ch11देशभक्ती आणि सामाजिक बांधीलकी ही जीवनमूल्यं मानली जातील अशी शाळा सुरू करण्याच्या ध्यासातून विवेक पंडित यांनी ३० वर्षांपूर्वी डोंबिवलीत विद्यानिकेतन ही शाळा सुरू केली आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनेक संस्थांना मदतीचा हात दिला.
चतुरंगच्या यंदाच्या पहिल्याच पुरवणीत याच सदरात भापकर गुरुजींविषयीचा लेख प्रसिद्ध झाला अन् असंख्य दूरध्वनी आले, त्यातील एक फोन होता डोंबिवलीतील विवेक पंडित यांचा! म्हणाले, ‘मी उद्या गाडी घेऊन गुरुजींना भेटायला गुंडेगावला निघालोय, तुम्ही येताय?’ मला जमलं नाही, पण हे सद्गृहस्थ भल्या पहाटे उठून सात तासांचा प्रवास करून गुंडेगावला गेले, गुरुजींना भेटले. त्यांनी श्रमदानाने केलेले सर्व रस्ते बघितले आणि येताना गुरुजींचं पडकं घर बांधण्यासाठी त्यांच्या हातात रोख रक्कम देऊनच परतले. आल्या आल्या एक भक्कम काठी कुरियरने गुंडेगावला पाठवली. एवढय़ावरच हा माणूस थांबला नाही तर त्यानंतर फोनद्वारे सतत पाठपुरावा करून व वाळू, सिमेंटसाठी नगरच्या असिस्टंट कमिशनरला गळ घालून जेव्हा गुरुजींच्या घराचं काम सुरू झालं तेव्हा ते निश्चिंत झाले. आता पुढच्या ट्रीपला बरोबर नेण्यासाठी गुरुजींच्या पायाच्या मापाच्या डॉक्टर्स सोल असलेल्या बुटांची खरेदी झाली आहे.
अगदी अकल्पितपणे झालेल्या या परिचयाचा मागोवा घेत मी डोंबिवलीत पोहोचले आणि एक समर्पित जीवनकहाणी उलगडत गेली. देशभक्ती आणि सामाजिक बांधीलकी ही जीवनमूल्यं मानली जातील, अशी शाळा सुरू करण्याच्या ध्यासातून विवेक पंडित यांनी ३० वर्षांपूर्वी डोंबिवलीत विद्यानिकेतन ही शाळा सुरू केली आणि आपलं स्वप्न साकार करताना विद्यानिकेतन ट्रस्टच्या माध्यमातून अनेक संस्थांना मदतीचा हात दिला. सरांचं आजवरचं योगदान पाहताना ऐसी कळवळय़ाची जाती, करी लाभावीण प्रीती.. ही उक्ती आठवत राहते.
८०-८५ चा काळ. विवेक विनायक पंडित नावाचा तरुण उच्च शिक्षण घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून व्यवसाय करत होता. पत्नी बँकेत नोकरीला होती. छान चाललं होतं सगळं. पण शैक्षणिक क्षेत्रात नवं काही तरी करण्याची जिद्द मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. राष्ट्रप्रेम शिकवणारी, चांगले नागरिक घडवणारी संस्कारक्षम शाळा उभी करण्याची पतीची तळमळ पाहून पत्नीने, शिल्पाने संसाराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचलली आणि १६ जून १९८५ रोजी २२ मुलांना घेऊन भाडय़ाच्या जागेत विद्यानिकेतनचा पहिलीचा वर्ग सुरू झाला.
डोंबिवलीच्या मानपाडा भागातली विद्यानिकेतनची आजची टुमदार इमारत ज्या ४-५ एकर जमिनीवर उभी आहे ती जागा टप्प्याटप्प्याने घेताना सरांनी स्वत:चे दोन प्लॉट विकून पैसे उभे केले. शिक्षण, शिस्त व संस्कृती यावर आधारलेल्या या रोपटय़ाचं बघता बघता वटवृक्षात रूपांतर झालं. आज एकूण २६०० विद्यार्थिसंख्या असलेल्या या शाळेत आता के.जी. वर्गाच्या २०० जागांसाठी तिपटीहून जास्त अर्ज येतात. मुलांसाठी तरण तलाव, बास्केटबॉल, खो-खो, फुटबॉल यांसाठी स्वतंत्र्य मैदानं, बॅडमिंटन टेबलटेनिससाठी इनडोअर स्टेडियमची व्यवस्था आणि सभोवार वड, पिंपळ, चिंच, नारळ अशा वृक्षांची गर्द छाया. बघताच प्रेमात पडावं, अशी ही शाळेची वास्तू.
इंग्रजी माध्यम पण भारतीय संस्कार या पायावर उभ्या असलेल्या या शाळेत देणगी न घेता, कमीत कमी फी आकारून (महिना ९७० रुपये) पंडितसरांनी उपक्रम सुरू केले. विद्यार्थी व शिक्षकांसाठी विनामूल्य बससेवा (१३ बसेस), संमेलन व सहलींसाठी वेगळा आकार नाही. प्रत्येक वर्गात डिजिटल लर्निग सिस्टीम, चौथीपर्यंतच्या मुलांना विनाशुल्क आरोग्यदायी नाश्ता, सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा, वाढदिवसाला मुलांचे औक्षण, अध्ययन- अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग, आजी-आजोबा संमेलन, परिसरातील रस्त्यांची विद्यार्थ्यांकडूनच देखभाल, गुरुपौर्णिमेला सर्व धर्मग्रंथांचं पूजन. अशा चाकोरीबाहेरील अनेक उपक्रमांद्वारे विद्यानिकेतनने डोंबिवलीकरांच्या मनात आदराचं स्थान मिळवलंय.
