण्यात ऐकून तो अतिशय खूश होई. मी जिथे जाईन तेथून त्याच्यासाठी पुस्तके आणते. मुलांच्या मासिकांच्या मालिका लावल्या. वेगवेगळी पुस्तके-इसापनीतीपासून अकबर-बिरबल, कविता, शिवचरित्र, महाभारत कथा, विश्वकोश आणि आता हॅरी पॉटर, वर्ल्ड वॉर अशीही पुस्तके त्याच्यासाठी आणली. सर्व पुस्तक प्रदर्शनास मी नचिकेतबरोबर लहानपणापासून हजेरी लावायचे. हे सर्व करूनही ९-१० वर्षांचा होईपर्यंत तो स्वत: अजिबात वाचत नसे. घराची लायब्ररी झाली तरी स्वत: वाचायची गोडी लागेना. माझ्याकडूनच पुस्तकं वाचून घ्यायचा तो. मी माझ्या समुपदेशक मैत्रिणीशी चर्चा केली. ती म्हणाली, ‘‘नचिकेत १० वर्षांचाच आहे ना? मग काय? असेच रात्रीचे वाचन सुरू ठेव. पुस्तके घेत राहा. हळूहळू त्याला वाचायची आवड नक्की लागेल.’’ नचिकेत जसजसा मोठा होत गेला तसे आमचे रात्रीचे वाचन बंद झाले, कारण शाळा सकाळी लवकर. मग मी आमच्या एकत्र वाचनासाठी शुक्रवार आणि शनिवारची रात्र निवडली. दुसऱ्या दिवशी लवकर शाळा नसल्याने रात्री आरामात वाचन, गप्पागोष्टी, शाळेतील घडामोडी, मित्रमैत्रिणी अशा वेगवेगळय़ा विषयांसंबंधी आम्ही बोलतो. कधी रात्री १२ तर कधी रात्री १ वाजेपर्यंतही गप्पा होतात. या सर्व मेहनतीचे फळ आता मला मिळत आहे. नचिकेत आता हाडाचा वाचक झाला आहे. त्याचा वाचनाचा वेगही छान वाढला आहे. आता आम्ही दोघेही रात्री आपापली पुस्तके वाचत वाचत झोपतो.
नचिकेतवर लहानपणापासूनच मी पूर्ण विश्वास टाकला, आणि त्यालाही त्याची जाणीव करून दिली. तो स्वावलंबी व्हावा त्यासाठी प्रयत्न केले. त्याचा आत्मविश्वास वाढायला आवश्यक आणि पोषक असे आनंदी व सुरक्षित वातावरण घरात होतेच. म्हणूनच ७ वर्षांचा असल्यापासून तो वेगवेगळय़ा शिबिरांसाठी आनंदाने जातो. पहिल्याच वर्षी म्हणजे ७ वर्षांचा असताना आळंदीला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एक आठवडय़ाच्या शिबिरात राहून आला. या वर्षी तर तो चक्क एक महिना पोर्तुगालला आंतरराष्ट्रीय शिबिराला जाऊन आला. त्या एक महिन्याने त्याचा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे. तसेच कुठेही राहण्यासाठी जमवून घेणेही छान शिकला आहे. चांगले काय, वाईट काय याचेही भान त्याला त्या एका महिन्याने शिकवले आहे.
मुलगा आहे म्हणून घरातली कामे न करण्याची मी त्याला कधीच मुभा दिली नाही. स्वयंपाकही शिकवला. तेव्हा घरी एकटा असला तरी स्वत: काहीतरी बनवून नक्कीच खाऊ शकतो. त्याच्या आवडीचे नूडल्स, पिझ्झा, पास्ता, सँडविचेस हे तो नेहमीच बनवतो. पोर्तुगाललाही तो ज्या कुटुंबात राहत होता त्या सर्वासाठी त्याने एकटय़ाने पुलावही बनवला होता! आम्ही कधी कधी एकत्र केक बनवतो, तर कधी बिस्कीट, तर कधी चॉकलेट्सही. तो माझ्या आईला पुरणपोळय़ा करण्यासही आवडीने मदत करतो.
विज्ञानाची नचिकेतला गोडी लागावी म्हणून मी विशेष प्रयत्न केले. दररोजच्या जीवनातही विज्ञान प्रत्येक ठिकाणी असते. म्हणूनच त्याची वैज्ञानिक बैठक भक्कम व्हावी, कशावरही आंधळी श्रद्धा न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच जगावे अशी माझी इच्छा असणे स्वाभाविकच, नाही का? माझे वडीलही डॉक्टर व आईही विज्ञानाची पदवीधर. त्यामुळे घरातील वातावरणही पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले. या पोषक वातावरणात नचिकेतला विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच विज्ञान शिकण्यातही आजी-आजोबांचा सिंहाचा वाटा.
म्हणूनच सहावीत असताना मी नचिकेतला होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षेला बसवले. अभ्यास करण्यासाठी घरी जणू छोटी प्रयोगशाळाच बनवली. स्वयंपाकघरही आमची प्रयोगशाळा झाली. रोज नवीन प्रयोग करायचे. नियमितपणे किराणा दुकानात जाऊन धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळं यांची ओळख झाली. आमच्या भागातली सर्व झाडे, पाने, फुले यांचीही यानिमित्ताने ओळख झाली. मी सर्जन असल्याचा फायदा घेतला. हॉस्पिटलमध्ये नेऊन पॅथॉलॉजी म्युझियम दाखवले. तेथे जतन केलेले मानवी अवयव, हाडांचे सांगाडे बघून त्याच्या बऱ्याच संकल्पना स्पष्ट झाल्या. मायक्रोस्कोपखाली रक्तपेशी, जिवाणू दाखवले. अशा तऱ्हेने अभ्यास करताना त्यालाही खूप मजा वाटे. त्याच्याबरोबर हा अभ्यास करताना मी माझं आईपण पूर्ण आनंदाने जगले. त्या वैज्ञानिक वाटचालीत, आम्हाला त्याचे शिक्षक राहुल ओगले आणि डॉ. मानसी राजाध्यक्ष यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्या सर्वाचा परिणाम म्हणजे नचिकेतला बालवैज्ञानिक स्पर्धापरीक्षेत गोल्ड मेडल मिळाले! त्यानंतर जी नॉर्थ-साऊथ स्तरावरील प्रश्नमंजूषेमध्येही तो पहिला आला! परंतु प्रत्येक वेळी आपण जिंकणार नाही हे समजणंही अतिशय महत्त्वाचं. माझ्या वागण्यातून त्याला नकार पचवायलाही शिकवलं. कुठे तरी अपयश हे येणारच आणि ते पचवण्याची ताकदही हवी. भावनिकदृष्टय़ा खंबीर होण्यासाठी मी त्याला सर्वतोपरी मदत करते आहे. मनाने सबळ होण्यासाठी अनुकूल असे प्रेमाचे, आनंदाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण माझ्या घरात नक्कीच आहे.
मनाबरोबरच शरीरानेही प्रबळ होण्यासाठी नचिकेत सकाळी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करतो, ते थोडं जबरदस्तीनेच. व्यायामाचं आणि प्राणायामाचं महत्त्व पटलं असलं तरी ते वळत नाही आहे. पण मला खात्री आहे की थोडं मोठं झाल्यावर त्याला त्याचं महत्त्व पटेल.
त्या सर्वाबरोबर त्याला सामाजिक भान येण्याचीही गरज आहे हे ओळखून त्यांनी विविध जंगलांची सैर घडवली. ताडोबा, रणथंबोर, बांधवगड या जंगलांतून फिरून आलो. मसूरीला गेलो तेव्हा झाडे लावली. कधी गावातल्या शाळेला भेट दिली, तर कधी वरळी सीफेसवरील मुलांना फळे वाटली.
हे सर्व करत असतानाच नचिकेत सायकलही शिकला. अधेमधे ड्रॉइंग, नाच, गिटार, कराटेही शिकून झालं. ज्या गोष्टी फार आवडल्या नाहीत त्या त्याने थोडय़ाच काळात सोडूनही दिल्या, परंतु त्यायोगे वेगवेगळय़ा गोष्टींची तोंडओळख झाली. तसेच टेनिस, फुटबॉलचेही आहे. सध्या तो स्पॅनिश भाषाही शिकतो आहे.
प्रत्येक आई आपल्या कुवतीनुसार आपल्या मुलांसाठी जमेल ते करत असते. मी मला महत्त्वाच्या वाटलेल्या गोष्टी केल्या. खूप काही बाकीही आहेत. माझा नचिकेत अजून फक्त १३ वर्षांचाच आहे. अजून खूप घडणं बाकी आहे..
rajashri19@yahoo.co.uk