News Flash

चित्रकर्ती : ‘पोटोचित्रां’चा ‘माया उत्सव’

भिंतींवर किंवा लांब कापडी गुंडाळ्यांवर चित्रं रंगवून पारंपरिक कथाकथनासाठी त्याचा वापर करण्याची लोककला देशात ठिकठिकाणी दिसते.

पश्चिम बंगालमध्ये ‘पोटोचित्र’ या नावानं ओळखली जाणारी ही चित्रशैली काळानुसार बदलली आणि आधुनिक वापरातील वस्तूही या पटचित्रांनी सजल्या.

प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

भिंतींवर किंवा लांब कापडी गुंडाळ्यांवर चित्रं रंगवून पारंपरिक कथाकथनासाठी त्याचा वापर करण्याची लोककला देशात ठिकठिकाणी दिसते. पश्चिम बंगालमध्ये ‘पोटोचित्र’ या नावानं ओळखली जाणारी ही चित्रशैली काळानुसार बदलली आणि आधुनिक वापरातील वस्तूही या पटचित्रांनी सजल्या. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या कलेतील स्त्रियांचा सहभागही लक्षणीयरीत्या वाढला. आज जमेला खाला ही पटचित्रकर्ती पौराणिक विषयांबरोबरच सामाजिक विषयांवरही ही चित्रं रेखाटते, तर स्वर्णा चित्रकारसारखी चित्रकर्ती जागतिक स्तरावर आपल्या पटचित्रांचं प्रदर्शन आणि सादरीकरण करते.

‘नया गाव’ म्हणजे चित्रकारांनी चित्रकारांसाठी वसवलेलं चित्रकारांचं गाव. सारंच कसं चित्रमय. स्वच्छ परिसर, घराच्या भिंतींवर रंगवलेली सुंदर चित्रे. प्रत्येक भिंत म्हणजे स्वतंत्र कॅनव्हासच जणू!  हे गाव पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्य़ात आहे. हेच ‘पोटेरग्राम’ म्हणजे पटुआंचे गाव बंगालमधील ‘पटचित्र’ या लोकचित्रकलेचं मध्यवर्ती कें द्र आहे. ‘पोटोमाया उत्सव’ इथे दरवर्षी साजरा होतो. पटचित्राचा अर्थ कापडावरील चित्र. हे चित्र रंगवणारा चित्रकार म्हणजे ‘पटुआ’. बंगालीमध्ये पटचित्राचा उच्चार ‘पोटोचित्र’ असा करतात. अजितकुमार मुखर्जी यांनी ‘Folk Art of Bengal’ या पुस्तकात बंगालच्या पटचित्रांचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो, असं नमूद केलं आहे. तसंच बनकु रा जिल्ह्य़ातील काही मंदिरांमधील भिंतींवर  पटुआ शैलीची चित्रं आढळतात, असंही ते म्हणतात.

बंगालच्या सांस्कृतिक कलापरंपरेत पटचित्र ही महत्त्वाची लोकचित्रकला आहे. या पटचित्राबरोबर गाणं म्हणण्याची सांस्कृतिक परंपराही आहे. त्याला ‘पटुआ संगीत’ म्हणतात आणि हे संगीत बंगालचं लोकसंगीत म्हणून ओळखलं जातं. पारंपरिक कथा आणि नैसर्गिक रंगांचा वापर ही या पटचित्रांची वैशिटय़ं आहेत. दुर्गा उत्सवात देवीच्या प्रतिमेमागे पाश्र्वभूमीला ही चित्रं काढली जातात. या दुर्गापटामध्ये मध्यभागी दुर्गादेवीचं चित्रण आणि आजूबाजूला इतर देवतांचं चित्रण असतं.

‘नया गाव’मध्ये २०१० पासून दरवर्षी ‘पोटोमाया उत्सव’ (Pot Maya) साजरा होतो. ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसांत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय उत्सवाचं आयोजन युरोपियन संघाच्या मदतीनं होतं. गावकरी दरवर्षी नव्या चित्रांनी घराच्या भिंती रंगवतात, दोरीवर पटचित्रं टांगून प्रदर्शित करतात. अनेक परदेशी पाहुणे या काळात कोलकात्यापासून तीन तासांच्या गाडीच्या प्रवासानं इथे येतात. चित्रकारांच्या घरात किंवा तंबूत राहातात. यातून चित्रकारांना आर्थिक मदत मिळते. इथे राहण्यासाठी हॉटेल्स नाहीत. या काळात पिंगळा येथील या नया गावचं रूप ‘झगझगीत रंगांचं सांस्कृतिक केंद्र’ असं होतं. घराघरात कार्यशाळा सुरू असतात. त्यात परदेशी पाहुणे हस्तकलेतील कलात्मक वस्तू बनवत असतात. नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रात्यक्षिक पाहातात. नृत्य, गायन संध्याकाळपासून सुरू होतं आणि रात्री संपतं. पटचित्र सादरीकरणात तेलाचे दिवे वापरतात. छायाप्रकाशाचा सुंदर खेळ रात्रीच्या अंधारात आकर्षित करतो. चित्र-गीत-संगीताची नशा अनुभवायला या पटचित्रांच्या उत्सवाला भेट द्यायलाच हवी.

पश्चिम बंगाल म्हणजे सांस्कृतिक संपत्तीचं भांडार आहे. परंपरा, लोककला, हस्तकला, उत्सव, ललित कला, साहित्य सगळंच उच्च दर्जाचं. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतननं कला क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांचेच शिष्य पद्मभूषण जामिनी राय यांनी ‘कालीघाट पटचित्रां’पासून प्रेरणा घेऊन आपली शैली निर्माण केली. अतिशय साधं जीवन ते या लोककलाकारांच्या सहवासात जगले. स्वत:ला ‘पटुआ’ म्हणवून घेण्यात त्यांना धन्यता वाटे.  पटुआ आपल्या नावापुढे ‘चित्रकार’ आडनाव असंच लावतात. पटचित्र म्हणजे साधारणपणे वीस फूट लांबीचा, मोठा कापडी पट्टा. साधारणपणे एक ते दीड फूट रुंदी असलेल्या या पट्टय़ात एकामागोमाग एक अशी स्वतंत्र चित्रचौकट असते आणि कथेतील एक-एक प्रसंग चित्रित केलेला असतो. अशा प्रकारे ती कथा पुढे पुढे जाते. याला गुंडाळीपट (‘स्क्रोल’) म्हणता येईल. याला बंगाली भाषेत ‘जोरनापट’ म्हणतात. दुसरा असतो चौकोनी पट. यात अगदी पोस्टकार्डाच्या आकारापासून मोठय़ा आकारापर्यंतचं चित्र असतं. चौकोनी पटामध्ये एक देव किंवा एक देवता अथवा एखादा पौराणिक प्रसंग रंगवलेला असतो. या चित्रासोबत गाणं म्हणण्याचा प्रघात नाही. लवकरात लवकर विक्री करून पैसे मिळवणं हा व्यावसायिक उद्देश असतो. दुर्गा, राम, गणेश, कार्तिकेय, सरस्वती, लक्ष्मी, महिषासुरमर्दिनी हे या चित्रांचे विषय असतात.

आदिवासी पटचित्र, मेदिनीपूर पटचित्र, कालीघाट पटचित्र असे या चित्रांचे प्रकार आहेत. यातली कालीघाट पटचित्र शैली जामिनी राय यांनी विकसित केली. पटचित्र हा मोठा ठेवा समजला जातो. लिखित आणि मौखिक पद्धतीनं महाकाव्यं जपली गेली आहेत. पटचित्राच्या गुंडाळ्या सोबत घेऊन गावोगाव, दारोदार जाऊन ‘पटुआ’ लोकांच्या मागणीनुसार कथा सांगतात आणि त्याचं मूल्य लोक देतात. धार्मिक प्रसंग, घरात लग्नकार्य, बालकाचा जन्म अशा शुभकार्यावेळी पटचित्रगान होतंच, पण घरातील मृत्यूप्रसंगीही ‘जादुआ पट’ गान होते. यात मृत व्यक्तीचं चित्रण केलेलं असतं, पण तिच्या चेहऱ्यावर पटुआ त्याला जोपर्यंत मनासारखे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत डोळे रंगवत नाही. डोळे रंगवले की मृतात्म्याला स्वर्गात स्थान प्राप्त होतं, असा त्यांचा समज आहे. या डोळे रंगवण्याच्या कृतीला ‘चोखूदान’ असं म्हणतात.

गुंडाळीपटाची लांबी ४ ते १२ फुटांपर्यंत (जास्तीतजास्त २० फूट) असून रुंदी एक ते दीड फूट असते. कापडाचे दोन तुकडे- प्रारंभी एक आणि शेवटी एक असे जोडले जातात. गुंडाळून ठेवता यावं, उघडता आणि बंद करता यावं यासाठी त्यांचा उपयोग होतो. कथा सांगताना पट हळूहळू गुंडाळता यावा यासाठी सुरुवातीला एक आणि शेवटी एक अशा बांबूच्या काठय़ा बसवतात. कागदाच्या एका बाजूला चित्र काढल्यावर मागील बाजूस गोंदाच्या साहाय्यानं पातळ साडीचा कपडा चिकटवतात. चित्र टिकावं म्हणून उन्हात वाळवलं जातं. पूर्वी ज्यूटचं कापड आणि बेलफळाच्या गोंदाचा वापर करीत. नैसर्गिक रंग तयार करताना तांदूळ भाजून त्यापासून किंवा काजळीचा काळा रंग, गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून निळा, पांढरा चुनखडीच्या भुकटीपासून, सिंदूरपासून लाल रंग, ओल्या हळदीपासून पिवळा, सागाच्या पानांपासून तपकिरी रंग बनवतात. मातीच्या वाटय़ा किंवा करवंटीत रंगमिश्रण करतात. बकऱ्यांच्या पोटावरील केस, मुंगूस, खार यांचे केस कुंचल्यासाठी वापरतात.

पूर्वी फक्त रामायण, महाभारत हे कथाविषय असत. प्रामुख्याने पुरुष चित्रकार असत. आता स्त्रियांचा सहभाग लक्ष वेधणारा आहे.

स्वर्णा चित्रकारसारखी चित्रकर्ती जागतिक स्तरावर आपल्या पटचित्रांचं प्रदर्शन आणि सादरीकरण करते. समकालीन विषयांवर गाणी रचून त्यातून जनजागृतीचा प्रयत्न करते. भ्रूणहत्या, एड्स, वृक्षारोपण, स्वच्छतेच्या सवयी, ‘कोविड’ या विषयांवर पटचित्रगान सादर करते.

आता पटचित्रकार निव्वळ पटचित्र न करता इतर वस्तूही कलात्मकतेनं बनवतात. मातीच्या फुलदाण्या, काचेचे कंदील, काचेच्या बाटल्यांवर पटचित्रातील काही आकार- फुलं, पक्षी, प्राणी, मासे, देवदेवता आदी रंगवून सौंदर्यपूर्ण बनवतात.

‘रांगामाटी’सारखा प्रकल्प त्यांना उत्तेजन देत असतो. संजय गुहोठाकुरता हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला तरुण. या चित्रकारांना सन्मानानं जगता आलं पाहिजे, त्यांच्या कलाकृतीला योग्य मूल्य मिळालं पाहिजं यासाठी आणि तळागाळातील चित्रकार स्त्रियांना सक्षम करण्यासाठी संजय हे ‘रांगामाटी’ प्रकल्प राबवत आहेत. विशेष म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील चांगली नोकरी सोडून ते हे काम करत आहेत. हे चित्रकार शहराबाहेर दूर गावांमध्ये राहतात. त्यांच्या जीवनपद्धतीला धक्का न लावता पारंपरिक कलानिर्मितीची पद्धत, साधनं तशीच ठेवून त्यांनी केलेल्या कलाकृतींना बाजारात चांगली किंमत मिळवून द्यायची आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायची हा त्यांचा हेतू. ‘रांगामाटी’च्या कलावंताची कलाकृती पर्यावरणपूरक (‘इकोफ्रेंडली’) असावी यासाठी ते कटाक्षानं लक्ष देतात. हातमागावर सूती आणि रेशमी साडय़ा विणतात, कांथा पद्धतीचं सुंदर भरतकाम वस्त्रं, कुर्ती, दुपट्टा यावर करतात, साडय़ा,     टी-शर्ट, पर्सेस अशा विविध वस्तूंवर पटचित्रकार चित्रं रंगवतात.

‘रांगामाटी’शी अनेक चित्रकार, विणकर जोडलेले आहेत. जमेला खाला चित्रकार ही अशीच एक ‘रांगामाटी’ची चित्रकर्ती. त्या पिंगळा येथील नया गावमध्ये राहतात. गरिबीची परिस्थिती अजूनही आहे. त्यांचे वडील मातीच्या सुंदर अशा छोटय़ा मूर्ती बनवीत. त्यांचं नाव पुलीन चित्रकार. त्यांना ‘रवींद्रभारती’ आणि इतरही पुरस्कार मिळाले होते. छोटी जमेला सतत वडिलांबरोबर असे. रंग बनवणं, गोंद बनवणं, पटचित्राचा पट बनवण्यासाठी मदत करणं अशी कामं ती करत असे. गावोगावी वडिलांबरोबर पटचित्रं घेऊन सादरीकरण करायला जाई. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचा विवाह झाला. जमेला यांचे पतीही उत्तम पटचित्रकार होते आणि थोर भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक असलेले बंगालचे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनावरील पटचित्रं काढण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पतीकडून जमेला विविध तंत्रं शिकल्या. लग्नानंतर आठ वर्षांतच त्यांना वैधव्य आलं आणि तीन मुलांना घेऊन त्या माहेरी परतल्या. वडिलांच्या प्रेरणेनं पटचित्र करू लागल्या. ‘यमराज’ हे पहिलं चित्र वयाच्या चोविसाव्या वर्षी विकलं गेलं. त्या वेळी त्यांना बाराशे रुपये मिळाले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला.

जमेला खाला पटचित्रं तर रंगवू लागल्याच पण विशेष म्हणजे एका मोठय़ा दुर्गापूजा उत्सवाचं काम त्यांनी केलं. त्यात १५ फूट उंची आणि सात फूट रुंदी असलेली मोठमोठी पटचित्रं त्यांनी रंगवली. चार ते पाच महिने आपल्या दोन विवाहित चित्रकार मुली, मुलगा, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांना घेऊन त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन काम पूर्ण केलं. त्या कामाला तीन पुरस्कार मिळाले. त्यांच्या कन्या दीपिका चित्रकार आणि लतिका चित्रकार ही परंपरा मनापासून जपत आहेत. त्या काचेच्या बाटल्या, काचेचे कंदील, साडय़ा, टी-शर्ट अशा विविध वस्तूंवर काम करतात. जमेला खाला आता मुला-नातवंडांत रमल्या आहेत. ‘रांगामाटी’ प्रकल्पामुळे थोडं आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. त्या म्हणतात, की बालपणापेक्षा आताचं जीवन खूप चांगलं आहे. लहानपणी अन्नासाठी, जुन्या कपडय़ांसाठी हात पसरावा लागे. गावोगावी पायपीट करून वडील पटचित्रं विकत. त्याच्या बदल्यात धान्य मिळत असे.

पूर्वी फक्त पौराणिक कथा हाच पटचित्रांचा मुख्य विषय असे. आता जमेला खाला अनेक सामाजिक विषयही चित्रित करतात. ‘करोना’मध्ये घ्यायची काळजी या विषयावर पटचित्रांतून पटुआगानमधून लोकजागृती करतात. ‘रांगामाटी’साठी सुंदर साडय़ाही रंगवतात. विशेष म्हणजे त्या मुस्लीमधर्मीय असूनही चित्रं हिंदू धर्मातील विविध विषय रंगवतात. ही परंपरा अनेक पिढय़ा चालली आहे. नया गावमधील चित्रकार रोज नमाज अदा करतात. जमेला  मुस्लीमधर्मीय असूनही त्यांनी दुर्गापूजा सजावटीचं काम केलं आहे. कलावंताचा दृष्टिकोन व्यापक असतो. जात, पात, धर्म याहीपेक्षा त्याच्या दृष्टीनं कलानिर्मिती महत्त्वाची असते हेच खरं! पुरुषांचं वर्चस्व असलेल्या पटचित्रकलेत आता स्त्रियाही उत्कृष्ट काम करत आहेत ही बाब आनंददायीच.

(या उत्सवात सहभागी व्हायचं असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे- ‘नया गाव’ पिंगळा- तालुका मोहनपूर- जि. प. मेदिनीपूर- पश्चिम बंगाल).

विशेष आभार
संजय गुहोठाकुरता-कोलकाता, सिद्धेश शिरसेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:56 am

Web Title: pattachitra or patachitra chitrkati dd70
Next Stories
1 महामोहजाल : धोकादायक ‘लिंक्स’
2 सायक्रोस्कोप : लोक काय म्हणतील?
3 पडसाद : अंधारलेल्या कोपऱ्यावर उजेड टाकणारा लेख
Just Now!
X