आज स्त्री जो किंवा जितका काही मुक्त श्वास घेते आहे, तो मिळवण्यासाठी तिला, तिच्या आधीच्या पिढय़ांना खूप काही सोसावं लागलं आहे, खूप काही गमवावंही लागलं आहे. अनेक लढे, संघर्ष, आंदोलनं, चळवळी कराव्या लागल्या आहेत. त्याचाच मागोवा घेणारं हे सदर..
नाचो! खुशियाँ मनाओ!
जो कहते थे की स्त्रियोंका पुस्तक छुना पाप है
वे मर चुके है
जो मूर्ख कहते थे की वे स्त्रियों को
घरो में कैद कर देंगे
वे अब अपनी सूरत नही दिखा सकते।
उन्होंने हमारी जगह घर में दिखाई
जैसे हम कोई बैल हो जो
मुँह बंद करके काम करे
हमने यह सब खत्म कर दिया है
नाचो-गाओ खुशी मनाओ!
‘स्वाधीनता का नृत्य’ नावाची ही मूळ कविता तमिळ कवी सुब्रमण्या भारती यांनी चक्क १९२० मध्ये लिहिली आहे, यावर विश्वास बसेल? स्त्रिया बंडाची भाषा बोलू लागल्या, याचं हे ढळढळीत उदाहरण म्हणावं लागेल. आपल्या पारतंत्र्याची जाणीव होणं ही स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली पायरी आहे आणि शाळेची दारं स्त्रियांसाठी उघडताच स्त्रियांना स्वत:तल्या शक्तीची जाणीव होऊ लागली आहे.
स्त्रियांच्या प्रबोधनाच्या या वळणावर सगळा भारतच खडबडून जागा झालेला दिसतो. १८९० मध्ये आर्य समाजाने जालंधरमध्ये विधवांनाही अविवाहित मुलींबरोबर शाळेत प्रवेश द्यायला सुरुवात केली. लुधियानात शाळेबरोबरच विधवांसाठी आश्रमही निघाला. स्त्रियांना पाकशास्त्र, शिवणकाम, विणकाम, सफाई, संगीत याचेच शिक्षण दिले जात होते, पण निदान दारं तरी थोडी किलकिली झाली हे काय कमी आहे? माई भगवतींनी विशाल जनसमुदायांपुढे निर्भयपणे भाषणे करून हरियाणा दणाणून सोडला.
कलकत्ता (आताचे कोलकाता) तर महाराष्ट्रासारखा सुधारक विचारवंतांचा प्रदेश. नवऱ्याकडून शिक्षण घेतलेली मनोरमा मुजुमदार ब्राह्मो समाजाची १८८१ मधली पहिली धर्मप्रचारक. तीन-चार वर्षे ‘अरे बायकांना कसला हा सन्मान देता?’ अशा गरमागरम चर्चा चालू होत्या, पण मनोरमाने न डगमगता आपले काम चालू ठेवले. १८९०मध्ये कलकत्त्यात पडदा पद्धतीविरोधात ब्राह्मण स्त्रियांनी जनअभियान सुरू केले. शहरातल्या गल्ल्यागल्ल्यांतून त्या गाणी गात फिरत आणि लोक जमले की पडदा पद्धतीच्या वाईट प्रथांबद्दल त्यांचं अनुबोधन करत.
काँग्रेसच्या अधिवेशनात थोडय़ा थोडय़ा बायका हजेरी लावू लागल्या होत्या, पण बोलण्याचं धारिष्टय़ मात्र करत नव्हत्या. पण सन १९०० मधल्या कलकत्त्यातल्या १६व्या काँग्रेसच्या अधिवेशनात कादंबिनी गांगुली यांनी अध्यक्षांचे आभार मानण्याची जबाबदारी पार पाडली. आता वाटतंय, की, कसलं हे एवढंस छोटं काम, पण एवढय़ा जनसमुदायापुढे एका स्त्रीनं उभं राहून चार वाक्यं बोलणं, म्हणजे त्या काळात केवढं धाडस! महाराष्ट्रातसुद्धा रमाबाई रानडे सार्वजनिक सभेत बोलल्या म्हणून केवढा गहजब झाला. घरच्या मोठय़ा स्त्रियांनी तर त्यांना चांगलंच धारेवर धरलं. गुरू रवींद्रनाथ टागोरांची चौथी कन्या स्वर्णकुमारी देवी यांनी १८८२ मध्ये लेडीज थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली, विधवांचं शिक्षण आणि त्यांच्या साहाय्यासाठी ‘सखी समिती’ची स्थापना केली. १८८६ मध्ये स्वत: लेखिका असलेल्या स्वर्णकुमारी १९२९ मध्ये बंगाली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. याबाबतीत मात्र बंगाल नक्की महाराष्ट्राच्या पुढे आहे.
आत्मनिर्भर आणि विद्रोही स्त्री म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते त्या सरला देवी घोषाल (चौधरानी) स्वर्णकुमारींच्या कन्या. त्यांनी २३व्या वर्षीच म्हैसूरच्या कन्यापाठशाळेत नोकरी धरली. सन १८९५मध्ये माझ्या घररूपी कैदेतून मुक्त होऊन पुरुषांप्रमाणेच जीवन जगण्याचा आत्मनिर्भर अधिकार मला सिद्ध करायचा होता, असं त्याचं बाणेदार स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तरुणांनी तलवारबाजी, कुस्ती, मुष्टियुद्ध, मार्शल आर्ट यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांनी अकादमी उघडली. पारंपरिक दुर्गापूजेला त्यांनी शौर्याची जोड दिली. १९०५च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये त्यांच्या सुहृदय समितीने पहिल्यांदा वंदेमातरम् गाऊन इतिहास निर्माण केला.
खरं तर १९०५ पासूनच बंगालमध्ये स्त्रियांनी स्वदेशी आंदोलनात भाग घ्यायला मोठय़ा प्रमाणात सुरुवात केली होती. बंगालच्या फाळणीविरोधातील आंदोलनात स्त्रियांचा मोठाच सहभाग होता. विभाजनाच्या दिवशी कोणत्याही घरात चूल पेटली नाही. आपल्या हातात असलेल्या साधनांचा वापर करून निषेध करण्याची ही कला पुढे कित्येक महिला आंदोलनांनी वापरली. याच वर्षी फेडरेशन हॉलमधील आधारशीला कार्यक्रमात ५०० स्त्रिया सहभागी झाल्या. मुर्शिदाबादमध्ये ‘लक्ष्मीव्रतकथा’ या नावावर ग्रामीण भागातील स्त्रियांच्या मोठय़ा सभा आयोजित करण्यात आल्या. स्वदेशीचं जागरण आणि हिंदू-मुसलमानांमध्ये फोडा-झोडा नीती आचरणात आणणाऱ्यांविरोधात स्त्रियांमध्ये जागृती हाच त्याचा छुपा अजेंडा होता.
नेतेमंडळींच्या नातेवाईक स्त्रियांचा राष्ट्रीय आंदोलनात सहभाग हे साहजिकच आहे, पण मध्यमवर्गीय स्त्रियांनी धनाबरोबर आपले दागदागिने काढून दिले. गावागावातल्या स्त्रियांनी मूठभर धान्य देऊन पोती भरली. विदेशी बांगडय़ा आणि विदेशी कपडय़ांचा त्याग करून स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणात देशाबद्दलची आपली बांधीलकी व्यक्त केली. देशभक्तीचा हा वणवा भारतातल्या कानाकोपऱ्यात पसरत चालला, त्यात बायकांचा मोठा सहभाग होता. ही गोष्टच समाजजीवनात महिला कार्यशील होऊ लागल्याची खूण नव्हती का?
समारंभ हळदी-कुंकवाचा. १२० उच्चवर्गीय ब्राह्मण स्त्रिया पुण्यातल्या एका देवळात जमलेल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी पार्वती बापट. कुमारी भातखंडे, सरस्वती भानू या बायकांनी स्वदेशीच्या प्रश्नावर निबंध वाचले आणि सभेनं ठराव केला की, आजपासून काचेच्या बांगडय़ा नाही घ्यायच्या. खनिज तेलाचा वापर करून बनवलेले चिटाचे कपडे आणि मुलांची खेळणी या युरोपमध्ये तयार केलेल्या वस्तू नाही वापरायच्या! १९०५ मध्ये स्त्रिया असा ठराव करतात, अजून तर स्त्रीशिक्षण ही फार सार्वत्रिक गोष्ट झालेली नाही, तरीसुद्धा बायकांना जाग आलेली आहे, देशाच्या सुखदु:खाशी त्या समरस होऊ लागल्या आहेत. कधी पुरुषांच्या नेतृत्वाखाली तर कधी स्वतंत्रपणे त्या सभा घेऊ लागल्या आहेत, निर्णय घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर सियालकोटमध्ये सुशीलादेवींनी स्त्रियांची एक मोठी सभा भरवली आणि कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांच्या कायदेशीर खर्चासाठी मोठी रक्कम जमा केली. साल होतं फक्त १९०९. पूरनीदेवींनी पंजाबच्या जिल्ह्याजिल्ह्यात दौरे केले आणि बायकांना आवाहन केलं, तुमच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांत जाऊ देऊ नका, त्यांना स्वतंत्र व्यवसाय आणि स्वदेशी वस्तू निर्माण करण्याची प्रेरणा द्या.
मॅडम कामा म्हणजेच भिकाजी कामा यांचं क्रांतिकारक कार्य तर सर्वश्रुत आहे. १९०७ मध्ये स्टुटगार्ट इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये तर त्यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावून स्वातंत्र्याचं समर्थन केलं. ‘वंदे मातरम्’ नावाची पत्रिका १९०९ मध्ये जिनिव्हामध्ये प्रसिद्ध केली. शिक्षण, युद्ध आणि पुनर्निर्माण या त्रिसूत्रीची ओळख स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केली. नाताळच्या भेटीत रिव्हॉल्व्हर लपवून भारतातील क्रांतिकारकांना पाठविण्याची त्यांची धाडसी वृत्ती क्वचितच यापूर्वी कोणी दाखवली असेल. त्यांना देवी कालीचा पुनरावतार मानले गेले यात आश्चर्य वाटायला नको.
 ही तर केवळ एक झलक आहे. प्रत्येक घटनेचे तपशील पाहिले तर हजार पानांचे पुस्तक विसाव्या शतकातल्या फक्त पहिल्या दहा वर्षांचेच तयार होईल. मात्र ही नांदी होती. भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ात गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घराच्या चार भिंतींबाहेर समाजाच्या मध्यप्रवाहात येण्यासाठी रस्त्यावर आलेल्या हजारो स्त्री-सामर्थ्यांची. काही भावनिक आवाहनाने इतक्या स्त्रिया भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सामील झाल्या असे थोडेच आहे? त्यासाठी मागची पन्नास वर्षे पाश्र्वभूमी तयार होत होती. सुधारकांचे अपार परिश्रम आणि स्त्रियांनी त्यांना दिलेला विधायक प्रतिसाद! पुनर्विवाह, स्त्रियांच्या बाजूने झालेले कायदे, स्त्री-शिक्षणामुळे स्त्रियांना स्वत:च्या क्षमतेचे आलेले भान, स्त्रियांची एकजूट, त्यांच्या मनात जागू लागलेले आपल्या देशाचे प्रेम यांसारख्या समाजात नित्यनेमाने घडणाऱ्या गोष्टी स्त्रियांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढू लागल्या होत्या. पुढच्या तीस वर्षांतल्या स्वातंत्र्याच्या चळवळीतील क्रियाशील सहभागाने स्त्रियांना किती तरी नव्या गोष्टींचा प्रकाश दाखवला. स्वातंत्र्यानंतरच्या स्त्रियांच्या अनेक लढय़ांची तयारी या चळवळीने कशी केली हे पुढच्या लेखात वाचायला तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत विस्मृतीत गेलेल्या या अनेक स्त्रियांचे मनापासून स्मरण करू या.    
डॉ. अश्र्विनी धोंगडे –ashwinid2012@gmail.com

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार