27 May 2020

News Flash

आव्हान पालकत्वाचे : एक ‘गलेलठ्ठ’ समस्या

‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)’हा विकार दर दहांत एका मुलीमध्ये दिसून येतो

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)’हा विकार दर दहांत एका मुलीमध्ये दिसून येतो. यात गरजेचं असतं ते ‘वजन कमी करणं व कमी ठेवणं. उर्मिलाच्या आईबाबतही ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम’ हेच निदान अनेक वर्षांपूर्वी केलं गेलं होतं. तरीही त्यापासून सावध राहणं त्यांना सुचलं नाही. आणि मग गलेलठ्ठ असण्याचे जे काही परिणाम असतात ते तिला भोगावे लागले.. काय टाळता येईल यासाठी..

रणदिवे पती-पत्नी दोघेही गलेलठ्ठ. दोघांचंही वजन आज शंभर किलोपेक्षा जास्त. सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं तेव्हासुद्धा दोघे स्थूलच होते, पण आज त्यात सुमारे वीस किलोंनी भर पडली होती. लग्नानंतर मूल होण्यास त्यांना काही वर्ष गेली. पत्नी नियती हिला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)असल्याचं निदान झालं होतं. त्यासाठी बऱ्याच उपाययोजना करत-करत सात वर्षांनी त्यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर दोन वर्षांत त्यांना मुलगा झाला.

पती-पत्नी दोघांनाही खाण्यापिण्याचं भलतं वेड. मुलांनाही घरात तेच वातावरण मिळाल्याने दोन्ही मुलेसुद्धा स्थूल होत गेली. शेजारच्या घरात राजकीय नेते सामंत राहत असत. त्यांच्याकडे सतत लोकांची वर्दळ असे. त्यांच्या घरात नियमितपणे येणाऱ्या मिठायांचे डबे शेजारीच असलेल्या रणदिवेंच्या घरी सतत पाठवले जात व समस्त रणदिवे परिवार त्याच आनंदाने नियमित व भरपूर खात असे. व्यायामाची आवड नाही. वजनाकडे लक्ष नाही. अशा खादाड जीवनशैलीमुळे घरातल्या सर्वाची शरीरं स्थूल होत गेली. त्यांची मोठी मुलगी उर्मिला २० वर्षांची झाली तेव्हा तिचं वजन ९० किलो झालं. अति स्थूलपणाव्यतिरिक्त तिला गालांवर मुरमांचा सतत होणारा उद्रेक त्रास देत असे. तिच्या मासिक पाळीमध्ये तर कमालीचा अनियमितपणा होता. शरीरातील या सर्व उणिवांमुळे उर्मिलाच्या मनातली स्वत:ची छबीच (सेल्फ इमेज) खूप वैगुण्यग्रस्त होती. ‘आपण आकर्षक नाही. इतर मुलींप्रमाणे आपण विविध पेहराव घालू शकत नाही. आपलं रंगरूप मुलांना किंवा कुणालाही आवडेल असं नाही. उलट आपल्या स्थूलपणामुळे आपली थट्टा-मस्करीच अधिक होत असते.’ या विचार-विवंचनांमुळे उर्मिला एकटी-एकटी राहत असे. तारुण्यात मुलामुलींमध्ये दिसून येणारा उल्हास व उत्साह तिने कधी अनुभवलाच नाही. उलट सतत साशंक मन:स्थिती, मनावर अनिश्चिततेचं सावट, उदासवाणं असं निगेटिव्ह थिंकिंग (नकारात्मक विचार करण्याची सवय), आत्मविश्वासाचा अभाव व निस्तेज उदासीन चेतना या गोष्टींमुळे उर्मिला आपला विरंगुळा गोड पदार्थ खाण्या-पिण्यात शोधत असे.

‘आपण वजन कमी करू या,’ असं तिच्या मनात अनेकदा आलं, पण त्यासाठी खाण्यापिण्यावर ठेवावा लागणारा ताबा, मनोनिग्रह, व्यायामातला नियमितपणा, चिकाटी तिला कधी जमलीच नाही. शिवाय घरात यासाठी लागणारं वातावरण अजिबात नाही. घरात खाण्यापिण्याची सतत रेलचेल. गोडधोड, तेलकट, तुपकट पदार्थाचा विशेष समावेश. या गोष्टींमुळे वजन कमी करण्याचे सर्व बेत फोल ठरत असत व पुन्हा-पुन्हा ‘अन्नसेवनातून मिळणारा आनंद’ (कम्फर्ट इटिंग) याच एकमेव विकल्पाकडे ती वळत असे. शिवाय घरात पालकांच्या जीवनशैलीमध्येही हाच एक परिपाठ (पॅटर्न) सतत समोर दिसत असल्यामुळे या दुष्टचक्रातून बाहेर येण्याची ऊर्मीच उर्मिलाने जणू काही गमावली होती.

एकदा पाच महिने उर्मिलाला मासिक पाळीच आली नाही म्हणून तिची आई तिला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे प्रथमच घेऊन गेली. स्त्रीरोगतज्ज्ञांनी उर्मिलाला पाहताच प्रथमदर्शनी भुवया उंचावून लगेच एक शेरा मारला, ‘‘या वयात एवढा जाडेपणा? अशाने तुझ्याशी लग्न कोण करणार?’’ शिष्टाचाराच्या दृष्टीने असं चटकन एखाद्याच्या तोंडावर म्हणणं आपण टाळतो पण ‘आपणही गप्प राहिलो तर रुग्णांना हा आरसा कोण दाखवणार?’ असा परखड विचार अनेक डॉक्टर या प्रकारची वक्तव्यं करताना अनेकदा करतात. कुठे तरी रुग्णांनी थोडं आत्मपरीक्षण करावं असाही उद्देश यामागे असू शकतो.

पाच महिने पाळी न आल्याच्या तक्रारीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांनी रीतसर उर्मिलाची तपासणी केली व काही तपासण्या करून घ्यायला सांगितल्या. तपासण्यांचे तमाम रिपोर्ट्स घेऊन स्त्रीरोगतज्ज्ञांशी झालेल्या नंतरच्या भेटीत त्यांनी उर्मिलाला ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम’ हा विकार असल्याचं निदान केलं. या विकाराबद्दल माहिती देताना कसलाही संकोच न बाळगता उर्मिला व तिच्या आईला डॉक्टरांनी एक परखड ताकीद दिली, ‘‘आधी तीस किलो वजन कमी करा, नाही तर या विकाराचा काहीही उपाय होऊ शकणार नाही. कुठल्याही क्षणी तुला मधुमेह उद्भवू शकतो. अंगावर पुरुषांसारखे केस येतील (हिर्सुटिजम), मुरमं (अ‍ॅकने) गालावरच नाही तर शरीरावर इतर अनेक ठिकाणीही येतील. त्वचेवर काळे डाग (अ‍ॅकनॅथोसिस निग्रिकॅन्स) येऊ लागतील आणि उद्या लग्न झालंच तरी मुलं होऊ शकणार नाहीत.’’

डॉक्टरांचं हे स्पष्ट, परखड वक्तव्य ऐकून उर्मिला व तिची आई गांगरून गेले. डॉक्टर असं काही सांगतील याची चाहूल खरं तर दोघींनाही आधीच थोडीशी लागली होती, पण विकाराचं हे असं इतकं भेदक स्वरूप ऐकून दोघींना धक्काच बसला. डॉक्टरांवर विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. त्या शहरातल्या एक ज्येष्ठ व नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. ‘आधी वजन तीस किलो कमी करा.’ डॉक्टरांचं हे विधान उर्मिलाच्या डोक्यात सतत प्रतिध्वनित होऊ लागलं. जिव्हारी घाव लागावा अशीच काहीशी तिची अवस्था झाली. वजन कमी करण्याचे यापूर्वीचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते. आता असं काय वेगळं करावं याचा शोध घेत असतानाच फॅमिली डॉक्टरांनी ‘बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी’ करणाऱ्या एका नामांकित शल्यविशारद डॉक्टरांचं नाव सुचवलं.

‘बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी’ ही एक मोठी म्हणजे ‘सुप्रामेजर’ व जिकिरीची अशी शल्यचिकित्सा मानली जाते, ज्यांमध्ये जठराचा काही भाग कापून ते कायमचं लहान केलं जातं. जेणेकरून रुग्ण केवळ लहान प्रमाणातच अन्नसेवन करू शकतो व त्याचा उपयोग मग वजन कमी करण्यासाठी व कमी ठेवण्यासाठी होऊ शकतो. काही निवडक रुग्णांमध्ये हा पर्याय सुचवला जातो पण उर्मिलाचं वय लहान आहे, ती अजून अविवाहित आहे व तिचं वजन शंभर किलोच्या आत आहे ही वैध आणि वास्तविक कारणं सांगून त्या शल्यविशारदांनी उर्मिलावर ही शस्त्रक्रिया करण्यास सुदैवाने नकार दिला.

शस्त्रक्रियेचं एक संकट टळलं, पण पीसीओएसची मूळ समस्याच इतकी गंभीर होती, की आता त्यावर काय उपाय करावा हा प्रश्न अजून अनुत्तरितच होता. सुदैवाने त्याच शल्यविशारदांनी उर्मिला व बरोबर आलेल्या तिच्या आई-वडिलांना एका समुपदेशन करणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. विषयाचं गांभीर्य आता नीट गवसलं असल्याने रणदिवे कुटुंबीय त्या समुपदेशनतज्ज्ञ डॉक्टराकडे लगबगीने पोहोचले.

समुपदेशनशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या या डॉक्टरांनी उर्मिलाची पूर्ण केस आधी सविस्तरपणे समजून घेतली. तिच्या जन्माआधी तिच्या आईने मूल होण्यासाठी घेतलेल्या उपचारांपासून पासून ते चार दिवसांआधी स्त्रीरोगतज्ज्ञांनी केलेल्या उर्मिलाच्या तपासण्यांपर्यंत तमाम गोष्टींची त्यांनी तपशीलवार विचारपूस केली. उर्मिलाचं लहानपण, घरातलं वातावरण, दिनचर्या, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, स्वत:बद्दल तिच्या मनात असलेल्या धारणा, या व अशा अनेक गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर डॉक्टर जे म्हणाले ते खूपच महत्त्वाचं होतं, ‘ही केस एकटय़ा उर्मिलाची नाही तर पूर्ण रणदिवे परिवाराची आहे. यासाठी उपाय व समुपदेशनही सर्वाचं करावं लागेल.’

रणदिवे परिवारात सर्वच स्थूल होते. कुणालाही नियमित व्यायाम करणं किंवा खातापिताना त्याचे काही नियम-निर्बंध पाळणं याचं महत्त्व व माहिती फारशी अवगत नव्हती. वजन बेसुमार वाढत जाण्यामागचे धोके, त्याचे शरीराच्या विविध भागांवर व त्यांच्या कार्यक्षमतेवर होणारे दुष्परिणाम, आपल्या स्थूलपणामुळे चारी बाजूंनी लोकांकडून सतत मिळणारे अवमानकारक संकेत व प्रतिसाद, त्याचा आपल्यावर होणारा विपरीत परिणाम, या व अशा गोष्टींचं आत्मपरीक्षणात्मक विश्लेषण त्यांनी कुणी कधी केलंच नव्हतं. रणदिवे परिवाराला एकत्रितपणे या तमाम गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं होतं. सर्वाच्या एकत्रितपणे केल्या जाणाऱ्या समुपदेशनामुळे उर्मिलामध्ये ‘यात आपण एकटे नाही आहोत.’ ही (सांत्वनात्मक) भावना जागृत झाली व त्याने ती खोलवर ‘रिलॅक्स’ झाली. या खोलवर रिलॅक्स होण्याला समुपदेशनशास्त्रात खूप महत्त्व दिलं आहे. यामुळे व्यक्तीमध्ये कुठलंही ध्येय गाठण्यासाठी लागणारी सक्षम आत्मप्रेरणा, प्रयत्नांमध्ये टिकवावं लागणारं प्रबळ सातत्य व दृढ चिकाटी जागृत होते. व्यक्ती उत्साहाने एखाद्या ध्येयाला गाठू शकते. समुपदेशनशास्त्रात इंग्रजीमध्ये या प्रक्रियेचा उल्लेख ‘स्टिमुलेटिंग हेल्दी इनर मोटिव्हेशन’ म्हणजेच ‘स्वप्रेरणेची चालना’ असं केलं आहे.

वजन कमी करण्यासाठी आणि अनेक असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी समुपदेशनाचं जे विशेष कौशल्य किंवा तंत्र वापरावं लागतं. त्याचे सर्व नियम व निकष पणाला लाऊन डॉक्टरांनी समस्त रणदिवे परिवाराला नेटाने मदत व मार्गदर्शन केलं. त्यांच्याच केंद्रात असलेले आहारतज्ज्ञ (न्युट्रिशनिस्ट) व घरी येऊन योग्य व्यायाम करवून घेणारे खासगी प्रशिक्षक (पर्सनल ट्रेनर) यांनाही या कामात समाविष्ट करून घेतलं गेलं व पाहता-पाहता आठ महिन्यांत घरातल्या सर्वाचं वजन लक्षणीयरीत्या कमी झालं. शेजारीपाजारी, नातेवाईक, आप्तेष्ट, अशा सर्वाकडूनच कौतुक व प्रशंसांचा वर्षांव होऊ लागला. लोकांच्या प्रोत्साहित करणाऱ्या या सर्व प्रतिक्रियांचा अत्यंत सकारात्मक असा परिणाम रणदिवे कुटुंबीयांवर, अधिकाधिक प्रेरणेसाठी व उत्साहाने प्रयत्नशील राहण्यासाठी होत गेला. नवचतन्याची लाट यावी असा काहीसा जिवंतपणा घरात सर्वानाच जाणवू लागला. दुसऱ्या बाजूला डॉक्टरांशी नियमित होणाऱ्या समुपदेशनातून ही सर्व प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे मॉनिटर होत होती. वर्षभरात कायापालट झाल्याप्रमाणे उर्मिलाचं वजन कमी झालं व ती आकर्षक दिसू लागली. तिची मासिक पाळी आपोआप नियमित येऊ लागली.

गालावरची मुरमं कुठल्याकुठे गायब झाली. त्वचा तजेलदार दिसू लागली. रणदिवे दाम्पत्याचीसुद्धा अनेक वर्ष चालू असलेली रक्तदाबाची व कोलेस्टेरॉलसाठीची (मेद नियंत्रक) औषधं कमी झाली व चक्क लग्नात घातलेला सूट अंगावर सहज चढवता येऊ लागला.

‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)’ हा विकार दर दहांत एका मुलीमध्ये दिसून येतो. त्याचं स्वरूप व तीव्रता प्रत्येक मुलीमध्ये वेगवेगळी असते व म्हणूनच उपाययोजनासुद्धा भिन्न-भिन्न असतात. पण उपाययोजनांच्या या सर्व पर्यायांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे ती म्हणजे ‘वजन कमी करणं व कमी ठेवणं.’

उर्मिलाच्या आईबाबतही ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम’ हेच निदान अनेक वर्षांपूर्वी केलं गेलं होतं. तरीही त्यापासून सावध राहणं त्यांना सुचलं नाही. स्थुलपणाचे असंख्य दुष्परिणाम असतात. केवळ पीसीओएसच नव्हे तर अनेक शारीरिक व मानसिक विकारांचं मूळ उगमस्थान ‘स्थूलपणा’ (ओबेसिटी) हेच असतं. त्यातले धोके समजावे व त्याबाबतची जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानेच हे लिखाण मी केलं.

पालकांच्या सवयी, आवडी निवडी, राहणीमान, जीवनशैली, विचार करण्याची पद्धत, वागण्या-बोलण्यातल्या लकबी, या व अशा अनेक गोष्टींचं नकळत पण काटेकोर निरीक्षण, अनुकरण मुलं सतत करत असतात. हे पालकांच्या आग्रही शिकवणीमधून तर होत असतंच पण त्यापेक्षा अधिक अगदी नकळत निरीक्षणांमधून, अनवधानानेसुद्धा होत असतं याची जाणीव पालकांनी ठेवावी.

घरात जसे संस्कार तसे परिणाम. आपल्या मुलांवर आज ओढवलेली परिस्थिती अनेकदा आपल्याकडूनच कळत-नकळत झालेल्या अनेक संस्कारांमुळे उद्भवलेली असते याचं भान पालकांना ठेवावं लागेल. उर्मिलाच्या केसमध्ये खरोखरच अगदी योग्य वेळी तिला मदत व मार्गदर्शन मिळालं. नाही तर ‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम’च्या अनेक केसेस कशा विकोपाला जातात व त्यांची दारुण शोकांतिका होते याची अनेक उदाहरणं आम्हा डॉक्टरांना आजकाल पाहायला मिळू लागलीत.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:12 am

Web Title: pcos disorder avahan palkatvache article dr rajan bhosale abn 97
Next Stories
1 वेध भवतालाचा :वृक्षांशी जोडून घेताना
2 नात्यांची उकल : सहजीवन आनंदाची गुरुकिल्ली
3 आभाळमाया : तपस्वी शब्दसाधक
Just Now!
X