पंडितसर म्हणाले, ‘आमच्या अडीच हजार मुलांना सहलीला न्यायचं म्हणजे प्रत्येकी २०० रुपये खर्च धरला तरी पाच लाख रुपयांची तरतूद करावी लागते. पण कारगिल युद्धाच्या वेळी मुलांशी बोललो आणि त्यांच्या संमतीने त्या वर्षांच्या ट्रीपचे पैसे आम्ही आर्मी रिलीफ फंडाला पाठवले. दरवर्षी विद्धार्थ्यांकडून मूठ मूठ धान्य गोळा करून ते आदिवासी भागात पोहचवण्यामागेही मुलांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी हा हेतू.
२६ जुलै २००५ च्या प्रलंयकारी पावसाच्या तडाख्यात कल्याण तालुक्यातील रायता, आणे, म्हारळ, कांबा, वरप, आपटी-चोण, ओझली वसद अशा अनेक गावांत १५ ते २० फूट पाणी साचल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. या भागातील संपर्क यंत्रणाही पूर्ण ठप्प होती. अशा वेळी पंडितसर व त्यांच्या टीमने पुरात अडकून पडलेल्या अनेकांचे प्राण वाचवले. मृतदेह घराबाहेर काढले. पूर ओसरल्यावर पूरग्रस्तांच्या घरोघर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. शुद्ध पाणी व औषधं पुरवली. विद्यार्थ्यांसाठी दहा हजार वह्य़ा पंचायत समितीकडे सुपूर्द केल्या. या योगदानाबद्दल कल्याण पंचायत समितीने विद्यानिकेतन ट्रस्टचा मानपत्र देऊन सन्मान केला.
डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान याचे स्मरण राहावे यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने २००७ साली धरडा सर्कल भागात एक स्फूर्तिस्थळ उभारलं खरं, पण योग्य देखभालीअभावी दोन-तीन वर्षांतच या स्मारकाला अवकळा आली आणि स्फूर्तिस्थळाला गर्दुले, भिकारी व प्रेमीयुगलं यांचा वेढा पडला. स्फूर्तिस्थळाची ही दैन्यावस्था पाहून पंडितसरांनी महानगरपालिकेकडे विद्यानिकेतनतर्फे स्मारक देखभालीची परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. अखेर जुलै २०१४ ला संमती मिळाली आणि अवघ्या ६-७ महिन्यांतच या स्मारकानं कात टाकली. बंद पडलेले सगळे दिवे सुरू झाले. पंख्यांची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण परिसरातील पेस्ट कंट्रोल, सभोवती तारांचं कुंपण, रणगाडय़ाच्या दर्शनी भागाची दुरुस्ती, स्फूर्तिस्थळाच्या भिंतींवर जंगलाच्या चित्रांचं रेखाटन, देशभक्तिपर गीतांची ध्वनियंत्रणा अशा कामासाठी आजवर चार लाखांवर खर्च झालाय. अजूनही बरीच कामं बाकी आहेत. मुख्य म्हणजे परमवीरचक्र मिळालेल्या प्रत्येक जवानाच्या तैलचित्रासमोर उभं राहिल्यावर त्याची वीरकहाणी ध्वनिफितीच्या माध्यमातून ऐकता येईल, अशी व्यवस्था करायचीय. तरीही स्फूर्तिस्थळाचं हे बदललेलं प्रसन्न रूप पाहणाऱ्याच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवतं एवढं निश्चित. अर्थात या उपक्रमासाठी विद्यानिकेतनचे आजी-माजी विद्यार्थी, पालक व डोंबिवलीतील जागरूक नागरिक यांचं अमूल्य सहकार्य मिळाल्याचं व मिळत असल्याचं पंडितसरांनी विनम्रपणे सांगितलं.
जांभूळपाडा येथील स्नेहबंध वृद्धाश्रमाशीही पंडितसरांचे बंध जोडले आहेत. जवळजवळ प्रत्येक रविवारी ते तिथे फेरी मारतात. जाताना गरजेप्रमाणे इलेक्ट्रिशियन, सुतार, गवंडी यांना घेऊन जायचं आणि ती ती कामं करूनच परतायचं हा त्यांचा नेम.
‘राइट टू पी’ हा आता परवलीचा शब्द झालाय. पण कित्येक वर्षे आधीच त्यांनी आपल्या शाळेच्या बाजूला असलेल्या वस्तीला शौचकूप बांधून दिलंय.
डोंबिवली स्टेशनच्या पूर्वेला अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरील एका इमारतीच्या तळमजल्यावर गेली अनेक वर्षे सर राहतात. त्यांच्या या घराचा हॉल म्हणजे विद्यानिकेतनचं बिनभाडय़ाचं ऑफिस. का तर.. नोकरीवरून घरी परतणाऱ्या पालकांना सरांना भेटणं सोपं पडावं म्हणून. मुख्य म्हणजे ही घुसखोरी घरच्या मंडळींनी चालवून घेतली आहे. आणखी एक.. उभं आयुष्य शाळेसाठी व समाजासाठी वाहून घेतलेल्या आणि गेल्या ३० वर्षांत स्वत:साठी एक पैदेखील न घेणाऱ्या या अवलियाला जगाच्या कल्याणासाठी मुक्त ठेवणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीलाही मानायलाच हवं. नाही का?
 संपदा वागळे -waglesampada@gmail.com
विवेक पंडित यांचा ई-मेल -vidya.niketan.school@gmail.com
मोबाइल – ८१०८०५११९९
वेबसाइट – http://www.vidyaniketan.net

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण